थोडा है थोडे की जरुरत है @24.04.18
‘अतुल’नीय
फोनवर आपल्या वडीलांबाबत कुणीतरी चुकीचे बोलतेय असे माझ्या मुलाला जाणविले आणि म्हणून त्याने तो अनोळखी नंबरवरुन आलेला फोन कट करुन टाकला. मी बाहेरुन परत आल्यावर मला तो म्हणाला, बाबा कुणाचा तरी फोन आला होता आणि ते तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचे बोलत होते. मी जरा विचारात पडलो. माझ्याबद्दल चुकीचे? म्हणजे काय म्हणत होते? माझ्या पोराला सांगताना जरा जड जात होते. कसेबसे त्याने मला सांगितले, बाबा, ते म्हणाले की तुझ्या बापाला सांग की त्या नंबरवर जर तुम्ही एक तासात फोन केला नाही तर ते तुम्हाला बदडणार आहेत. सहाजिकच माझ्या पोराला फोनवर मिळालेला हा संदेश घाबरवणाराच होता. नंबर अनोळखी असल्याने मी देखील जरा विचारात पडलो होतो. परंतू अजूनही मला जरा शंका होती. त्यापुढे माझा मुलगा म्हणाला की बाबा ते बोलताना रागाने नाही तर हसून बोलत होते. नंबर ओळखीचा नसला तरी मी एका निर्णयाप्रत पोहोचलो होतो. हसून माझ्याबाबत अश्या प्रकारे बोलण्याचा प्रकार एकच जण करु शकतो याची खात्री होत होती. शेवटी मी देखील त्या फोन नंबरवर फोन करुन जराशी गम्मत करण्याचे ठरविले. हे असले फोनवर बोलण्याचे काम कोण करु शकते याचा अंदाज जवळपास मला आला होताच. मी एक रीस्क घ्यायचे ठरविले. विचार केला की समजा, मला वाटते तसे झाले नाही तर सरळ क्षमा मागण्याची तयारी ठेवायची. परंतू मला असा फोन करु शकणाऱ्या त्या व्यक्तीला मला त्याच पद्धतीने पकडायचे होते. मनाचा निर्धार करुन फोन हातात घेतला आणि नंबर डायल केला. काही रींग नंतर फोन उचलल्या गेला. तिकडून हॅलो आवाज यायच्या आतच मी जोरात बोलणे सुरु केले, ना*** तुला जर मला बदडायचे आहे तर माझ्या पोरासोबत काय बोलतोस? मला सांग मी येतो तुझ्याकडे आणि तुझी सगळी हाडे मोडून देतो. हे वाक्य बोलल्यावर काही सेकंदाचाच पॉज गेला पण तो फार जीवघेणा होता. मी जवळपास तयारी केली होती की मला आता मी चुकून बोललो असे म्हणावे लागणार. काही क्षणच गेले आणि पलीकडून एक गडगडाटी हास्य ऐकू आले. ते ऐकल्या बरोबर मी जोरात म्हणालो कसा पकडला बरोब्बर!! पलीकडून आवाज आला सा*, अव्या बरोबर ओळखलास. तुला बदडलेच पाहीजे, नंबर बदलला तरी ओळखतो. आणि मग पुढे तासभर भरभरुन बोलणे, शिव्या देणे, खिदळणे, मधेच भावनिक होणे, बऱ्याच दिवसात भेट झाली नाही याची खंत व्यक्त करणे, कंपनीमधे काम करुन करुन थकलो यार असे सांगणे, भेटायला हवे यार असे म्हणणे वगैरे वगैरे सुरु राहीले. माझ्या बोलण्यावरुन घरच्यांनी देखील आता एखादा तास माझ्याशी बोलता येणार नाही म्हणून आपापली कामे सुरु केली. असा फोन करुन बदमाशी करणारा तो होता माझा अत्यंत जिवाभावाचा एक अतुलनीय मित्र.
त्याची माझ्या मुलांना असलेली ओळख म्हणजे मोठमोठ्याने बोलणारा, आल्याबरोबर आपल्या बापाला प्रेमाने बुकलून काढणारा, दिवसभर बाबांशी गप्पा करणारा, त्या गप्पांनंतर बाबांना बाहेर घेऊन जाणारा, बाबांसोबत वेगवेगळ्या विषयावर वाद घालणारा, बाबांना हमखास गाणे म्हणायला लावणारा, बाबांचे मनापासून खूप कौतुक करणारा, परंतू पुढच्याच क्षणी मी कौतूक केले म्हणून जास्ती माजू नको म्हणून बाबांची खोडी करणारा, बाबांना काहीही बोलू शकणारा असा बाबांचा जीवःश्च कंठःश्च मित्र, त्यांचा काका. त्याची माझी मैत्री किती दिवसांची आहे हे मोजणे मी बंद केले आहे. सुरुवात कधी झाली हे मला नीट आठवत नसले तरी देखील शेवट मात्र शेवटच्या श्वासालाच असेल याची खात्री आहे. आयुष्यभराची मैत्री. कधी कधी या मैत्रीचा विचार करतो तर असे वाटते की आम्ही दोघे संपुर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीचे जीवन जगत आहोत. शिक्षणाच्या प्रक्रीयेत केवळ दोन वर्षे सोबत होतो. त्यानंतर त्याचा मार्ग बदलला. तो वेगळ्या मार्गाने जाऊन फार लवकरच यशस्वी जीवन जगू लागला. माझ्या आयुष्यात काही चढ उतार आले. अपयश आले. त्यावेळी तर संपुर्णपणे एकटेपणा आला. परंतू त्याही वेळी तो माझ्या सोबत होता. असाच कोसळणाऱ्या धबधब्यासारखा यायचा, शिव्या घालायचा, गप्पा करायचा आणि अपयशानंतर आलेले मनावरचे मळभ दूर करुन देऊन परत नव्याने लढण्याची शक्ती देऊन निघून जायचा. अर्थात हे सारे अत्यंत अनौपचारीकपणे व्हायचे ज्यात कसलाही अभिनिवेश नसायचा. आयुष्य पुढे चालत राहीले. तो अजून यशस्वी झाला. एका मोठ्या शहरात, एका मोठ्या कंपनीत, एका मोठ्या पदावर आता काम करतो. माझ्याही आयुष्यात अपयशाने माझी पाठ सोडली व समाधानकारक यश मिळाले. परंतू आमच्या दोघांच्याही आयुष्याच्या विविध आणि बदलत जाणाऱ्या स्थिती आमच्या जिवाभावाच्या मैत्रीवर काहीच परीणाम करीत नव्हत्या. ती अनेक वर्षांपूर्वी होती तशीच अबाधित होती. अजूनही भेटी झाल्यावर त्याचा आवेश तोच असतो. त्याने आजतागायत मला त्याचे पॅकेज सांगितलेले नाही. वारंवार अमेरीका किंवा अनेक देशांमधे जातो हे सांगताना त्याचा टोन अतिशय सामान्य असतो. भारतातल्या एका महानगरात तीन बेडरुमचा प्रशस्त फ्लॅट घ्यायला किती पैसे लागतात हे मला चांगलेच ठाऊक असले तरी त्याने त्याच्या सुंदर फ्लॅटची किंमत मला सांगितलेली नाही. त्याच्या घरी त्याने घेतलेल्या वस्तुंच्या किंमती, त्याच्या आलीशान गाडीतील सुविधा या कोणत्याही गोष्टी आमच्या चर्चेतही तो कधीच आणत नाही. या सर्व गोष्टींच्या किंमती सांगून स्वतःचे मोठेपण दाखविणारी अनेक मंडळी आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात. परंतू ही मैत्रीच मुळात मनाचे तार मनाशी जोडल्यानंतरची आहे व त्यामुळे या सर्व बाबींचे कौतुक असले तरी देखील त्याचा फार फरक पडत नाही. मला असा मित्र आवडतो याकरीता की तो मला माझे पद, त्या पदासोबत प्राप्त झालेले अधिकार, त्या पदामुळे मिळणारी प्रतिष्ठा, हे सारे काही विसरायला लावतो व या सर्व बाबींपासून दूर असलेल्या माझ्यातल्या त्या मूळ व्यक्तीला तो सजग ठेवतो कारण तिच काय ती कायमस्वरुपी बाब असते. म्हणून असा मित्र आयुष्यात मिळणे व त्याच्या सोबतची मैत्री कायम स्वरुपी टिकणे हे आजच्या काळात जरासे दुरापास्त होत चालले आहे. असा किमान एखादा मित्र आयुष्यात मिळणे ही मोठी उपलब्धी राहू शकते.
हे सारे माझ्या त्या मित्राबद्दलचे विचार येथे उमटण्याचे कारण म्हणजे परवा खूप मोठा लोकसंग्रह असलेल्या, अनेक संस्थांशी संबंध असलेल्या, अनेक ठिकाणी आपल्या कार्यकुशलतेची छाप सोडलेल्या एका मित्राचे एक वाक्य मला विचारात पाडून गेले. त्याच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलताना तो सहजच म्हणाला की यार, मला कायम सोबत असलेला मित्रच नाही. मित्र मिळतात, छान मैत्री देखील होते परंतू काही दिवसांनी त्यात खंड पडतो. मग नवे मित्र मंडळी सोबत येतात. असे सुरु राहते. त्याच्या बाबतीत असे का व्हावे याचा विचार करताना हेच जाणवते की मैत्री ही जर कोणत्याही देवाण घेवाणीच्या आधारावर किंवा काहीतरी हेतू ठेवून केली असेल तर ती अल्पायुषीच राहते. मैत्रीची सुरुवात कदाचित व्यावहारिक देवाण घेवाणीतूनच होते परंतू पुढे त्या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मने जुळतात व अशी मैत्री, आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आपल्या मूळ स्वरुपाला जिवंत ठेवण्याचा स्रोत बनते. आपले मूळ स्वरुप हेच अंतिमतः खरे स्वरुप असते व त्या स्वरुपामधे झालेली मैत्री कायम स्वरुपीच असते.
हे सारे वाचल्यानंतर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील असा एखादा तरी मित्र किंवा मैत्रीण आठवली असेल. आज त्याला मुद्दाम फोन करुन एक सांगता येईल? मित्रा, माझ्या आयुष्यात तुझे अनन्यसाधारण महत्व आहे. मी कर्तृत्वाच्या भराऱ्या घेत असताना किंवा अपयाशाने जमिनीवर रखडत असताना दोन्ही स्थितींमधे माझ्या सोबत माझा हात हातात धरुन सदोदित माझी सोबत करणारा तू, माझा खराखुरा आधार आहेस आणि म्हणूनच तुझी मैत्री माझ्याकरीता अतुलनीय आहे. हे सांगून बघा, बघा किती प्रसन्नता लाभते त्याला नि आपल्यालाही.
Comments
Post a Comment