थोडा है थोडे की जरुरत है @11.12.18
सिंडीकेट
सिंडीकेट या इंग्रजी शब्दाचा अर्थ असा की एखादे विशिष्ट काम करण्याकरीता वेगवेगळ्या व्यक्तींनी एकत्रीत येऊन एकमेकांच्या सहयोगाने ते कार्य करण्याकरीता केलेला समुह. या व्याख्येला जर काळजीपूर्वक अभ्यासले तर सिंडीकेट मधे काही महत्वाच्या बाबी आवश्यक आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सिंडीकेट ही अनेक लोकांची मिळून बनत असते. अनेकांना एकत्रीत यायचे म्हणजे अनेकांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना विसरुन समुहाचे व्यक्तित्व तयार करावे लागते. तसेच या समुहाने व्यक्तिगत हीत न बघता समुहातील प्रत्येकाच्या हिताचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. सोबतच सर्व बाबतीत एकमेकांना सहकार्य करण्याची भावना जोपासण्याची नितांत आवश्यकता सिंडीकेट मधे असायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे सिंडीकेट मधे योग्यता वेगवेगळी असली तरी योग्यतेनुसार आपल्याला मिळते आहे हे समजून घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालण्याची अनोखी बांधिलकी जपावी लागते व ती जपत असताना फसवणूक केली जाणार नाही याची फार काळजी घेतली जाते कारण या सर्व साखळीमधे एकाही माणसाने वावगे वागण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण सिंडीकेटला त्याचे परीणाम भोगावे लागतात याची जाणीव सिंडीकेटमधील प्रत्येक सदस्याला असते व तो या सर्व अलिखित नियमांचे पालन करीत असतो. असे झाल्यास ती सिंडीकेट यशस्वी होते व तिची भरभराट होते. अशीच एक बंगाली मंडळींची सिंडीकेट मला नुकतीच अंदमान बेटांच्या सफरीवर असताना भेटली. त्यांच्या सिंडीकेट बनवून काम करण्याच्या पद्धतीला आठ दिवसात जवळून अनुभवता आले व वेगवेगळ्या वयोगटाची, शैक्षणिक पात्रतांची, क्षमतांची व कौशल्यांची बंगाली माणसे एकमेकांना एका सिंडीकेट मधे बांधून कश्या प्रकारे कार्य करतात व एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ या मराठीतील प्रसिद्ध उक्तीनुसार काम करतात याचा अनुभव मला आला. याचे कारण अंदमान बेटांवरील आमच्या सहलीचा संचालक एक बंगाली माणूस होता. सिंडीकेट बनवून कार्य केल्यामुळे अदमान बेटांवरील ७० टक्के पर्यटन व्यवसाय बंगाली मंडळींच्या ताब्यात आहे असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. इंग्रजांनी ही बेटे वापरली परंतू आता मात्र तेथे बंगाली मंडळी राज्य करतात असे गंमतीने म्हणता येईल. ही सिंडीकेट अतिशय सहकार्याने कार्य करते व सर्वच लोकांना यात सामावून घेतल्या गेले आहे. उदाहरणार्थ सुरुवात झाली आमच्या सहलीच्या संचालकापासून जो एक बंगाली माणूस होता. त्याने आमच्याकरीता बोलाविलेली २२ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर विमानतळावर वेळेवर पोहोचू शकली नाही. त्याने त्वरीत दुसऱ्या एका बंगाली गाडी मालकास विनंती केली व त्यांनी आपसात ठरविले देखील. आम्हाला नेण्यास तो नवा गाडीवाला तयार झाला व सोबत त्याने आमचे सामान पण गाडीवर चढविले. तुझे टुरीस्ट आहेत तर तू बघत बस असे त्याने केले नाही. एकमेकांना अश्या प्रकारचे सहाय्य मी अंदमान बेटांवर अनेक ठिकाणी अनुभवले. चिडचिड न करता सहजच ते लोक असा बदल करुन टाकतात व कुणाचे काम अडू देत नाही. सेल्युलर जेलमधील लाईट अँड साऊंड शो बघायला जाताना देखील आम्हाला उशीर होत होता म्हणून त्याने अशीच वेळेवर योजना केली कोणतेही मोठे भांडण न करता. आम्ही हॉटेल मधे गेलो ते देखील बंगाली माणसाचे. गाडी चालविणारा ड्रायव्हर मुलगा बंगाली जो त्या गाड्यांच्या बंगाली मालकाकडे पंचेवीस हजार रुपये पगारावर नोकरीला होता. त्या मालकाकडे केवळ पोर्ट ब्लेअर मधे सत्तर गाड्या होत्या व त्यावर जवळपास दिडशे बंगाली पोरे ड्रायव्हर होती. कोणत्याही पॉईंटवर आम्ही गेल्यानंतर दुपारच्या जेवणाचे किंवा सायंकाळच्या नास्त्याकरीता बंगाली माणसांची हॉटेल सुरक्षित असायची जेथे पर्यटकांना विशेष सवलत दिली जायची. एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर जाण्याकरीता मोठ्या फेऱ्यांसाठी जहाज चालविणारे बंगाली लोक परंतू त्या मोठ्या जहाजावर नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या बोटी देखील बंगाली पोरांच्या मालकीच्या किंवा बंगाली मालकाकडून भाड्याने मिळालेल्या. परत दुसऱ्या तिरावर आपल्याला छोट्या बोटीतून किनाऱ्यावर नेण्यासाठी वेगळ्या छोट्या बोटी. त्यानंतर एका विशिष्ट पॉईंटवर जाण्यासाठी आमच्या सहल संचालकाने नेमून दिलेला बंगाली पोरगा हाच आमचा ड्रायव्हर व त्या दिवशीचा सहल संचालक. तो आमची स्पीड बोट ची तिकीटे काढण्यापासून ते एका नव्या स्पॉटला सोडण्यापर्यंत आमच्या सोबत. मग स्पीडबोटवर दोन बंगाली पोरे. एक बोट चालविणारा व दुसरा आम्हाला जिवंत चुनखडीच्या गुफांमधे नेऊन माहिती सांगणारा गाईड. ही सारी पोरे वेगवेगळी कामे करणार व हे सारे एकमेकांना व्यवसायात मदत करीत राहणार. परत एका दिवशी हॅवलॉक नावाच्या बेटावर एलीफंटा बीचवर बोटीत बसवून नेणारे वेगळे आणि तेथे जाऊन स्मॉर्कलींग, स्कुबा डायविंग, पॅरासीलींग, स्पीड मोटर बाईकींग करविणारे सगळे यांच्याच समुहातील व ते सारे एकमेकांकडे टुरीस्ट पोहोचवित एकमेकांना मदत करणार. प्रत्येकाचे कमीशन ठरलेले. ते बरोबर ज्याचे त्याला पोहोचणार. मी कुठेही माझे टुरीस्ट तू पळविले आणि मग आता मी काय करु वगैरे पद्धतीची भांडणे बघितली नाहीत. सारे कसे बरोबर ठरलेले व सारे बंगाली मंडळी एकत्रीत पणे हे सारे करतात. आपातकालीन स्थितीमधे देखील त्यांची एकमेकांना मदत करण्याची सवय खरोखरीच वाखाणण्यासारखी होती. एकदा एका बेटावर जाताना क्रुजमधे आम्हा वीस जणांपैकी पंधराच जणांची तिकीटे निघाली होती. उरलेल्या पाचांना पुढच्या फेरीने यावे लागेल असे होते. पण दुसऱ्या दिवशी ड्युटीवर एक बंगाली बाई आल्या व आमच्या सहल संचालकाने बरोबर ती पाच तिकीटे देखील त्याच फेरीमधे जमवून आणली. ही सारी जमवाजमव, व्यवस्था ही सारी मंडळी अत्यंत सौहार्दतेने करतात याचे मला सर्वात जास्त कौतुक वाटले. ही अशी सिंडीकेट फारच कौतुकास्पद होती. सिंडीकेट या शब्दाचा खराखुरा अर्थ जगताना मी तेथे हे लोक बघितले. आणि मग स्वाभाविकच आठवण झाली आपल्या महाराष्ट्र देशातील मराठी व्यावसायीक चमुची.
एकविसावे शतक सुरु होऊन अठरा वर्षे होताहेत परंतू अजूनही मराठी माणसाने नोकरीच करावी, व्यवसायाच्या भानगडीत पडू नये असली वाक्ये कानावर येतात. अजूनही व्यवसाय करणारा मराठी मुलगा हा लग्नाच्या चौकटीत उपेक्षितच आहे. निदान लग्न ठरे पर्यंत तरी एखादी नोकरी कर बाबा, नंतर सोडून दे इथपर्यंत चतुराई केली जाताना आढळते. आपल्या ते रक्तात नाही रे बाबा. आपण सरळ मार्गी, चाकरी करावी व महिनाअखेर आपला पगार घेऊन सुखी व समाधानी आयुष्य जगावे. ती नोकरी देखील आपल्या गावातच असेल तर मग काय, फारच छान. घराचीही समस्या सुटते. या सर्व विचारांची मालिका अद्यापही आपल्याला ऐकायला मिळते. या मालिकेच्या बाहेर जाऊन काही मराठी मित्र मैत्रीणी हिंमतीने व्यवसायाच्या क्षेत्रात आपला जम बसविण्याचा प्रयत्न करतात. परंतू अद्यापही आपल्या या महाराष्ट्र प्रांतातील मंडळींना मी वर वर्णन केल्या प्रमाणे व्यवसायांची सिंडीकेट बनविणे शक्य झालेले नाही. त्यामुळे एकएकटे आपल्यापैकी काही जण निश्चितच यशस्वी होऊ लागलेत परंतू अजूनही सिंडीकेट तयार करणे आपल्याला जमले नाही हे खरे. अंदमानची सिंडीकेट अनुभवताना माझ्या पेक्षा दुसरा सहल संयोजक वाईट आहे किंवा मी त्याच्या पेक्षा कसा चांगला आहे असली वाक्ये कुणाच्याही तोंडून ऐकली नाही. एखाद्याने स्कुबा डायवींगचे जर ३५०० रुपये सांगितले असतील जर दुसऱ्या कुणी ३००० रुपयात करुन दिले असे होत नाही. व्यवसाय सोबत व सर्वांना सोबत घेऊनच केला जातो. ही विशेषता आपल्याला आपल्या प्रांतात धारण करणे गरजेचे आहे. त्याकरीता आवश्यक ती योजना सर्वसहमतीने आखावी लागेल.
खरे तर सिंडीकेट हा व्यवसायाचा प्रकार नसून ही सहकारीतेची मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती व्यवसायातच नाही तर एकत्रीतपणे केल्या जाणाऱ्या कोणत्याही कामाला लागू पडते. स्वतंत्रपणे आपण सर्वच जण बरेचवेळा खूप साऱ्या क्षमता बाळगून असतो परंतू सहयोगाने व सहकारीतेने कार्य करीत असताना एकमेकांबद्दलचे अनेक हेतू, अहेतू आड येतात व टीम म्हणून त्या प्रमाणात यश मिळत नाही. एकविसाव्या शतकात जर मोठे व भव्यदिव्य काही घडवायचे असेल तर एकमेकांमधील ईर्ष्या, मत्सर, इगो हे सारे विसरुन प्रत्येकाला सहकारीतेच्या धाग्यात बांधण्यासाठी सिंडीकेट बनवूयात... मोठे यश फार लवकर मिळेल!!
Comments
Post a Comment