थोडा है थोडे की जरुरत है @ 01.05.18
ग्रे
विचारांचे काही तार कसे जुळतात याचे काही आखीव गणित नाही. माणसाची विचार प्रक्रीया ही एक अतिशय गुढ व अतर्क्य व्यवस्था आहे. कोणत्या संदर्भाने कोणता विचार कोठे जोडल्या जाईल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या विचार जुळणीला स्थळ काळाचेही बंधन नाही. असाच एक अनुभव मला नुकताच आला व खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका अफाट संकल्पनेशी मी जोडल्या गेलो. ती संकल्पना म्हणजे ग्रे.
बऱ्याच दिवसांनंतर घराला रंग देण्याचे ठरले. आता नव्या काळात रंग देणे ही एक नवी प्रक्रीया आहे. जुन्या काळी घराला रंग देताना घरातले बाबा सफेदी मारुन घ्यायचे आणि घर सजून जायचे. परंतू आता मात्र रंगाचे जगच बदलले. आपल्या घराला रंग द्यायचा म्हणल्यावर घरातील प्रत्येकाचे मत तयार होते. रंगाचे जग बदलले तसे घराघरातील वातावरण देखील बदलले. लोकशाही पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या खोल्यांचे रंग ठरविणे सुरु केले. यामधे घरापासून नोकरीच्या निमीत्ताने दूर असलेली देखील सर्व मंडळी ऑनलाईन सामील झाली व रंगाबाबत महाचर्चा घडू लागल्या. यामधे घराच्या बाहेरुन देण्याच्या रंगासंबंधी सूचना करताना माझा भाऊ म्हणाला की आपण ग्रे फॅमीली मधील रंग निवडूया. रंगांच्या या नव्या दुनीयेत एक अडचण अजून जाते ती म्हणजे रंगांच्या नावांची. आपल्याला इंद्रधनुषी ता ना पि हि अ नि जा (तांबडा, नारींगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, निळा व जांभळा, मुद्दाम नव्या पिढीच्या वाचकांना समजावे म्हणून) हे ठळक रंग ठाऊक होते. आता या रंगाच्या रंगीत दुनियेत रंग दोनच नावाने ओळखला जातो. शॅडो डान्स किंवा ८०८३. आता हे दोन्ही प्रकार आपल्याला कळत नाहीत. एका बिंदु नंतर तर सर्वच रंग सारखे वाटून सर्वच आवडायला लागतात. अश्या वेळी भावाने ग्रे फॅमीली म्हणल्यावर काळ्या पासून तो पांढऱ्या शुभ्र रंगापर्यंतचे वेगवेगळे वीस ते पंचेवीस शेड मी बघायला लागलो. सहजच मी बोलून गेलो. किती कमी फरक आहे या रंगांमधे पण फरक आहे. आणि अचानक माझ्या विचारप्रक्रीयेमधे साधारण पंधरा वर्षांपूर्वी मी ऐकलेल्या एका संकल्पनेची आठवण झाली आणि मी पुन्हा म्हणालो, इतकेच काय या ग्रे फॅमीलीत तर अजूनही खूप शेड असतात. मनाने मी पोहोचलो होतो थेट म्हैसूरला, एका आंतरराष्ट्रीय परीषदेमधे जेथे लंडनहून आलेल्या डॉ. सॅम्युअल डोरेक्स या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाने सादर केलेले एक संशोधन सादरीकरण मला आठवले ज्याचे शिर्षक होते Mahabharata : A journey from black to white via many shades of grey.
एक अतिशय अफलातून संशोधन त्या डॉ. सॅम्युअल ने केले होते ज्यामधे त्याने महाभारतातील विविध व्यक्तीरेखांचा अभ्यास मांडताना त्या व्यक्तीरेखांमधील वेगवेगळे मानसिक पैलू या ग्रे रंगाच्या विविध छटांशी तुलना करुन विषद केले होते. मानवी मनाचा अभ्यास हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकार असतो व त्यात महाभारतासारख्या महाग्रंथामधे तर मानवी मनाचे सारे पैलू दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीरेखा आहेत. या सर्व व्यक्तीरेखा व त्यांची मनोभूमिका ही काळ्या कडून पांढऱ्या रंगाकडे होणाऱ्या प्रवासाचे द्योतक आहे व या दोन टोकांमधे वेगवेगळ्या ग्रे छटा दाखविणाऱ्या व्यक्तीरेखा आहेत. काळ्या रंगाचे प्रतिनिधीत्व करणारी सर्वात प्रभावशाली व्यक्तीरेखा म्हणजे दुर्योधन जो कपट, असुया, मत्सर यासारख्या दुर्गुणांचे प्रतिक आहे व सर्वात शुभ्र अशी व्यक्तीरेखा म्हणजे धर्मराज युधिष्ठीर जो सद्गुणांचा समुच्चय असलेल्या मनोभुमिकेचे प्रतिक आहे. उर्वरीत सर्व व्यक्तीरेखा या या दोन रंगांमधील आहेत. कुणाचे काळ्या रंगाकडे झुकते माप आहे तर कुणाचे पांढऱ्या रंगाकडे. वाईट मनोभूमीका असलेल्या काही व्यक्तीरेखा काही क्षणांना चांगुलपणा दाखवतात जसे कर्णाची व्यक्तीरेखा, तर काही शुभ्रतेच्या जवळ असूनही परिस्थितीने बांधल्या गेल्यामुळे ग्रे झालेल्या व्यक्तीरेखा जसे भिष्म पितामह. महाभारतातील वेगवेगळ्या व्यक्तीरेखांचा ग्रे रंगातील विविध छटांच्या दृष्टीने केलेला तो अभ्यास आम्हा सर्वांना चकित करुन गेला. त्या प्रत्येक व्यक्तीरेखेला त्या श्रेष्ठ संशोधकाने फार बारकाईने अभ्यासले होते व त्यांच्या मनोभूमिका मांडताना स्वतःचे चिंतन देखील त्यात जोडले होते. सर्व महत्वाच्या व्यक्तीरेखांचे विश्लेषण केल्यावर सर्वात जास्त रोचकतेने त्यांनी सादर केला कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधीत्व करणारा ग्रे.
कृष्णाचा सावळा रंग अनेकांना आकर्षक वाटतो किंबहुना बरेच वेळा पांढऱ्या शुभ्र रंगापेक्षाही त्याला उजवे माप मिळते कारण कृष्ण मानवी जगण्याच्या व्यावहारिक संदर्भांचे सर्वोत्तम उदाहरण ठरतो. आदर्शवादाचा कट्टर पुरस्कारक परंतू तो आदर्शवाद व्यावहारिक पातळीवर टिकणारा असावा हे सांगणारा एक श्रेष्ठ समुपदेशक. चांगल्याचाच विजय व्हावा या करीता प्रयत्नशील परंतू त्याकरीता वाईटाचा निःपात करताना केलेले कारस्थान देखील समर्थनीय ठरविणारा विचारवंत. माणसाच्या जगण्याच्या सर्व अवस्थांचा बारकाईने अभ्यास असणारा तत्वज्ञ परंतू प्रसंगी बुद्धीचा वापर करुन मानवी भावनांना देखील वापरुन घेऊन कार्य सिद्धीस नेणारा प्रशासक. शस्त्र हातात न घेण्याची प्रतिज्ञा करुन ती शेवटपर्यंत निभावणारा सच्चा व्यक्ती परंतू प्रसंगी आपल्या जवळील शक्तीच्या धाकाने कुप्रवृत्तींना काबूत ठेवण्याची क्षमता असलेला योद्धा तसेच त्या कुप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी अनेक विरांना शस्त्र उचलून लढायला लावणारा नेता. पांडवांच्या सद्प्रवृत्तीला जगासमोर ठेवण्यासाठी शिष्टाई करुन कौरवांना परत एक संधी देण्यासाठी गेलेला विचारदूत तर झालेल्या अपमानाचा सूड घेतला जाईल असे वचन द्रौपदीला देणारा तिचा सखा. कृष्णाच्या या ग्रे रंगाचे कितीतरी प्रकारे वर्णन करता येऊ शकते. आजच्या या नव्या जगतात कृष्णाच्या ग्रे रंगाचेच अनुसरण माणसाचे आयुष्य सुखमयी करु शकते असा निष्कर्ष डॉ. सॅम्युअल यांनी काढला होता. किती खरे होते त्यांचे म्हणणे. रामाच्या ठायी असलेला आदर्शवाद हे आपल्या सर्वांचे जीवनध्येय असायलाच हवे परंतू त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जो जिवन मार्ग अवलंबावा लागतो त्या करीता मात्र कृष्णाचा ग्रे कामात येतो.
नवे जग हे व्यावहारिक व उपयोगीतावादी बनते आहे. त्या दिशेने झपाट्याने होणारी वाटचाल आपल्यापैकी कुणालाही थांबविता येणे आता शक्यच नाही. हे सारे आधुनिकीकरणाचे सहपरीणाम असतातच व त्यांना सामोरे जावे लागतेच. त्यासाठी आपली इच्छा आहे अथवा नाही हा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणूसपण निभावताना रामाच्या किंवा युधिष्ठीराच्या शुभ्रतेचा आदर्श ठेवूनच मार्गक्रमण करावे लागते कारण ते आदर्श ध्येयच माणसाला इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळे अस्तित्व प्रदान करते. परंतू त्या मार्गावर आपला हात धरुन आपल्याला मदत करतो कृष्णाचा व्यावहारिक व भावनिकतेचे उत्कृष्ट संमिश्रण असलेला ग्रे. तो ग्रे आपल्याला सुख म्हणजे काय हे सांगतो, तो आपल्याला आनंद कसा मिळवायचा ते सांगतो, तो आपल्याला निराशा पदरी न येण्यासाठी माणसे वाचायला शिकवितो व त्यानुसार आपले वर्तन करायला शिकवितो, तो आपल्याला उदात्त विचार करायला शिकवितो पण तो उदात्त विचार सोसण्याची क्षमता असलेल्यापर्यंतच नेण्याचे चातुर्य देतो, तो आपल्याला समर्पण शिकवितो परंतू आपल्यासोबत कृतघ्नतेने व बदमाशीने वागणाऱ्यांशी जश्यास तसे वागण्याची कला शिकवितो, तो आपल्याला प्रेम करायला शिकवितो परंतू प्रेमाला जिवनाचा आधार कसा बनवायचा हे देखील सांगतो, तो आपल्याला आत्मिक एकरुपतेचा मार्ग सांगतो परंतू ती आत्मिक एकरुपता भौतिकतेचा मजबूत आधार घेऊनच प्राप्त होते ही वैचारिक योग्यता प्रदान करतो, तो आपल्याला मित्र बनायला शिकवतो परंतू त्या मित्राचे सख्यामधे रुपांतरही तोच करवितो, असा वैशिष्ट्यपूर्ण ग्रे जो कृष्णाच्या आकर्षक सावळ्या रंगाशी साधर्म्य ठेवतो तो आपल्या जिवनामधे संम्मीलित करुन त्या रंगात रंगून जावे… त्या ग्रेच्या अनेक आनंदलहरी आयुष्यभर आपल्याला सुखावत राहतील.. म्हणूनच डॉ. सॅम्युअलच्या त्या शोध निबंधातील शेवटचे वाक्य माझ्या अद्यापही स्मरणात आहे. ते म्हणाले होते, Krishna’s grey is great so assimilate it to make our lives great. So, Friends be GREY… IT’S REALLY BEAUTIFUL!!
Yes.. Thanks for sharing Prof Dr SAMUEL's observations on the 'Mahabharat' !
ReplyDeleteThanks Vivek
ReplyDeleteग्रे ग्रे ग्रेट!!! मस्त लिहिलस्, तुला हे सगळ कस कुठून सूचल ते पण रंजक आहे.
ReplyDeleteग्रे ग्रे ग्रेट!!! मस्त लिहिलस्, तुला हे सगळ कस कुठून सूचल ते पण रंजक आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGrey is really great of human relationship
ReplyDelete