थोडा है थोडे की जरुरत है @ 18.12.18
आर्तता विरहाची
रात्रीचा प्रहर! नीरव शांततेचा अंमल सुरु झालेला. दूरवर कुठेतरी सहजच होणारी रातकिड्याची किर किर, ती देखील हलकेच. आसमंतात स्वच्छ परंतू गर्द निळाई पसरलेली व त्यावर चमकणाऱ्या असंख्य ताऱ्यांनी उजळून निघालेले ते प्रत्येकच माणलाला विधात्याकडून लाभलेले छत अधिकच घनगर्द दिसत होते. अर्धवट उजळलेला चंद्रमा व त्याच्यापासून काहीश्या अंतरावर असलेली, त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघणारी, त्याची असूनही त्याच्या समवेत नसलेली, विरहातही आनंद मानणारी, त्याच्या जगण्याचा आधार असूनही त्याला स्वतंत्रपणे जगायला लावणारी, परंतू त्याला तसे करायला लावून त्याच्या नकळत आसवे ढाळणारी आनंद विरहणी, ती तारका या दोघांचाच विचार मनात सुरु असताना अचानक फोनमधील प्ले लीस्टवर तो दैवी सुर उमटला, ते भावनेने ओथंबलेले शब्द झंकारले व त्याचे गाणे करणाऱ्या संगीतकाराचे वैशिष्ट्य जाणविले, अगदी नकळत! आसमंतातील चंद्रमा व त्याची ती विरहणी तारका यांचेच जणू मनोगत व्यक्त करणारे गीत स्वरसम्राज्ञी, वन अॅन्ड द ओन्ली लता मंगेशकर गात होत्या. सुरेश भटांचे ते अद्भुत शब्द होते व या कवितेला स्वरसाज चढविला होता पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी. एका विरहणीच्या प्रेमाची व त्या प्रेमातून तिच्या ओटी येणारा विरह, वेदना देणारा परंतू त्या वेदनेतही सुख मानणे शिकविणारा विरह, एकेका शब्दातून व स्वच्छ लागलेल्या सुरावटीतून थेट मनापर्यंत पोहोचत होता. ती विरहाची वेदना आणि त्या वेदनेचे लताबाईंनी केलेले सादरीकरण म्हणजे एक अमृतानुभवच होता. रात्रीच्या त्या शांत प्रहरी त्या गीताचा एकेक सूर व शब्द त्या विरहणीच्या मनातील ती विरहाची वेदना अलगद तिच्या मनस्वी विश्वात घेऊन गेली जेव्हा ती पहिली ओळ कानावर पडली,
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की, अजुनही चांदरात आहे,
सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या!
मैफिलीचे सुनेपण ह्रदयाला बोचत असतानाही ती विरहीणी आनंद व्यक्त करते तो त्याच्यासाठी गाणे गाण्याचा. त्याच्या सहवासाची ओढ, त्याची अस्तित्वहीन आठवण व त्या आठवणींमधून जाणविणारे तिच्या तिच्या आत्म्याशी एकरुप असलेले त्याचे प्रेम या साऱ्या गोष्टींचा एकत्रीत परीणाम तिला स्वच्छ चांदरातीप्रमाणे सुखद भासतो. त्याच्या विरहाने होरपळून निघालेल्या मनाला दिलासा देणारी ती चांदरात संपलेलीच नाही असेच ती म्हणते. तो तिच्या आयुष्यात नेमका कुठे आहे हे तिला कळत नाही. त्याच्या असण्याचा भास सारखा होत असल्याने त्याचा उलगडा भट साहेबांनी कडव्यामधे केला आहे. तिच्या सोबत असलेल्या परीचित अस्तित्वापलीकडे असलेला तो तिला दिसतो, हसरा आणि तिला हसविणारा!
कळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरश्यात आहे,
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या!
चेहेऱ्याचा केवळ भास आहे त्याच्या, जो तिला सुखावतो. संभ्रम व्यक्त होतो तिच्या मनातला. नेमका तो चेहेरा कुणाचा जो मला कळत नाही परंतू आरश्यात बघताना माझ्या चेहेऱ्यावर जे तुझ्या आठवणीने आलेले हसू आहे त्याचा स्रोत मात्र तूच आहेस. माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांना त्यानेच निर्माण करणे शिकविले आहे व त्यामुळे आता माझ्या आयुष्यातील त्याच्याशी प्रत्यक्ष संबंधित नसलेल्या आनंदामुळेही माझ्या चेहेऱ्यावर जर हसू आले तरी ते त्याचेच आहे जे मला आरश्यात बघायला मिळते. ही किमया आहे त्याच्या प्रेमाची, त्याच्या प्रत्यक्ष नसलेल्या परंतू सारख्या जाणवित असलेल्या अस्तित्वाची. पुढच्या कडव्यात मात्र भट साहेबांनी तो कोण याचा उलगडा केलाय व त्याला ज्या नावाने हाक मारलीय ते तर अजरामर असलेले नाव आहे. ते ज्याने धारण केले किंवा ते ज्याला प्राप्त झाले तो खरोखरीच भाग्यवान असतो. त्याला त्या विशेष नावाने गाण्यात हाक मारण्यासाठी लताबाईंचाच आवाज लागतो याची प्रचिती ते गाणे ऐकताना होते. आपल्या दैवी आवाजात लताबाईंनी या विरहिणीच्या मनातील अव्यक्त भावच जणू व्यक्त करताना त्याला हाक मारलीय, सख्या. सखा! हे मुळात नाते नाही तर ती एक मोठी जबाबदारी आहे, जी जबाबदारी न मानता समर्पणाने निभवावी लागते. कृष्णाने ती निभावली होती. राधेच्या बाबतीत, द्रौपदीच्या बाबतीत. तसाच हा तिचा सखा आणि त्याच्या जीवनाची सर्वात जवळची असूनही अबोलपणे त्याच्या दूर राहून सारे सहन करणारी ती, त्याची सखी.
सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा, अबोल हा पारीजात आहे
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या!
दोघेही आपापल्या स्वतंत्र चौकटीत वावरत असताना देखील प्रेम इतके उत्कट आणि निरातीशय आहे की ज्या प्रमाणे तिच्या आरश्यातील चेहेऱ्यावर त्याचे हसू रेंगाळते तसेच त्याच्या अंगणी तिच्या स्वरांचा अबोल पारीजात आहे. काय सुंदर कल्पना आहे सुरेश भटांची. स्वरांचा अबोल पारीजात. स्वर आहेत परंतू अबोल आहेत, ते कानाला ऐकू येत नाहीत परंतू त्यांच्या अस्तित्वाने ह्रदयाच्या तारा झंकारुन उठतात. त्याच्या घरात त्याच्या मनाला भिडणाऱ्या त्या तिच्या सुरावटी केवळ त्याला ऐकू येतात कारण त्या ऐकण्यासाठी कान उपयोगी नाहीत तर प्रेमाने ओथंबलेले मन असायला हवे व ते तिच्या सख्याजवळ आहे. म्हणूनच आपल्या सख्याला आर्ततेने हाक मारताना कदाचित त्याच्या विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर ती देते की मी आहेच रे तुझ्यासह. तुझ्या अंगणी रुजलेला तो अबोल पारीजात तुला सुरांनी भिजवितो ना? ते सूर माझेच तर आहेत. त्यामुळे शरीराच्या अस्तित्वाने जरी दोघांची चौकट वेगळी असली तरी मनाची परीभाषा एकच आहे. विरहामधेही इतकी सुखावह एकरुपता शोधणारी ही विरहीणी या गाण्याच्या रुपाने आपल्यासमोर येते. ही एकरुपता प्रेमाची, निस्सिम प्रेमाची व ती दोघांनाही समान पातळीवरील तीव्रतेने जाणवित असल्याने कुणी कुणाला प्रेम दिले हा प्रश्नच आहे. जे एखाद्याच्या अंतरातच आहे तर ते त्याने कुणाला कसे द्यावे? असा सुंदर विचार तिसऱ्या कडव्यात भट साहेबांनी मांडलाय.
उगीच स्वप्नात सावल्यांची, कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला, तुझ्याच जे अंतरात आहे,
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या!
जे तुझ्याजवळच आहे नि तुझेच आहे त्याच्या करीता तू आर्जव का करतो आहेस? असा प्रश्न विचारुन ती विरहिणी तिच्या विरहामधे विव्हळणाऱ्या सख्याला सांगतेय. स्वतः विरहाच्या अग्नीत होरपळत असूनही त्याचे मन जाणून घेऊन त्याला दिलासा देण्याचा हा तिचा प्रयत्न किती गोड आहे! जे तुझेच आहे त्याचे आर्जव कशाला? जे तुझ्याच अंतरात आहे ते प्रेम तू कुणाला देणार? ते सारे काही तुझेच आहे. शरीराने तुझ्यापासून दूर असल्याने हा विरह तिव्रतेने जाणवित असला तरी देखील मनाच्या पातळीवर तर केवळ तूच आहेस आणि मी देखील तुझ्याशीच एकरुप आहे, इतकी की सखा नि सखीची दोन स्वतंत्र अस्तित्वे जाणवितच नाहीत, ते एकच आहेत.
विरहाचा व समर्पित प्रेमाचा हा उच्च कोटीचा विचार सुरेश भटांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. प्रेमाच्या या दैवी स्वरुपापुढे, उत्श्रुंखलतेने व्यक्त होणारे व काही काळानंतर ओसरुन जाणारे प्रेम फारच क्षुल्लक वाटू लागते. प्रेमाची ही निरामय भव्यता भट साहेबांनी मांडली जी लताबाईंच्या स्वरांमुळे तितक्याच तिव्रतेने मनाला भिडते. गाणे संपले. आसमंतात बघितले तर अद्याप तो चंद्रमा व ती तारका एकमेकांपासून विलगच होते. परंतू आता मला त्यांच्यातील निरामय प्रेमाची अनुभूती झाली होती, या सुरेल गाण्यामुळे!!
अप्रतिम!
ReplyDelete