थोडा है थोडे की जरुरत है @26.03.19

नंबर १४०

आपण सारेच भारतीय आपल्या देशाबद्दल सकारात्मकतेने विचार करताना या देशाला लाभलेल्या थोर सांस्कृतिक आणि वैभवशाली परंपरेचा उल्लेख करीत असतो. बहुविध भाषा, प्रांत, पेहेराव, खानपान अश्या वैविध्यांनी नटलेला आपला देश या परंपरांमुळे मजबुतीने उभा आहे. माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याला कारणीभूत असलेल्या या परंपरा फार मोलाचे कार्य करीत आल्या आहेत अद्यापही करीत आहेत. या परंपरांमुळे आपल्याला वेगवेगळ्या आनंदसंधी उपलब्ध होतात ज्या द्वारे आपल्या जीवनातील ताण कमी करुन सकारात्मकतेने आयुष्य जगण्याचे बळ प्राप्त होत राहते. शेवटी माणसाच्या आयुष्याच्या यशस्वितेचे मापक त्याने मिळविलेली भौतिक समृद्धी राहू शकत नाही तर ती यशस्विता त्याच्या जीवनात आनंद किती कसा निर्माण होतो हेच अंतिमतः बघितले जाते. जगण्याची ही सारी मुलतत्वे आपल्या देशात अनेक वर्षांपासून रुजली असूनही आपला नंबर १४० वा कसा?

जगातील कोणत्याही देशात पाळल्या जात नसतील इतक्या मोठ्या प्रमाणात विविध परंपरा आपल्या देशात पाळल्या जातात. या सर्व परंपरांचा थेट परीणाम या परंपरांचा केंद्रबिंदु असलेल्या आपल्या घरावर होतो. आपले घर आणि त्या घरात वास्तव्य करणारा आपला परीवार या सर्व गोष्टींचे एका विशिष्ट पद्धतीने पालन करीत असतो. जरासे तार्किक दृष्टीने या सर्व परंपरांचे सूक्ष्म अवलोकन जर आपण केले तर आपल्या असे लक्षात येईल की यांच्या आयोजनामागे एक महत्वाचा हेतू दडलेला आहे. त्यास देशातील बहुविध व्यवस्थेमधे नावे वेगवेगळी असतील परंतू हेतू एकच दिसून येतो. तो हेतू आहे लोकांना एकत्रित आणायचे त्यामधून आनंद निर्मिती करायची. या परंपरा आपल्या घरांमधून वेगवेगळ्या सणांच्या उत्सवांच्या निमीत्ताने नांदत असतात. हेतू मात्र एकच लोकांनी एकत्रीत यावे. मग तो महालक्ष्मीचा सण असो किंवा पोंगल असो किंवा नवरात्री असो. आपला परीवारच नाही तर परीवाराच्या पलीकडे समाजानेही या निमित्ताने एकत्रीत यावे आनंदनिर्मीतीच्या संधींचे सोने करावे. असे कितीतरी आनंदक्षण आपल्याला या प्रक्रीयांमधून मिळत राहतात आपण समृद्ध होतो. कदाचित याच मूळ हेतूने जुन्या काळच्या काही द्रष्ट्या समाजधुरीणांनी याची योजना केलेली आहे. सुदैवाने यातील बऱ्याच गोष्टींचे आपण पालनही करीत आहोत असे निदान दृष्य आहे. तरीही आपला नंबर १४० वा कसा?

गेल्या दशकात तंत्रज्ञान ठळकपणे सांगायचे झाल्यास मोबाईल तंत्रज्ञान आपल्या देशात झपाट्याने वाढले. गेल्या दहा वर्षात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या देशात सत्तर कोटीच्या वर गेली ज्यापैकी ९० टक्के लोक सोशल मीडीयाचा प्रभावीपणे वापर करतात. फेसबुक, व्हॉटस् ॲप, इन्सटाग्राम, यासारख्या सोशल मीडीया तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु झाला. यामागील हेतू देखील तोच आहे जो आपल्या देशातील पंरपरांचा होता. लोकांना एकत्रीत आणायचे, त्यांना एकमेकांबद्दल कळवायचे, त्यांना कायम एकमेकांच्या संपर्कात ठेवायचे त्या माध्यमातून विचारांचे आदान प्रदान होऊन आनंद निर्मिती करायची. अगदी साधे डोके दुखते आहे या माहितीपासून ते अपघात होऊन दवाखान्या दोन महिने ॲडमीट रहावे लागत आहे पर्यंतच्या सर्व बातम्या एकमेकांना त्वरित देता येतात. आपला प्रवास, आपले वाढदिवस, आपले नवे कपडे, आपल्या जेवणातील नवा पदार्थ, आपले विचार, आपले डॉक्टरी सल्ले, आपल्या कार्यक्रमांचे आयोजन, हवामानाचा अंदाज, आपल्या सामाजिक राजकीय प्रतिक्रीया, आपला आनंद, आपले वैषम्य, आपल्या वेदना, आपल्या जीवनाचा अक्षरशः प्रत्येक क्षण आणि पैलू लोकांपर्यत सहज पोहोचविता येतो. एकमेकांबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती यापूर्वी कधीही  या देशात प्राप्त होत नव्हती. एकमेकांबद्दल इतके कळत असल्याने आपण सारे खरे तर घट्ट बंधनात बांधल्या गेले आहोत. या वातावरणात एकटे वाटण्याचा प्रश्नच येत नाही. एकटे वाटले तरी फीलींग लोनली असे स्टेटस टाकले की आपला मुड ठिक करण्यासाठी आपले स्नेही तत्परतेने हसणारे चेहेरे, अंगठे, पुण्यातील बाबींसंबंधातील एखादा विनोद किंवा मार्केटमे नया है या सदराखाली विनोदांची मालीका, किंवा बिनाका गीतमालेतील पन्नास साठ टॉप वर राहीलेली गाणी असे काहीतरी पाठवून आपला एकटेपणा घालविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या स्टेटसच्या साध्या एका ओळीवर आपल्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्परता दाखविणारे इतके सारे लोक आपल्या सभोवताली असताना देखील आपला नंबर १४० वा कसा?

संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच सादर केलेल्या जागतिक आनंदी देशांच्या यादीत आपल्या या सामाजिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने संपन्न असलेल्या भारत देशाचा नंबर १४० वा आहे असे घोषित केले. फिनलँड या देशाचा प्रथम क्रमांक असून आपला २०१८ साली असलेला १३३ वा नंबर घसरुन १४० वर पोहोचला. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे काही विशिष्ट मापदंडांवर एकुण १५६ देशांमधे या संदर्भात पाहणी करण्यात आली. देशातील लोक आनंदी किती आहेत, त्यांच्या जिवनात ताण किती प्रमाणात आहे, त्यांच्या जिवनाला नैराश्याने किती प्रमाणात घेरले आहे, त्यामधून निर्माण झालेली व्यसनाधिनता किती प्रमाणात वाढली आहे, जिवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन नकारात्मकतेमधे किती प्रमाणात परावर्तित होतो आहे यासारख्या मापदंडावर ही चाचणी करण्यात आली. समाजिक परंपरा तंत्रज्ञानामधून निर्माण झालेली जवळीक याचे आपल्या देशातले प्रमाण बघता आपल्या देशाचा नंबर १४० वा कसा काय हा प्रश्न उपस्थित होतो. त्याहून जास्त चिंतेची बाब म्हणजे गेल्या एक वर्षात आपला नंबर या यादीमधे खाली घसरलाय ज्याचा सरळ अर्थ असा आहे की आनंद निर्मीतीची प्रक्रीया कुठेतरी कमी होत आहे नैराश्याचे प्रमाण वाढते आहे. देशाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या प्रत्येकाला खडबडून जागे करणारी ही घटना आहे असे मला वाटते. दोन महत्वाचे निष्कर्ष या निमीत्ताने आपल्या समोर येतात.

एक म्हणजे आपल्या जीवनात आनंदक्षण निर्माण करणाऱ्या पंरपरा आपण गेली अनेक वर्षे सांभाळतो आहे त्याचे महात्म्य संपुष्टात येत आहे. त्यांचे पालन तर होते आहे परंतू ते केवळ जबरदस्तीने केले जात आहे, त्यामधील खरे मर्म नव्या पिढीला कळल्यामुळे जुन्या पिढीने ते विसरल्यामुळे त्यांचा अपेक्षित परीणाम जाणवित नाही. दुसरा निष्कर्ष म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे आपण एकमेकांशी जोडले आहोत असे वाटत असले तरी ते मोठ्या प्रमाणात आभासी आहे हे सिद्ध होते आहे. त्याचा प्रत्यक्ष परीणाम आपल्याला आनंदी करण्यासाठी होत नसून त्यामधूनही वेगवेगळ्या प्रकारचे ताण निर्माण होत असावे असा देखील एक निष्कर्ष निघतो.

आपल्या देशाच्या १४० व्या नंबरला कारणीभूत असलेल्या गोष्टींमधे परंपरांचा नव्याने अभ्यास करुन त्या राबविण्याचे आधुनिक तंत्र विकसित होणे दुसरीकडे तंत्रज्ञानाने माणसाचे जीवनातील प्रत्यक्ष अस्तित्व काढीन आभासी बनविणे याचा अंतर्भाव होतो. लोकसंग्रह करणाऱ्या परंपरांना नव्या पिढीला पटतील या स्वरुपात मांडण्याची त्यांना ते नीट समजावून सांगण्याची पद्धतच उरलेली नाही. त्यामुळेच लग्नसंस्काराच्या अतिशय महत्वाच्या प्रसंगी देखील मंत्रोच्चार किंवा विधी याबाबत महत्व राहता, फोटो शुटींग चे महत्व जास्त आहे. परंपरांचे वैज्ञानिक सामाजिक महत्व समजून घेता त्याचे पालन करत राहणे हा फोलपणा अखेर त्या परंपरांना मृतप्राय स्थितीमधेच नेणार आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आभासी स्वरुपात केवळ एकमेकांना संदेश पाठवून दिलासा देण्याऐवजी प्रत्यक्ष हातात हात धरुन प्रेमळ स्पर्शातून दिलेले सांत्वन किंवा दिलासा दिवसागणिक हरवत जातो आहे. त्यामुळेच आपला १४० वा नंबर आहे.

आपल्या देशातील या सर्व परंपरागत आनंदनिर्मीतीच्या प्रक्रीयांमधील शुद्ध वैज्ञानिकता अभ्यासून त्या पुन्हा नव्याने तरुणांच्या मनात स्थापित करुयात तंत्रज्ञानाचा आभासी आधार सोडून आपल्या जिवलगाचा हात हातात घेऊन त्याला केवळ प्रेमळ स्पर्शातून आणि त्याच्या डोळ्यात बघून सांगुयात, आनंदीच रहायचे कारण आपण सोबत आहोत, कायम. आपल्या देशाची विचारी भावनिक लोकसंख्या बघता हा एक छोटासा बदल आपल्याला एक वर्षातच १४० वरुन १०० वर पोहोचवू शकतो. करुयात प्रयत्न?




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23