थोडा है थोडे की जरुरत है @01.01.19
विश्वास
ट्रेकच्या तयारीसाठी रुट मार्क करायला जायचे होते. राष्ट्रीय कॅम्पचे आयोजन केले असल्याने नवे काही रुट शोधण्याचे बैठकीत ठरले. नवे रुट म्हणजे जंगलात जाऊन रुट मार्कींग करणे आले. कोण कोण तयार होणार याबाबत विचारणा करण्यात आली. अनेक उत्साही कार्यकर्ते होते त्यापैकी पाच जण तयार झाले. प्रविण, सुनिल, निरज, प्रसन्न आणि मंजिरी. होय मंजिरी. चार मुलांसोबत एकटी मुलगी. या बाबीचा असा उल्लेख केल्यावर अजुनही सहजच भुवया वर जातात. परंतू या पाच जणांची ही टीम आणि त्या टीमसोबत घडलेला प्रसंग ऐकल्यावर शंकेने वर जाणाऱ्या भुवया कौतुकाने वर जातील. सर्वात महत्वाचे म्हणजे आजपासून साधारण तीस वर्षांपूर्वीच्या सामाजिक वातावरणातील ही घटना मी आपणाला सांगतोय. चार मुले आणि एकच मुलगी रुट मार्कींगला जाणार आहेत हे समाजाच्या दृष्टीने जरी प्रश्नार्थक चिन्ह लावणारे वाक्य असले तरी देखील आमच्या समुहाकरीता मात्र पाच जण रुट मार्कींगसाठी जाणार आहेत हे पुर्णविराम असलेले वाक्य होते. परंतू असे असले तरी आमच्या समुहाकरीता कायमस्वरुपी अभिमानास्पद ठरावी अशी लौकीकार्थाने आनंददायी परंतू त्या पाच जणांकरीता मात्र जीवाचा थरकाप उडविणारी ती घटना होती जी आमच्यापैकी अनेकांच्या स्मरणात आहे.
बोरखडी बल्डा या मेळघाटातील एका कॅम्पवर पोहोचण्याचा एक नवा रस्ता मार्क करण्यासाठी हे पाच जण एका स्थानिक गाईडला घेऊन निघाले. जंगलात फिरण्याचा अनुभव असलेल्यांना ठाऊक असेल की जंगल दिवसागणिक आपले रुप बदलत असते. नवी झाडे, नवे बहर, नवी पालवी बरेचवेळा जंगलाचे मार्गही बदलून टाकते. त्यामुळे जंगलात वाट काढणे कठीणच असते. या पाचही मंडळींचा प्रवास सुरु झाला. जंगलात चालता चालता चालता नेहमीचा गाईड असूनही नेमके काय झाले ते कळले नाही व ही सारी मंडळी रस्ता विसरली. नेमका खूप पाऊस पडून गेल्याने जंगलात जागोजागी पाणी साचले होते. रस्ते निसरडे झाले होते. त्याच पहाड चढायचे, दऱ्या उतरायच्या असे सारे सुरु होते. त्याच प्रकारात यांचा रस्ता चुकला. पावसामुळे जंगलात प्रचंड गारठा निर्माण झाला होता व सायंकाळच्या वेळी हे सारे नेमके कुठे होते हे कुणालाही कळत नव्हते. अंधार पडल्यानंतर मात्र त्यांनी त्यांना असलेल्या अनुभवाच्या आधारे निर्णय केला की आता रात्री जंगलात रस्ता शोधत बसायचा नाही. कारण ते फारच घातक होते. निसरडे रस्ते आणि श्वापदांची देखील भिती होती. त्यामुळे सुरक्षित जागा बघून रात्रभर त्याच जागी राहणे हाच निर्णय योग्य होता. प्रविणने निर्णय घेतला होता व सर्वांनी त्याचे अनुपालन करण्याचे ठरविले. अगदी मंजिरीसकट. वारंवार मंजिरीच्या नावाचा उल्लेख मी यासाठी करतोय की सामाजिक विचाराच्या चौकटीत मंजिरी तेथे असल्याने या घटनेकडे बघण्याचे संदर्भच बदलतात. त्या पाच जणांकरीता मात्र तसे काही नव्हते. रात्र झाली. सर्वांनी आळीपाळीने झोप घ्यायची व किमान दोघांनी जागे रहायचे असे ठरले. रात्री बारा नंतर मात्र थंडीचा तडाखा जाणवू लागला. सगळेच कुडकुडू लागले. काही वेळाने तर थंडी सहनही होईना. रात्री निबीड जंगलात व त्या काळेख्या रात्री वाट चुकलेल्या स्थितीत त्याच्यापैकी कुणीही काहीच करु शकत नव्हते. परंतू काही वेळाने मात्र मंजिरीची स्थिती जास्तच वाईट झाली. तिला थंडी सहनच होईना. तिचे सारे अंग थरथरायला लागले. शेकोटी करण्याचा निर्णय झाला. टॉर्चच्या उजेडात त्या गाईडने काही लाकडे गोळा करुन आणली. पण दुर्दैवाने सारी लाकडे ओली गच्च होती. आगपेटी होती पण त्या लाकडांना पेटविण्याकरीता रॉकेल किंवा तसले काहीच उपलब्ध नव्हते. मग निर्णय झाला. प्रविण व सुनिल यांच्या अंगातील शर्ट जाळून शेकोटी करण्याचे ठरले. पर्यायच नव्हता. दोघांचेही शर्ट जाळून कशीबशी शेकोटी पेटली व त्यामुळे मंजिरीची परीस्थिती जरा बरी राहू शकली. रात्रभर त्या शेकोटीजवळ बसून मंजिरीने जराशी झोप काढली. परंतू सर्वांनीच तिची काळजी वाटत असल्याने रात्र जागूनच काढली. त्या काळोख्या रात्री जंगलात राहणे ही बाबच मुळात मनाचा थरकाप उडविणारी होती. असे काही घडेल याची सुतराम शक्यताही न वाटल्यामुळे कसलीच तयारी नव्हती. त्यामुळे जे घडले ते घाबरवणारेच होते. दुसऱ्या दिवशी पहाटे सुदैवाने लवकरच वाट गवसली आणि हे सर्व मंडळी वाहतुकीच्या रस्त्यावर पोहोचले. यथावकाश अमरावतीला आल्यानंतर ही घटना सर्वांना कळली. सर्वांनी देवाचे आभारच मानले की यापैकी कुणावरही काही आपत्ती न येता हे सारे सुखरुप परत आले. ही घटना कळल्यानंतर मात्र एका काकुंनी मंजिरीला त्यांच्या मनात खदखदत असलेला तो प्रश्न विचारलाच. त्यांनी मंजिरीला विचारले, का गं पोरी? जंगलात तू एकटी होती यांच्यात, तुला भिती नाही वाटली? आमच्या समुहाच्या वातावरणात वावरणारी असल्याने मंजिरीला त्या प्रश्नाचा रोख कळलाच नाही. खरे तर काकुंना विचारायचे होते की जंगलात चार तरुण पोरांसोबत तू एकटी मुलगी होती तेव्हा तुला या मुलांची भिती नाही वाटली? मंजिरीने अत्यंत निरागसपणे व स्वाभाविकपणे उत्तर दिले. भिती वाटली ना काकू! जंगलात असे अडकल्यावर मन धास्तावले होते. पण माझे चार मित्र सोबत होते ना, त्यामुळे भिती पार निघून गेली व मी त्यांच्यामुळे बिनधास्त होती. मंजिरीचे ते वाक्य आजही या पाच जणांच्या आणि आमच्या समुहातील प्रत्येकाच्या कायम लक्षात राहीले आहे कारण ते वाक्य म्हणजे आमच्या समुहावर आमच्याच मैत्रीणीने व्यक्त केलेल्या संपुर्ण विश्वासाचे प्रतिक होते. संपुर्ण विश्वास ही किती सुखावह कल्पना आहे.
माझा तुझ्यावर संपुर्ण विश्वास आहे हे वाक्य म्हणजे एखाद्या नात्याच्या उच्चतम स्थितीचे परीमाण आहे. जगात वावरत असताना आपल्याला येणाऱ्या अनुभवांवरुन आपले मत बनत असते. अनुभवांनी आपला दृष्टीकोन देखील तयार होतो. अनुभव जर वाईट असतील तर मग नकारात्मक व संशयी व्यक्तीमत्व तयार होते. जगात सारे काही वाईट आहे व त्यामुळे या जगात वावरताना आजुबाजुच्या लोकांवर कायम कुरघोडी करुन आत्मकेंद्रीत झालेली मंडळी आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. याऊलट काही वाईट अनुभव आले तरी देखील जगाच्या चांगले असण्याबद्दल मनात शंका न ठेवता जिवनातील प्रत्येक दिवसाला आनंदाने आलिंगन देणे व सहवासातील व्यक्तींच्या मनात आपल्या वागणूकीतून संपुर्ण विश्वास निर्माण करणे हे माणुसपणाचे फारच उत्तम वैशिष्ट्य आहे. कारण नात्यांमधे संपुर्ण विश्वास निर्माण करण्यासाठी संबंधितांना मोठ्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. विश्वास टाकणे व त्याकरीता स्वतःला पात्र बनविणे या त्या जबाबदाऱ्या आहेत. मंजिरीने विश्वास टाकला यात तिचे मोठेपण होतेच परंतू आमच्या समुहातील आमच्या मित्रांनी एखाद्या मैत्रीणीने इतका निरातिशय विश्वास टाकावा ही पात्रता मिळविली होतीच.
जगातील वैगुण्य शोधून त्यास दोष देण्यापेक्षा, या जगाला दोन्ही हात पसरुन कवेत घेणे, त्याच्याशी मैत्री करणे, मनात शंका न ठेवता किंवा आपले मन पूर्वग्रहदूषित न ठेवता लोकसंग्रह वाढविणे व त्या सर्वांच्या संपुर्ण विश्वासाकरीता पात्र बनणे हे खरे यशस्वी जीवन आहे. काळ कितीही बदलला तरी देखील विश्वासाची व्याख्या व त्यासाठी लागणारी पात्रता व त्या पात्रतेमुळे कुणीतरी आपल्यावर टाकलेला संपुर्ण विश्वास ही अत्युच्च बाब आहे व कायम राहील. नववर्षाच्या या पहिल्या सुंदर दिवसाला आपल्याला एक छोटीशी पण सुरेख गोष्ट करता येईल. आपल्या जीवनात असलेल्या अनेक सुरेल नात्यापैकी ज्या नात्यात आपल्याला असा संपुर्ण विश्वास जाणवतो त्या व्यक्तीस माझा तुझ्यावर संपुर्ण विश्वास आहे हे प्रत्यक्ष बोलून सांगता येईल? करुन बघा!! मनापासून वाटत असल्यास हे वाक्य बोललेच पाहीजे, व्यक्त झालेच पाहीजे. त्यानंतर बघा, तो दुर्दम्य विश्वास या वाक्याच्या व्यक्त होण्यामुळे कितीतरी पटीने दृढ होतो व ते वाक्य ऐकणाऱ्याला कितीतरी पटीने अधिक समृद्ध करतो. नववर्षानिमीत्त आपल्यापैकी प्रत्येकाला हे वाक्य बोलण्यासाठी किमान एक नाते मिळावे आणि तेच वाक्य किमान एका व्यक्तीकडून ऐकण्याची धन्यता लाभावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! असे केल्यास हे संपुर्ण वर्ष आपल्याला लाभलेल्या सकारात्मक उर्जेने झळाळून निघेल हा मला संपुर्ण विश्वास वाटतो!!
Very nice article avi
ReplyDeleteखूपच छान!
ReplyDeleteKhup chan .new year chya kharya shbhechchya .vishwas ha kharach aayushyat khup mahatvachi ashi
ReplyDeletegoshta. Tyamukech aapan sarva ekmekanshi ajunhi julalele aahot. Nakkich abhimanachi goshta aaplya YHAI sathi ani vushwasachya matrisathi. Asech chan anubhav mala sudhdha aalele aahet. Sundar lekh.