थोडा है थोडे की जरुरत है @02.04.19

कार्यसिद्धीप्रयास

रडत रडत ती विद्यार्थिनी माझ्याकडे आली. कुणीतरी रागावले असणार किंवा काम होऊ शकत नाही असे म्हणले असणार असे मला नेहेमीच्या अनुभवावरुन वाटले. बरेच वेळा विद्यार्थिनींना तुमचा मी मोठा भाऊ आहे असे सांगितलेले असल्याने त्याच भावनेतून वागणूक ठेवल्यामुळे माझ्याकडे येऊन समस्या मांडताना त्यांना सहजता वाटते. त्यामुळे दिवसभरात अश्या छोट्या छोट्या समस्या बऱ्याच सोडविल्या जातात. त्या दिवशी देखील तोच प्रकार असावा असे मला वाटले. फी भरायला पैसे नाहीत, स्कॉलरशीपचा फॉर्म भरता आला नाही, बाबा फीचे पैसे देत नाही म्हणतात, परीक्षेचा फॉर्म भरलाच नाही, मॅडम प्रॅक्टीकल रेकॉर्ड घेत नाहीत, मी वर्षभर कॉलेजला आलीच नाही त्यामुळे परीक्षा दिल्याच नाही, मला गॅदरींगमधे डान्स करायचा आहे पण सर म्हणतात की ऑडीशन होऊन गेले आता काही करता येणार नाही या सारख्या छोट्या छोट्या तक्रारींपासून तो मी आई बाबांचा विरोध जुमानता पळून जाऊन लग्न केले आहे मला टीसी हवी आहे किंवा माझ्या बाबांनी काल दारु पिऊन माझी सगळी वह्या पुस्तके जाळून टाकली, मला पुस्तके हवी आहेत इथपर्यंतच्या समस्या घेऊन माझ्या लहान बहिणी माझ्याकडे येतात त्यांच्या समस्या नियमाच्या चौकटीत बसून मी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. कारण ती चौकट सोडता येत नाही. ही अगदी छोटीशी मदत करुनही मनाला आनंदच मिळतो. परंतू त्या दिवशी जी समस्या माझ्यासमोर आली ती या सर्व समस्यांपेक्षा वेगळी होती त्याचे समाधान मी एकटा करु शकत नव्हतो. मला त्याकरीता बऱ्याच लोकांची मदत घ्यावी लागणार होती. त्या माझ्या बहिणीचा रडवेला हताश चेहेरा बघून मलाच काय करावे ते सुचेना. सर्वप्रथम मी तिची समस्या पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला

सकाळी १० च्या सुमारास ती माझ्यासमोर उभी होती तिची समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडे मोजून दहा तास होते. कारण तिला कोणत्याही परीस्थितीत मला सायंकाळी वाजताच्या विदर्भ एक्सप्रेस मधे बसवायचे होते. बीए अंतीम वर्ष आधीच्या वर्षी पास झालेली ती मुलगी होती. सुरुवातीपासूनच हुशार असल्याने तिने चांगल्या गुणांनी बीए पास केले होते त्या आधारावरच तिला एका शासकीय व्यवस्थेमधे नोकरी लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची मुलाखत कागदपत्रांची तपासणी होती त्या कार्यालयाच्या लक्षात आले की हिच्या दहावीच्या, बारावीच्या आणि बीए फायनलच्या गुणपत्रीकांवर तिचे नाव वेगवेगळे आहे. छपाईची छोटी चूक आहे परंतू ती झालेली आहे या सर्व गुणपत्रीकेवर नावे समान असल्याखेरीज तिला नोकरी प्राप्त होऊ शकत नाही आणि ती सारी दुरुस्त केलेली कागदपत्रे तिला दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता कोणत्याही परीस्थीतीत सादर करायची होती अन्यथा तिची संधी हुकणार होती. महाविद्यालय, बोर्ड विद्यापीठ अश्या तीन व्यवस्थांमधून ही कागदपत्रे दुरुस्त करुन घ्यायची होती. त्या मुलीला वडील नव्हते आई आजारी. तिच्या सोबत कुणीही नव्हते, तिच्याकडे गाडी नव्हती सर्वात महत्वाचे म्हणजे दोन वेळा मुंबईला जाऊन आल्याने तिच्याकडचे पैसे देखील संपलेले होते. नोकरी मिळाल्यावर मी सर्व पैसे परत करीन पण मला आता मदत करा सर असे म्हणून ती पोर रडायलाच लागली. प्रथमदर्शनी तर मला ते सारे अवघडच वाटत होते कारण तिच्या तीन गुणपत्रीका वेगवेगळ्या व्यवस्थांमधे जाऊन बदलवायच्या, त्या प्रत्येक व्यवस्थांचे काही नियम आहेत. शिवाय हे महत्वाचे दस्तऐवज असल्याने करुन द्या, पाहून घेऊ असेही म्हणणे शक्य नव्हते. अधिकृत कागद प्राप्त करायचा असल्याने त्याकरीता असलेली कार्यालयीन प्रक्रीया पार पाडावी लागणार. शिवाय या सर्व प्रक्रीया एकदम सुरु करुन चालणार नाहीत तर क्रमा क्रमाने कराव्या लागणार म्हणजे सर्वप्रथम दहावीची गुणपत्रीका बदलावी लागेल, त्याची नोंद घेऊन बारावीची बदलली जाईल त्यानंतर महाविद्यालयातून सर्व कागदपत्रे प्रमाणित करुन विद्यापीठातून पदवीची गुणपत्रीका नव्याने तयार करावी लागेल त्यानंतर हिला गाडीत बसवावे लागेल. गाडीत बसणे सोपे नाही तर त्याकरीता आरक्षण मिळवावे लागेल. एकंदरीत साराच प्रकार अवघड वाटत होता. सामान्यपणे तिला हे सांगता येत होते की खरंय गं, हे करावे लागेल. तुला पैसे देतो. तू करुन घे. दहावीच्या गुणपत्रीकेवर जी चूक झाली ती मी केली आहे का? ती तर शाळेने केली. त्या शाळेच्या लोकांना कळले नाही? त्यानंतर ज्युनीअर कॉलेजमधे ही तोच प्रकार. तेथेही लक्ष दिले नाही आणि महाविद्यालयात आल्यावर तुझ्या फॉर्ममधे तू जे नाव जसे लिहीले तसेच आम्ही कॉम्प्युटर मधे टाकले. त्यामुळे अंतीम वर्षाच्या गुणपत्रीकेत तेच नाव आले. त्याला मी काय करु? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतक्या साऱ्या गुणपत्रीका मिळत असताना तुझे स्वतःचे लक्ष कुठे होते. हे सारे तुझ्या आधी लक्षात नको यायला? गुणपत्रीकेवरील चूक सुधारता येते हे त्यावर बारीक अक्षरात खाली लिहीलेले असते? तुला ते पण वाचता येऊ नये. किती हा निष्काळजीपणा? बरे तुझे एक वेळ ठिक आहे परंतू पालकांनी तरी लक्ष द्यावे. त्यांची जबाबदारी ते पुरी करत नसतील तर मग काय उपयोग? आता रडून काय होणार? इतक्या वेळेवर हे शक्य नाही. माझ्या संपुर्ण संवेदना तुझ्या सोबत आहेत, मी तुला हवे तर पैसे देऊ शकतो पण ही सारी कामे तुला करावी लागतील. तुला कागदपत्रे प्रमाणित करुन मिळतील पण बाकी सारे तू करुन घे. आज नेमके तुझे रेकॉर्ड ज्याच्याकडे आहे तो माझा कर्मचारी सुटीवर आहे. त्याच्या घरी मेडीकल इमर्जन्सी आहे. पण तरीही कागदपत्रे प्रमाणित करुन देऊ. बाकी तू जर करु शकली तर बघ. हे सारे तुझ्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहे. असे सारे काही मी तिला सहजच सांगू शकलो असतो. ते सारे माझ्या मनात आले देखील. पण खरे सांगतो, मला यापैकी काहीही बोलता येत नव्हते. कारण तिची नजर, तिची असहाय नजर. माझ्या लहान बहीणीचे अश्रुंनी भरलेले डोळे मला काही सांगत होते

तिचे डोळे मला सांगत होते, सर माझे चुकले, मी निष्काळजीपणा केला पण मी काय करु? मला अश्या कौटुंबिक स्थितीमधे शिक्षण घ्यावे लागले की मला या कोणत्याही गोष्टीचे भान राहीले नाही. गुणपत्रीकेवर नाव बघण्यापेक्षा मी पास झाली का याकडे माझे लक्ष होते. आई वडीलांकडून काय अपेक्षा करावी? मी अकरावीत असताना वडील वारले आई माझी चवथा वर्ग शिकलेली आहे. तिला सांभाळण्यासाठी लहान भावाचे शिक्षण व्हावे म्हणून चांगला अभ्यास केला सुदैवाने नोकरी लागते आहे. या नोकरीमुळे माझे आणि माझ्या परीवाराचे भवितव्य बदलविण्याची संधी मला मिळालीय जी आता माझ्या हातून निसटतेय. सर, कसेही करा पण मला ही संधी मिळविण्यासाठी मदत करा. सर, मला बहिण म्हणता ना? मग मला असे सोडून नका देऊ. मी एकटी काहीच करु शकणार नाही. माझी नोकरी जातेय सर, माझे चांगले भविष्य माझ्या हातून निसटतेय सर, काहीतरी करा. तिचे भावपूर्ण डोळे मला हे सारे काही सांगून गेले. दोनच मिनीटे मी तिला बाहेर जाऊन बसायला सांगितले. मनात विचार आला, एका महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर माझी नियुक्ती कदाचित आजच्याच दिवसाकरीता झालेली आहे की मी माझ्या पदाचा, माझ्या ओळखीचा, माझ्या मित्रपरीवाराचा, माझ्या व्यवस्थांचा माझ्या जास्तीत जास्त क्षमतांचा वापर याच कारणासाठी करावा. परीक्षा होती. परंतू मी अनेकांच्या सहकार्याने परीक्षेला बसण्याचे ठरविले. माझ्यासोबत काम करणाऱ्या चमुला बोलावले आणि त्यानंतर सुरु झाला एक कार्यसिद्धीप्रयासाचा एक अनोखा प्रवास!

खरे तर ही गोष्ट नेहेमी करीत असलेल्या कामांच्या तुलनेत मोठी नव्हती परंतू केवळ दहा तासात ही सारी कागदपत्रे बनवून, रेल्वेचे आरक्षण मिळवून माझ्या बहिणीला तिच्या भवितव्याच्या दिशेने अग्रेसर होण्यास मदत करण्याचा तो एक अनोखा प्रयास होता, तो  आम्ही सुरु केला! (क्रमशः)






Comments

  1. सगळ्यांनाच शिकवण देणारा अनुभव

    ReplyDelete
  2. सगळ्यांनाच शिकवण देणारा अनुभव

    ReplyDelete
  3. फारच चांगला अनुभव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23