थोडा है की थोडे की जरुरत है@05.03.19

व्यस्ततेचा ऑटीझम

खुदी को कर बुलंद याची प्रचिती मला लवकरच येणार होती

आजकाल कोणताही कार्यक्रम आटोपल्यानंतर फोटो काढण्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. बदललेल्या काळातील ती एक नवी गोष्ट आहे. कार्यक्रम झाल्यावर सर्व सहभागी लोकांसोबत फोटो काढणे आवश्यक आहे. मला ही गोष्ट छान वाटते. कारण कार्यक्रमाच्या तयारीत काही लोक नेहेमी पडद्याच्या मागे काम करतात त्यांचा कुठे उल्लेखही होत नाही. त्यामुळे त्यांचा निदान फोटो काढल्या जाणे ही बाब खरोखरीच चांगली आहे. शिवाय कार्यक्रम झाल्याचा तो एक पुरावा देखील असतो. म्हणूनच मी देखील कार्यक्रम संपल्यावर या फोटोच्या कार्यक्रमात सहभागी होत असतो. परंतू त्या दिवशी मात्र मला तो कार्यक्रम लवकर आटोपावा असे वाटत होते कारण मला प्रचंड आश्चर्यात टाकणारा बदल दर्शविणारी माझी वर्गमैत्रीण माझी वाट बघत होती. त्यापेक्षाही जास्त मला तिच्याशी बोलण्याची वाट होती. जेवणाच्या वेळी मात्र मी आयोजकांना सांगितले की मला माझ्या वर्गमैत्रीणीशी निवांत बोलायचे आहे. त्यांनी आम्हा दोघांची स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था केली जेवण करता करता आम्ही बोलू लागलो. पुढच्या साधारण अर्धा तास तिने मला तिच्या आयुष्याचा जो भाग कथन केला, मला तर ती एखाद्या चित्रपटाची कथाच वाटली

किती चिडवायचे रे तुम्ही सारे मला, आठवतंय? तिने मला विचारले. हो यार, कळत नव्हते त्या वयात. तू म्हणजे आमच्यासाठी सॉफ्ट टारगेट होती त्यामुळे ते सारे व्हायचे. तुझ्या आजाराबद्दल किंवा तुझ्या अडचणींबद्दल समजून घेण्याची संवेदनशीलता नव्हती त्या वेळी. फारच क्रूर वागत होतो आम्ही सारे तुझ्याशी, आता जाणवते. तुझे केस ओढायचो, तुझ्या नावाने बोर्डवर काही काही लिहायचो, तुझ्या पाठीला ते गोकरुच्या झाडाची काटेरी फळे चिटकवायचो, पागल, बह्याड, मॅड काय काय म्हणायचो तुला! त्या सर्व गोष्टींबद्दल मनापासून सॉरी. ते सारे वागणे फारच निष्ठूर होते. हो खरोखरीच होते, ती म्हणाली, पण खरे सांगू? मला त्यावेळी ते फार जाणवायचे नाही कारण मी वेड्यागत माझ्यातच होती. आपल्या मनाविरुद्ध काहीतरी होतंय आणि माझ्या सभोवतालचे सारे माझ्याशी काहीतरी वेगळे वागताहेत असेच केवळ जाणवायचे. तुम्हा कुणालाही एक गोष्ट ठाऊक नव्हती. शाळा संपल्यावर तुम्ही सारे हो हल्ला करीत निघून जायचे पण मी मात्र पायऱ्यांवर बसली असायची आईची वाट बघत. आई शेतात मजुरीला जायची ते काम आटोपून मग मला घ्यायला याची. आई फार जबरदस्त बाई होती माझी. अतिशय कणखर. मुख्याध्यापकांशी भांडून तिने मला प्रवेश मिळवून दिला होता शाळेत. दिवसभर तुम्ही त्रास दिल्यामुळे तुम्ही सारे गेल्यावर मी आई येईपर्यंत रडत बसायची एकटीच. मला का रडू येते ते मलाच कळत नव्हते आणि आई दिसली की जास्त रडू यायचे. ती दोन मिनीटे माझ्याजवळ बसायची आणि मी तिला घट्ट बिलगायचीमाझी आई फार शिकलेली नव्हती परंतू भावनांची ओळख तिला फार जास्त होती. वर्गात तुम्ही सर्वांनी तिला त्रास दिला असणार म्हणून मी रडतेय हे तिला कळायचे पण तुमच्याबद्दल ती वाईट बोलायची नाही. पण मग परीक्षेपूर्वीच तिने माझे नाव शाळेतून काढून टाकले होते. हो मला माहित आहे, मी तिला म्हणालो. परंतू आम्ही सारे वेड्यासारखे आमच्यात जगात मग्न होतो त्यामुळे ऑटीझम ची सुरुवात असलेली एखादी मुलगी वर्गातून निघून गेली ही काही फार मोठी बाब नव्हती आमच्यासाठी. नाही म्हणायला चिडविण्याचे एक टारगेट कमी झाले एवढेच काय आम्हाला वाटले. फारच वाईट वागत होतो आम्ही. परंतू नेमके काय झाले होते? प्रसंग तसा वाईटच घडला होता. पण त्याची दाहकता मला मोठी झाल्यावर माझ्या आई ने सांगितली तेव्हा कळली. एके दिवशी मी शाळेत एकटी आईची वाट बघत बसली असताना शाळेच्या चपराश्याने मला जवळ बसविले माझ्या अंगावरुन हात,.. ती बोलण्याची थांबली. पुढचे माझ्या लक्षात आले. आईने ते बघितले त्याला तिने चोपूनच काढला. पण मग त्यामुळे तिने मला शाळेतून काढून टाकले. पुढे दोन वर्षे मी घरीच होती. त्यानंतर मात्र माझ्या जीवनात माझ्या दूरच्या नात्यातील एक जोडपे आले त्यांनी माझ्या आयुष्याचा कायापालट केला. मला त्यांनी दत्तक घेतले. मला दोन मोठे भाऊ असल्याने पोरीचे आयुष्य सुखात जाऊ शकेल असा विचार करुन माझ्या आईने होकार दिला आणि मी बंगलोरला पोहोचली

बंगलोरला देखील माझ्या समस्या कमी नव्हत्या. सुरवातीला एका शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर तेथेही तुमच्यासारखेच मित्र मैत्रीणी होते. फरक इतकाच की ते सारे माझी इंग्रजी भाषेत खोड काढायचे. सगळे मिळून माझ्याबद्दल बोलत रहायचे मला काहीच कळायचे नाही. शाळेमधले एकटेपण माझा पिच्छा सोडत नव्हते. माझे पालक मात्र सर्व गोष्टी फार धिराने सांभाळत होते. माझ्या स्थितीमधे फार सुधार नव्हता. त्या चमकदार शाळेने देखील मला स्विकारले नाही. तेथेही मी एकटीच होते. दोन वर्षाच्या तेथील माझ्या असमाधानकारक प्रगतीमुळे शाळेकडूनच मला टीसी देण्यात आली पुन्हा माझे आयुष्य थांबले. त्याचवेळी माझ्या पालकांनी मला होप नावाच्या एका संस्थेमधे घातले तेथून माझे आयुष्य अक्षरशः बदलून गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या संस्थेमधे मला मी जशी होते तशीच स्विकारल्या गेली

माझ्या जीवनात आशा निर्माण करणारी ती होप नावाची संस्था नावाप्रमाणेच कार्य करणारी होती. त्यांनी जे मला घडविले त्याचाच परीपाक म्हणजे आज मी हा पुरस्कार तुझ्या हस्ते स्विकारला आहे. प्रत्येक ठिकाणाहून अवहेलना झाल्यावर मला त्याचेही काही वाटेनासे झाले होते. परंतू त्या संस्थेमधे सर्वप्रथम माझ्यावर इलाज सुरु झाला. पहिल्यांदा मला सन्मानाने प्रेमाने वागविणे सुरु झाले. मला माझ्यातले बदल जाणवायला लागले. हळूहळू मी जगायला लागली. माझ्या बळावर जगू लागली. त्या संस्थेमधे माझ्या प्रत्येक कमतरतेवर काम करणारे वेगवेगळे लोक होते. कुणी माझे बोलणे ठीक करीत होते तर कुणी मला व्यवस्थित वागायला शिकवित होते. एकंदरीत एका अडगळीत पडलेल्या खेळण्याला पुन्हा चमकवून चालविण्याचा प्रयत्न ते  सारे लोक करीत होते. मला पण छान वाटू लागले होते. मी देखील खूप प्रयत्न करु लागली. सर्व मुलांपेक्षा मी जरा मागे होती. परंतू आता मला धावायला आवडू लागले होते. दहावीचा निकाल लागला तेव्हा मी निश्चित काहीतरी चांगले करु शकते हा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर मात्र मला मोठ्ठे आकाश मिळाले नि मी उडू लागले. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएच. डी. देखील केले. होप संस्थेतीलच एका माझ्या आवडत्या सरांनी मला ही हेल्प लाईन ची कल्पना दिली आणि या माध्यमातून मुलांशी बोलणे सुरु केले. परंतू याचे काही विशेष कारण आहे का? मी तिला विचारले. ती म्हणाली, आहे ना! तिने जे कारण सांगितले ते माझ्या मनात अजूनही जसेच्या तसे आहे

ती म्हणाली, अविनाश, लहानपणी मला बोलता येत नव्हते त्याचे कारण मला असलेला आजार होता. परंतू आता मुलांना बोलता येत नाही त्याचे कारण म्हणजे मुलांच्या आई वडीलांना आजार झालाय. बदलत्या काळातल्या या आजाराचे नाव आहे व्यस्तता. आई वडीलांच्या या व्यस्ततेमुळे मुलांना बोलण्यासाठी कुणी नाही. त्यामुळे त्यांना मन मोकळे करायला जागाच नाही. असाच एखादा मुलगा मला सांगत असतो, त्याच्या वर्गातल्या चिंटू ने त्याच्या स्कुलबॅगवर पेनाने चित्र काढले त्याचा राग आला म्हणून त्याने त्याला मारले. गोष्ट पिटूकली असते परंतू ही त्याला त्याच्या बाबांना सांगायची असते परंतू त्याच्यासाठी पैसा कमावता कमावता बाबांना वेळच नसतो म्हणून मी माझा स्टाफ बोलतो. यातली अजून दाहक बाब म्हणजे या मुलांना असे बोलते करण्यासाठी यांचे आई बाबाच नोंदणी करुन देतात महिनावारी पैसे देखील देतात. लहानपणी बोलू शकणारी मी आता कायम बोलत असते पण मन मात्र रुदन करीत असते. काय करु? असे व्हायला नको ना? सांग! काय बोलणार मी? हा व्यस्ततेचा ऑटीझम कसा दूर करावा याचा विचार मी करु लागलो. बघूयात. उत्तर सापडेल. आपण देखील मदत कराल, होय ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23