थोडा है थोडे की जरुरत है @ 02.07.19

डीमेन्शीया.. नेमका कोणता?

साधारण पाच वर्षांच्या कालावधी नंतर मी काकांना भेटत होतो. माझ्या बालपणापासून त्यांचा सहवास मला लाभला. घराच्या शेजारीच ते रहायचे आणि त्यामुळे त्यांच्या अंगा खांद्यावरच मी खेळलो असे म्हणायला हरकत नाही. काकांचा एक मुलगा माझ्या बरोबरीचा दोन मोठ्या मुली होत्या त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. आम्हा सर्वांची छान मैत्री होती. काका आम्हा सर्वांना सोबत फिरायला वगैरे न्यायचे आणि त्यामुळे त्यांच्या घराशीच छान नाते होते. पुढे मात्र मी दुसऱ्या गावी शिकायला आल्यामुळे संबंध कमी झाले. नंतर नंतर तर भेट होईनाशी झाली. परंतू त्यांच्या परीवाराबद्दल मधून मधून कळत होते. त्यांचा मुलगा जर्मनीला स्थायीक झाला होता. एक मुलगी पुण्याला एक नागपूरला होती. मधेच काही वर्षांपूर्वी काकूंचे देहावसान झाल्याची पण बातमी कळली होती. परंतू त्यावेळी त्यांना भेटलो होतो. परंतू मागच्या महिन्यात काकांच्या भेटीचा पुन्हा योग आला. पुण्याला त्यांच्या मुलीकडे काका राहतात त्यांना मुद्दाम भेटायला मी गेलो होतो. काकांकडे जाताना मला आमच्या त्या गावाला असतानाचे दिवस आठवत होते. आपल्या बालपणाशी संबंधित कुणी आपल्याला भेटल्यास त्या व्यक्तीच्या निमीत्ताने आपल्याला आपले बालपण आठवण्याची संधी मिळते. तसेच काहीसे माझे होत होते. गाडी काकांच्या घराच्या दिशेने जात होती परंतू माझे मन मात्र भूतकाळात रेंगाळत होते.

काकांचे खरे तर या तिन्ही मुलांच्या संगोपनात विशेष योगदान होते. केवळ वडील म्हणून नव्हे तर त्यांना त्यांच्या आईची देखील भुमिका करावी लागे. आमच्या काकुंना फार वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला होता त्यामुळे त्या घरातील मोजकीच कामे करु शकत होत्या. या मुलांच्या शाळेची तयारी करुन देण्यापासून ते त्यांचे डबे भरुन देण्यापर्यंतचे काम काकाच करायचे. त्यांना भटकायला नेणे, त्यांना लहान असताना आंघोळी घालून देणे, त्यांच्याकरीता नवे कपडे आणणे ही सारी जबाबदारी काका मोठ्या आनंदाने पार पाडायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे काकांनी या सर्व कामांच्या बाबत कधीही कुणाजवळही कुरकुर केल्याचे माझ्या स्मरणात नाही. आईची प्रकृती अशी असल्याने ही मुले लवकरच मोठी स्वतंत्र झाली. परंतू त्यानंतर देखील त्यांची शिक्षणे, त्या निमीत्ताने करावी लागणारी मदत हे सारे काकांनी फार मनापासून केले त्यामुळेच आज त्यांची मुले अत्यंत चांगले आयुष्य जगत आहेत. हे सारे विचार काकांच्या मुलीच्या घरी पोहोचेस्तोवर माझ्या मनात सुरु होते. काकांना भेटण्याची उत्सुकता मनाला लागून गेली होती. काकांच्या मनातील त्या गावाच्या आठवणींमुळे आज गप्पांना रंग येणार होता. काकांची मुलगी मला फ्लॅट स्कीमच्या दरवाज्यावर घ्यायला आली. सहाशे फ्लॅट्स असलेल्या त्या परीसरात मला फार शोधाशोध करावी लागू नये म्हणून ती मला घ्यायला आली होती. लिफ्टमधे शिरता शिरता मी तिला विचारले, काका काय म्हणतात? ती मला सहजच म्हणाली, बघ तुला ओळखतात का? मी पटकन म्हणालो, का नाही ओळखणार? केवळ पाच वर्षात काका मला विसरतील का? ती मला जराश्या खिन्न आवाजात म्हणाली, अरे ते मलाच ओळखत नाहीत, तर तुला काय ओळखणार? मला नेमका त्या वाक्याचा अर्थ कळेपर्यंत मी काकांसमोर उभा होतो. ओळख विसरलेल्या कोणतेही निश्चित भाव नसलेल्या नजरेने काका माझ्याकडे बघत होते. त्यांची मुलगी त्यांना विचारु लागली. ओळखा कोण आहे? ते मला ओळखेना, ती पुन्हा विचारायची घरातील सारे जोराजोरात हसायचे. दोन चार वेळा तिने विचारल्यावर त्यांना त्या विचारण्याचा त्रास होत असल्याचे मला जाणवले. मी तिला थांबवले त्यांना शांत बसू द्यायला सांगितले. त्यांच्या मुलीने सारा प्रकार स्पष्ट केला. काय बोलावे ते सुचेना. काकांसोबत माझ्या भूतकाळातील मजेदार गोष्टींबद्दल गप्पा मारणार होतो परंतू काका तर येथे त्यांचा वर्तमानकाळ देखील विसरुन गेले होते. त्यांची मुलगी तावातावात मला काकांना झालेल्या या नव्या त्रासाबद्दल सांगत होती. त्यांना सर्व काही आठवून देण्याचा ती किती जास्त प्रयत्न करते याची वर्णने तिने मला ऐकविली. काकांना जेवण केल्याचेही लक्षात राहत नाही, आंघोळीकरीता जातात परंतू घरातील बाथरुम सापडत नाही, घरात कुणी असेल तर ठीक अन्यथा कितीतरी वेळ ते तसेच फिरत राहतात. जेवणाचे देखील त्यांना कळत नाही. सांगितले नाही किंवा टोकले नाही तर ते आठ दहा पोळ्या देखील खातात. असे सगळे त्यांचे झाले आहे. मानसशास्त्राचा अभ्यास केला असल्याने मी तिला विचारले, किती दिवस झाले यांना असे सारे होऊन? ती मला म्हणाली, झाले असतील तीन वर्षे. तिन वर्षे? मी तिच्यावर जवळपास ओरडलोच. तिन वर्षांपासून तुम्ही तिघेही काय करताय? यांना तुम्ही कुण्या डाॅक्टरकडे नेले नाही का? त्यानंतर तिने मला जे सांगितले त्यावर काय बोलावे हेच मला कळेना.

तीन वर्षांपासून डीमेन्शीया या आजारामुळे ग्रस्त असलेल्या आपल्या बापाला एखाद्या दवाखान्यात नेण्याकरीता देखील त्या तिघांनाही वेळ मिळाला नाही ही गोष्ट त्यांच्या मुलीने मला वेगवेगळ्या सबबी सांगून स्पष्ट केली. या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच जर योग्य उपचार केले तर हा आजार सुसह्य करता येऊ शकतो. परंतू जर त्याकडे दुर्लक्ष केले तर मात्र या आजाराचे यापेक्षा भयंकर परीणाम होऊन तो असह्य बनतो. काकांचा डीमेन्शीया असह्य टप्प्यामधे परावर्तित झाला होता. त्याला कारण त्यांच्या तिन्ही अपत्यांना वेळ मिळाला नाही. त्यांचा मुलगा जेव्हा परदेशातून एका महिन्याच्या सुटीवर येतो तेव्हा त्याचा कार्यक्रम अतिशय व्यस्त असतो. त्याला कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन आपला भाविकपणा सिद्ध करायचा असतो, त्याला सर्व नातेवाईकांना धावती का होईना परंतू भेट द्यायची असते, तो येणार म्हणून खास त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या रीयुनीयनच्या कार्यक्रमांना त्याला जायचे असते, त्याच्या बायकोच्या माहेरी आयोजित गेट टुगेदरला त्याची जावाई म्हणून उपस्थिती आवश्यक असते, त्याला भारतात आल्यावर इथल्या पदार्थांची चव घ्यायची असते, इतकेच काय पण परदेशात डेंटीस्टचा खर्च परवडत नाही म्हणून त्याच्या मुलीच्या दातांची ट्रीटमेंट देखील त्याला त्या एक महिन्यातच आटोपून घ्यायची असते. या सर्व महत्वाच्या गोष्टींमुळे त्याला आपल्या वडीलांना दवाखान्यात नेऊन त्यांच्या आजारावर उपचार करायला वेळच मिळत नाही. पहिले एक वर्ष तर त्याचे म्हणणे होते की बाबा उगाच असे करतात. गुगलवर त्याने शोधले होते की अश्या उतारवयात काही वयस्कर लोक लक्ष आकर्षित करण्यासाठी असे प्रकार करतात. नंतर त्यांचा त्रास वाढल्यावर त्याने बहिणींना दोष देणे सुरु केले. बहिणींच्या नवऱ्यांनी ही जबाबदारी त्याची आहे म्हणून पुन्हा टोलवाटोलवी केली या सर्व प्रकारात काकांचा सुसह्य होऊ शकणारा आजार जवळपास असाध्य प्रकारामधे परावर्तीत झाला. ही सारी कहाणी ऐकल्यावर तिला वाईट वाटेल का याची चिंता करता मी सहजच बोलून गेलो, ताई डीमेन्शीया काकांना नाही, तर तुम्हा तिघांना झालाय. ते तर सर्वांना विसरले कारण आजारी आहेत, परंतू तूम्ही कसे काय विसरलात की ते तुमचे जन्मदाते वडील आहेत? आता आम्ही त्यांना लवकरच नेणार आहोत वगैरे वाक्ये मला ऐकूच आली नाहीत. माझी मदत लागली तर नक्की सांग एवढेच मी त्यांच्या मुलीला सांगितले काकांना नमस्कार करुन मी निघालो.  

मला अजूनही प्रश्न पडलेला आहे. वयोमानापरत्वे ज्या स्वाभाविकपणे इतर आजार होतात त्याच प्रमाणे मेंदुशी निगडित हा आजार, ज्यात सारे काही विसरल्यागत होते त्यास डीमेन्शीया म्हणावे की आपल्या बापाने आपल्याला कष्टाने मोठे करुन स्वबळावर जगण्याची शक्ती प्रदान केली त्याच बापाला झालेल्या एका उपचार करुन सुसह्य होणाऱ्या आजाराला अजिबात प्राधान्य देता त्यास एका असाध्य आजारापर्यंत पोहचविण्याच्या प्रवृत्तीला डीमेन्शीया म्हणायचे?






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18