थोडा है थोडे की जरुरत है @ 23.01.18
संपुर्ण समर्पण
सकाळीच माझ्या जिवलग मित्राचा फोन आला… अवि, माझी आई गेली. काही बोलू शकलो नाही. त्याने पण पुढे बोलणे टाळले. त्वरित गाडी घेऊन त्याच्या घरी जायला निघालो. मन मात्र मागे रेंगाळता रेंगाळता १८ वर्षे आधी पर्यंत पोहोचले जेव्हा सर्वात पहिल्यांदा मी माझ्या मित्राच्या आईला भेटलो होतो. पाळण्यावर तिला बसविण्यासाठी त्याच्या वडीलांनी हात धरुन आतल्या खोलीतून आणले…तिला नीट चालता येत नव्हते. मित्राने माझी तिच्याशी ओळख करुन दिली. कसेबसे हसून तिने मला तोडक्या मोडक्या भाषेत प्रतिसाद दिला. काकुंची तब्येत बरी नव्हती हे स्पष्टच दिसत होते. नंतर कळले की त्याआधी साधारण ११ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचे दोन अटॅक येऊन गेल्याने त्यांची तशी अवस्था झाली होती. त्यांच्या शरीरातील त्राण कमी झाला व तेव्हापासूनच त्या स्वतःहून स्वतःची कामे करण्याची शक्ती गमावून बसल्या. आणि तेव्हापासून त्यांचा सक्षम आधार बनले माझ्या मित्राचे वडील….आदरणीय काका.
…मित्राकडे पोहोचलो तर काकू शांत झोपल्यागत वाटत होत्या. काका बाहेर बसले होते. दुःख होत असूनही कसेनुसे हसण्याचा प्रयत्न करुन मला खुणेनेच त्यांनी सांगितले..काकू गेली. मित्र म्हणाला की डॉक्टर येत आहेत. मनात धस्स झाले की आपण तर संदेश दिलाही बऱ्याच लोकांना. तो म्हणाला की एका डॉक्टरने सांगितले आहे परंतू बाबा म्हणताहेत की अजून एका कडून कन्फर्म करुन घ्या म्हणून बोलाविले आहे. दुसऱ्या डॉक्टरांनी देखील काकुंच्या निधनाची पुष्टी केली आणि मग मात्र काकांना काय करावे ते सुचेना. या खोलीतून त्या खोलीत येरझारा सुरु होत्या. मी त्यांना म्हणालो, काका तुम्ही बसा जरा, फार धावपळ करु नका. एक क्षण काकुंच्या खोलीत ते डोकावले आणि मग माझ्या बाजुने बसले…बसताना ते जे वाक्य बोलले त्या वाक्याचा खरा अर्थ समजायला त्यांच्या जीवनात त्यांनी काकुंप्रती केलेल्या संपुर्ण समर्पणाला समजून घ्यावे लागते.. काका म्हणाले..अवि, आता मला बसायचेच काम आहे, ती गेली नि आता कामच उरले नाही मला..
गेली अडतीस वर्षे काका कामच करत होते आणि ते देखील काकूंचेच काम करत होते. सुरुवातीला ते स्वतः बँकेत नोकरी करायचे व त्यामुळे काकुंकडे लक्ष देण्यासाठी एक ताई नोकरीला असायच्या. त्याही वेळी काकुंना सकाळी तयार करुन देणे, हाताला धरुन उन्हात फिरवून आणणे, वेळ प्रसंगी खाऊ घालणे, वेणी घालून देणे ही सारी कामे ते करायचे. परंतू बँकेच्या वेळात मात्र त्यांना काही करता यायचे नाही. याशिवाय काका एक चांगले अॅथलीट होते. पोहणे व पोल व्हॉल्ट सारखा खेळ देखील ते खेळायचे. व्हेटरन्सच्या स्पर्धांमधे सहभागी व्हायचे. सायंकाळी पाच ते सहा किलोमिटर फिरणे अजूनही त्यांचे सुरु आहे. परंतू या शारिरिक फीटनेसकडे त्यांनी आयुष्यभर लक्ष देण्यामागचा हेतू परवा काकू गेल्यावर जेव्हा त्यांनी सांगितला तेव्हा मन भरुन आले. ते म्हणाले, अवि, माझा मुलगा व सून माझ्या बायकोचे सारे काही करतील याची मला खात्री आहे परंतू शक्यतोवर त्यांना ते करायला लागू नये ही माझी इच्छा होती. माझ्या पत्नीची संपूर्ण जबाबदारी माझ्यात त्राण आहे तोवर मीच निभवावी हा माझा हट्टच होता. कधी कधी माझ्या मुलाला व सुनेला माझ्या हट्टाचा त्रास व्हायचा परंतू मी तो हट्ट कायम ठेवला आणि त्यासाठीच मी स्वतः गेली तीस पस्तीस वर्षे सतत व्यायाम आणि तत्सम सारे प्रकार करुन मी स्वतःला तंदुरुस्त ठेवतोय जेणे करुन माझ्यामधे माझ्या पत्नीला उचलण्याची, तिला आंघोळ घालण्याची, तिची स्वच्छता करण्याची, तिला जेवू घालण्याची, तिला उचलून खुर्चीवर बसविण्याची, तिला हाताला धरुन उन्हात नेऊन बसविण्याची, तिची वेणी घालून देण्याची, तिचे कपडे साफ करण्याची, तिला काही वाचून दाखविण्याची, तिला कंटाळा आला आणि मला झोप आली तरी तिच्याशी बोलण्याची आिण तिच्या आधी कोणत्याही परिस्थीतीत परमेश्वराकडे न जाण्याची ताकद माझ्यामधे रहावी यासाठी हा सारा व्यायामाचा आणि तंदुरुस्तीचा खटाटोप. आपल्या अडतीस वर्षांपासून आजारी असलेल्या पत्नीला हट्टाने स्वतः सांभाळण्यासाठी व्यायाम करणाऱ्या काकांना समजून घेणे खरोखरीच जड जात होते. लोक कशाकशासाठी व्यायाम करतात किंवा खेळ खेळतात व तो करत असताना स्वतःचे ह्रदय चांगले ठेवण्याचा विचार करतात. येथे मात्र काका स्वतःला काकूंकरीता तंदुरुस्त ठेवत होते हा अतिशय महत्वाचा फरक मला जाणवला.. काकुंकरीता काकांनी काय काय करावे या बाबींचा केवळ विचार जरी केला तरी देखील त्यांच्या पत्नीवरील निस्सीम प्रेमाचा मनापासून आदर करावा वाटतो.
काकुंना कोणत्याही समारंभात नेणे म्हणजे कसोटीचे कार्य असायचे. बरेचवेळा माझा मित्र ते काम करायचा. अगदी अत्यावश्यक ठिकाणीच त्यांना नेले जायचे परंतू तेथे तिने कोणतेही जेवण करु नये असा काकांचा आग्रह असायचा. कारण बाहेरचे मसालेदार जेवण काकूंना त्रासदायक ठरायचे. त्यामुळे कुठे नेले तरी थोड्या वेळात घरी परत यावे लागे. बरेच वेळा काकांना काकूंना घरी सोडून वेगवेगळ्या समारंभांना जावे लागे कारण या सर्व व्यस्ततेतही काकांनी आपला जनसंपर्क दांडगा ठेवला होता. आनंदाची असो वा दुःखाची बातमी, ते त्या त्या घरी दहा मिनीटे का होईना जाऊन यायचे. परंतू केवळ दहा मिनीटे कारण त्यांना त्यापेक्षा जास्त वेळ देता येत नव्हता. एवढा मोठा जनसंपर्क ठेऊनही गेली जवळपास वीस वर्षे काका कधीही एखादा मुलाच्या लग्नाचा अपवाद वगळता कोणत्याही समारंभामधे जेवले नाही. त्यांचे जेवण काकुंसोबत आणि त्यांना चालते तसेच. ज्या बँकेत काका नोकरी करायचे तो परीसर मार्केटचा होता आणि सभोवताली वेगवेगळी हॉटेल्स असायची. लोक न्याहारी म्हणून अमरावतीची प्रसिद्ध कचोरी किंवा समोसे खायला परगावाहून ज्या दुकानात येतात ते दुकान काकांच्या बँकेला लागून होते. काकूंना खाता येत नाही म्हणून काकांनी गेल्या वीस वर्षात एकदाही एकही समोसा किंवा कचोरी खाल्ली नाही. खावी वाटत नसेल असे मला वाटत नाही परंतू काकूंसाठी म्हणून त्यांनी ते निग्रहाने टाळले. या अश्या प्रकारच्या प्रेमाला काय नाव द्यावे हाच प्रश्न पडतो.
गेली तीन वर्षे तर काकुंची तब्येत अतिशय जास्त खालावलेली होती. त्यांच्या साऱ्या संवेदना संपल्या होत्या. शरीर जड झाले होते. त्यांना काहीच कळत नव्हते असे म्हणायला हरकत नाही परंतू काकांच्या दिनचर्येत, त्यांची सेवा करण्यात, त्यांना खाऊ घालण्यात, त्यांची स्वच्छता ठेवण्यात, त्यांच्याशी गप्पा करण्यात काहीही खंड पडला नाही. कारण काकांची मान्यता होती की तिला जरी कळत नसले तरी मला कळते आहे आणि म्हणून मी केले पाहिजे. काकू गेल्या त्या दिवशी देखील सकाळी काकांनी काकुंचे गेल्या अनेक वर्षांपासून करत आले त्याप्रमाणे प्रातर्विधी आटोपले, त्यांची स्वच्छता केली आणि त्यांना उशीला टेकवून बसविण्यासाठी त्यांची मान खांद्यावर ठेऊन त्यांना उचलले आणि काकांच्या खांद्यावर मान टेकवूनच काकूंनी शेवटचा श्वास घेतला… त्यांच्या जीवनाचा खराखुरा आधार असलेल्या व आजारपणाच्या अडतीस वर्षे त्यांचा एका शब्दानेही तक्रार न करता सांभाळ करणाऱ्या त्यांच्या सहचारी सख्याच्या खांद्यावर डोके ठेऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हो सखाच तो…ज्याने आयुष्यातील साऱ्या आवडी निवडी, वेगवेगळ्या प्रसंगातील सहभाग, बाहेर फिरण्याचा आनंद, मित्रांसोबत गप्पा मारत बसण्याची मजा, हॉटेलमधे जेवायला जाण्याची गंमत, पार्टी एन्जॉय करण्याची इच्छा, करमणूकीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा छंद हे सारे केवळ आपल्या विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या पत्नीला सांभाळण्यासाठी अक्षरशः कोणतीही तक्रार न करता सोडून दिले…तो सखाच असू शकतो. पत्नीवर मालकी हक्क गाजविणारा किंवा आपल्या तालावर नाचविणारा नवरा हे समर्पण करु शकत नाही.
दाटून आलेल्या आवाजात काका मला म्हणाले, अवि, आता मला आरामच आहे. पण खरे सांगतो तुझ्या काकूसारखी बाई शोधून सापडणार नाही. तिच्या इतकी कॉपरेटीव्ह बाई मिळणे अशक्य आहे. कॉपरेटीव्ह? तो शब्द मला कळला नाही. मनातून इच्छा असूनही गेली अडतीस वर्षे कुणाच्यातरी आधाराशिवाय एक पाऊलही ज्या काकूला टाकता आले नाही आणि सारखी मदत घ्यावी लागल्यामुळे अगणित वेदना सहन केलेली काकू कॉपरेटीव्ह? काका म्हणाले, मी तिचे डायपर बदलायचो, स्वच्छता करायचो, तिला जेवू घालायचो पण हे सारे करताना तिने कधीही मला त्रास दिला नाही…तिने मला सहकार्यच केले..तिच्यासारखी बाई सापडणार नाही… ते वाक्य ऐकल्यानंतर ज्यांनी निग्रहाने अश्रू रोखले होते त्या काकांना मनोमन केवळ नमस्कार केला…बाहेर पडलो.. नंतर मात्र त्यांच्या काकूंप्रतीच्या संपुर्ण समर्पणाचा विचार मनात आला नि अश्रुंना रोखणे कठीण झाले..
Comments
Post a Comment