थोडा है थोडे की जरुरत है @ 03.04.18

मानसिक आधाराचे हात..

मामाचा फोन, अरे अवि तुझ्या आजीला आयसीयु मधे भरती करतो आहे, प्रकृती ठीक नाही येतोस? दहाव्या मिनीटाला मी माझ्या मामासोबत एका रुग्णालयाच्या आयसीयुच्या बाहेर उभा होतो. आजीला भरती करण्यात आले होते. काय झाले ते सारे मामाने तेथेच उभे राहून मला सांगितले. ८२ वर्षांची माझी आजी चांगली चालती फिरती असताना अचानक एका जागी थांबून गेली. काय झाले बघण्यासाठी मामीने विचारले तर मामीच्या अंगावरच ती कोसळली. जवळच्या एका रुग्णालयात तातडीने भरती केल्यावर त्यांच्या मते मेंदूत क्लॉट आल्याने असे झाले असावे असे निदान करण्यात आले. केवळ काही तासात प्रकृती जास्त ढासळल्याने आजीला आसीयु असलेल्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदुचे स्कॅनींग केल्यावर लक्षात आले की केवळ क्लॉट नाही तर आजीचे ब्रेन हॅमरेज झालेय. मेंदुला रक्त पुरवठा करणारी एक नसच फाटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता. उपचार सुरु झाले. मेंदुशी संबंधित आजार असल्याने गावातील एका न्युरोसर्जन डॉक्टरांना पाचारण केले. त्यांनी योग्य उपचार सुरु असल्याबाबत खात्री करुन घेतली. दोन दिवस आपण वाट बघू त्यानंतर पुन्हा नवा स्कॅन करुन पुढचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले. वेगवेगळ्या रुग्णालयांमधे रुग्णांना बघायला जायचे असल्याने त्यांच्याकडे बोलायला फार वेळ नव्हता. आजीचे वय बघता सध्या तरी आपल्याला ऑपरेशनचा विचार करता येणार नाही असे ते माझ्याशी जिना उतरता उतरता बोलले. तेवढ्या वेळातही कुठल्याश्या रुग्णालयात ऑपरेशनची तयारी झालीय असे दोन फोन आले त्यामुळे त्यांच्याशी जास्त बोलून त्यांचा मुल्यवान वेळ घेणे मला प्रशस्त वाटले नाही. दोन दिवस वाट बघण्याचा सिलसीला सुरु झाला.

तिसऱ्या दिवशी ऑक्सीजन सुरु असलेल्या आजीला त्या रुग्णालयातून स्कॅनींग सेंटरला नेण्याचे दिव्य करावे लागले. पण स्कॅन करणे गरजेचे होते. ते सारे कठीणच काम होते पण सुखरुप पार पडले. परंतू स्कॅनींगचा रिपोर्ट मात्र चांगला नव्हता. दोन दिवसाच्या उपचारानंतरही हॅमरेज कमी झाले नव्हते तर रक्तस्त्राव वाढला होता. आता मात्र चिंता वाढली. काय करावे काहीच कळत नव्हते. उपचार सुरु होते. आजीच्या शरीरातील त्राण कमी होणे सुरुच होते. त्या रुग्णालयात येणारे डॉक्टर त्यांना जमेल तसे आम्हाला सांगत होते. एक डॉक्टर म्हणाले की ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. रक्तस्त्राव वाढतोय याचा अर्थ शरीर औषधांना साथ देत नाहीये. त्यामुळे तुम्ही विचार करा. वैद्यकीय क्षेत्रातील कुणीच तज्ञ नसलेल्या आमच्यापैकी कुणीही काय विचार करणे अपेक्षित होते ते मात्र घाईघाईत डॉक्टर सांगू शकले नाहीत. आम्ही सारे पुन्हा विचारात पडलो. एका अजून वेगळ्या डॉक्टरांनी माहीती दिली की या उपचारापुढचा भाग म्हणजे आजीचे ताबडतोब ऑपरेशन करणे परंतू तिचे ८२ वय बघता ऑपरेशनचा ताण ती सहन करु शकणार नाही असेच वाटते कारण ॲनेस्थेशीया ती सहन करु शकेल असे वाटत नाहीतुम्ही विचार करा असे सांगून ते घाई घाईने निघून गेले आम्ही सर्व नॉन मेडीको पुन्हा एकमेकांच्या डोक्याला डोकी लावून विचार करु लागलो. आम्ही फारच विचारात पडलोय हे बघितल्यावर आमचे एक काका निग्रहाने म्हणाले की सारे काही बंद करा आणि आजीला घरी घेऊन चला, आता तिचे जास्त हाल करायचे नाही. काय निर्णय करावा हे आमच्यापैकी कुणालाही सुचत नसल्याने हा एक मार्ग राहू शकतो असा विचार आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात आला. परंतू या दिशेने कुणीही बोलायच्या आधीच एक दुसरे नातेवाईक जे खास करुन परवगावहून भेटायला आले होते ते ताडकन म्हणाले की, घरी घेऊन जा म्हणजे काय मरायला घरी न्या. काहीतरी विचार करु नका. प्रयत्न करता घरी नेणे होईल ते. लोक काय म्हणतील? त्यांचा तो विचार ऐकल्यावर आम्ही सारे पुन्हा संपुर्णपणे गोंधळलेल्या मूळ स्थितीत येऊन पोहोचलो. परत एकदा पहिल्या दिवशी ज्या डॉक्टरांना बोलाविले होते त्यांनाच विचारुन काहीतरी निर्णय घ्यावा असे सर्वानुमते ठरले. परंतू का कोण जाणे त्या डॉक्टरांचा दिवसभर संपर्कच होऊ शकला नाही. रात्री केव्हातरी त्यांचा फोन लागला तेव्हा त्यांच्याकडून कळले की ते परगावला एका कॉन्फरन्स साठी गेलेले आहेत त्यांचे त्या दिवशी पेपर सादरीकरण असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांना सर्व परीस्थिती सांगितल्यावर त्यांनी देखील स्थिती गंभीर आहे अश्या स्थितीत ऑपरेशन होऊ शकणार नाही असे ठामपणे सांगितले. परंतू घरी न्यायचे किंवा काय करायचे याबाबत ते स्वतः तीन दिवस येऊ शकत नसल्याने दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूनच निर्णय घ्यावा असे सुचविले त्या डॉक्टरांचा फोन नंबर देऊन सहायता केली आणि फोन संपवताना ते म्हणाले, तुम्ही सर्व मिळून निर्णय घ्या. एकंदरीत आम्ही सारे पुन्हा त्याच जागेवर. आता एव्हाना त्या रुग्णालयातील डॉक्टरांना काही विचारणेही जमेना. त्यांना बिचाऱ्यांना अनेक रुग्ण बघायचे, उपचार करायचे. ते कसे काय एकच एक आम्हाला सांगत बसणार? मग त्या रुग्णालयात आम्हाला पाठविणाऱ्या डॉक्टरांनाच पाचारण करायचे ठरले. काहीतरी मार्ग निघेल ही अपेक्षा होती. त्यांनी सर्व पाहणी केली त्यानंतर आधीच्या डॉक्टरांनी जे काही सांगितले त्याचीच गोळाबेरीज त्यांनी मांडली. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की एकदम घरी नेता येणार नाही कारण आजीला ऑक्सीजन सुरु आहे. घरी तो सुरु ठेवणे कठीण जाईल. त्यामुळे दोन तीन दिवस आयसीयुमधून साध्या खोलीत आजीला ठेवावे ऑक्सीजन वीना ती किती राहू शकते हा प्रयोग करावा नंतर मग पुढचा विचार करुयात. म्हणजे आमची निर्णय प्रक्रीया पुन्हा पुढे ढकलली गेली आम्ही सारे मूळ पदावर येऊन ठेपलो. महत्वाचे म्हणजे या सर्व डॉक्टर्स पैकी कुणीही आम्हाला त्यांच्या व्यस्ततेमुळे जास्त वेळ देऊ शकत नव्हता. तशी अपेक्षाही करणे चूकच होते कारण त्या सर्व डॉक्टरांचा वेळ अतिशय अमुल्य होता. एकंदरीत आम्ही सारे एका वैद्यकीय चक्रव्यूहात अडकल्यागत झालो होतो. मला त्या क्षणी प्रत्येक रुग्णालयात असायलाच हवा अश्या मेडीकल कौन्सीलरची आत्यंतिक गरज वाटली

सध्या मोठ्या मोठ्या रुग्णालयात मेडीकल कौन्सेलर असतात परंतू ती व्यवस्था सर्वदूर प्रस्थापित झालेली नाही. मोठ्या रुग्णालयाचा एचआर मॅनेजर वेगळे कारण ते त्या रुग्णालयाच्या व्यवस्था, सोयी सुविधा, पॅकेजेस या बाबत मार्गदर्शन करतात. तो वेगळा भाग झाला. रुग्णाच्या नातेवाईकांना अश्या परीस्थीतीमधे जो मानसिक आधार लागतो काही स्थितींमधे निर्णय घेताना जो त्रास होतो त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राशी परीचित असलेली, डॉक्टरांकडून गोष्टी समजून घेऊन त्या व्यवस्थितपणे विस्तृतपणे समजावून सांगणारी सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक व्यावहारिक अश्या दोन्ही पातळीवर सारासार विचार करुन रुग्णाबाबत निर्णय घेण्यास मदत करणारी व्यक्ती म्हणजे मेडीकल कौन्सेलर ही काळाची गरज आहे. कामाचा विचार करताना कोणत्याही डॉक्टरला रुग्णाबद्दलच्या असल्या निर्णयांमधे भावनिक दृष्टीने अडकणे शक्य नसते त्यांनी ते करुच नये. म्हणूनच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देऊन मेडीकल कौन्सेलर तयार केले जावे रुग्णालयांनी देखील अश्या नियुक्त्या करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा. रुग्णालये जशी मार्केटींग करण्यासाठी लोक नेमतात जी आज कदाचित स्पर्धेच्या युगात गरज आहे, त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना कौन्सेलींग करण्यासाठी भावनिक आधार देऊन रुग्णाबाबत योग्य प्रक्रीया करण्यास्तव स्वतंत्र मेडीकल कौन्सेलर नेमणे ही तातडीची गरज आहे. काही ठिकाणी हा प्रयोग यशस्वीरीत्या चालविला जातो पण त्याचे सार्वत्रीकीकरण करण्याचा प्रयत्न करुयातकारण..

ऑपरेशन करणारे निष्णात डॉक्टरांचे हात जसे लागतात, सुश्रुषा करणाऱ्या परिचारीकेचे हात जसे लागतात, रुग्णाच्या उपचारासाठी पैसे देणारे नातेवाईकांचे हात जसे लागतात तसेचया सबंध प्रक्रीयेमधेखांद्यावर सहानुभूतीने स्पर्श करुन तुझ्या निर्णयांमधे मी तुझ्या सोबत आहे..आपण सगळे योग्यच करु असे म्हणणारे मेडीकल कौन्सेलरचेही हात लागतातते हात निर्माण करुयातत्यांची गरज आहे






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18