थोडा है थोडे की जरुरत है @11.06.19

बर्न आऊट

वहिनीचा फोन आला. भाऊजी, जमेल तेवढ्या लवकर या. यांना एक वेगळाच प्रॉब्लेम सुरु झालाय. मला काही कळत नाही. तुम्ही आलात तर बरे होईल. एका मोठ्या आयटी कंपनीमधे काम करणाऱ्या माझ्या एका जीवलग मित्राच्या बायकोचा तो फोन होता. बाराव्या वर्गात माझ्यासोबत विज्ञान शाखेत शिकणारा माझा हा मित्र. बारावीनंतर त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. फार कमी अवधीतच त्याने छान प्रगती केली. पुण्याला स्वत:चा फ्लॅट, एक छान मोठी गाडी, परदेश दौरे, एक चांगला परीवार, छान बँक बॅलन्स इत्यादी आधुनिक काळातील प्रगतीची सारे मापदंड त्याने फार चांगल्या प्रकारे पूर्ण केले होते. अमरावतीच्या आपल्या मूळ घराशी देखील तो फार चांगल्या प्रकारे जोडलेला होता. वर्षातून एकदा घरी यायचेच, येताना सर्वांसाठी काही ना काही आणायचे, येथे आल्यावर सर्वांच्या भेटी घ्यायच्या, मित्र मंडळींसोबत वेळ घालवायचा अश्या सर्व प्रकारे तो खरोखरीच एक छान व्यक्ती म्हणून सर्वांना परीचित होता. कुटुंबासोबत देखील त्याचे वागणे फार छान होते. एकंदरीत त्याच्या कोणत्याही वागण्याबद्दल कुणालाही तक्रार करायला संधी नव्हती. केवळ गेल्या काही वर्षांपासून कंपनीच्या कामाचा फार ताण वाढलाय हे वाक्य मात्र तो बोलत होता. परंतू आजकाल कामाचा ताण सर्वच क्षेत्रांमधे असतो. त्यातल्या त्यात खाजगी क्षेत्रामधे स्पर्धा असल्याने तो जरा जास्त असतो. मिळणाऱ्या प्रचंड पगाराच्या बदल्यात तो सहन करावा लागतो किंबहुना ती मानसिकता सर्वांचीच असते. त्यामुळे आमच्यापैकी कुणालाच त्याच्या त्या वाक्याचे फार काही वाटायचे नाही. परंतू त्याच्या त्या वाक्याचा अर्थ मला तेव्हाच कळला जेव्हा वहिनीचा फोन मला आला. अचानक इतके काय झाले याचा विचार करीतच मी माझे जाणे निश्चित केले.

त्याच्या गावाला पोहोचेपर्यंत त्याच्या त्या वाक्याचाच विचार मी करु लागलो. साधारण चार वर्षांपासून तो मला सांगत होता की त्याचे सारेच गणित बिघडल्यासारखे झालेय. तो सांगायचा, परदेशात जाण्याचे कौतुक संपले, मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्सचे देखील कौतुक संपले, खरे तर ज्या सर्व गोष्टी मी मिळविल्या आणि ज्याचे सर्वांनाच फार कौतुक वाटते त्याचे माझ्या मनातील अप्रुप संपले. आता मला केवळ शांतता हवीय. हातात व्हीस्कीचा पेग घेऊन बोलत असल्याने मी त्याच्या बोलण्याकडे फार लक्ष दिले नाही. ताण घालविण्याकरीता ही ग्लास भरण्याची ही नवी आणि अनेकांना आवडणारी पद्धत त्याने देखील अंगीकारली होती. परंतू आज त्याच्या गावाला जाताना मला त्याच्या बोलण्याचे संदर्भ लागत होते. त्याला भेटल्यावर मात्र मी अंदाज केल्यापेक्षाही त्याची स्थिती वाईट होती. पहिले तर मला घट्ट मिठी मारुन लहान मुला सारखा रडू लागला माझा मित्र. साधारण पंधरा मिनीटे मी त्याला शांत होऊ दिले. त्याचा नेहेमीचा प्रसन्न चेहेरा आता मात्र बघवत नव्हता. त्याचा तो आवेग शांत झाल्यावर मी त्याला विचारले, काय झाले तुला? माझ्या मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या मदतीने मी त्याच्या समस्येबद्दल काही आडाखे बांधले होते. परंतू निर्णयाप्रत येण्यासाठी मला त्याचे ऐकायचे होते. तो मला नेमका प्रॉब्लेम सांगू लागला. त्याने जे काही संगितले ते वेदनादायी तर होतेच परंतू त्याही पेक्षा चिंताजनक होते. चाळीच्या वयात असताना आणि आयुष्य अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर असताना एखाद्या तरुण माणसाच्या जीवनात अशी समस्या उद्भवत असेल तर आपण आपल्या कार्य पद्धतींचा नव्याने विचार करण्याची नितांत गरज आहे असे मला वाटले.

तो मला कधी रडत, कधी खिन्न होत तर कधी खूप आक्रमकपणे हे सारे सांगू लागला. यार, याची सुरुवात झाली एका घटनेने. त्या दिवशी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरले आणि मी पैसे देऊन गाडीत येऊन बसलो आणि मला दिसणेच बंद झाले. काहीच दिसेना आणि काही वेळातच माझी शुद्ध हरपली. साधारण पंधरा मिनीटाने शुद्ध आली तेव्हा मी त्या पेट्रोल पंपाच्या ऑफीसमधे झोपलेला होतो. मला दिसू लागले होते. मी घरी आलो. काही तपासण्या केल्यावर पुन्हा काम सुरु केले. खरे तर तो अलार्म होता, या आताच्या समस्येचा. आता स्थिती अशी आहे की मी कॉम्प्युटरकडे बघूच शकत नाही. वेळी अवेळी प्रचंड डोके दुखते. रात्री झोप लागत नाही, कधी कधी तर चार चार तास मी टक्क जागा असतो. मग रडायला लागतो. कधी फार जास्त भूक लागते तर कधी लागतच नाही. कॉम्प्युटर नाही म्हणजे माझे कामच नाही. आणि सोबतच मला आजकाल कोणत्याही गोष्टीची फार भिती वाटते. मी कशालाही घाबरायला लागलोय. अन्विता ऑफीसला जाते. ती परत येईपर्यंत तिचा अपघात तर होणार नाही किंवा मला हार्ट अटॅक तर येणार नाही अश्या वेगवेगळ्या काळज्या आणि भिती मला त्रस्त करीत आहेत. माझे कशातच मन लागत नाही. कामावर जाऊच शकत नाही म्हणून एक महिन्याची सुटी घेतलीय. परंतू आता मी परत काम करु शकेल की नाही याची खात्री वाटत नाही. पण मी काम केले नाही तर माझ्या जबाबदाऱ्या कश्या पूर्ण होणार? मी काय करु? असे म्हणून तो पुन्हा रडू लागला. त्याची अवस्था बघून माझ्या अभ्यासाच्या मदतीने मी अन्विता वहिनींना सांगितले, वहिनी, इट्स केस ऑफ बर्न आऊट.

होय. माझा मित्र बर्न आऊट नावाच्या एका विचित्र परंतू झपाट्याने वाढणाऱ्या आजाराचा शिकार झाला होता. शिकारच कारण बर्न आऊट हा आजार नाही तर ते एक जाळे आहे ज्यात अनेक तरुण तरुणी हल्ली अडकायला लागले आहेत. मानसोपचार तज्ञ देखील आम्हाला तेच सांगत होते. कामाचा प्रचंड ताण, दिलेल्य वेळात टारगेट पूर्ण करण्याची सक्ती, त्या सक्तीमुळे नोकरीवर सतत टांगती तलवार, परफॉर्मन्स नसेल केली जाणारी अवहेलना, परदेशातील क्लायंट्स सोबत काम करताना त्याच्या वेळेनुसार केलेली जागरणे, व्यवस्थापनाची बदलणारी धोरणे, लांगुलचालन करणाऱ्यांना मिळणारा अतिरीक्त लाभ, काम करणाऱ्यावरच अतिरीक्त कामाचे ओझे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगणकाचा अतिरेकी वापर या सर्व बाबींच्या एकत्रीत परीणामामुळे माझ्या त्या मित्राची अवस्था झाली होती. त्याहून हादरवून टाकणारी बाब म्हणजे ते मानसोपचर तज्ञ मला म्हणाले की सध्या त्यांच्याकडील बर्न आऊट केसेस चे प्रमाण गेल्या चार पाच वर्षात जवळपास चार पाच पट वाढलेय आणि वेदनादायी गोष्ट म्हणजे या रुग्णांमधे सर्वच वय वर्षे २५ ते ३५ या वयोगटातील तरुण तरुणी आहेत. माझ्या मित्राचा सहा महिन्याचा इलाज त्यांनी करण्याचे ठरविले परंतू शक्यतोवर अश्या पद्धतीचा जॉब त्याने पुढे करु नये असे त्यांनी सुचविले. तो नंतरचा भाग होता. त्याचा इलाज सुरु झाला परंतू मी मात्र मनातून या समस्येचा विचार करुन हादरुन गेलो. सखोल विचार करता मला असे जाणविले की बदलत चाललेली परिस्थिती बघता ही समस्या कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांमधे येऊ शकते. या समस्येने अक्राळ विक्राळ रुप धारण करुन आपल्या तरुण पिढ्या गारद करण्याआधी आपल्या कार्यक्षेत्रातील व्यवस्था बदलायला हव्यात.

सरकारी असो अथवा खाजगी, सर्वच क्षेत्रामधे कमी होत जाणारे मनुष्यबळ त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा ताण प्रचंड वाढतोय. कामांचे ओझे वाढत आहेत परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या ताण नियोजनाकरीता व्यवस्था काहीच करीत नाही. ताणनियोजनाचे प्रशिक्षण दिले जात नाही. मन:स्वास्थ्य चांगले राहील याकरीता प्रक्रीयांचे सुलभीकरण कुणी करीत नाही. कामांची समान वाटणी केली जात नाही. अवाजवी स्पर्धा माणसांचे श्रम हे थेट नफ्याशी जोडल्यामुळे कर्मचाऱ्याकडे माणूस म्हणून बघता व्यावहारीकतेच्या भुमिकांमधून बघितल्या जाऊ लागले. या साऱ्या बाबींचाच परीणाम म्हणजे बर्न आऊट सारखी समस्या आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे

माणसामधे कार्य करण्याची प्रचंड क्षमता असली तरीदेखील त्याचे श्रम हे त्याच्या मानसिक स्वास्थ्यासोबत जोडलेले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. वयाच्या तिशीमधे तो शारीरिकदृष्ट्या अनेक कामे करेलही परंतू कामांच्या अतिताणामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला तर मात्र माझ्या मित्राप्रमाणे अवस्था होण्याची भिती राहू शकते. कामासाठी जळणे ही कर्तव्यरुप भुमिका असली तरी त्यामुळे आयुष्य जळून जायला नको याची काळजी करणे गरजेचे आहे.





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18