थोडा है थोडे की जरुरत है @ 02.10.18

१० वाजताचा आनंद

कार्यालयात त्या दिवशी दोन कर्मचाऱ्यांमधे वाद झाला. नेमका कशावरुन ते कळले नाही. वादावादीची कारणे नेहेमीच ठरलेली असतात. महत्वाचे म्हणजे ती सर्वच कार्यालयांमधे सारखी असतात. एक तर काम करण्याच्या पद्धतींवरुन वाद होतात किंवा जास्त काम दिले मलाच का दिले या मुद्द्यांवरुन होतात किंवा मला काम सांगितले आणि दुसऱ्याला मात्र नाही सांगितले यावरुन होतात. या तीन महत्वाच्या कारणांवरुन वादावादी आणि तणाव निर्माण झालेला दिसतो. काम करण्याच्या पद्धती म्हणजे माझ्या मनाला पटलेल्या पद्धतीनुसार समोरच्या व्यक्तीने कार्य केले नाही तर तणाव निर्माण होतो. बरेच वेळा काम करताना ते केवळ करायचे म्हणून केले जाते त्यामुळे कामाच्या दर्जावर त्याचा परीणाम होतो. या प्रकारच्या पद्धतीमधे काम करुन घेणारा करणारा यांचे सुर जुळत नाहीत मग त्याची फलश्रुती वादावादीमधे होते. यावर साधा उपाय म्हणजे काम करत असताना जर ते सर्वोत्तम करण्याची जिद्द मनात असेल कुणीही सांगितल्यापेक्षा त्या कामाच्या पद्धतींमधे नाविन्य निर्माण करण्याची आपलीच इच्छा असेल तर मग आपली स्वतःशीच सकारात्मक स्पर्धा सुरु होते. ही स्पर्धा एका बाजुने आपले काम अधिकाधिक उत्तम बनवते तर दुसऱ्या बाजुने कामाचा ताण जाणवित नाही.

वादावादी होण्याच्या दुसऱ्या कारणाचा देखील आपल्याला अश्याच प्रकारे विचार करता येईल. मला काम जास्त दिले ही कायम केली जाणारी तक्रार असते. परंतू काम सोपविणाऱ्याला बरेच वेळा काम करण्याच्या योग्यतेनुसार कामे सोपवावी लागतात. प्रत्येक कर्मचाऱ्याची योग्यता वेगवेगळी असते त्यामुळे काम सर्वोत्तम होण्याकरीता ते सोपविणाऱ्या कर्मचाऱ्याची योग्यता बघावी लागते. अर्थात या प्रक्रीयेमधे काही जणांवर अन्याय होतो असे प्रथमदर्शनी वाटू शकते. तसेच आम्ही करतो म्हणून इतरांनी योग्यता वाढवूच नये का असा देखील प्रश्न मनात उद्भवतो. या विचाराचा संबंध वादावादी होणाऱ्या तिसऱ्या कारणासोबत आहे. मला इतरांपेक्षा जास्त काम दिले हा विचार आपले काम करताना सारखा मनात येत राहणे. याचा अर्थ मला सोपविलेल्या कामापेक्षा मी इतरांना काय काम सोपविले जातेय याचा विचार जास्त करतो आहे. मुळात मला सोपविलेले कार्य हे माझ्या अधिकाऱ्याने माझी इतरांपेक्षा जास्त असलेली योग्यता बघून सोपविलेले आहे असा विचार करता जो काम करतो त्याचाच जीव घेतात या नकारात्मक विचारांनी झाकोळला जातो. माझी दिवसेंदिवस वाढत जाणारी योग्यता, त्यानुसार मी करीत असलेले कार्य हे माझ्या कार्यक्षेत्राच्या विकासाकरीता मी करीत असलेले योगदान आहे असा भाव जर निर्माण झाला तर वादावादीचे प्रसंग बऱ्यापैकी संपुष्टात येऊ शकतात अकारण तुलना टाळल्या जाऊ शकते. परंतू तसे होता आपल्या कामासोबत इतरांच्या कामाची नकारात्मकतेने तुलना करत करत आपल्या कामाचा आनंद हरवून जातो आणि परीणामतः कामाच्या ठिकाणी प्रचंड ताण निर्माण करुन आपण घरी जातो

कार्यालयात झालेल्या वादावादीचा परीणाम तोच झाला. दोन कर्मचाऱ्यांमधे आरडाओरड झाली. एकमेकांची उणीदुणी काढली गेली. मनाला लागतील असे शब्द बोलले गेले. हे सारे होत असताना अनेक लोकांसमोर आपलीच शोभा होते आहे याचे भान देखील राहीले नाही अंतिमतः एका कर्मचाऱ्याने रागारागात कागदावर सुटीचा अर्ज खरडला घरी निघून गेला. कामाच्या ठिकाणी निर्माण झालेला तणाव घरी घेऊन गेल्यानंतर घरचे वातावरण चांगले राहणे शक्यच नाही. म्हणजे कामाच्या ठिकाणचे वातावरण चांगले राहीले नाही तोच मुड घरी नेल्याने तेथलेही वातावरण गढूळ झालेच असणार. अर्थात हा प्रकार कार्यालयातून घरी जाणाऱ्या वादांमुळेच होतो असे नाही. कधी कधी याउलट देखील होते.

कधी कधी घरी मोठमोठे वाद होतात. ते देखील कळत नकळत तयार झालेल्या इगो मुळे होतात त्या वादावादींमुळे बेचैन झालेले मन घेऊन कार्यालयात कर्मचारी येतात. त्याचा परीणाम देखील कामाच्या योग्यतेवर होतोच. बेचैन तणावग्रस्त मन कामाचे योग्य नियोजन करु देत नाही. त्यामुळे सहकारी शत्रु वाटायला लागतात. त्यांना समजून घेण्याची क्षमता कमी होते. मग त्यामुळेच आपल्याला सोपविलेले काम सर्वोत्तम करायचे आहे हा विचार मनात येता दुसऱ्यापेक्षा मलाच काम जास्त देता माझ्यावर अन्याय करता असा विचार मनात डोकावतो त्यामुळे निर्माण झालेला तणाव घेऊन परत आपण घरी जातो. असे तणावाचे विषवर्तुळ तयार होते बरेच वेळा त्यामधे अडकून घर आणि कार्यालय या दोन्हीही ठिकाणी आपल्याला आपल्या भुमिकांना न्याय देता येत नाही. यामधून आपल्याच होणाऱ्या मानसिक शारीरिक हानीचा आपल्याला बरेच वेळा अंदाज नसतो. या असल्या तणावांमुळे त्यामधे सातत्याने भर पडत गेल्याने आपला स्वभाव चिडचिडा होऊन जातो. या अश्या प्रकारच्या विषवर्तुळामधे अडकलेले अनेक कर्मचारी आपल्याला दिसतात. याचा फटका अधिकाऱ्यांपासून ते विविध श्रेणींमधे काम करणाऱ्या सर्वांना बसू शकतो. या सर्व ताणांचे व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात अनेकवेळा चांगले शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देखील केले जाते. पण या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनासोबतच काही सुंदर उपाय आपल्याला आपले करता येतात. त्यातीलच एक मला माझ्या एका मैत्रीणीने शिकविला. अनेक सुंदर उपायांसोबतच हा उपाय मला फार भावला.

एखाद्या व्यवस्थेत कार्य करीत असताना अधिकारी म्हणून ती व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारे हाताळावी लागते. ती हाताळत असताना ताण येतोच कारण तो अपरीहार्य आहे. त्या कामाचा आनंद घेण्यासाठी त्या ताणाचे योग्य पद्धतीने नियोजन करणे महत्वाचे असते असे मी माझ्या मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात अभ्यासले देखील होते. त्यामधील वेगवेगळ्या उपायांसोबत हा एक सुंदर उपाय माझ्या मैत्रीणीने दिलेल्या सुरेख भेटीमुळे मला फार उपयोगी पडतोय. भेट म्हणून ते झाड हातात देताना ती म्हणाली होती, तु जेव्हा कार्यालयात जातोस त्याच वेळी तुला निखळ आनंद मिळवून देण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेल्या एका अद्भुत योजनेचे प्रतिक म्हणून हे झाड मी तुला देते आहे. हे घरच्या बागेत लाव आणि विशेषतः त्याची जागा अशी ठेव की दारातून बाहेर पडताक्षणी याच्या सुंदरतेचे दर्शन होईल आणि प्रसन्न मनाने तुला कामावर जाता येईल. कारण या विलक्षण झाडाची निर्मीती बहुदा परमेश्वराने तुम्हा कर्मचारी मंडळींसाठी केलीय आणि कुण्यातरी हुशार माणसाने म्हणूनच त्याचे नाव ठेवलेय 10 O’clock.

आता माझी तयारी आटोपुन मी कार्यालयात जाण्याकरीता बॅग घेऊन निघतो. दरवाजाच्या बाहेर पडताक्षणी समोरच बरोबर १० वाजता सुंदर फुललेली अनेक गुलाबी रंगांची गोड फुले माझे स्वागत करतात. बरोबर १० वाजता या फुलांचे उमलणे ही सुंदर ईश्वरी किमया आहे. कार्यालयात निघताना एकच मिनीटे या फुलांजवळ रेंगाळतो, त्याना हलकेच स्पर्श करतो. तो अत्यंत मुलायम स्पर्श आणि त्या फुलांचे ते लोभस रुप मनात साठवून निघाल्यावर तो आनंद बराच वेळ रेंगाळत राहतो. कामाच्या ठिकाणी गेल्यावरही त्या भरभरुन मिळालेल्या १० वाजताच्या आनंदाचा परीणाम जाणवत राहतो. मला आणि कदाचित माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही. गोष्ट फार छोटी आहे पण मोलाची आहे.

आनंदनिर्मीतीच्या प्रक्रीया जर सहज आणि सोप्या असतील तर त्या तेवढ्याच सहजतेने आत्मसात केल्या जाऊ शकतात त्यामुळेच त्याला निखळता प्राप्त होते. निखळ आनंद हा अभिनिवेशाने किंवा फार योजना करुन मिळतच नाही. अश्या १० वाजता पवित्र आनंद देणाऱ्या अनेक सुरेख गोष्टी परमेश्वराने आपल्याकरीता योजिल्या आहेत. त्यांना ओळखून त्यांना आपल्या आनंदनिर्मीतीच्या प्रक्रीयेचा भाग बनविल्यास सहजच आनंद मिळत राहतो त्यामुळेच सर्वात महत्वाची एक गोष्ट घडते ती म्हणजे आपण ताणविरहीत स्वच्छंदी जीवन जगु शकतो. शेवटी तुमच्या माझ्या जीवनाचे अंतीम ध्येय तेच तर आहे. होय ना?





Comments

  1. Ananda..khuppp mothi goshta pan to milvanyache upay suddha mothe aahe asa aplyala vatte pan..tumchya ya wrote up madhun kalle ki..ananda milvaycha asel tar saglyat sopa upay mhanje.. fakta aplya aaju bajucya sunder goshtinkade bagha..!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23