थोडा है थोडे की जरुरत है @ 25.12.18
पृथ्वी एवढे वर्तुळ
व्हॉटस् ॲप वरील अनेक चांगल्या चांगल्या पोस्ट पैकी मला दोन दिवसांपूर्वीची एक पोस्ट वाचून त्याबद्दल लिहावे वाटले. मला भावलेली एक अतिशय कामाची व सर्वांनीच विचार करावा अशी ती पोस्ट होती. परंतू त्याबद्दल सांगण्याआधी या पोस्टशी संबंधित आधी आलेल्या अनेक पोस्ट फेसबुक आणि सोशल मिडीयाच्या विविध प्रकारांवर मी वाचत होतो. कधी कधी त्या सर्व पोस्ट बघून फार अस्वस्थ देखील होत होतो. हे सर्व लिखाण होते नुकत्याच झालेल्या देशात झालेल्या विधानसभा निवडणूकांबाबत.
राजकीय रणधुमाळीत सध्या सोशल मिडीया हे फारच प्रभावी साधन बनले आहे. किंबहुना अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तर याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या डेटा ॲनेलेटीक्स या विलक्षण प्रकारामुळे जगभर गाजली. सोशल मिडीयाच्या माध्यामातून मन परीवर्तन घडू शकते याची काही प्रमाणात जाणिव भारतीय राजकारणाला देखील आली व तेव्हापासून या माध्यमांचा वापर करणारे मंडळी अस्तित्वात आले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी बांधिलकी असणाऱ्या मंडळींनी या माध्यमांचा वापर पक्षाच्या विचारांना प्रसरीत करण्यासाठी नव्हे तर विरोधातील पक्षाच्या व्यक्तींना विचित्र पद्धतीने सादर करण्यासाठी सुरु केला. परंतू हे करताना या पोस्ट वाचल्यावर फार वाईट वाटणारी स्थिती येऊन जाते कधी कधी. म्हणूनच या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मला ती दोन दिवसापूर्वीची पोस्ट महत्वाची वाटते.
राजकीय पक्ष व राजकारणाबाबत लिहीताना इतक्या तीव्रतेने लिहीले जाते की त्यावर महाचर्चा घडतात. आपल्या विचारांच्या विरोधातील राजकीय पक्षाबद्दल लिहीताना कधीकधी तो कडवटपणा परिसीमा गाठतो. मग त्याला विरोधही तितक्याच ताकदीने करावा लागतो. अश्या पद्धतीने राजकीय व्यक्तीमत्वांचे आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जमेल तेवढ्या वाईट शब्दांमधे अवमूल्यन करताना त्या चर्चांचा दर्जा फार जास्त खालावतो. यामधून ती चर्चा राजकीय न राहता खाजगी बनायला लागते. मुद्द्यांवर न बोलता शिवीगाळ सुरु होते. शिवाय चर्चा करणारे त्या प्रसिद्ध मुख्य व्यक्तिमत्वांना व्यक्तीशः ओळखत नसले तरी एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळे पुढे या चर्चांमधे त्या दोन व्यक्तिमत्वांना दूर ठेऊन स्थानिक पातळीवरील उणी दुणी काढणे सुरु होते. तुला ओळखून आहे, कौन कितने पानी मे अश्या संवादांनंतर त्या संवादाचे रुपांतर भांडणात होते व त्यानंतर अमुक चौकात भेट तुला दाखवतो, खऱ्या बापाचा असशील तर, तुला धडा शिकवायलाच पाहिजे अश्या धमक्यांची भाषा सुरु होते. या चर्चेचा स्तर पुढे पुढे तर अक्षरशः वाईट वाईट शिव्यापर्यंत देखील जातो. मुळात ज्या दोन व्यक्तिंबद्दल लिहायचे होते ते दूर राहतात आणि यांचेच सुरु होते. अश्या पद्धतीच्या चर्चा व त्यामधे अतिशय खालच्या पातळीवरील भाषेचा केलेला वापर फारच दुर्दैवी आहे. काय साध्य होणार अश्या पद्धतीने? राष्ट्रीय पातळीवरील राजकीय नेत्यांची बाजू मांडताना किंवा त्यांची व्यक्तीमत्वे मोठी किंवा लहान करण्याच्या नादात आपली स्थानिक पातळीवरील सौहार्दता मात्र लयाला जाते आहे याचा विचार सर्वच पातळीवर करण्याची गरज आहे. कधी कधी या चर्चांमधून चांगली ओळख असलेल्या दोन मित्रांमधे वितुष्ट येईपर्यंत मजल जाते. राजकारण, निवडणूक, नेत्यांचा आपापसातील विरोध, त्यांची भाषणे या साऱ्या गोष्टी संपतात परंतू त्या माध्यमातून या चर्चांच्या निमित्ताने मात्र आमचे स्थानिक पातळीवरील मित्र एकमेकांचे वैरी बनून कायम वैर टिकवितात. राजकीय चर्चांच्या माध्यमातून मोठ्या पातळीवरील गोष्टी किती गांभिर्याने घ्यायच्या व त्याद्वारे आपल्यात वितुष्ट येऊ देणे हा केवळ पोरखेळ आहे आणि हे असले प्रकार प्रयत्नपूर्वक सहमतीने थांबवायला हवेत ही गरज स्पष्ट करणारी ती पोस्ट मला या ठिकाणी उधृत करायची आहे.
एका राज्यातील निवडणूकांमधे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी व नेत्यांनी एकमेकांविरोधात केलेला प्रचार, आरोप-प्रत्यारोप, या संदर्भातील लिखाण या पोस्ट मधे वर दिले होते. व त्यानंतर जेव्हा आता नव्या सरकारचा शपथविधी होता त्या दिवशीची याच सर्व परस्पर विरोधी नेत्यांची एकमेकांची जीवाभावाने भेट घेतानाची छायाचित्रे दिली होती व त्याखाली लिहीले होते की, निवडणूकीच्या काळात एकमेकांविरोधात वाटेल तसे बोलणारे, एकमेकांवर आरोप करणारे, एकमेकांच्या विरोधात असलेले सारे नेते मंडळी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देताहेत, एकमेकांच्या गळ्यात पडताहेत, निवडणूक संपली म्हणून सारे विसरुन पुन्हा आपापल्या कामाला लागतात. त्यांच्यात वितुष्ट रहात नाही. पण आपण मात्र त्यांच्या विचारांचे वाहक बनून हकनाक एकमेकांची उणी दुणी काढतो व शत्रुत्व निर्माण करतो. असे करण्यापेक्षा असल्या चर्चांना थारा न देता काहीतरी सकारात्मक बोलुया व आपल्यातील सौहार्द टिकवूयात. मला हा विचार मनापासून आवडला. खरोखरीच एकमेकांबद्दल सर्व प्रकारचे आरोप केल्यानंतरही ही मंडळी किती सहजतेने एकमेकांसोबत वावरु लागतात. त्यापैकी काहींना विचारल्यास ते सांगतात देखील की तो विरोध, ते सारे केवळ निवडणुकीपुरते असते, आमचा एकमेकांना तात्विक विरोध आहे, तशी आमच्यात मैत्री आहे. मला या वैचरिक प्रगल्भतेचे कौतुक वाटते. राजकारण करायचे म्हणजे विरोध करावाच लागणार, एकमेकांवर आरोप करावेच लागणार परंतू तो सारा प्रचाराचा भाग असून त्याला कायमस्वरुपी गांभिर्याने घ्यायचा नसतो तर त्या सर्व आरोपांच्या फैरींच्या पलीकडे नाते जपायचे असते ही प्रगल्भता आपल्या देशातील जवळपास सर्वच नेत्यांकडे आहे. अडचण ही आहे की ही प्रगल्भता त्यांच्या विचारांचे वाहक मात्र दाखवू शकत नाहीत. ते मात्र या मोठ्या नेत्यांची बाजू घेण्याच्या निमीत्ताने आपल्या जवळच्या परंतू वेगळ्या विचारांच्या लोकांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतके जबरदस्त प्रहार करतात की त्याच्या जखमा खोलवर होतात आणि मग तुला अमूक चौकात बघून घेतो पर्यंत पाळी जाते. त्याचवेळी त्यांच्या राजकीय नेत्यांनी मात्र निवडणूकीपुरता केलेला विरोध विसरुन सहभोजनाचा आस्वाद घेणे सुरु केले असते.
सोशल मिडीयाचा आपल्या जिवनातील वापर कशासाठी व कोणत्या पद्धतीने या विषयावर खरोखरीच विचार करण्याची पाळी आली आहे. हे सारे आंतरजाल आपल्याला एकमेकांशी जोडण्यासाठी निर्माण झाले आहे हा विचार सर्वप्रथम डोक्यात पक्का व्हावा. या निमित्ताने वर्षानुवर्षे एकमेकांशी संपर्कात नसलेले लोक परत एकदा संपर्क प्रस्थापित करु शकतात, माहितीचे वेगाने आवागमन होऊ शकते व या द्वारे जग जवळ येण्यास मदत होते या भुमिका मनात पक्क्या करणे गरजेचे आहे. परंतू सोशल मिडीयाची कोणतीही पद्धत माणसा माणसातला प्रत्यक्ष संवाद रीप्लेस करु शकत नाही. माणसांची आपापसातील भेट, प्रत्यक्ष सहवास, सोबत राहण्याचा आनंद, सोबत जगून दिलेली साथ, प्रेमाने केलेला स्पर्श हे सारे रीप्लेस होणारे नाही. म्हणूनच सोशल मिडीयाचे आपल्या जीवनातील महत्व तेवढ्याच प्रमाणात आहे हे समजून त्याला किती गांभिर्याने घ्यायचे याचा देखील विचार व्हावा. कोणत्यातरी राजकिय किंवा सामाजिक विचारांशी असलेली माझी अवास्तव बांधिलकी सोशल मिडीयावर मला चुकीचे लिखाण करायला, त्याद्वारे जवळच्या वेगळ्या विचारांच्या मित्राची अवहेलना करायला व त्यामधून संवादाचा स्तर घसरुन कायमच्या जखमा करायला बाध्य करत असेल तर मी सोशल मिडीयाचा खरा अर्थ विसरलो आहे असेच म्हणावे लागेल. यापेक्षा राजकीय नेत्यांद्वारे दाखविली जाणारी प्रगल्भता समजून घेऊन व त्यांचे एकत्रीत येणे लक्षात घेऊन अकारण भावनिक होणे बंद करायला हवे. त्यात नुकसान आपलेच आहे. कारण कोणतातरी राजकीय किंवा सामाजिक विचार मांडताना सोशल मिडीयावर इतक्या तीव्रतेने लिहीले जाते की मनभेद होतो आणि आपण आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना देखील अकारण दुरावून बसतो.
खरे तर सोशल मिडीयावर आपण जमेल तेवढ्या सकारात्मक गोष्टींचेच प्रसरण करायला हवे असे वाटते. अप्रीय गोष्टी कळतातच, पण चांगल्या छान गोष्टी एकमेकांपर्यंत पोहोचविल्या तर छान होते. छान छान गाणी, सकारात्मक घटना, सुंदर छायाचित्रे या सर्व बाबी एक सकारात्मक वर्तुळ निर्माण करतात आणि ते वर्तुळ एके दिवशी पृथ्वीच्या गोलाएवढे बनवुयात!! असे करता येईल?
ट
Comments
Post a Comment