थोडा है थोडे की जरुरत है @ 24.07.18
जजमेंटल
इंग्रजी भाषेतला हा शब्द मी माझ्या साहित्याच्या अभ्यासात वाचला होता. परंतू फार तिव्रतेने मी इंग्लीश विंग्लीश नावाच्या एका चित्रपटात श्रीदेवीच्या तोंडी ऐकला. बरेच वेळा आपण जजमेंटल होतो आणि त्यानुसार वागू लागतो. असे करणे चूक असते असे नाही कारण आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन आपण जजमेंटल होतो. परंतू कधी कधी या नादामधे आपण अकारण काही लोकांवर अन्याय करतो. आपल्याला आलेल्या अनुभवांवरुन आपले काही बाबतीत फार ठाम मत बनलेले असते व त्यावरुनच आपण लोकांच्या वागण्यासंदर्भात आडाखे बांधतो, त्यांच्या कृतींबद्दल वाच्यता करतो व आपले मत व्यक्त करतो. परंतू असे करणे कधी कधी फारच चुकीचे व अन्यायकारक होऊ शकते. विशेषतः अश्या व्यक्तीच्या बाबतीत जी व्यक्ती आपल्या पूर्व अनुभवांपेक्षा संपुर्णपणे वेगळी वागून आपल्याला आश्चर्याचा धक्का देते. अश्या व्यक्तींच्या धक्क्यामुळे आपण उगाच जजमेंटल झालो असे आपल्याला वाटू लागते. आपल्याला आलेले अनुभव जरी तसे असले तरी ती व्यक्ती आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांना चांगल्या अनुभवांमधे परावर्तित करुन जाते. कधी कधी तर एकच व्यक्ती काही दिवसांनंतर संपुर्णपणे वेगळी वागून आपण तिच्याबद्दल अकारण जजमेंटल झाल्याचा आपल्याला पश्चाताप घडवून देते. एखादे साधे काम करणारी व्यक्ती देखील आपल्याला योग्य पद्धतीने जगण्याचा धडा देऊ शकते, अर्थात आपली शिकण्याची तयारी असेत तरच. काही दिवसांपूर्वीच असाच एक जजमेंटल होऊ नये हे शिकविणारा धडा मला शिकायला मिळाला.
माझ्याकडे कार साफ करायला आठवड्यातून दोन दिवस एक मुलगा यायचा. अतिशय मेहनती व कष्टाळू असा तो पोरगा होता. सकाळी सहा वाजे पासून ते दहा वाजे पर्यंत लोकांकडे कार साफ करणे व त्यानंतर एका दुकानामधे सायंकाळपर्यंत नोकरी करणे असे त्याचे चरितार्थासाठी सुरु होते. गेल्या वर्षभरापासून तो माझ्याकडे काम करायचा व स्वतःची कार असल्यागत अतिशय छान साफ सफाई करायचा. यासोबतच त्याचा आणखी एक गुण मला अतिशय भावला होता व तो म्हणजे तो अतिशय प्रामाणिक होता. गाडी आतल्या बाजूने साफ करताना कधी कधी समोरच्या कप्प्यात चिल्लर पैसे पडलेले असायचे, गाडीत गाणी ऐकण्यासाठी पेन ड्राईव्ह लागलेला असायचा शिवाय इतरही काही छोट्या वस्तू पडलेल्या असायच्या. परंतू एक वर्षाच्या कालावधीत एकाही वस्तूला किंवा पैश्यांना त्याने हात लावला नव्हता. अगदी चिल्लर पैसे देखील, जे मी मोजलेलेही नसायचे, त्यांचीही संख्या कधीच कमी झाली नाही. यासोबतच गाडी नेहेमी स्वच्छ ठेवत असल्याने मी त्याच्यावर खुश होतो. एका वर्षानंतर त्याने मला काही पैसे वाढवून मागितले जे मी अतिशय आनंदाने मान्य केले. एकंदरीत त्याचे छान काम सुरु होते. अश्यातच त्याने मला एक दिवस त्याच्या भविष्यातील एका योजनेबाबत सांगितले. त्याला त्याच्या परीसरात चप्पल जोड्यांचे एक दुकान लावण्याची इच्छा होती. त्याने परीसरातील मार्केटचा अभ्यास केला होता व तश्या प्रकारचे दुकान तेथे चालू शकेल असे त्याला खात्रीपूर्वक वाटत होते. मला त्याचे खरोखरीच कौतुक वाटले. इतकी मेहनत करुन तो पोरगा आपल्या जिवनाचा विकास करण्यासाठी धडपडत होता. मी त्याला काही प्रश्न विचारुन त्याच्या व्यवसायाचा व्याप व संधी समजून घेतल्या. त्याचा बारीक अभ्यास बघून मला त्याच्या यशस्वीतेबद्दल खात्री पटली. आमचे बोलणे झाल्यावर तो मला म्हणाला की सर, माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीला जी रक्कम उभी करायची आहे त्याकरीता मला आपल्याकडून काही मदत हवीय. आपण मला दोन हजार रुपयाची मदत करावी. मी आपल्याकडे काम करुन ते पैसे फेडून देईन. मी मुळातच त्याच्या प्रामाणिकपणावर आणि मनापासून काम करण्याच्या कार्यशैलीवर खुश असल्याने मी त्याला लगेच पैसे दिले. त्यानंतर तो पुढे कार स्वच्छ करण्यासाठी येत राहीला. त्याला दिलेल्या मदतीपैकी जवळपास दोनशे रुपये त्याने काम करुन फेडले आणि तो गायब झाला.
मला कोणतीही सूचना न देता त्याने अचानक कार स्वच्छ करायला येणे बंद केले. एखादा आठवडा वाट बघितल्यानंतर मी त्याला फोन केला तर फोन नंबर अस्तित्वात नाही असे मला ऐकू आले. त्याच्या दुसरा नंबर होता त्यावर हा नंबर बंद आहे असे कायम ऐकू येत होते. पुढचा आठवडा त्याला फोन करण्यात गेला. त्यानंतर मी तो काम करीत असलेल्या दुकानात जाऊन चौकशी करुन आलो तर मला असे कळले की त्याने ती नोकरी दोन महिन्यांपूर्वीच सोडली आहे. आता मात्र माझी खात्री पटू लागली की आपण पुन्हा एकदा फसविल्या गेलो. कारण या आधीही अश्या प्रकारे मदत करण्याच्या प्रसंगांमधे मला बरेच वेळा आर्थिक फटके बसलेले होते. त्याकरीता कुणावरही पटकन विश्वास ठेवतोस असे टोमणेही मला ऐकायला मिळतात. परंतू यावेळी मला जास्त वाईट वाटत होते. कारण हा पोरगा असे काही करेल असे मला मनापासून वाटत नव्हते. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी फारच आश्वस्त होतो. पण जवळपास महिना उलटून गेला. मी रोज त्याला फोन करुन बघायचो परंतू उपयोग झाला नाही. शेवटी आपली फसवणूक झाली हे दुःख मनात ठेऊन आणि या संपुर्ण प्रसंगाला जीवनातील एक कटू प्रसंग म्हणून जमा खाती टाकला आणि नवा कार स्वच्छ करणारा मुलगा नेमला. त्याला नेमताना त्याला व आणखी काही जणांना मी माझा अनुभव सांगितला. सोबतच आगंतूकपणे त्यांनीही अशी मदत करताना विचार करावा हे देखील सुचविले. तो नवा मुलगा येऊन त्याने कार स्वच्छ करुन दिली. त्याचे देखील काम चांगले होते. माझा जुना अनुभव विसरुन आणि १८०० रुपये आपण नेहमी म्हणतो त्या प्रमाणे अक्कलखाती टाकून मी तो प्रसंग विसरुन गेलो तेवढ्यात माझ्या अत्यंत स्वाभाविकपणे जजमेंटल होण्याला चुकीचे ठरविणारी घटना घडली.
त्या दिवशी सकाळी मी सायकलींग करुन आल्यावर चहा घेत बसलो असताना अचानक तो जुना मुलगा माझ्यासमोर हजर झाला आणि कार स्वच्छ करण्यासाठी त्याने मला चावी मागितली. दोन मिनीटे मला काय बोलावे ते कळलेच नाही. अचानक माझ्या मनातला राग उफाळून आला. मी त्याला त्याच्या बेशिस्त वर्तनाबद्दल विचारले. त्यानंतर त्याने जे सांगितले त्यानंतर काय बोलावे ते सुचेना व जुने अनुभव असले तरीही त्यांच्या भरवश्यवर जजमेंटल होणे खरोखरीच चूकीचे असते हे मला पटून गेले. त्याने मला थोडक्यात असे सांगितले.
तो म्हणला सर, मला माफ करा मी मोठी चूक केली. मला साधारण एक महिन्यापूर्वी पुण्याला एका सीएनसी मशीनबाबातच्या प्रशिक्षणाचा कॉल आला. मला फोन आला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी रुजू व्हायचे होते. मी केवळ तीन तासात तयारी करुन पुण्याला गेलो. तयारी घाईत झाल्यामुळे सामान नीट नेले नव्हते, रेनकोट विसरलो आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी पावसात ओला झालो आणि फोन पूर्णपणे खराब झाला. मला नवा फोन घेण्यासाठी पैसे नव्हते. रोज दहा तास प्रशिक्षण होते त्यामुळे मला काहीही करता येत नव्हते. मला कळत होते की आपल्याप्रमाणे मी ज्यांच्या ज्यांच्या घरी कार स्वच्छ करायला जातो त्यांची किती अडचण झाली असणार. पण सर मी काहीच करु शकलो नाही. आजच पुण्याहून आलो व आल्यावर त्वरीत माझ्या सर्व ग्राहकांकडे जाऊन त्यांची माफी मागून काम सुरु करण्याचा प्रयत्न करतोय. मला माफ करा.
मला काय बोलावे ते सुचले नाही. त्याच्या हातात कार स्वच्छ करण्यासाठी चावी दिली आणि स्वतःला बजावले, कधीही जजमेंटल होऊ नये. त्यामुळे कधी कधी आपण अकारणच चांगुलपणावर अन्याय करीत असतो. वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी एक चांगला धडा मिळाला. खरेच आहे शिकण्याची तयारी असेल तर कोणत्याही वयात शिकता येऊ शकते.
खरोखरच सर,आपल्या प्रत्येकासोबत केव्हा तरी असे जजमेंटल झालेलं असतं।।
ReplyDelete