थोडा है थोडे की जरुरत है @ 04.12.18

सेंड ऑफ

मी सेंड ऑफ घेणार नाही, दामले सरांनी घोषणा केली. या घोषणे मागे त्यांचे काय कारण होते ते कळायला मार्ग नव्हता. त्या घोषणे चा अर्थ असा होता की सहकारी मंडळींनी त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कोणताही कार्यक्रम आयोजित करु नये. दामले सर असे का म्हणत आहेत हे कुणालाही कळत नव्हते. दामले सरांच्या निवृत्तीच्या निमीत्ताने शाळेचा एक महत्वाचा आधार जाणार होता. तीन दिवसांनंतर ते निवृत्त होणार होते आणि त्यांच्या निवृत्तीच्या प्रसंगी शिरस्त्याप्रमाणे निरोप समारंभाचे आयोजन करणारी समिती त्यांच्या जवळ गेली त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. ते ऐकल्याबरोबर दामले सरांनी ती घोषणा केली, मी सेंडऑफ घेणार नाही. मला शांतपणे काहीही करता निवृत्त होऊ द्या. समितीमधील लोक चकित झाले त्यांनी सरांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू सरांचा निर्णय पक्का होता. बरे त्यांच्या घोषणे मागचे कारण देखील सर सांगत नव्हते. दामले सरांसोबतच केवळ एक वर्षाच्या फरकाने शाळेत नोकरीला लागलेले देशमुख सर मात्र शांतपणे हा सारा प्रकार बघत होते. त्यांना कारण ठाऊक होते परंतू त्यांनी काहीही बोलण्याचे ठरविले. दामले सर ऐकत नाही म्हणल्यावर समितीच्या लोकांनी हा सारा प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर टाकण्याचे ठरविले कारण आता हा तिढा तेच सोडवू शकतात असे त्यांना वाटले. ती सारी मंडळी मुख्याध्यापकांकडे गेल्यावर देशमुख सरांनी दामलेंकडे बघितले. डोळ्यातील अश्रू दिसू नये म्हणून दामलेंनी मान वळवली आणि पुस्तके उचलून ते वर्गावर गेले. त्यांना वर्गावर जाताना बघून देशमुख सरांना साधारण अडतीस वर्षांपूर्वीचा काळ आठवला जेव्हा ते या शाळेत रुजू झाले पहिल्याच दिवशी दामले सरांचे त्या शाळेतील वलय काय आहे याचा त्यांना अंदाज आला.

संपुर्ण आयुष्य समर्पित करणे कशाला म्हणतात ते दामले सरांकडून शिकता येते. ज्यावेळी सर शाळेत रुजू झाले त्यावेळी शाळेची इमारत पाच वर्गखोल्यांची होती. सोबत तणकट वाढलेले मोठ्ठे मैदान होते. आपल्या कामाची सुरुवात केल्यावर दामले सरांनी ती शाळा दामलेमय करुन टाकली असे म्हणले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मरगळ आलेली, कोणतीही सकारात्मकता नसलेली एक उदास व्यवस्था असे ज्या शाळेचे रुप होते ते दामले सरांनी आमुलाग्र बदलवून टाकले. महत्वाचे म्हणजे त्या काळात शाळेत असलेल्या सर्व शिक्षकांनी दामले सरांचा आदेश शिरोधार्ह मानून प्रचंड काम केले. तीन वेळा दामले सरांना शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक होण्याची विनंती केली परंतू त्यांनी ती नम्रपणे नाकारुन वर्गामधे शिकविणेच प्राधान्याचे समजले. तालुक्याच्या ठिकाणची एक साधी शाळा परंतू दामले सरांच्या कर्तृत्वामुळे सर रुजू झाल्यानंतर केवळ तीन वर्षात जिल्ह्यातील एक महत्वाची शाळा बनली. देशमुख सरांना ते सारे आठवू लागले. सेंड ऑफ समिती मुख्याध्यापकांकडे गेली होती परंतू दामले ऐकणार नाहीत हे देशमुख सरांना ठाऊक होते. ते तो जुना काळ आठवत होते. तो दिवस आठवला ज्या दिवशी दामले सरांनी हसत हसत देशमुख सरांच्या हातात खराटा दिला होता जोरात म्हणाले होते, देशमुख व्हा आता गाडगे बाबा!!

मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची मोहीम सरांनी शाळेत सुरु केली. मुलांना प्रेरीत केले. एक एक वर्ग वेगवेगळ्या शिक्षकाकडे सोपविला आणि केवळ दहा दिवसात सारा परीसर स्वच्छ झाला. संपुर्ण मैदान साफ केले त्यावर तीन वेगवेगळ्या खेळांची मैदाने आखली. व्यवस्थापनाच्या मागे लागून खेळाचे साहित्य बोलाविले मुलांसोबत स्वतः तीनही खेळ खेळणे सुरु केले. सकाळी सात वाजता शाळेत येणारे दामले सर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरी जात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकवायचे. मुलांची खचाखच गर्दी असायची त्यांच्या वर्गात. परंतू अध्यापनासोबत सरांनी त्या शाळेचे जणू पालकत्वच घेतले होते. शाळेत नव्या खोल्या बांधल्या गेल्या त्यांस रंग देण्यास पैसा नव्हता तेव्हा काही मोजक्या मुलांना सोबत घेऊन सरांनी स्वतः शाळेच्या भिंती रंगविल्या, त्यावर सुंदर सुविचार लिहीले. एक मोठा फळा त्यांनी बनवून घेतला त्यावर रोज सर स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरामधे सुविचार लिहायचे. शाळेतल्या मुलांचे त्यांनी एक बँडपथक बनविले होते. स्वतः मुलांना सारी वाद्ये वाजविणे शिकविले. दामले सरांनी केलेली सारी परीवर्तने देशमुख सरांना आठवू लागली. विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सहकारी शिक्षकांकरीता देखील दामले सर एक आदर्श शिक्षक होते. ती शाळा दामले सरांची शाळा म्हणून ओळखली जायची त्यात नवल नव्हते. परंतू तेच दामले सर आज अडतीस वर्षांनतर त्या शाळेतून निवृत्त होताना निरोप समारंभाचा कार्यक्रम करु नका, मी येणार नाही असे म्हणत होते. मुख्याध्यापकांच्या सूचनेवरुन शेवटी सेंडऑफ समिती देशमुख सरांकडे आली. मुख्याध्यापकांचेही म्हणणे होते की यावर तोडगा देशमुख सरच काढू शकतात. समिती मधील शिक्षकांना देशमुख सरांनी सहजच त्यांच्या मनात दामले सरांच्या योगदानाबद्दल जे विचार आले होते ते सारे सांगितले शेवटी ते म्हणाले, दामले ऐकणार नाहीत कारण त्यांनी मोठ्या कष्टने उभारलेल्या या शाळेचे तुम्ही साऱ्यांनी काय करुन टाकले? वेदना होतात त्यांना. समितीमधील शिक्षकांना काही कळेना. पाच सहा दिवसांपूर्वी त्यांना दामले सरांनी जे सांगितले जे सारे देशमुख सरांनाही ठाऊक होते ते सारे त्यांनी त्या नव्या शिक्षकांना सांगितले.

किती बदलवून टाकलीत शाळा तुम्ही! एका बाजुने आपण शाळेला आधुनिक केले, नविन उपकरणे आलीत, संगणक आलेत, मुलांचे गणवेष स्मार्ट झाले पण अत्यंत असे अनेक वर्षे जपलेले सहकारीतेचे वातावरण मात्र पार बदलून गेले. आपल्या पेक्षा आपले इगो मोठे झाले आहेत. त्यामुळे पंचेवीस शिक्षक संख्येमधे आता पाच ते सहा गट झालेले आहेत. आपण स्टाफरुम मधे बसण्याच्या पद्धतीने नाही तर मनानेही विभागले गेलोत. जातींच्या अनुषंगाने गट पडले आपले. त्यामधे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्लॅनींग करीत असतो आपण फावल्या वेळात. दामले सर आम्हाला फावल्या वेळात इंग्रजीचे नवनविन शब्द सांगायचे. आता विद्यार्थ्यांसोबत आपणही साडेपाच वाजता बाहेर पडतो शाळेच्या. आपल्या शाळेचे मैदान आता ओसाड पडलेय परत. मुलांना आणि आपल्यालाही कोचिंग क्लासमधे जायचे आहे. आपल्या शाळेतील अध्यापनापेक्षा कोचिंग क्लासच्या शिक्षणावर मुलांचा जास्त विश्वास आहे याचे दुःख वाटण्यापेक्षा आपल्यावरचा ताण कमी झाला याचा आनंद आपण व्यक्त करतो. कसे वातावरण केले आपण. मागच्या आठवड्यात गावंडे मॅडम निवृत्त झाल्या तेव्हा त्यांच्याकरीता भेटवस्तू आणण्यासाठी समारंभासाठी आपण जे पैसे गोळा केले त्यावेळी झालेली भांडणे दामले सरांसमोरच झाली ना? आम्ही जेवणार नाही म्हणून आम्ही अर्धे पैसे देऊ म्हणून आपल्यापैकी दहा लोकांनी केवढा वाद घातला. या मॅडम निवृत्त होताहेत मग आम्हाला त्याचा ताण का हे वाक्य ऐकल्यावर दामले सर आपल्याकडून काही घेतील का किंवा समारंभाला येतील कादामले ऐकणार नाहीत. आपण एवढेच करु शकतो की निदान त्यांनी निर्माण केलेले सौहार्दपूर्ण वातावरण परत एकदा निर्माण करुयात. तेच दामले सरांचे गिफ्ट असेल.

अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या शाळेतला शेवटचा अध्यापनाचा तास आटोपून दामले सर स्टाफरुम मधे आले. तेथे कुणीच नव्हते. त्यांनी शांतपणे आपली सारी पुस्तके गोळा केली. बाहेर पडले. सायकल घेतली निघाले. क्षणभरच त्यांना थांबावे वाटले. सायकल उभी करुन त्यांनी मनभरुन एकदा शाळेच्या भव्य इमारतीकडे बघितले. स्वतःच्या हाताने भिंती रंगविलेल्या इमारतीपासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक बदलाचे ते साक्षीदार होते. सरांच्या डोळ्यात आसवे गोळा झाली. उद्यापासून हे माझे नाही. मी येथे परका. रुमालाने डोळे पुसून मागे वळतात तो काय? मोठी गर्दी जमा झालेली. एक नवा शिक्षक म्हणाला, सर, एक सेल्फी होऊन जाऊ द्या. सर हसले फोटोसाठी उभे राहीले. त्यानंतर तो मैदानावरच दोन तास पर्यंत रंगलेला सेंडऑफ चा कार्यक्रम बघून ती शाळा देखील नशशिखांत बहरुन आली

आपल्या संस्थे करीता योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने निवृत्त करताना केवळ कार्यक्रम करता त्यांनी निर्माण केलेले सौहार्दतेचे वातावरण टिकविणे हे आपले कर्तव्य आहे हे समजून कार्य करुयात.. आपल्याला हे निश्चित जमेल!!




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18