थोडा है थोडे की जरुरत है @04.0918

विलग होणारी कलाकृती..

ज्या कवितांची गाणी होतात ती गाणी आपल्या लक्षात राहतात कारण एरवी कविता लक्षात ठेवणे जरा कठीण बाब असते. बालपणीच्या कविता आपल्यापैकी अनेकांना स्मरतात कारण त्या काळी कविता वाचन, पठण हा सारा आनंदाचा भाग होता. दुर्दैवाने आता बालकवींची एखादी सुंदर कविता परीक्षेतील गुणांपर्यंत मर्यादित असल्याने त्या कवितांना अभ्यासणे त्यांच्या गर्भीतार्थापर्यंत पोहोचणे हा प्रकार दुर्मिळ होत जातो आहे. कवितेचे स्वरुपही एखाद्या गाण्यासारखेच असते. एखादे गाणे जे दस्तुरखुद्द लताबाईंनी गायले असेल तर त्याचा आनंद शब्दातीत आहे. परंतू तेच गाणे पुढे श्रेया घोषाल म्हणते, मग तेच गाणे एखाद्या गायनाच्या स्पर्धेत एखादी लहानगी पोर गाते तेच गाणे आपण देखील गुणगुणत असतो. या सर्व वेळी देखील आनंद मिळालेलाच असतो. कलाकृतीचे असेच असते. कोणतीही कलाकृती ही तिच्या निर्मात्यापासून कधी ना कधी विलग होते नंतर खरे तर त्या निर्मात्याचा त्यावरचा अधिकार संपलेला असतो. जोवर ती कलाकृती निर्मीतीच्या प्रक्रीयेत आहे तोवर त्यावर वेगवेगळे संस्कार करण्याची मुभा त्या कलाकारास असते. तो स्वतःच्या सर्वोत्तम क्षमता वापरुन त्याची निर्मिती करतो. परंतू एकदा ती कलाकृती पूर्णत्वास जाऊन लोकांपर्यंत पोहोचली की कलाकाराची भूमिका संपुष्टात येते त्यानंतर त्या कलाकृतीचा हवा तसा, मनाला भावेल तसा, समजेल तसा अर्थ काढल्या जातो त्या प्रक्रीयेला रोखता येत नाही. ज्या व्यक्तींमधे कलात्मक दृष्टीकोन असतो ते तर त्या कलाकृतीच्या निर्मात्याच्या मनात आले नसतील असे अर्थ निर्माण करतात त्या कलाकृतीची उंची वाढवतात. कवितेच्या संदर्भातील असाच एक प्रसंग एका वर्गात घडला होता.

एक जुनी गोष्ट माझ्या ऐकण्यात आहे. मराठी पद् व्युत्तर वर्गामधे शिक्षण घेण्याकरीता एक ज्येष्ठ कवी पोहोचले. त्यांनी नागपूर विद्यापीठात रीतसर प्रवेश घेतला त्यांनी वर्ग करणे सुरु केले. गंमत म्हणजे ते जो अभ्यासक्रम शिकत होते त्या अभ्यासक्रमात त्यांनीच लिहीलेली कविता समाविष्ट करण्यात आली होती. प्रसंग मोठा गंमतीदार होता. स्वतः कवी विद्यार्थी म्हणून वर्गात असताना त्यांची कविता शिकवायला एक ज्येष्ठ प्राध्यापक आले. अर्थात ते प्राध्यापक देखील थोर समिक्षक होते. त्यांनी ती कविता शिकवायला घेतली. साधारण दोन तीन वर्ग तासांमधे ती कविता त्यांनी शिकविली. त्या प्राध्यापकांना ठाऊक होते की त्या कवितेचे रचयीता कवी विद्यार्थी म्हणून त्या वर्गात होते. कविता पूर्ण शिकवून झाल्यावर कवीराज उभे राहीले त्यांनी प्राध्यापकांना त्यांचे मत सांगितले. ते म्हणाले की सर, आपण ही कविता शिकवित असताना एकूण पाच कडव्यांपैकी दोन कडव्यांचा अर्थ पूर्णपणे वेगळा सांगितला. आपण जो अर्थ सांगितला तो कुठेही माझ्या मनात नव्हता. हे कसे? ज्येष्ठ समिक्षक असलेले ते प्राध्यापक जे काही उत्तरले तेच खरे कलात्मक समिक्षणाचे मर्म आहे. ते म्हणाले, कविराज आपण ही कविता लिहीत असताना जो काही विचार केलात तो आपल्या त्यावेळेच्या मनःस्थीतीवर, आपल्या मनावर बालपणापासून झालेल्या वैचारिक संस्कारांवर, आपल्या व्यक्तीगत चिंतन क्षमतेवर आपल्या मनाच्या एकुणच जडणघडणीवर अवलंबून असलेला होता. त्या विचाराला आपण आपल्या कवितेमधे प्रसृत केले ही कविता वाचकांकरीता उपलब्ध करुन दिली. ज्याक्षणी आपण ही सर्व वाचकांसाठी उपलब्ध करुन दिलीत त्याक्षणी त्यावरचे आपले स्वामित्व संपुष्टात आले. आता यानंतर त्या काव्याचा आस्वाद घेताना मी आताच सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोभुमिकांचा नव्हे तर संबंधित वाचकांच्या मनोभुमिकेचा विचार महत्वाचा ठरणार त्यांच्या मनोभूमिका आपल्यापेक्षा निश्चितच स्वतंत्र पुर्णतया वेगळ्या राहणार. तिच बाब मला देखील लागू आहे. त्यामुळे कवितेचे लिखाण जरी आपण केले असेल तरीदेखील या वर्गाचा शिक्षक म्हणून त्यामधून मला प्रतित होणारा अर्थच मी तुम्हा सर्वांना सांगणार या वर्गाचे विद्यार्थी म्हणून आपणाला तोच स्विकारावा लागणार. अर्थात हा सारा संवाद अत्यंत खेळीमेळीच्या स्वरुपातच झाला होता त्यामुळे कवीराज निमूटपणे खाली बसले. परंतू कोणतीही कलाकृती ही त्या कलाकाराची किती कुठवर असते याचे नेमके उत्तर त्या प्राध्यापक महोदयांनी अचूक सांगितले होते

कधी कधी तर कलाकृती ही जनमानसात जाताना किंवा प्रसिद्ध होताना चुकीच्या संदर्भासह लोकप्रीय होते. एखादा शब्द चुकीच्या अर्थाने स्विकारलेला असतो. एके दिवशी रेडीयोवर माझ्या अतिशय आवडत्या कवीची, गुलजारची मुलाखत सुरु होती. त्यामधे सहजच बोलताना गुलजारांनी त्यांनी लिहीलेल्या दोन वेगवेगळ्या गीतांमधील मुद्दाम वापरलेल्या दोन शब्दांची गंमत सांगितली. गुलजार यांचे एक सुप्रसिद्ध गीत त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटात वापरले होते. आशा भोसले यांनी गायलेल्या त्या गीताचे शब्द होते, झुठे नैना बोले साची बतीया, नित चमकावे चाँद काली रतीया. या गीतात झुठे नैना हा शब्द गुलजार यांनी खोटे किंवा फसवे डोळे या अर्थाने वापरला आहे. हे गीत अतिशय प्रसिद्ध झाले. या चित्रपटानंतर काही दिवसांनी गुलजार, आशा भोसले राहुल देव बर्मन यांनी दिल पडोसी है नावाचा एक अल्बम काढण्याचे ठरविले. यामधे आर डी बर्मन यांना झुठे नैना बोले सारख्याच आशयाचे गीत हवे होते. त्यामुळे त्यांनी तश्याच पद्धतीचे गीत लिहावे अशी विनंती त्यांनी गुलजारना केली. त्यांनी गीत लिहीले ते गीत देखील अतिशय लोकप्रीय झाले. सर्व रसिक श्रोत्यांनी ते झुठे तेरे नैन, सौतन की छब छु के आये असे ते गीत आवडीने ऐकले. मी देखील ते गीत त्याच पद्धतीने ऐकले होते. त्या दिवशी मात्र त्या मुलाखतीमधे गुलजारांनी फारच वेगळी गंमत सांगितली. ते म्हणाले माझे लेकीन चित्रपटातील झुठे नैना बोले साची बतीयाँ हे गीत लोकांना ठाऊक असल्याने या गीताचे शब्द देखील झुठे तेरे नैन म्हणजे फसवे किंवा खोटे डोळे असतील असे सर्वांनी गृहित धरले होते. परंतू खरी बाब अशी आहे की मी हे गीत लिहीताना फसवे डोळे या अर्थाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जाणिवपूर्वक वेगळा शब्द टाकून लिहीले होते. ते असे की, जुठे तेरे नैन, सौतन की छब छु के आये. येथे जुठे म्हणजे उष्टे असा त्याचा अर्थ गुलजारजींना अभिप्रेत होता. परंतू आधीच्या गाण्याच्या लोकप्रीयतेमुळे सर्वांनी सरसकट तोच झुठे म्हणजे खोटे हा अर्थ गृहित धरला. मला हे सारे ऐकून विश्वासच बसेना परंतू गुलजारजींच्या बोलण्यानंतर लगेच ते गीत लागले त्यात खरोखरीच आशा भोसलेंनी जुठे तेरे नैन असेच गायले आहे

कलाकृती ही अशीच असते. कलाकारापासून ती विलग झाल्यावर तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. त्याचा आस्वाद प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने घेऊ लागतो. त्या कलाकृतीला उत्तम विचार करणारे सकारात्मकतेने स्विकारणारे लोक भेटले तर तिचे नशीब उजळून ती लोकप्रीय होते तिच कलाकृती नवनवीन आनंद दालने निर्माण करु शकते, समाधानाचा स्रोत बनु शकते. परंतू दुर्दैवाने जर तिला चांगला संवेदनशील लोक समुह भेटला नाही तर एखादी उत्तम कलाकृती देखील अव्हेरली जाते. आपले आयुष्य देखील काहीसे अश्याच प्रकारचे आहे.

जीवन जगत असताना आपल्या क्रिया, आपले शब्द, आपले विचार आपल्यापासून विलग झाल्यावर आपले नसतात म्हणूनच त्यांना योग्य पद्धतीने स्विकारल्या जाण्याकरीता आपल्या आजुबाजुला संवेदनशील सकारात्मक लोकांची गरज असते. तसे असल्यास आपल्याला या सर्वांकडून जीवन योग्य पद्धतीने आनंदाने जगण्याची उर्जा मिळते. दुर्दैवाने असे नसल्यास आपल्याला बऱ्याच वेळी मानसिक अवहेलना कुचंबणा सहन कराव्या लागतात. त्यासाठी उच्च योग्य अभिरुची कलात्मक संवेदना जागृत असलेले लोक जास्तीत जास्त आपल्या जीवनात रहावेत याकरीता प्रयत्न करायला हवा म्हणजे एखाद्या उत्तम कलाकृतीप्रमाणे आयुष्य देखील निरंतर आनंद निर्मीतीचा अक्षय स्रोत बनू शकेल. होय ना?





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23