थोडा हा थोडे की जरुरत है@12.03.19

डीसमीस... बट..

डीसमीस ॲन्ड डीले कन्डोन्ड.. बट ऑल बेस्ट फॉर युवर फ्युचर.. 

सर्वोच्च न्यायालयाच्या एका ज्येष्ठ न्यायाधीशाने दिलेल्या या निर्णयातील पहिले वाक्य नेहेमीचेच होते परंतू त्या पुढील वाक्य मात्र जरासे वेगळे होते. तेथे उपस्थित बऱ्याच मंडळींना त्या वाक्याचे आश्चर्य वाटले परंतू त्या सर्वांना माननीय न्यायाधीशांनी उच्चारलेल्या त्या वाक्याचे कौतुकही वाटले. न्यायदानाच्या चौकटीबद्ध प्रक्रीयेला छेदून एक पाऊल पुढे टाकून त्यांनी उच्चारलेले हे वाक्य ज्याच्यासाठी होते तो मात्र त्या वाक्याने खुश झाला होता.

सर्वोच्च न्यायालयातील तो दिवस बऱ्याच धावपळीच्या दिवसांपैकीच एक होता. केसेस सादर करण्याच्या दिवशी जी धावपळ असते तिच सगळीकडे सुरु होती. प्रत्येक बेंचसमोर किमान साठ केसेस होत्या.परंतू त्यातील जवळपास सर्व या दाखल होण्याच्या पायरीवरच्या असल्याने दोन दोन मिनीटातच त्याचे कामकाज होत होते. कोर्टाचे कामकाज सुरु व्हायचे असल्याने सारे जण समोरच्या जागेत उन्हात उभे होते. त्याचवेळी तो मुलगा मला सुप्रीम कोर्टात्या पायऱ्या चढताना दिसला. माझ्या तो लक्षात राहीला कारण त्याने पहिल्या पायरीवर नमस्कार केला. सामान्यपणे तेथे येणारे वकील मंडळी असे काही करीत नाहीत. म्हणूनच तो साधारण पंचेवीशीतला मुलगा मला जरा वेगळा वाटला. नामांकित परीवारातील तो असावा कारण बरेच जण त्याला शुभेच्छा देत होते, त्याच्याशी बोलत होते. एकंदरीत त्या सर्व प्रकारावरुन माझ्या लक्षात आले की त्या मुलाचा बहुदा तेथील पहिला दिवस असावा. स्वतंत्रपणे तो त्याची पहिली केस लढणार होता हे मला नंतर कळलेच. सर्वांच्या शुभेच्छा स्विकारत असताना तो मात्र प्रचंड बावरलेला होता. नामांकित आणि दिग्गज वकिलांची फौज तेथे होती. कपील सिब्बल, प्रशांत भुषण, साळवे, या सारख्या अनेक मोठमोठ्या वकीलांच्या उपस्थितीचेही दडपण त्याच्यावर होते. सर्वांच्या शुभेच्छा घेऊन तो कोर्टात हजर झाला. त्याची केस ४० नंबरवर होती

कोर्टरुम खचाखच भरलेले होते. काही महत्वाच्या केसेस त्या ठिकाणी असल्याने खूपच गर्दी होती. हा मुलगा मला वकिलांसाठीच्या शेवटच्या रांगेत बसलेला दिसला. अस्वस्थपणे त्याचे फाईल वाचणे सुरु होते. त्याचा अशील माझ्या बाजूलाच उभा होता. तो आपल्या केसचे भवितव्य त्या नव्या वकिलाच्या माध्यमातून बघत होता. त्यामुळे त्या मुलाला एका बाजूने आपल्या अशीलाला स्वतःमधील आत्मविश्वासही दाखवायचा होता आणि दुसऱ्या बाजूने तो मनातून फार अस्वस्थ होता. एका यशस्वी वकिलाकरीता आत्मविश्वास ही सर्वात जमेची बाजू असते. आपण केस हरुच शकत नाही हा आत्मविश्वास जो वकील अशीलाच्या मनात निर्माण करु शकतो तोच खरा यशस्वी वकील असतो. परंतू आत्मविश्वास ही हळूहळू अनुभवाने निर्माण होणारी बाब आहे त्या मुलाची तर ती पहिलीच केस होती. कोर्टाचे कामकाज जसेजसे पुढे सरकू लागले तसा तसा तो अजूनच अस्वस्थ होऊ लागला. त्याचे कारणही तसेच होते. फार वेगात प्रकरणे डीसमीस होत होती. माननीय न्यायधीश भरपूर अभ्यास करुन आले असल्याने ते वकिलांना फार बोलू देत नव्हते. एका पाठोपाठ एक प्रकरणे डीसमीस करत होते. साधारण वीस प्रकरणे आटोपल्यावर त्या मुलाने मागच्या दिर्घेत फेऱ्या मारणे सुरु केले. त्याने तयार केलेले प्लीडींग तो केवळ वाचत नव्हता तर फेऱ्या मारता मारता त्याचे ते पाठ म्हणून बघणे सुरु होते. छान एअर कंडीशन्ड कोर्ट रुममधेही त्याला घाम फुटला होता. आपला मोबाईल नीट बंद केलाय की नाही हे देखील त्याने दोन तीन वेळा तपासले होते. पस्तीस नंबरचे प्रकरण आटोपल्यावर तो समोर जाऊन बसला. त्याचे वाचन सुरुच होते. साधारण पंधरा मिनीटांनी त्याच्या केसचा नंबर घोषित झाला हातात आपल्या केसची कागदपत्रे संदर्भाकरीता काही पुस्तके घेऊन तो माननीय न्यायाधीशांसमोर उभा झाला.

याही केसचा अभ्यास न्यायाधीश महोदय करुन आले असल्याने त्यांनी तुमच्या केसमधे फार काही नाही असे सुरुवातीलाच म्हणाले. परंतू मोठ्या हिमतीने त्या पोराने आपली बाजू मांडणे सुरु केले. न्यायाधीश महोदय कधी त्याचे ऐकत होते तर कधी त्यांच्या सोबत असलेल्या न्यायाधीशांशी चर्चा करीत होते. पाठ केलेले सर्व म्हणायचे आहे या मानसिकतेमधे हा मुलगा धडाधड बोलत होता. न्यायधीशांनी त्याला सूचना केली की आम्ही परस्परांशी बोलत असताना तुम्ही बोललात तर आम्हाला तुमचे ऐकता कसे येईल? पहिला धडा तो मुलगा शिकत होता. आपली बाजू मांडताना त्याने संदर्भाकरीता काही कागदपत्रे दिली. न्यायधीशांचे समाधान होत नव्हते. दोन न्यायधीशांच्या बेंचसमोर केस असूनही त्याने संदर्भ कागदपत्रांचा एकच सेट आणला होता. न्यायधीशांनी ही देखील बाब त्याला सांगितली. त्याची सर्व गडबड बघून त्यांनी त्याला विचारले की ही तुझी पहिली केस आहे का? ओशाळून त्याने हो म्हणले. पुढे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न त्याने सुरु ठेवला. आता मात्र न्यायाधीश महोदय देखील हसू लागले होते. त्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी ते देत होते. त्या मुलाच्या मनाची स्थिती मी समजू शकत होतो. खचाखच भरलेले कोर्टरुम, अनेक दिग्गज वकील तेथे बसलेले. सर्वांचे लक्ष त्याच्या बोलण्यावर लागलेले. एका बाजूने केस जोरकसपणे लढायची परंतू जर डीसमीस झाली तर कोर्टात बसलेल्या सर्वांकडे बघायचे कसे? त्या ताणामुळे तो गोंधळून गेला होता. त्याचे बोलणे आटोपल्यावर न्यायाधीश महोदयांनी त्याला त्याच्याच याचिके मधील एका विशिष्ट पृष्ठावरील एक बाब वाचायला लावली त्यानुसार ती केस दाखल होऊ शकत नाही असे त्यास सांगितले. तज्ञ अनुभवी असलेल्या न्यायाधीशांनी त्याला एका वाक्यातच शांत केले त्यानंतर त्यांनी वाक्य उच्चारले डीसमीस ॲन्ड डीले कन्डोन्ड. साधारण या वाक्यावर निकाली निघणाऱ्या प्रत्येक प्रकरणाचे समापन होते. परंतू अचानक न्यायाधीश महोदयांनी त्या नव्या वकीलास म्हणले, बट ऑल बेस्ट फॉर युवर फ्युचर. त्या वाक्यामुळे तो जरा खुश झाला त्याला उपस्थित मंडळींकडे बघण्याचे बळ मिळाले. त्याच्या जीवनातील पहिली केस तो हरला होता. नाराज तर झालाच होता. जेवणाच्या सुटीमधे मला तो परत दिसला. एका ज्येष्ठ वकीलांसोबत तो बसला होता. ते वकील महोदय त्याला समजावत होते. त्यांनी त्याला जे सांगितले ना ते आपल्या घरातील आसपासच्या सर्वच तरुण मंडळींना सांगण्यासारखे आहे. जीवन जगताना असा विचार जर आपल्याला तरुण पिढीच्या मनात प्रस्थापित कराता आला तर ही तरुण मंडळी अपयशाने वैफल्यग्रस्त होऊन खचून जाणार नाहीत तर परीश्रमाने नव्या आव्हानांकरीता तयार होऊ शकतील

एक अत्यंत नामांकित अनुभवी वकील, त्या पहिली वहीली केस हरुन आलेल्या मुलाला छान समजावत होते. बेटा, केस जिकणे किंवा हरणे महत्वाचे आहेच कारण त्यावरुन आपले परीक्षण केले जाते परंतू यासोबतच महत्वाचे आहे की आपण केस लढतो कश्या प्रकारे? कोणाच्याही कार्याचे मुल्यमापन केवळ निकालावरुन नव्हे तर त्या निकालापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रीयेवरुनही ठरते. आज तू ज्या प्रकारे तुझ्या आयुष्यातील पहिला प्रयत्न केलास तो निश्चितच स्पृहणीय होता म्हणूनच तुला न्यायाधीश महोदयांनी भविष्याकरीता शुभेच्छा दिल्यात. बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्यात लढाया किती जिंकल्या यासोबतच त्या कश्या लढल्या हे देखील महत्वाचे असते. या आजच्या केस संदर्भात तुला तुझ्या अशीलाला, नातेवाईकांना, इतर वकीलांना काय काय सांगायचे आहे ते फार वेगळे असू शकते. परंतू तुला स्वतःला जे सांगायचे आहे ते अतिशय प्रमाणिकपणे सांगता आले पाहिजे, आणि ते काय? आजची लढाई मी हरलो असलो तरी लढताना मी माझ्या सर्व क्षमता प्रामाणिकपणे वापरल्या त्याबाबत मी संपुर्ण समाधानी आहे. हे जर तू स्वतःला सांगू शकलास तर हरण्याचे शल्य दूर होऊन पुढे जिंकण्याची जिद्द निर्माण होईल

केवळ दोन मिनीटात त्या मुलाच्या चेहेऱ्यावरची खिन्नता घालवून त्यास हास्यामधे परावर्तीत करणाऱ्या या संदेशाला पराभवांनी खचून जाणाऱ्या तरुणांपर्यंत आपल्याला पोहोचविता  येईल?




 


Comments

  1. Wowww...great experience Sir.. And beautifully written as well.. 👌👍🙏

    ReplyDelete
  2. Excellent presentation, wonderful message. Must reach new generations. Try out new possibilities for reaching them.

    ReplyDelete
  3. Excellent presentation, wonderful message. Must reach new generations. Try out new possibilities for reaching them.

    ReplyDelete
  4. Excellent Presentation.I too should learn.Must reach new generation.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23