थोडा है थोडे की जरुरत है@04.06.19
देवाची गंमत
देव किती छान गंमत करतो यार! इतकी छान की सारे वातावरण बदलून जाते. हेच ते घर होते का असा प्रश्न पडतो. ज्या घरातल्या समस्यांबाबत मी तुझ्याशी बोलली होती तेच घर आता या देवबाप्पाने केलेल्या गंमतीमुळे आमुलाग्र बदलून गेले. तुझ्याशी बोलले ती कोणतीही समस्या आता उरली नाही. घरातील सर्वजण जुने सारे काही विसरुन परत एकदा आनंदाने रहायला लागलेत, एकमेकांशी छान बोलायला लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कटू आठवणी मनात न ठेवता मनमोकळेपणाने नांदू लागले. खरोखरीच किमयाच आहे देवाची. हे सारे मोठ्या उत्साहात ती मला सांगत होती. उत्साहाने भरलेला तिचा आवाज मला बरेच काही सांगून गेला होता. घरामधे झालेला बदल तिला खरोखरीच आवडला होता. परंतू त्या बदलाकरीता कारणीभूत ठरलेली ती घटना ज्याला तिने मोठ्या कल्पकतेने देवाची गंमत संबोधले होते त्याच्याशी मी देखील सहमत झालो. तिला या घटनेमुळे किती आनंद झालाय याची कल्पना होती कारण साधारण तीन महिन्यापूर्वी त्याच घरातील बिघडलेल्या वातावरणाबाबत बोलताना तिचा पडलेला चेहेरा मला स्पष्ट आठवत होता. ज्या काकूंकडे ती लहानाची मोठी झाली, त्यांच्या घरातील बदलून गेलेले वातावरण सांगताना ती फार चिंतेत होती. परीस्थितीच तशी होती की एकाच घरात राहणाऱ्या लोकांचे एकमेकांसोबतचे वागणे पार बदलून गेले होते.
काकूंच्या मुलाचे लग्न झाले आणि नव्या सूनबाई घरात आल्या. कौतुकाचे काही दिवस संपल्यावर मात्र सूनबाईंचे वागणे काकुंना आणि काकांना काही रुचेना. सारी कामे वेगाने करुन त्याबद्दल थकवा आला असे आजही पासस्ठाव्या वर्षी न म्हणणाऱ्या काकूंना त्यांच्या सूनबाईंकडून तश्याच अपेक्षा होत्या. सूनबाईंचे काम मात्र अगदी या अपेक्षेच्या विरोधात होते. तिला सारे काही हळू हळू करण्याची सवय. त्यामुळे सासूबाई चिडून जायच्या. त्यात सासरेबुवा जरा समजून घेणारे होते. सूनबाईला जर कामात वेळ होत असेल तर ते काही हरकत नाही म्हणून तिची बाजू घ्यायचे व त्यामुळे काकुंचा पारा अजूनच चढायचा. यामधून काका आणि काकुंचीच भांडणे सुरु झाली होती. काकांनी जराशीही सूनबाईंची बाजू घेतली की काकुंचा भडका उडायचा. यामधे ज्या मुलाचे लग्न झाले होते त्याने नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेतली होती. त्याच्याजवळ त्याखेरीज इतर कोणताही पर्याय नव्हता हे देखील तेवढेच खरे होते. त्यामुळे तो कधी आईचे बोट धरुन चालणारा ठरायचा किंवा बायकोच्या ताटाखालचे मांजर ठरायचा. त्याच्या या शांत राहण्याने तो दोन्ही बाजूने बोलणी खायचा. एकंदरीत घरात कटकटीचे वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण अचानक कमी झाले होते व त्यामुळे गैरसमज वाढून तेढ निर्माण झाली होती. सारखे वादविवाद होत होते आणि त्यामुळे घरातील वातावरण फारच बिघडून गेले होते. म्हणूनच या पार्श्वभूमीवर देवाची ही गंमत मला फारच महत्त्वाची वाटत होती. त्या गंमती नंतर मात्र हे विस्कळीत झालेले वातावरण अचानक बदलून गेले आणि हेच घर आनंदाच्या क्षणांमधून न्हाऊन निघू लागले. हा सगळा बदल केवळ त्या एका बाबीमुळे झाला. ती गंमत म्हणजे त्या घरामध्ये एका छोट्या बाळाचे आगमन झाले.
खरे तर अनेक घरांमधून घडणारी ही घटना. परंतु या घरामध्ये या संपूर्ण घराच्या व्यवस्थेला संपुर्णत: बदलून टाकणारी ठरली. त्या काकूंच्या घरांमध्ये झालेला बदल जेव्हा तिने मला सांगितला तेव्हा खरोखरीच देव हा किती छान गंमत करतो याची प्रचिती आली. बाळाचा जन्म झाला. त्या छोट्याश्या पिटुकल्या बाळाचे आगमन घरी झाले आणि जणू जादूची कांडी फिरवावी अशाप्रकारे त्या घरातील सर्वांचे स्वभाव बदलून गेले. एका छोट्याशा बाळाच्या आगमनाने एवढा मोठा बदल अनपेक्षित परंतु सुखद होता. ते बाळ जे केवळ आठड्याभराआधी जन्मलेले आहे तरीदेखील त्याचे अस्तित्व त्या घराला खरे घरपण देण्यासाठी कारणीभूत ठरले. सुनबाई बद्दल काकूंच्या मनात असलेली अढी क्षणार्धात दूर झाली कारण तिच्या निमित्ताने घरामध्ये त्या बाळाच्या रुपात आनंद निर्मिती झाली. आपली सून काहीच करत नाही याबद्दल तक्रार करणाऱ्या काकू सूनबाई काहीच करू नको अशा सूचना देत होते. माझ्या वयामध्ये मला मदत करायला हवी कारण माझ्याकडून आता काही गोष्टी होत नाहीत अशा पद्धतीचा आग्रह सारखा सारखा मांडणाऱ्या काकू आता मात्र आपले वय विसरून गेल्या होत्या. आता काकूंना थकवा येत नव्हता. आता काकूंचे पाय दुखत नव्हते. इतकेच काय पण आता काकूंना दोन्हीही वेळेचा स्वयंपाक करायला देखील अडचण नव्हती. याउलट आपल्या सुनेला कोणकोणत्या भाज्या आवडतात आणि त्यापैकी पौष्टिक भाज्या कोणत्या याबाबत काकूंची चर्चा सुरू झाली. संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक घराचे मला तोंडही बघावे वाटत नाही असे म्हणणाऱ्या काकू सूनबाईंचे जेवण लवकर व्हावे यासाठी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच स्वयंपाकाच्या कामाला लागलेल्या असायच्या. सुनेला गरमागरम पोळी मिळावी यासाठी घरातील इतरांकरीता पोळ्या वाल्या बाईंकडून पोळ्या करुन घेणाऱ्या काकू मात्र सूनबाईंना स्वतःच्या हाताने बनवलेल्या गरम गरम पोळ्या करुन वाढू लागल्या. तीच अवस्था सासरेबुवांची झाली होती. घरामध्ये चाललेली कटकट मला सहन होत नाही अशी सारखी तक्रार करून घराच्या बाहेरच राहणारे काका आता मात्र सारखे घरी राहू लागले. ते बाळ या खोलीमध्ये असायचे त्या ठिकाणी त्यांचा वावर वाढला. सुनबाईला आराम मिळावा म्हणून बाळाला पाळण्यात घालून त्याला छान गाणी ऐकविण्याचे काम काका करू लागले. काकांचा गाण्याचा आवाज खरोखरीच छान होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या आवाजातले गाणे त्या घराने ऐकले नव्हते. परंतु देवाची गंमत असणाऱ्या त्या छोट्याश्या सोनुल्या च्या आगमनाने काका पुन्हा गाऊ लागले. माळ्यावरच्या पेटीतील गाण्याची वही कित्येक वर्षे पडून होती, तिला बाहेर काढून झोका देताना गाणी म्हणायची आहे त्याकरीता त्यांनी गाणी पाठ करणे सुरू केले. काकांच्या कोणत्याही आवाजाला प्रतिसाद देणारे ते बाळ काकांना अक्षरश: वेडावून टाकायचे. कौतुकाच्या रागाने त्या बाळाला ते म्हणायचे, किती वेळ घेतोस माझा? मला किती कामे करायची आहेत,पण तुझ्यामुळे मात्र माझी कामेच होत नाहीत असे म्हणत म्हणत सर्व कामांना विसरून त्या बाळासोबतच ते रमून जायचे. काकूंचे तर काय सांगावे? त्यांना तर त्या बाळाच्या बोबड्या बोलांचे वेगवेगळे अर्थ देखील कळू लागायचे. ते बाळ मला माझे नाव विचारते, मी काय करते विचारते, जेवण काय बनवणार हे विचारते असे त्या कौतुकाने सांगू लागल्या. अधूनमधून आपल्या सूनबाईने इतका छान आनंद त्या बाळाचे रूपाने आपल्या घरात आणल्याबद्दल तिचे कौतुकही करायच्या. काकूंचे एकंदरीत जीवनच बदलून गेले. यासोबतच त्या बाळाच्या वडिलांना देखील घरातील बदललेल्या वातावरणाचा आनंद होऊ लागला. एरवी ऑफिसमधून दमून आल्यानंतर प्रथम आईबद्दलच्या बायकोच्या तक्रारी आणि त्यानंतर बायको बद्दलच्या आईच्या तक्रारी ऐकून ऐकून कंटाळून गेलेला तो घराकडे यायला देखील उशीर लावायचा. परंतु आता मात्र सायंकाळी चार वाजल्यानंतर लक्ष सारखं घड्याळाकडे असायचे. घड्याळात केव्हा एकदा साडेपाच वाजतात आणि केव्हा एकदा मी घरी पोहोचतो असे त्याचे होऊ लागले. घरी आल्यानंतर आता मात्र त्याला तक्रारी ऐकण्याची गरज नव्हती. घरातले सगळेजण त्याच्या येण्याची वाट बघत असायचे आणि तो आल्यावर त्या छोट्या बाळाच्या या सगळ्या करामती त्याला ऐकवल्या जायच्या. एवढेच काय तर बाळाने दिलेला त्रास देखील कौतुकाच्या स्वरूपामध्ये सांगितला जायचा. केवढा हा बदल म्हणायचा! आज बाळाने खूप त्रास दिला आणि दुपारी कोणालाही झोपू दिले नाही हे देखील सांगत असताना काका, काकु आणि त्यांची सुनबाई यांच्या तोंडी कौतुकाचेच स्वरूप असायचे. खरोखरीच हे सारे अद्भुत होते! एका छोट्याश्या बाळाचे त्या घरात झालेले आगमन घरातील प्रत्येकाला स्वतःमध्ये अकारण तयार झालेला इगो विसरून त्या बाळाभोवती गुंतवून टाकणारे ठरले हे खरोखरीच अद्भुत होते.
माणसाला त्याचे खरे माणूसपण कळावे या करीताच कदाचित देव अशी गंमत करीत असावा. केवळ या गंमतीला स्विकारणे जमायला हवे. ते ज्याला जमले, त्याचे जीवन आनंदमयीच होणार यात शंका नाही!!
Comments
Post a Comment