थोडा है थोडे की जरुरत है @ 10.04.18
शेवटचा आधारवड कोसळताना
आमच्या पिढीला खरा खुरा आधार देणारा, व कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवणारा आमच्या कुटुंबातील शेवटचा आधारवड कोसळतोय.. जुन्या काळात ज्याला खऱ्या अर्थाने कुटुंब संबोधीले जायचे तश्या पद्धतीचे माझ्या आईचे कुटुंब. तीन भाऊ, त्यांची एकुण चौदा मुले, त्यांची मुले असे मिळून जवळपास साठ सत्तर जणांचे मोठे कुटुंब. यामधील तीन आजोबा व तीन आज्या या खऱ्या अर्थाने या कुटुंबाचे आधारवड होते. तीन वेगवेगळ्या घरांमधे जरी रहात असले तरी त्यांच्या सर्व मुलांमधे व नातवांमधेही एक प्रकारची छान एकरुपता होती. चुलत, मामे असा काही भेदच नव्हता कारण या सहा मोठ्या आधारवडांनी हा संपुर्ण परीवार मजबुतीने धरुन ठेवला होता. या सर्व पसाऱ्यामधे मतभेद नव्हते असे नाही, भांडणे नव्हती असेही नाही परंतू असे सर्व असले तरीही प्रसंगी सारेच एकत्र येऊन मनातील वाद संपवून छान एकत्रपणे नांदत होते कारण या सर्वांना तसे करायला भाग पाडत होते हे सहा आधारवड. नाती गोती जपण्याचे, त्यानुसार सर्व आचार उपचार करण्याचे कार्य ही मंडळी मोठ्या निष्टेने करायची. खरे तर फार काही उल्लेखनीय कार्य त्यांनी कुणीही केले नव्हते. सामाजिक दृष्टीने देखील अगदीच अपवाद सोडला तर फार मोठे योगदान कुणाचेही नव्हते. परंतू आपल्या कुटुंबाचा बाज सांभाळण्याचे व त्या अनुषंगाने परीवाराला व त्याच्याशी निगडीत सर्व परंपरांना सांभाळण्याचे कार्य मात्र त्यांनी मनोभावे केले. लोकांना या परीवाराशी जोडण्याचे देखील कार्य त्यांनी केले. येणारे जाणारे पाहुणे, त्यांचे आदरातिथ्य, त्यांना हवी ती मदत अश्या प्रकारच्या माणसे जोडण्याच्या प्रक्रीया ही मंडळी मोठ्या जिव्हाळ्याने करायची. या सर्वांच्या वागण्याची एक विशिष्ट पद्धत होती व त्या पद्धतीचाच परीपाक म्हणून संपुर्ण परीवार त्यांच्या निमीत्ताने मनाने जोडलेलाच रहायचा. आम्हा नातवांच्या मनात तर आमच्या बालपणीच्या रम्य आठवणी केवळ याच मंडळींच्या अश्या सर्वांना जोडण्याच्या प्रवृत्तीमुळे अजूनही ताज्या आहेत. आमचे बालपण जे अतिशय रम्य व एकत्रीत पणे नांदून आम्ही जगले ते सारे काही कुटुंबाच्या आधारवडांमुळेच. आज त्या साऱ्या बाबींबद्दल नव्या पिढीला सांगितल्यास त्यांना त्या सर्व परीकथाच वाटतात. असेही जगणे असू शकते? भावंडे अश्या प्रकारे देखील इतके दिवस आई वडीलांना सोडून केवळ आजी आजोबांसोबत राहू शकतात? इतकेच काय पण उन्हाळ्याच्या सुट्या अश्या प्रकारे घालविल्या जातात यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. तो काळच वेगळा होता व त्या काळात कुटुंबाला घट्ट बांधून ठेवणारे मजबूत आधारवडही होते…
उन्हाळ्याची सुटी कधी लागते याची चातकासारखी वाट बघणे सुरु असायचे. आमच्या आईच्या त्या भल्यामोठ्या कुटुंबाची एक शाखा मेहकरजवळ नागापूर नावाच्या एका गावाला होती. आमचे एक आजोबा-आजी तेथे रहायचे. साधारण दोन वर्षांमधून एकदा आम्हा सर्व नातवंडांचा तेथे जाण्याचा बेत ठरायचा. गावातले ते भले मोठे घर, घराच्या अंगणात मोठे तुळशी वृंदावन, त्याच्या पलीकडे गोठा, त्यात गायी म्हशी असा सगळा खटला होता. शेते होती, बैलगाड्या होत्या, रेंग्या होत्या, बैलांना नावे होती, आमराई होत्या असे एकंदरीत जुन्या काळातील गावाला शोभणारे सारे काही तेथे होते. आणि हे सारे सांभाळणारे आजी आजोबा देखील होते. उन्हाळ्यात आम्ही साधारण दहा बारा नातवंडे त्या आजी आजोबांकडे पोहोचायचो. सगळी धमाल असायची. घरच्या वरच्या बाजुला आजोबांनी आंब्यांचा माच लावलेला असायचा. मनात येईल तेव्हा तेथे चढायचे व वाटेल तेवढे आंबे खायचे. आंबे संपत आले की आजोबा कधी त्या माचाची शीग भरुन टाकायचे ते कळायचेच नाही. अंगावर डाग लागतील, कपडे खराब होतील अश्या कोणत्याही बाबींचा विचार न करता रसाने माखून जाऊन आंबे खाणे चालायचे. मग तेथला मामा पोहणे शिकायला न्यायचा. मोठ्या विहीरीमधे गावातील पोट्टे पाट्टे (गावाकडचा विशेष शब्द) मस्त उड्या मारायचे. स्विमींगपूलमधील आता शिकवले जाणारे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण बघितल्यावर आम्हाला शिकविलेले स्विमींग म्हणजे रानटीच होते. विहीरीच्या काठावर मी व माझा भाऊ बसलो असताना मामाच्या एका मित्राने दोन बाजूने आम्हाला पकडून कपड्यांसकट पाण्यात मारलेली उडी, त्यानंतर नाकातोंडात गेलेलं पाणी आणि दूरवर असलेला लटकता दोर पकडण्यासाठी आम्ही दोघांनीही मारलेले हातपाय…आणि पोहणे आले. दुसऱ्या दिवशी आपणहून वरुन पाण्यात उड्या मारल्या. थकून परत घरी गेल्यावर आजीच्या हातचा गंजभर मस्त दहीभात…क्षणात फस्त व्हायचा. जरासा वेळ जात नाही तर आजोबा आंबे माचून आमच्यासाठी रस करीत बसायचे. दुपारच्यावेळी घरात बसून कुणी पत्ते खेळणार, कुणी गोठ्यातील धांड्यांपासून चश्मे किंवा बैलगाड्या अश्या छान छान वस्तू बनविणार असे सारे घरात बसून खेळायचे खेळ चालायचे. उन्हे जराशी कलली की मामासोबत बैलगाडीत बसून शेतात जायचे, बैलगाडी चालवायची, विटीदांडू खेळायचा व सायंकाळी घरी भूक लागली म्हणून ओरडत परत यायचे. वाढीच्या वयाची पोरे घरात आहेत म्हणून आजीने पुन्हा भले मोठे दडपे पोहे बनविलेले असत. ते फस्त केले की मग सर्वांनी मिळू आजीसोबत शुभंकरोती व अथर्वशिर्ष म्हणायचे. ते आटोपले की आजी रात्रीच्या स्वयंपाकाला लागायची. रात्री आम्हाला आवडतो तसा मऊ गुरगुट्या भात, मेतकुट आणि खास आमच्यासाठी आजीने बनविलेले लिंबाचे गोड लोणचे असा बेत. जेवण झाल्यावर वेध लागायचे ते म्हणजे रात्री अंगणात गाद्या घालून त्यावर लोळायचे आणि मग आजी गोष्ट सांगायची. टिपूर चांदण्याखाली आणि निद्रीस्त झालेल्या गावाच्या नीरव शांततेत आमच्यापैकी जवळपास सगळे गोष्ट ऐकता ऐकताच आजीच्या जवळच झोपी जायचो… जवळपास महिनाभर कधी या आजी आजोबांकडे किंवा कधी त्या आजी आजोबांकडे आमच्या सुट्या व्यतीत व्हायच्या.
वर वर बघता या सबंध प्रक्रीयेत कुटुंबाचे हे आधारवड सकृत दर्शनी फार मोठ्या गोष्टी करायचे असे भासत नसेलही कदाचित…परंतू त्यांच्या या सबंध कामांमधून एक महत्वाची गोष्ट व्हायची ज्याचे मोल आजच्या घडीला जास्त कळते. आम्हा नातवंडांसाठी हे सारे करत असताना त्यांनी आमच्या मनामधे त्यांच्याबद्दल जी अतूट ओठ निर्माण केली त्यामुळे आम्हा सर्व भावंडांमधे एकत्रितपणाचा भाव निर्माण झाला. कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवण्याचा तो मोठा प्रयास ही मंडळी करायची व तेच त्यांचे सर्वश्रेष्ठ योगदान होते. आज त्या आजी आजोबांची जागा त्यांच्या पुढच्या पिढीतील लोकांनी घेतलीय. मग ते आता आधारवड नाहीत का असा प्रश्न सहाजिकच मनात येणार. ते देखील आधारवडच आहेत परंतू बदलत्या सामाजिक स्थितीमधे त्यांची मुळे घट्ट रुजण्यासाठी कसदार जमीन उरलेली नाही. असे महिनाभर आजी आजोबांसोबत रहाण्याची स्वप्ने देखील मुलांना आम्ही पडू देत नाही. स्पर्धेच्या जगात आम्हाला आमच्या मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुटीतही वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. जरासे मोठे झाले की उन्हाळ्यातही त्यांच्या परीक्षा असतात. घरच्या महत्वाच्या कार्यक्रमांना देखील मुलांना परीक्षा, क्लासेस इत्यादी व्यस्ततेमुळे नेता येत नाही तर मग आजी आजोबांचा सहवास कसा लाभणार, पर्यायाने ओढ कशी निर्माण होणार व म्हणूनच आधारवड असूनही त्यांची प्रेममयी घनगर्द सावली कशी मिळणार हे महत्वाचे प्रश्न आहेत. अर्थात हे सारे कुणीही मुद्दाम करीत नाही तर बदललेली सामाजिक परीस्थितीच कौटुंबिक आधारवडांना बोनसायच्या रुपात नेते आहे. म्हणूनच या सर्व पार्श्वभुमीवर आमच्या कुटुंबातील पाच आधारवड कोसळल्यानंतर सहावा आणि शेवटचा आता कोसळतोय…
आमच्या कुटुंबाला आधारभूत ठरलेली व महत्वाचा आधारवड असलेली माझी आजी जिच्या हातच्या गुरगुट्या भाताची ती सुंदर चव अजूनही जिभेवर रेंगाळते, तिच्या ढोपराखालच्या त्वचेचा मऊपणा ज्याला हात लावून लहानपणी मज्जा वाटायची तो स्पर्श अजूनही जाणवतो, अगदी आतापर्यंत भेटायला गेल्यावर काहीतरी खाऊनच जा असा आग्रह धरणाऱ्या आजीचे प्रेम मनात ताजे आहे… अशी आमची आजी व घरातील सर्वांना मायेने धरुन ठेवणाऱ्या त्या पिढीची शेवटची प्रतिनीधी आता जातेय… एखादा मोठा आधारवड कोसळताना बघवत नाही… परंतू त्याच्या घनगर्द सावलीची माया मात्र कायम भासत राहील हे नक्की…
Comments
Post a Comment