थोडा है थोडे की जरुरत है @ 17.04.18
निदान एक खांदा हवा…
दामोदरचे व्यक्तीमत्व सर्वांनाच आवडायचे. अतिशय उत्साही असलेला दामोदर खरे तर आमच्यासाठी दामू होता. अगदी महाविद्यालयीन काळापासून दामू जिवनाचा प्रत्येक क्षण मनापासून जगतोय असे वाटायचे. त्याचे अस्तित्व प्रत्येकच ग्रुपमधे चैतन्य निर्माण करायचे. अनेक गुण त्याच्या ठायी होते. अक्षर अतिशय छान होते, अनेकांच्या नकला करणे त्याला फार लिलया जमायचे. कवितांचा फॅन होता तो. गुलजार तर संपुर्ण पाठ होते त्याच्या. सगळे जण बसले असताना अचानक गुलजारच्या ओळी ऐकवून त्यावरचा त्याला भावलेला पॉईंट ऑफ व्ह्यू सांगण्यात त्याला मजा वाटायची. गुलजार ज्या तरलतेने लिहायचे त्याच तरलतेने आवाजाचे चढ उतार करुन त्या ओळींचा परीणाम साधण्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा. त्याचे सोबत असणे फार सुखकारक असायचे. आमच्या ग्रुपमधे त्याच्या त्या कवितांचीच मजा असायची. विशेषतः आमच्या ट्रेकींग ग्रुपचे कॅम्प फायर आटोपल्यावर जेव्हा सारे धुमाकुळ घालून शांत झाले की मग दामुची मैफल असायची. वेगवेगळ्या कवींच्या कविता, त्यावरचे त्याचे विवेचन, कवितांमधे दडलेले गर्भितार्थ हळूवारपणे जेव्हा उलगडत जायचे तेव्हा टिपूर चांदण्यांनी भरुन गेलेल्या आभाळातील काही नक्षत्रे आमच्या सभोवताली पिंगा घालू लागायचे. निसर्गाबद्दल हे असे वाटणे हा दामुच्याच सहवासाचा परीणाम. एक असेच गेट टुगेदर आणि त्यानंतर दामुने उलगडलेले गुलजारची एक अप्रतिम कविता आठवते.
कडाक्याच्या थंडीतले ट्रेकींग गेट टुगेदर. शेकोटीच्या सभोवताली सर्व मित्र मैत्रीणी बसलेले. हातात एका मित्राने सर्वांसाठी बनविलेले टोमॅटो सुपचे कप्स होते. गरम कप ओंजळीत घेऊन हातांना उब मिळवित व गरमागरम सुपचा आस्वाद घेत आम्ही सर्वजण शांत बसलो होतो कारण दामू उलगडत होता गुलजारचे एक काव्य जे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. या ओळींबद्दल दामू जे बोलला ते आजही तसेच्या तसे मनात आहे. दामू म्हणाला होता, माणसाचे जिवन आणि मन हे दोन्हीही अतर्क्य घटनांनी आणि विचारप्रवर्तनांनी व्याप्त असते. माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विचार केला तर तो किंवा ती स्वतःपुरते राजा किंवा राणी असतात. जगताना जसे आपण इतरांबद्दल मते बनवितो व त्यानुसार आपल्या वागण्याच्या दिशा ठरतात. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल देखील मत बनवित जातो व त्यामधून त्याचे स्वतः बद्दलच्या समजुती विशिष्ट पॅटर्ननुसार बदलत जाते. काही व्यक्ती आपल्या मनातील भाव सहजपणे व्यक्त करीत जातात व त्यांना मैत्री करण्यास अजिबात त्रास होत नाही. काही मंडळी आपल्या मनातले काहीच चेहेऱ्यावर येऊ देत नाहीत. त्यांच्या मनात अनेक विचार असतात परंतू त्यांना आपल्या मनातले विचार कुणालाही सांगणे जमत नाही किंवा त्या विचारांचा निचरा ते वेगळ्या पद्धतीने करीत असतात. बरेचवेळा त्यांना व्यसनांचा आधार मिळतो व त्यामुळे त्यांना माणसांची गरज पडत नाही. पण या दोन व्यक्तीमत्वांपेक्षा एक तिसरे व्यक्तीमत्व देखील असते. ते व्यक्तीत्व असलेले मंडळी फारच वेगळे व गुढ असतात. त्यांनी स्वतःभोवती एक कोष निर्माण केलेला असतो. त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतात पण हे देखील आपल्या मनातले विचार फारसे व्यक्त करीत नाही परंतू ते त्यांच्या चेहेऱ्यावर दिसतात व त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव व त्यांमागील त्यांचे भावविश्व ओळखणारी व्यक्ती त्यांना हवी असते. अश्या व्यक्तीच्या ते कायम शोधात असतात. अश्या व्यक्तीमत्वाच्या प्रत्येकालाच अशी व्यक्ती मिळते असे नाही परंतू जेव्हा ती मिळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरच्या हास्यामागील वेदना ओळखून ती म्हणते, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. असे छान छान सांगून दामुने जेव्हा परत कवितेच्या समेवर जेव्हा आम्हाला आणले तेव्हा प्रत्येकाच्या तोंडून उद्गार निघाला, क्या बात है. त्यानंतर दामु जे वाक्य बोलला ते कायम स्मरणात राहणारे होते. दामू म्हणाला, जिवंतपणी माणसाचे कर्तृत्व असे असावे म्हणतात की त्याला मृत्यू पश्चात निदान चार खांदे मिळावेत, परंतू जिवन जगत असताना किमान एक जरी समर्थ खांदा मिळाला तरी जिवन सार्थकी होते. लोकांना दाखविण्यासाठी आपल्या चेहेऱ्यावर आपण जाणिवपूर्वक आणलेल्या हास्याच्या मागे कधी कधी असलेली वेदना ओळखणाऱ्या व्यक्तीचा खांदा मिळणे ही एक मोठी उपलब्धी असते. गुलजारच्या एका अप्रतिम काव्याला आमच्या मनात कायमस्वरूपी स्थापित करण्याची किमया दामू करुन गेला.
साधारण पंधरा वर्षांनतर दामूची बंगलोरला भेट झाली. त्याच्या सुंदर फ्लॅटमधे त्याचे सुंदर पद्धतीने स्थापित झालेले आयुष्य बघून फार आनंद वाटला. त्याचे सारे काही नेहमीप्रमाणेच होते. धमाल, मस्ती मुलांसोबतचा त्याचा वावर, त्याच्या कार्यालयात त्याच्या नेतृत्वात काम करणारी त्याची टीम वगैरे सारे काही दामू स्टाईलमधेच होते. घरची सर्व कर्तव्ये योग्य पद्धतीने तो निभावत असल्याबद्दलचा अभिमान त्याच्या बाबांनी व्यक्त केला. आई गेल्यानंतर तो त्यांची कशी योग्य काळजी घेतोय हे देखील सांगितले. बायको खुश होती. मी दामुचा खूप जवळचा मित्र आहे म्हणून तिने विशेष माझ्या आवडीचा स्वयंपाक केला होता. दामुचे सारे काही फारच उत्तम होते परंतू त्याच्या त्या हसण्याला एक वेगळा आशय होता असे मला सहजच जाणवून गेले. रात्री सर्वांना गुड नाईट करुन आम्ही त्याच्या फ्लॅटच्या टेरेसवर आमच्या गप्पा करायला बसलो. गाण्याचा, कवितांचा विषय निघालाच होता. मी देखील माझ्या विद्यार्थ्यांना गुलजारचे वेड लावतोय असे त्याला सांगितले. गुलजारचे रात पश्मिने की पुस्तक त्याच्यासाठी नेले होते. गप्पा रंगात आल्यावर मी त्याला सहजच विचारले, दामु, एक विचारु, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो! आतापर्यंत मस्त मस्तीत वावरत असलेला दामू अचानक माझ्या वाक्याने चमकला. मला खात्री होती, त्याला ते ट्रेकींग गेट टुगेदर, ती कविता, त्याचा अर्थ सारे काही आठवले असणार. दामू, क्या गम है जिसको छुपा रहे हो.. बघता बघता त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. मी माझी खुर्ची त्याच्या जवळ ठेवली आणि त्याचे डोके आपल्या खांद्यावर ठेऊन घेतले. मनसोक्त रडू दिले दामूला. त्याचा तो अनेक वर्षांचा रोखून ठेवलेला बांध फुटला होता. गेली अनेक वर्षे कसले तरी ओझे मनावर घेऊन त्याचा आभासही कुणाला न होऊ देता तो जगत होता याची जाणीव मला त्याच्या हाताला सुटलेल्या कंपावरुन जाणवली. मला जाणवले, आज त्याला मोकळे व्हायचे होते. त्यानंतर पुढे जवळपास दोन तास त्याने मला जे सांगितले त्यावर विश्वास ठेवणे शक्य नव्हते. त्याच्या खाजगी आयुष्यातील एक प्रचंड मोझे ओझे मनावर घेऊन तो जगत होता. कुणालाही ती बाब सांगता येणे शक्यच नव्हते. परंतू मला दामुची कमाल वाटली की एवढे मोठे दडपण त्याच्या मनावर असून देखील सारे काही आलबेल आहे हे दाखविण्याची किमया तो गेली पंधरा वर्षे करीत होता. सारे सांगून मोकळे झाल्यावर डोळे पुसीत तो म्हणाला, अव्या आठवतंय, त्यावेळी म्हणालो होतो की जिवन जगण्यासाठी एक खांदा तरी निदान हवा! आज तुझा मिळाला. मी त्याला म्हणालो की माझे भाग्य आहे की मला तुझ्यासारखा मित्र मिळाला, गुलजार खरोखरीच तुलाच कळलाय! आम्ही तर केवळ वाचन करतोय. इतके दिवस दडपण मनावर ठेवण्यापेक्षा फोनवर का नाही बोललास? त्यावर दामू म्हणाला, माझ्या अंतस्थ मनातील ही इतकी तीव्र वेदना ऐकल्यावर तु माझा हात हातात धरुन आणि माझे डोके तुझ्या खांद्यावर ठेऊन मला थोपटलेस, त्या स्पर्शाची सर फोनवरील संभाषणाला येऊ शकेल का? प्रत्यक्ष तुझ्या खांद्याचा आधार मिळाला म्हणूनच मी शांत होऊ शकलो, अन्यथा त्या वेदनेची धग कायम राहीली असती. त्यानंतर दोघे काहीही बोललो नाही. त्या विषयावर पुन्हा कधीच बोलायचे नाही हे आम्ही दोघांनीही ठरविले. रात्रीच्या त्या शांत प्रहरी गुलजारची तीच कविता जगजीत सिंह गात होते,
रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओंसे मात खा रहे हो,
जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्युँ उन्हे छेडे जा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो!!
Comments
Post a Comment