थोडा है थोडे की जरुरत है@19.03.19

रीवाईंड

विद्यापीठातर्फे प्राचार्यांकरीता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे असा -मेल मला प्राप्त झाला. नव्या पद्धतीनुसार त्या -मेलमधे त्यांनी गुगल फॉर्म दिला होता. आजकाल तंत्रज्ञानाच्या सोयीमुळे अर्ज प्राप्त करा, मग ते भरा, मग तो सादर करा आणि या साठी विद्यापीठात किमान दोन वेळा कार्यालयीन वेळात जा हे सारे बंद झाले. गुगल फॉर्ममुळे लगेचच प्रत्येकाच्या सोयीनुसार अर्ज ऑनलाईन सादर करता येतो आणि आयोजकांना देखील सर्व माहिती अचूक प्राप्त होते. या अर्जामधे जन्मतारीख भरण्याकरीता क्लिक केले की एक कॅलेंडर येते. त्यावर आपल्या जन्माचे वर्ष, महिना आणि तारीख निवडले की ती तारीख आपोआप येते. एरवी त्या वर्षांवर क्लिक केले की त्यातील वर्षे सपाट्याने बदलतात. परंतू मला प्राप्त झालेल्या फॉर्ममधे काहीतरी तांत्रिक अडचण असल्याने ती वर्षे भरभर बदलता प्रत्येक महिन्याप्रमाणे बदलत होती. त्यामुळे माझी जन्मतारीख शोधण्याकरीता मला सत्तेचाळीस वर्षे म्हणजेच पर्यायाने ५६४ महिने मागे जायचे होते. तांत्रिक अडचणीमुळे मला तितके वेळा क्लिक करावे लागणार होते. आजकाल आपल्याला सारीच कामे पटकन व्हायला हवी असतात त्यामुळे सुरुवातीला मला इतके क्लिक करीत मागे जायचे आहे म्हणल्यावर तो एक त्रागा वाटला. परंचू जसेजसे मी क्लिक करीत वर्षे मागे न्यायला लागलो तसेतसे मला फार गंमत वाटू लागली. आणि अनावधानाने झालेली तांत्रिक चूक माझ्यासाठी एक आनंदयात्रा बनली. जसेजसे वर्ष मागे जायला लागले तसेतसे मला माझेच आयुष्य रीवाईंड केल्यासारखे वाटू लागले. खरे तर आयुष्य जगत असताना पुढे पुढे बघत आणि भविष्याचा वेध घेत जगावे असे अनेक विचारवंत सांगत असतात परंतू या तांत्रीक अडचणीमुळे मला जी संधी मिळाली ती अपूर्व होती.

प्रत्येकाच्या आयुष्याचा आलेख जर विचारात घेतला तर काही महत्वाच्या कायमस्वरुपी लक्षात राहणाऱ्या घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात घडलेल्या असतात. काही घटना तर इतक्या विलक्षण असातात की त्यांनी आपल्या आयुष्याला कलाटणी मिळालेली असते. स्वत्वाचे भान निर्माण झाल्यावर बहुतांश व्यक्ती आपल्या जीवनाच्या भविष्यातील स्थितीबाबत विचार करु लागतात देवाने प्रदान केलेल्या वैचारिक क्षमतेमुळे स्वप्ने देखील बघतात. ही खरे तर एक मोठी देण केवळ मानवाला प्राप्त आहे. त्या स्वप्नपूर्तीसाठी नंतर तो प्रयत्नरत राहतो. परंतू या सोबत त्याच्या सोबत त्याच्या आयुबाजूची परीस्थिती देखील चालत असते. सारीपाटावर मांडलेल्या खेळासारखे आपल्या प्रत्येकाचे आयुष्य पुढे पुढे जाते. यामधे सारीपाटावरील अन्य सोंगट्यांप्रमाणे अनेक लोक आपल्या पुढे सरकण्याला प्रभावित करीत राहतात. त्यामुळेच प्रत्येकच वेळी जीवन आपल्याला हवे तसे चालत नाही. याला कारणीभूत असतात आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी आलेले क्षण आणि त्या क्षणांना आपण घेतलेले निर्णय. काही निर्णय हे आपल्या आयुष्याला कमी वेळाकरीता प्रभावित करतात परंतू काही निर्णयांचा परीणाम तर कधी कधी आयुष्यभर आपल्यासोबत असतो. कधी तो सकारात्मक असतो तर कधी नकारात्मक परंतू त्याचे महत्व फार असते. म्हणूनच या निर्णयांचे पुनरावलोकन करण्याची संधी प्राप्त झाल्यास फार मजा वाटते. एरवी अशी संधी घेऊन त्यात वेळ घालविणे सध्याच्या (आपणच अकारण बनवून ठेवलेल्या) वेगवान जगात परवडणारे नसते. परंतू कधी कधी अशी मिळाली तशी संधी प्राप्त झाली की फार मजा वाटते. मी क्लिक करु लागलो आणि आयुष्य रिवाईंड व्हायला लागले. एखादे चलचित्र उलट फिरवावे त्याप्रमाणे मी आनंद घेत माझ्या मनात मागे मागे जाऊ लागलो.

प्रामाणिकपणे सांगतो, हा एक अफाट अनुभव होता. वर्ष मागे जाऊ लागली आणि एक एक महत्वाची गोष्ट आठवायला लागली. वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या भावनांचे कल्लोळ, कधी आनंदाचा वर्षाव कधी तणावाची स्थिती, कधी पराभव तर कधी विजय, कधी ओळखीचे वातावरण तर कधी संपुर्ण नवा प्रदेश, कधी काही कारणांवरुन निर्माण झालेला दुरावा तर कधी काहीही कारण नसताना आणि विचारही केला नसताना निर्माण झालेली जवळीक, जवळच्या लोकांनी सोडून जाणे, कधीही परीचित नसलेल्या लोकांनी जवळचे बनणे, कधी संपूर्ण पराभूत होऊन डोळ्यात आलेली हताश आसवे तर कधी जिद्दीने मिळविलेल्या यशामुळे डोळ्यातून ओघळलेली आनंद आसवे, कधी अभ्यासात लक्ष नसल्याने महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर ब्लॅकलीस्ट मधे लागलेले नाव तर कधी त्याच महाविद्यालयात पुढच्या काळात मिळालेला बेस्ट स्टुडंट अवार्ड, खेड्यातून शहरात आल्यावर ज्या विषयाच्या भयंकर भितीपोटी वर्ग बुडविण्याची केलेली कृती पुढे त्याच विषयात आचार्य पदवी धारण केल्याचे समाधान, वडीलांच्या हातचा ज्या कारणासाठी मार खाल्ला त्याच कारणाकरीता पोराला मार देताना वडीलांचे कसे बरोबर होते ही अनेक वर्षांनंतर झालेली जाणीव, कधी उन्हाळ्यात वाचण्यासाठी आई वडीलांनी आणलेली हात पुरणार नाही अश्या कपाटावर ठेवलेली पुस्तके बघून बघून परीक्षेचा केलेला अभ्यास तर कधी अभ्यासाचे पुस्तक, संगणक आता बाजूला ठेव अवांतर पुस्तक वाच असे सांगायची आलेली वेळ, कधी प्राचार्यांसमोर धाकापायी मान वर करुन बोलण्याची होणारी हिंमत तर आता विद्यार्थिनींसोबत मैत्रीपूर्ण भावनेने कधीतरी सेल्फी काढण्यासाठी दिलेली पोज, हे सारे मी कुणाचे सांगतोय? माझे का? अजिबात नाही. काही मोजके विशिष्ट संदर्भ सोडल्यास माझ्यासोबत हे वाचणाऱ्या प्रत्येकाच्या गत जीवनाचा स्मृतीपट उघडला गेलाय. बारकाईने बघितले तर आपल्या सर्वांची गत वर्षे वेगवेगळ्या स्मृतींनी भरलेली आहेत. होय ना? परंतू या सर्व आयुष्य रिवाईंड करण्याच्या प्रक्रीयेमधे मला प्रसंगांसोबतच आठवतात वेगवेगळ्या व्यक्ती. ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करुन जीवन समृद्ध केले. कोणत्याही माणसाच्या जीवनांचे मुल्यमापन त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्याचे जीवन पूर्ण होते ते त्याच्या आयुष्यातील माणसांमुळे. माझ्यासाठीही या सर्व माणसांना आठवणे हा या सबंध प्रक्रीयेमधला महत्वाचा भाग होता. मागे जाता जाता मी माझ्या जन्मतारखे पर्यंत जेव्हा पोहोचलो तेव्हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवरील या वेगवेगळ्या माणसांना जर वगळले तर आयुष्याला काही अर्थच उरत नाही. माझे म्हणून ज्या ज्या गोष्टींवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्या प्रत्येकच गोष्टीच्या मागे काही व्यक्ती आहेत. माझे म्हणून ज्याचा अभिमान बाळगला जातो त्याचा आधार संपुर्णपणे आपण नसून त्या मागेही काही व्यक्तींचे योगदान आहे. आयुष्य कधीतरी रीवाईंड करुन बघताना वेगवेगळ्या वळणावर उभी असलेली कित्येक अव्यक्त मने आपल्याला पुढच्या पायरीवर नेऊन समाधानी झालेली दिसतात. जीवनाची ही उतरंड या निमीत्ताने उतरत जाताना ते प्रेमळ डोळे अजूनही तसाच प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, आपल्याला केवळ त्या पायरीपर्यंत उतरण्याची गरज असते.

आयुष्यात यशस्वी होण्याचे दोन मार्ग असतात. एक मार्ग अतिशय व्यवहारी भावनांच्या गुंत्यात अडकणारा. यशस्वी जीवनाच्या शिखराकडे वाटचाल करीत असताना खाली अजिबात बघायचे नाही. नजर कायम आपल्या यशाच्या ध्येयाकडेच ठेवायची, लोकांचे सहकार्य घ्यायचे, कृतज्ञता व्यक्त करायची तेथेच त्या नात्यांना पूर्ण विराम द्यायचा. या सर्व पायऱ्यांवरील नात्यांच्या भावनांचे ओझे जर सोबत बाळगले तर सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही हे देखील सत्यच आहे. दुसरा मार्ग असा की यशाच्या शिखराकडे जाताना आपण सुरुवात कुठून केली त्या जागेचे कायम स्मरण ठेवणे. एक एक पायरी चढताना पाठबळ दिलेल्या प्रत्येक हाताचे पुढे ओझे झाले तरी तो हात सोडायचा नाही हा विचार मनाशी घट्ट बांधून मार्गक्रमण करणे. त्यामुळे एखादेवेळी यशाचे सर्वोच्च शिखर गाठताही येणार नाही परंतू त्याची पर्वा करता व्यक्तींना जपणे

या दोन मार्गांपैकी कोणता योग्य नि कोणता अयोग्य या प्रश्नाचे उत्तर सांगणे कठीण आहे. ते मिळविण्याचा एकच मार्ग आहे. मला मिळालेल्या संधी प्रमाणे आपले आयुष्य एकदा रीवाईंड करुन बघणे. खात्री देतो, उत्तर मिळेलच! करुयात आयुष्य रीवाईंड








Comments

  1. अरे वाह ! फारच छान ! रोचक आणि उद्बोधक सुद्धा 👌☺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23