थोडा है थोडे की जरुरत है @25.09.18

काळजी

दुपारची वेळ. साधारण वाजले होते. सकाळच्या पहिल्या टप्प्यातील महाविद्यालयाची कामे आटोपून मी नेहेमीप्रमाणे जेवायला निघालो होतो. जरासा उशीरच झाला होता. त्यामुळे मी जरा घाईने माझ्या गाडीकडे निघालो होतो. तेवढ्यात दुरुन मला एका माणसाने जोरात आवाज दिला. सर, सर असे ओरडत तो माझ्या दिशेने येऊ लागला. साधारण पन्नाशीला असलेला तो माणूस जरासा घाबरलेला होता. त्याला माझ्याकडे येताना बघून मी थांबलो तो इतक्या जोरात ओरडला होता की मैदानात असलेल्या विद्यार्थिनी इतर मंडळी देखील थांबून काय सुरु आहे ते बघू लागली. माझा  जवळ आल्यावर जरा तो शांत झाला. त्याच्या घाबरण्याचे कारण त्याने मला सांगितले. त्याची मुलगी माझ्या महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकते असे त्याने धापा टाकत मला सांगितले. माझ्याकडे येताना तो जवळपास धावत आल्याने त्याला दम लागला होता. नेहेमीप्रमाणे मी प्राथमिक प्रश्न त्याला विचारला की मुलीचे नाव काय आणि ती कोणत्या विद्याशाखेला प्रवेशित आहे? कला, वाणिज्य की विज्ञान? घाबरलेला असल्याने त्याला ते देखील सुचत नव्हते. कधी तो कला म्हणत होता तर कधी विज्ञान. मी त्याला सर्वप्रथम शांत व्हायला सांगितले व्यवस्थित काय झालेय हे बोलायला सांगितले. जरासा दम घेऊन त्याने मला त्याच्या घाबरण्याचे कारण सांगितले. ते ऐकल्यावर मात्र मी चिंतेत पडलो  प्राचार्य म्हणून तर मला काळजी वाटलीच परंतू एका मुलीचा पिता असल्याने मी त्या माणसाची मनःस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकत होतो. तो मला म्हणाला की, सर माझी मुलगी कला शाखेत अकरावीला शिकते. कॉलेज साडे अकरा वाजता सुटते. आता दोन वाजायला आले माझी मुलगी घरीच आलेली नाही. महत्वाचे म्हणजे रोज ती बाराच्या आत घरी आलेली असते. आज मात्र अजून आली नाही. सर, माझा जीव जायचा शिल्लक राहीला आहे. त्याने हे वाक्य उच्चारल्याबरोबर मी तातडीने चौकशी सुरु केली कारण त्या वाक्याचा अर्थ काय हे मला कळत होते.

परगावी शिकायला असलेली माझी मुलगी अमरावतीहून पुण्याला जेव्हा त्या दिवशी गेली तेव्हा त्या वेळच्या प्रवासात तिला काय वेगळा अनुभव येणार हे मला ठाऊक नव्हते. मुलीने सक्षम झाले पाहिजे या माझ्या आग्रहापोटी तिला एकटे पुण्याला पाठविणे मीच सुरु केले होते. परंतू सायंकाळी सहा वाजता बसमधे बसवून माझ्या मुलीला पुण्याला रवाना करताना दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण साडेसहा पर्यंत नेहमीप्रमाणे सुखरुप पोहोचली असा तिचा फोन येईल या अंदाजात मी होतो. परंतू सकाळी .४५ ला तिचा फोन आला तेव्हा तो बघता क्षणीच मनात पाल चुकचुकली. काही तरी गडबड आहे. तसेच होते. नेमकी भिमा कोरेगावची दंगल उसळली असल्याने त्याचे पडसाद पुण्यातही पडले होते पुणे शहरात गडबड असल्याने माझ्या मुलीला घेऊन जाणारी गाडी पुण्यापासून ४० किमी अंतरावर थांबवून दिली पुढे जाणार नाही असे सांगण्यात आले. प्रसंग विचित्र होता. त्यानंतर मी माझ्या मुलीला त्यावेळच्या परीस्थितीत काय केले पाहिजे ते सांगितले त्यानंतर तिचा फोन बंद पडला. इतर कुणाचाही नंबर माझ्या जवळ नाही. बस मधे काही महिला होत्या परंतू परीचित नव्हत्या. त्यानंतरचे पुढचे तीन तास मी कसे काढले ते मला अजूनही स्मरणात आहेत. तीन तासांनंतर माझ्या मुलीचा वसतीगृहात सुखरुप पोहोचल्याचा फोन आला तोपर्यंत माझा देखील जीव जायचा शिल्लक राहीला होता. त्यामुळे तो माणूस, तो बाप काय म्हणतोय हे मला चांगलेच कळले होते. मी तातडीने कामाला लागलो. आपल्याला भूक लागली आहे ही जाणीव देखील नाहीशी झाली. तिला शिकविणाऱ्या प्राध्यापकांकडून ती महाविद्यालयात आल्याची मी सर्वप्रथम खात्री करुन घेण्याचे ठरविले. परंतू त्या बापाच्या जीवाची घालमेल बघवत नव्हती. त्याची बिचाऱ्याची अखंड बडबड सुरु होती. माझ्या प्राध्यापकांना फोन लागेना तर तो एकदम डोके घ्यायचा. मी फोन लावताक्षणी फोन लागला का असे सारखे विचारायचा. मी प्रयत्न करीतच होतो परंतू काही वेळ तर लागणारच होता. मोलमजूरीच्या कामावरुन परस्पर मला भेटायला आलेला तो बाप, कामावर असतानाच त्याच्या बायकोचा फोन त्याला गेला मुलगी घरी आलीच नाही म्हणून कामावरुन अक्षरशः धावत धावत तो महाविद्यालयात आला होता. येताना त्याच्या पायातल्या चपलाही कदाचित विसरला होता. दरम्यान फोनवर मला माहिती मिळाली की ती महाविद्यालयात आली होती पूर्णवेळ हजर होती. हे फोन सुरु असताना तो बिचारा मला काय काय सांगत होता. एव्हाना त्याचा आवाज रडवेला झाला होता. आपली मुलगी कशी चांगली आहे तिच्यावर घरी कसे चांगले संस्कार केले जातात हे तो मला तेवढ्या वेळात पटवित होता

मुळात घाबरुन गेला होता तो बाप. चांगल्या घरची मुलगी असून त्या पोरासोबत पळून गेली अश्या पद्धतीचे प्रसंग त्याने ऐकलेले होते त्याच पद्धतीची शंका त्याच्याही मनात होती याची जाणीव मला होती. म्हणूनच त्याचे मला सांगणे सुरु होते. सर, आम्ही मुलीला मोबाईल दिलेला नाही. त्याच्यामधून आजकाल काय काय होते आम्हाला माहित आहे. आम्ही केवळ एकच मोबाईल घेतला, तो माझ्या घरवालीकडे असतो. आम्ही मुलीला जास्त कुणाशी बोलू देत नाही. रोज सकाळी आम्ही मोबाईलवर हनुमान चालीसा लावत असतो. पोरांवर आम्ही चांगले संस्कार करतो. सर, तरी माझी मुलगी कुठे गेली असेल सांगा. कधीच तिला उशीर होत नाही. ती सरळ कॉलेजमधे येते आणि सरळ घरी येते. वगैरे वगैरे. त्याच्या सर्व बोलण्याचा अर्थ त्याच्या प्रत्येक शब्दामागची भिती मला जाणवत होती. माझे प्रयत्न सुरु होते. शेवटी पोलीस स्टेशनला जाण्याचा त्याला सल्ला देण्याआधी मी एकदा त्याच्या घरी फोन लावून बघुया असे ठरविले आणि फोन लावला

त्याच्या पत्नीने फोन उचलला माझी ओळख दिल्यावर तिने मला सांगितले, सर बाली परत आलीमैत्रीणीकडे नोट्स द्यायला गेली होती म्हणून तिला उशीर झाला असे तिने मला सांगितले. मी सुटकेचा निःश्वास सोडला. त्या पोरीला फोन देण्यास मी सांगितले आणि मग तिला मी माझ्या नेहेमीच्या पद्धतीने तिने जो वेडेपणा केला त्याबद्दल समज दिली. पण तोवर आपली मुलगी घरी आली हे कळल्यामुळे त्या माझ्यासमोर उभ्या असलेल्या बापाचे काय झाले हे बाप झाल्यावरच कळू शकते.

माझे त्याच्या मुलीशी बोलणे आटोपल्यावर त्या माणसाने माझा हात घट्ट घरला तो रडायला लागला. मला कळेना काय करावे. मी त्याला शांत करत होतो. मला तो म्हणाला सर, माझी मुलगी खरच परत आली का? तुम्ही एकदा मला पुन्हा सांगा. भांबावला होता बिचारा. मी त्याला हो म्हणले त्या क्षणी त्याने माझे पायच धरले घट्ट सोडेचना. मैदानात अनेक जण बघत असताना माझ्यापेक्षा वयाने मोठा असलेला तो माणूस माझ्या पाया पडत होता. मला अतिशय विचित्र वाटले. मी त्याला लगेच उठविले. त्याच्या पाठीवरुन हात फिरवून शांत केले. तो एकच वाक्य वारंवार बोलत होता, सर तुमचे लय उपकार झाले! उपकार? मी काय केले होते? अक्षरशः काहीच नाही. केवळ तीन चार फोन जे माझे कर्तव्यच होतेमी त्याच्याशी काही बोलायच्या आतच, सर मी लगेच घरी जातो म्हणून तो वळला आणि घाईघाईने निघून गेला

मी देखील गाडीत बसून घरी निघालो. मला देखील हा अनुभव थरारुन टाकणाराच होता. त्या काही वेळात मी त्या माणसाची घालमेल अनुभवून सुन्न झालो होतो. त्याच विचारात मी घरी जायला निघालो होतो. जरासे पुढे गेल्यावर गाडीच्या आरश्यात मला तो पुन्हा दिसला. शर्टच्या बाहीने डोळे पुसत पुसत आपल्या मुलीची मनापासून काळजी करणारा आणि तिला प्रत्यक्ष बघण्यासाठी जवळपास धावत अनवाणी घराच्या दिशेने निघालेला, बाप!!





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23