थोडा है थोडे की जरुरत है @11.09.18

ॲन्टीथेसीस

ॲन्टीथेसीस हा एक इंग्रजी व्याकरणातील फार अफलातून प्रकार आहे. एका विशिष्ट प्रकारच्या वाक्यरचनेला ॲन्टीथेसीस असे म्हणतात. इंग्रजी व्याकरणातील फिगर्स ऑफ स्पीच मधील हा एक आहे. जेव्हा एका वाक्यात दोन अत्यंत परस्पर विरोधी शब्द किंवा कल्पना मांडलेली असेल तर त्यास ॲन्टीथेसीस असे म्हणतात. भाषा ही वापरत असताना वेगवेगळ्या प्रकारे वापरली जात असते. रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी भाषा साधी, सरळ असून तिचा उपयोग हा संवादाच्या माध्यमातून भावना पोहचविण्याकरीता केला जातो. परंतू जेव्हा हीच भाषा साहित्याचे रुप धारण करते तेव्हा तिचा वापर हा अलंकृत करुन केला जातो. त्याकरीता वेगवेगळी मांडणी ठेवण वापरली जाते ज्यास प्रत्येकच भाषेमधे एक असाधारण महत्व आहे. इंग्रजी भाषा देखील यांस अपवाद नाही. त्यामधील फिगर्स ऑफ स्पीच भाषेचा दर्जा वाढवून अलंकृत वाड़मयीन अभिव्यक्ती करण्यासाठी मदत करतात. इंग्रजी भाषेचा वापर करताना सौंदर्य निर्मीतीसाठी या ॲन्टीथेसीसचा उपयोग केला जातो. प्रत्यक्ष जीवन जगताना ते अत्यंत सुंदर ताणविरहीत बनविण्यासाठी या ॲन्टीथेसीसच्या तत्वांचा वापर करणारा एक मित्र मला भेटला. मला त्याने साधलेल्या ॲन्टीथेसीस तत्त्वाचे फारच कौतुक वाटले. एका कंपनीमधे इंजीनियर असलेला माझा मित्र या ॲन्टीथेसीस तत्त्वाचा वापर करुन आपले जीवन सुंदर बनवतो तेव्हा मला त्याच्या कल्पकतेचा त्याने जाणिवपूर्वक निर्माण केलेल्या मानसिक बदलाचा मला गौरव करावासा वाटला

लोकांच्या समाजात वावरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. कामाच्या ठिकाणी, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना किंवा अगदी आपल्या घरामधे देखील बरेच वेळा आपल्या सभोवताली असलेल्या लोकांचे वागणे किंवा बोलणे आपल्याला खटकत असते. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधीकधी लोक आपल्याला हवे तसे वागत नाहीत कारण ते त्यावेळी त्यांना हवे तसे वागत असतात. कधी कधी आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे नीट समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यामुळे गैरसमज निर्माण होतात त्यामुळे आपल्याला वाईट वाटलेले असते. कधी आपले काहीतरी दुखणे असते त्यावेळी नेमके सभोवतालच्या लोकांकडून त्याला सहानुभूती देता चुकीचे वागले जाते किंवा कधी कधी खरोखरीच आपल्यावर अन्याय झालेला असतो. या सर्व वेळी आपल्याला सभोवतालच्या लोकांच्या वागण्याचा राग आलेला असतो त्यावेळी आपल्याला आलेला राग संबंधित व्यक्तीला बोलून दाखवून फायदा नसतो. अश्या अडचणीच्या वेळी आपल्याला एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण लागते ज्याच्या जवळ आपण आपले मन मोकळे करतो. असे मन मोकळे केल्याने आपल्याला बरे वाटते. आपला जवळचा मित्र चांगला समजूतदार असेल तर तो आपले सारे काही शांतपणे ऐकून घेतो त्यासंदर्भात तो आपले कसे बरोबर आहे हेच सुचवितो. त्याने तसे म्हणले की आपल्याला बरे वाटते. परंतू या प्रकारात एक भाग मात्र राहून जातो तो म्हणजे ज्या व्यक्तींचा आपल्याला राग आलाय त्या व्यक्तीबाबत मनात तयार झालेली अढी मात्र निघत नाही. त्या व्यक्तींचा आपल्या मनात निर्माण झालेला राग हा तसाच राहतो हळू हळू आपण त्यांच्या संदर्भात जजमेंटल होऊ लागतो. आपल्या मनाविरोधात कुणी वागत असेल किंवा आपल्याला कुणाचे बोलणे रुचले नसेल तर त्याचा राग येणे ही स्वाभाविक मानवी प्रक्रीया आहे. त्यात गैर काहीच नाही. परंतू त्या रागाचे थर मनात साचू लागले तर त्याचा सुरुवातीला त्रास होतो नंतर त्याचा ताण येऊ लागतो. बऱ्याच वेळेला त्या ताणामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी जडतात. त्यामुळे राग येणे जरी स्वाभाविक असले तरीदेखील त्यावर उपाय म्हणजे माझा मित्र वापरत असलेला ॲन्टीथेसीस हा फॉर्म्युला होय

सहा वर्षांपूर्वी माझी या कलंदर मित्राशी ओळख झाली. सुरुवातीला आम्ही एकमेकांशी सामान्य विषयांवरच बोलायचो. परंतू कालांतराने आवडी निवडी सारख्या असल्याने छान मैत्री झाली. स्वाभाविकपणे आम्ही बरेच वेळा वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधू लागलो. मैत्री जर मनापासून झाली तर ती घनिष्ठ व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामधे विश्वास फार लवकर निर्माण होतो तोच खरा मैत्रीचा आधार असतो. त्या विश्वासाच्या बळावर बरेचदा कधी कधी मनाला वाईट वाटलेले, किंवा कुणाचे चुकीचे वागणे या संदर्भात देखील विचारांचे आदान प्रदान सुरु झाले. तसा तो अतिशय जास्त संवेदनशील या पठडीत मोडणारा गडी होता. आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी खूप खूप करायचे, सर्वांची मनापासून काळजी घ्यायची, सर्वांसाठी झटायचे, अगदी मनापासून. परंतू त्यापैकी कुणी वाईट वागले की मग मात्र त्याला फार फार वाईट वाटायचे. आपण त्याच्याकरीता इतके करतोय परंतू त्याचा प्रतिसाद हा असा मन दुखावणारा का याचा तो सतत विचार करीत रहायचा. परंतू या माझ्या संवेदनशील मित्राजवळ एक युक्ती फार विशेष होती ज्यामुळे त्याला सभोवतालच्या कुणाच्याही वागण्याचे वाईट वाटले तरीदेखील त्याबद्दलचा राग मनात घर करुन बसायचा नाही. ती युक्ती होती तो वापरत असलेला ॲन्टीथेसीस. त्याच्या या ॲन्टीथेसीस ची काही उदाहरणे वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल की ही युक्ती जर आपणही वापरली तर आपल्यालाही लोकांच्या वाईट वाटण्याचा राग येईल परंतू तो राग मनामधे साचून त्याचा ताण मात्र कधीच येणार नाही

एकदा त्याच्या कंपनीतल्या सहकाऱ्याच्या चुकीच्या वागण्याबद्दल तो अतिशय चिडला होता. त्याला तो राग सहन होईना. कंपनीतून बाहेर पडता पडताच त्याने मला फोन लावला कारच्या ब्ल्युटुथ वरुन माझ्याशी बोलू लागला. अव्या, आज पार डोके खराब झाले यार. तो माझा मित्र असे कसे काय वागला? मी त्याला त्याच्याच भल्याचे सांगायला गेलो होतो. त्याने जर मी सांगितले होते त्याप्रमाणे ती मशीन सेट केली असती तर त्याचा वेळ वाचला असता माझ्या सर्व प्लॅनींगनुसार काम झाले असते. परंतू अर्धवट काम टाकून घरी गेला यार. हे काय वागणे झाले काय? वगैरे वगैरे. साधारण तीन मिनीटे तणतण केल्यानंतर मी त्याला म्हणालो की, तुझे बरोबर आहे त्याने असे वागायला नको होते. मी असे म्हणल्याबरोबर त्याने पवित्रा बदलविला हळू आवाजात म्हणाला, पण यार कदाचित त्याला घरी काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून गेला असेल. ठिक आहे. अतिशय परस्पर विरोधी विचार. परंतू सकारात्मक विचाराने शेवट. मधेच केव्हातरी वहिनींच्या वागण्याबाबत खूप चिडला होता. किती सांगायचे यार तिला? माझ्याकडे तिचे हल्ली लक्षच नाही. सारखी मुलांमधे गुंतलेली असते. अरे काल तर मी कंपनीतून आलो, मला फार भूक लागून गेलेली होती आणि ही चक्क झोपलेली. असा राग आला यार. घरीच तर असते तरी माझा विचारच नाही. मी म्हणालो, हो रे! खरे आहे वहिनींनी तसे करायला नको. परत मी असे म्हणल्यावर तो म्हणाला, पण तिचेही बरोबर आहे यार, खूप थकते ती पण. घरी असते म्हणजे रिकामी नसते. घराची सगळी काळजी घेते. सर्वांचे सगळे करते. कधीच तक्रार करत नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी थकून झोप लागू शकते. परत संपुर्णपणे परस्पर विरोधी त्या व्यक्तीला समजून घेणारे सकारात्मक विचार. राग येऊनही त्याचा ताण येऊ देण्यासाठी वापरलेला ॲन्टीथेसीस.

सामाजिक परीस्थितीत किंवा कुटुंबात वावरत असताना आपल्या मनाविरुद्ध लोक वागणारच कारण आपण देखील बरेच वेळा त्यांना हवे तसे वागत नसतो. आपल्या बाजुने आपले खरे असते म्हणून लोकांच्या वागण्याचा राग येऊ द्यावा. परंतू त्या रागासोबत जर ॲन्टीथेसीस प्रमाणे प्रत्येकाची बाजू समजून घेण्याचा आपल्याला आलेल्या रागाच्या विरुद्ध परंतू सकारात्मक प्रयत्न आपल्याला त्या रागाच्या ताणापासून मुक्त करु शकतो आणि आपले आयुष्य सुंदर होऊ शकते. सुरुवातीला जरी असा विचार करायला त्रास झाला तरी त्याची सवय निश्चितच करता येऊ शकते!! होय ना?





Comments

  1. Very nice & useful in real life. Thank u Sir🙏

    ReplyDelete
  2. These optimistic and positive views of yours, inspire us to lead a good life!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23