थोडा है थोडे की जरुरत है @ 18.09.18

महालक्ष्मीचा प्रसाद

महालक्ष्मी पुजनाच्याच दिवशी माझ्या मुलीला पुण्याला जायचे होते. सकाळी घरी पुजन करुन आणि त्यानंतर प्रसाद घेऊन ती सायंकाळी बसने जाणार होती. तिला सोडण्यासाठी मी खाजगी बसच्या स्टॉपवर गेलो. गाडीला जरा उशीर होता. मी आपले माझ्या सवयीनुसार आजुबाजुला सुरु असलेल्या गोष्टींचे निरीक्षण करीत उभा होतो. महालक्ष्मीचा सण यावेळी आठवडा संपताना आला असल्याने गाव सोडून परगावी राहणारी अनेक मंडळी उद्यापासून सुरु होणाऱ्या आठवड्याचा पहिला दिवस पकडण्याकरीता परत निघाली होती. खाजगी बसचालकांसाठी आजचा दिवस म्हणजे सुकाळ होता. आजच्या दिवशी त्यांनी भाडे वाढवून सांगितले तरी लोक ते द्यायला तयार असतात म्हणून त्यांनी सर्वांनी नेहेमीपेक्षा काही जादा गाड्या देखील सोडल्या होत्या. एकंदरीत खाजगी बस प्रवास व्यवसायाशी निगडीत सारेच लोक आजच्या दिवशी फारच व्यस्त होते. परंतू या व्यस्ततेमुळे त्यांना कधी कधी काही महत्वाच्या गोष्टींना मुकावे लागते. असाच एक माणूस त्याचा परीवार मला दिसला ज्यांनी आजच्या दिवशी काहीतरी मिळविण्या करीता काहीतरी गमावले होते. खरे तर त्यांनी जे गमावले ते सर्वसामान्यपणे गमावू नये अश्या प्रकारचे होते. परंतू काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागणे हा आपल्या जगातील जगण्याचा नियमच आहे. त्या माणसाच्या त्या कृतीबाबत मला योग्य ती प्रतिक्रीया देता आली नाही परंतू जे माझ्या डोळ्यासमोर घडले त्याने मी विचारात मात्र पडलो

महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात विदर्भात महालक्ष्मी पुजन हा एक फार मोठा सण मानला जातो तो विशेषतः महाप्रसादाकरीता प्रसिद्ध आहे. ज्यांच्या घरी महालक्ष्मी बसतात त्यांच्या घरचा हा सण केवळ त्यांचा नसून अनेकांचा असतो. जुन्या काळापासून सर्वांच्या सहकार्याने साजरा केला जाणाराच हा सण आहे. आपण आता त्यात काही बदल स्विकारलेत परंतू महालक्ष्म्याच्या महाप्रसादाचे महत्व मात्र कमी झालेले नाही. जी मंडळी एखाद्या घरी प्रसादाकरीता जातात त्यांनी त्या घरी गेलेच पाहिजे असा देखील प्रघात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रसादाचा लाभ प्राप्त करण्याचा आनंद यजमानाला त्या प्रसादाची व्यवस्था करण्याचा आनंद कायम मिळत राहतो. अनेक लोक आपल्या या पारिवारीक सणाकरीता खास सुट्या काढून येतात. काहीही झाले तरी महालक्ष्मीचे पुजन प्रसाद चुकवायचा नाही अशीच पद्धत विदर्भात प्रसिद्ध आहे. परंतू कधी कधी हा महालक्ष्मीचा प्रसाद वेगळ्या स्वरुपात मानून कार्य करणारी मंडळी भेटली की मग एका बाजूने त्यांच्या व्यावहारीकतेचे आश्चर्य वाटते दुसऱ्या बाजूने त्यांनी दिलेला तर्क देखील पटून जातो. काय योग्य नि काय अयोग्य हे ठरविणे कठीण जाते. असाच काहीसा तो प्रसंग मी अनुभवला जेव्हा त्या ड्रायव्हरने अगदी माझ्या गाडीच्या मागेच त्याची भली मोठी बस आणून उभी केली

नागपूरहून पुण्याला जाणारी एका प्रसिद्ध ट्रॅव्हल्स कंपनीची ती बस अगदी माझ्या गाडीच्या मागे उभी राहीली. आम्ही सर्व माझ्या पोरीच्या बसची वाट बघत होतो. रस्ता वाहता होता. परंतू ती गाडी थांबली तेव्हा ड्रायव्हरच्या बाजूने एक बाई आपल्या मुलाला मुलीला घेऊन उभी होती ड्रायव्हरशी तिचा संवाद सुरु होता. त्यामुळे मुलांकडे तिचे लक्ष नव्हते. मी त्या बाईला आवाज देऊन मुलांना सांभाळायला सांगितले कारण फारच रहदारी सुरु होती. मी तसे म्हणल्यामुळे तो ड्रायव्हर खाली उतरला गाडीच्या समोर येऊन त्या बाईशी आणि मुलांशी बोलू लागला. मुलांना कडेवर घेऊन त्याने त्यांचा लाड केला. काहीतरी छत्रीसारखे खेळणे देखील त्याने दोन्ही मुलांकरीता आणले होते. एकंदरीत त्याच्या वागण्यावरुन बोलण्यावरुन तो त्या बाईचा पती आहे हे माझ्या लक्षात आले. ती डोळे पुसत पुसत त्याच्याशी बोलत होती. ते सारे माझ्या इतक्या जवळ उभे होते की मला सारे काही ऐकू येत होते. तिची तक्रार सुरु होती. एवढा मोठा सण झाला आज घरी, सगळे जण आले होते आपल्या मोठ्या घरी, फक्त तुम्ही नव्हते. सगळे लोक तुमची आठवण काढत होते. काय सांगायचे मी? आजच्याही दिवशी सुट्टी घेत नाही म्हणजे खूप झाले. आज तर सगळ्या जोडप्यांना सोबत बसवले होते जेवायला, मी मात्र बसली एकटी. अश्याने कसे व्हायचे? तुम्ही माझ्या मनाचा काही विचारच करत नाही. महालक्ष्मीचा प्रसाद मला असा डब्यात आणावा लागतो आणि रस्त्यावर द्यावा लागतो. भेटही किती वेळ तर पाच मिनीटे वगैरे वगैरे. पतीच्या अनुपस्थितीमुळे साधारणपणे रागावलेली पत्नी जशी तक्रार करेल तसेच ते होते. जरावेळ आपल्या पोरांचा लाड करता करता त्या ड्रायव्हरने तिचे ऐकून घेतले नंतर त्याने तिला उत्तर दिले. ते उत्तर ऐकूनच मी जरा विचारात पडलो. त्याच्या पत्नीने केलेली तक्रार अत्यंत रास्त होती अश्या महत्वाच्या सणाला घरच्या माणसाने हजर राहणे ही बाब तशीही जरा खटकणारी होती. परंतू त्या ड्रायव्हरचे उत्तर ऐकल्यावर मात्र आपल्याला वाटतात तश्याच साऱ्या गोष्टी असतात असे नाही हे मला कळले. प्रत्येकच गोष्टीला एक वेगळा दृष्टीकोन असतो याचा मला प्रत्यय आला.

थोडा वेळ आपल्या पत्नीची तक्रार ऐकल्यानंतर तो तिला म्हणाला, तुला काहीच समजत नाही. आज सर्वात जास्त ट्रॅफीक असते म्हणून आम्हाला सुटी मिळत नाही. आमच्या मालकाने सांगितले की आज जर सुटी घेतली तर नुकसान होईल पण कामावर आलो तर फायदाच आहे. आजच्या ट्रीपचे मला चार हजार रुपये जास्तीचे मिळणार आहे. पगाराशिवाय. कळते का? चार हजार म्हणजे आपल्या पोराची शाळेची अर्धी फी होऊन जाते. अश्या सणासुदीच्या दिवशी जास्त ट्रॅफीक असते आणि काही ड्रायव्हर येतच नाही कामावर. मग मी आलो तर असा फायदा होतो. माझ्या नेहेमीच्या पगारात आपले भागते काय? मग असे पैसे वर्षातून चार पाच वेळा मिळाले तर पोरांची फी होऊन जाते. महालक्ष्मीच्या प्रसादाला मी हजर नाही तर नाही. हा प्रसादच आहे आपल्यासाठी जो महालक्ष्मीमुळेच मिळतोय. चल आता वेळ झाला. दे डबा, जेवायला थांबलो की मी खाऊन घेईन. चलतो. लगेच गाडीत बसून आपल्या पत्नीला पोरांना टाटा करुन तो ड्रायव्हर पुण्याच्या दिशेने रवाना झाला. महालक्ष्मीचा प्रसाद सोबत घेऊन किंवा महालक्ष्मीमुळे प्रसाद मिळवायला.

तो पुण्याच्या दिशेने रवाना झाला परंतू माझ्या मनात मात्र विचार सुरु राहीला. घरच्या महालक्ष्मीच्या पुजनाकरीता प्रसादाकरीता काहीही झाले तरी हजर राहणे ही भावनिक स्थिती योग्य की त्याच महालक्ष्मीच्या सणाच्या दिवशी बस चालविल्यामुळे जास्त पैसे मिळतात म्हणून कामावर जाणे ही व्यावहारिक स्थिती योग्य? महालक्ष्मीचा प्रसाद कोणता? परमेश्वराचे अस्तित्व आणि ती संकल्पना आपण कोणत्या स्वरुपात स्विकारतो यावर हे सारे अवलंबून आहे. या करीता आपल्या व्यक्तिगत विचारांची जडण घडण कश्या प्रकारे झालीय यावर देखील बरेच काही अवलंबून आहे. हा परमेश्वराच्या प्रसादाचा विचार प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र वेगवेगळा असतो. एकाच परीवारात या संदर्भात वेगवेगळी मते असतात. यात खरे तर योग्य किंवा अयोग्य ठरवता येऊ शकत नाही. निदान या संदर्भात तरी प्रत्येकाचे स्वतंत्र मत राहूच शकते. महालक्ष्मीच्या पुजन प्रसादाकरीता प्रत्यक्ष हजर रहायलाच हवे किंवा या निमित्ताने चार पैसे जास्त मिळतात तर त्या पैश्यांनाच प्रसाद समजून घरी अनुपस्थित राहणे ही दोन वेगळी स्वतंत्र मते आहेत. त्या प्रत्येक मताचा सन्मान व्हावा प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य मिळावे हेच सर्वथा योग्य ठरेल. असे झाल्यासच महालक्ष्मीचा प्रसाद दोन्हीही मते धारण करणाऱ्यांना मनोभावे स्विकारता येईल.




Comments

  1. या मध्ये कर्तव्य महत्वाचं वाटणे साहजिकच आहे।।आपल्या चांगल्या कर्मातच भगवंताचा आशीर्वाद असतो हे मात्र खरं आहे।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23