थोडा है थोडे की जरुरत है @ 30.01.18

प्रेमाचा परतावा

साधारण चार वर्षांपूर्वी या साऱ्यांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता. या साऱ्याची मनापासून काळजी घेणारी, त्यांचे संगोपन करणारी, त्यांना हवे नको बघणारी, त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती अचानक निघून गेलीआणि ही सारी पोरकी झालीएका क्षणात. या सर्वांचे खरे तर भाग्य होते की एक अशी व्यक्ती त्यांना त्यांच्या जीवनाचा आधार म्हणून लाभली होती. अन्यथा या बदलत्या वेगवान जगात अनेकांना नाईलाज असतो म्हणून आपल्या वर्तुळापलीकडे बघताही येत नाही. त्या वर्तुळातच रहायचे तेथेच काय तो आनंद मिळवायचा अशीच स्थिती अनेकांची झालीय. अश्यावेळी या साऱ्यांकडे बारकाईने लक्ष देणारी त्यांचे खऱ्या अर्थाने पालनपोषण करणारी व्यक्ती त्यांना मिळणे हे त्या सर्वांचे भाग्यच होते. कधी कधी मला तर आश्चर्य वाटायचे की त्या व्यक्तीला या साऱ्यांच्या सहवासात आणि त्यांना इतका वेळ देण्यात काय मिळत असेल. त्या व्यक्तीला मी कधी ते विचारले नाही परंतू हा मनापासून केला जाणारा सांभाळ मनाला भावायचा. पण त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने जसे आमच्यावर आभाळ कोसळले तसे या साऱ्यांवरही कोसळले. आमच्यासोबत ती सारी देखील सैरभैर झाली. पण जीवन शेवटी सुरु राहते. गेलेल्या व्यक्तीची जागा कुणीच भरुन काढू शकत नाही परंतू तसा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि तोच करण्याचा प्रयत्न मी केला. त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने ज्यांची अक्षरशः वाताहात झाली त्यांच्या सांभाळाचा प्रश्न माझ्यापुढे होता. कसे करावे ते कळत नव्हते. या पेचाचे मुख्य कारण होते की त्यांना द्यायला हवा तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. अश्या वेळी माझ्या एका मैत्रीणीने एकदा मला सांगितलेली एक गोष्ट आठवली. ती मला म्हणाली होती की या सर्वांचा सांभाळ करणे ही एक अतिशय आनंददायी गोष्ट असते. एकदा करुन बघ. त्यांच्यासोबत वेळ घालव, त्यांचे निरीक्षण कर, त्यांच्या विकासप्रक्रियेत सहभागी हो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनापासून त्यांच्यावर प्रेम करबघ त्या प्रेमाचा परतावा किती वैविध्यपूर्णतेने आणि भरभरुन मिळतो ते. मला ते सारे आठवले आणि त्या साऱ्यांचा सांभाळ करुन बघण्याचे मी ठरविले. ज्या दिवशी मी ते ठरविले त्या दिवशी नेमके काय होणार, मी किती वेळ देऊ शकणार याबाबत माझे मन साशंक होते. त्यासाठीच मी त्यांच्या प्राथमिक देखरेखीसाठी व्यवस्था निर्माण होण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक नेमला. त्याने फार तत्मयतेने या साऱ्यांची पुन्हा नव्याने नीट व्यवस्था लावून दिली. देखभाल करण्यात तो अतिशय तज्ञ होता त्यामुळे फार कमी दिवसात त्याने पुन्हा त्या साऱ्यांची विस्कटलेली घडी जागेवर आणली. यासोबतच मी देखील त्यांच्या आधीच्या पालका इतका नाही पण त्यांच्याकडे लक्ष देऊ लागलो. वेळ घालवू लागलो आणि मग माझ्या हळू हळू असे लक्षात आले की मी त्यांच्यामधे रमायला लागलोय. मला त्यांचा सहवास आवडू लागलाय. त्यांच्या वेगवेगळ्या क्रीया कलापामधे मी आनंद शोधू लागलो मला तो मिळायला लागला. त्याची विकासात्मक वाटचाल देखील फार मजेदार मनाला समाधान देणारी होती. सर्वात महत्वाचा बदल माझ्या लक्षात आला तो म्हणजे त्यांच्या सहवासात माझा दिवसभराचा ताण कमी होऊ लागला. त्यांच्या सहवासात काही वेळ घालविला, त्यांना काय हवे नको ते बघितले की छान वाटू लागले आणि मग एक दिवशी सकाळी मी फिरायला जाण्यासाठी निघालो आणि बघतो तर काय? मी या सर्वांना दिलेल्या प्रेमाचा परतावा मला मिळाला. मन अतिशय प्रसन्न झाले. माझी मैत्रीण म्हणाली त्या प्रमाणे तो खरोखरीच निर्व्याज आणि निखळ आनंदाचे रुप असणारा परतावा होताअसा परतावा माणसाला लागतोच? प्रेमाचा परतावा?

कधी आपण आपले आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या स्थिती किंवा परिस्थिती आपल्यासमोर येत असतात. सामाजिक दृष्टीने आपण सजग असू तर अनेक लोकांशी आपला संपर्क येत राहतो. फार लोक आवडत नसले तरी देखील प्रत्येकाला माणसे लागतातच आणि त्यामुळे वेगवेगळ्या भावनांचे व्यवस्थापन आपल्याला करावे लागते. या सर्व भावनांमधे एक भावना कायम फार निर्मळ पवित्र मानली जाते..ती म्हणजे प्रेमाची भावना. या जगातील प्रत्येक जीवित वस्तुमधे प्रेम ही भावना देवाने फार प्रामाणिकपणे टाकलेली आहे. ती प्रत्येकात आहे. अगदी रानटी पशू बनून एखादा क्रूर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराच्या मनात देखील परमेश्वराने ती भावना टाकलेली आहे. ही भावना प्रत्येक जीवित गोष्टीच्या ठायी टाकत असताना परमेश्वराने त्या भावनेचे सर्वात पवित्र रुपच टाकले आहे. परंतू मग या सर्व जिवीत गोष्टींमधे माणूस नावाच्या प्राण्यामधे देवानेच या प्रेमाच्या भावनेसोबतच अन्य काही भावना देखील टाकल्या. या भावनांनी मात्र मोठी गंमत केली. खरे तर परमेश्वराला वाटले होते की या सबंध जगात वेगवेगळ्या जिवित गोष्टींना एकत्रीत ठेवायचे असेल तर प्रेम हीच भावना मूलतः उपयोगात येणार आहे. पण त्यासोबत माणसामधे टाकलेल्या वेगवेगळ्या भावनांमुळे या प्रेमाच्या भावनेचा मूळ आधार टिकत नाही. त्यामुळे केवळ माणसाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला लागतात. बरेच वेळा तर स्वार्थ, लोभ किंवा इगो या गोष्टींमुळे किंवा त्याचा अतिरेक झाल्याने प्रेमाच्या भावनेचे अस्तित्व देखील दिसेनासे व्हायला लागते. अश्या स्थितीमधे प्रेमाचा परतावा मिळणे कठीण जाते. परंतू मी ज्या पालनपोषणाचा उल्लेख केला त्या प्रक्रीयेमधे मात्र प्रेमाता परतावा मिळतोच किंवा तशी खात्रीच असते. मी स्वतः त्या दिवशी पहाटे झुंजूमुंजू झाले असताना त्या परताव्याचे अद्वितीय रुप बघत होतो. काय होता तो परतावा?

मी मनापासून केलेल्या प्रेमाचा सोबत घालविलेल्या वेळेचा परतावा पहाटेच्या कोमल सूर्य किरणांनी उजळून निघणाऱ्या पहाटे सुटलेल्या मंद वाऱ्यावर हलत असलेल्या टपोऱ्या सुरेख डाळींबी रंगाच्या गुलाबाच्या फुलाच्या रुपात मला मिळाला होता. होय.. माझ्या वडीलांनी आमच्या घरी वेगवेगळ्या झाडांची काळजी घेऊन त्यांच्यावर प्रेम करुन जो पायंडा पाडला होता त्याच व्यवस्थेला पुढे नेण्याचा माझा निर्णय मला आता भरभरुन प्रेमाचा परतावा देतोयअसा परतावा जो मनावरचा ताण घालवून खरे निखळ प्रेम शिकवतो.

घरासमोरची सुंदर फुललेली बाग मनाला खरोखरीच वेड लावते. नव्या लागलेल्या कळ्या ज्यांची रात्रीतून फुले होतात, प्रेमाने लावलेल्या झाडांना नवी पालवी येते, त्या प्रत्येक झाडाला पाणी घालताना त्यांची पाने जेव्हा तुषारांनी आनंदित होऊन नाचू लागतात तेव्हा आपले मन सुखावून जाते. आणि मग अगदी काहीच वेळाची या साऱ्या झाडांची घेतलेली काळजी हळूवारपणे त्यांच्यावर केलेले प्रेम आपल्याला काय काय देऊन जाते..टपोऱ्या फुलांच्या रुपाने, वेलीवर फुललेल्या फुलांच्या स्वरुपात, झाडांना लागलेल्या वेगवेगळ्या फळाच्या रुपात, परसदारी लावलेल्या भाजीच्या रुपात आपल्याला मन प्रसन्न करणारा परतावा मिळत राहतो. अनेक लोक हा छंद जोपासतात कारण त्यामधला आनंद त्यांना कळलेला असतो. बागेतील झाडांवर अगदी पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करुन त्यांची काळजी करणारे माझ्या वडीलांसारखे लोक खरोखरीच त्यामुळेच सकारात्मक आणि आनंदी राहू शकतात अशी माझी ठाम समजूत आहे. याचे कारण इतका निरपेक्ष हमखास मिळणारा प्रेमाचा परतावा माणसाच्या जगात मिळणे जरा कठीणच असतेज्यांना तो देता घेता येतो म्हणजेच तश्या प्रकारचे निस्सीम प्रेम अनुभवता येते ते भाग्यवानच म्हणावे. एरवी सामान्यतः माणसाच्या जगातील प्रेम आणि त्याचे परतावे बरेच वेळा छुप्या हेतूंनी व्यापलेले असतात. त्यामुळे त्याचे सुरुवातीला जरी आकर्षण वाटले तरी त्याचे वाईट स्वरुप काही दिवसातच समोर येते त्यामधून माणसाच्या जगात अपेक्षाभंगाचे दुःख सोसावे लागतेया बागेवरच्या प्रेमात मात्र त्यांच्यावर निस्सीमपणे केलेल्या प्रेमाचा परतावा खात्रीने भरभरुन मिळतोच हेच तर कदाचित निसर्गाचे मोठेपण आहेतो माणसापेक्षा खूप मोठ्या मनाचा आहे.







Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18