थोडा है थोडे की जरूरत है @ 09.01.18
काहिच नाही?… सर्व काही!!
माझ्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थिनींना काही वर्षांनी भेटण्याचा योग आला की मला फार गंमत वाटते. संसारामधे गुंतलेली, घरच्या कामांमधे व्यस्त असलेली, एक दोन पोरांची आई असलेली विद्यार्थिनी समोर आली की तिचे महाविद्यालयातील वास्तव्य आठवून जाते. महाविद्यालयात वादविवाद स्पर्धेमधे भाग घेणारी, स्नेहसंमेलनात मैत्रीणींसोबत एकत्रीतपणे बसून कोलाहल करणारी, तास बुडवून कधी सिनेमा बघायला जाणारी किंवा क्वचित प्रसंगी फार मस्ती केल्याने माझे रागावणे खाली मान घालून ऐकलेली एखादी विद्यार्थिनी घरची सारी कामे करताना, माझ्यासाठी आवर्जून काही पदार्थ करताना, परीवारातील सर्वांना माझे सर म्हणून माझी नम्रपणे ओळख करुन देताना, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसते तेव्हा मला तिचे फार कौतुक वाटते. अश्याच एका विद्यार्थिनीकडे गेल्यानंतर तिला माझ्याशी बोलायला वेळच नव्हता. आपले सर घरी आले म्हणल्यावर तिची लगबग सुरु होती. फराळपाणी आटोपल्यावर ती समोर येऊन बसली. तिचे यजमान, सासरे, सासुबाई या सर्वांचीच तिने ओळख करुन दिली. मी सहजच तिला विचारले, काय, कसे सुरु आहे तुझे जीवन? काय करतेस? तिला माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधीच तिचे सासरे पटकन बोलून गेले…काय करणार? काहीच नाही करत. घरीच असते. खरे तर मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्या विद्यार्थिनीने देणे अपेक्षित होते परंतू तिचे सासरेच तिच्या वतीने उत्तर देत होते. माझी त्या गोष्टीलाही हरकत नाही. माझी हरकत आहे त्या उत्तराला. सासऱ्याचे उत्तर ऐकून ती बिचारी एवढासा चेहरा करुन आतून सोप सुपारी आणण्याच्या निमीत्ताने घरात गेली. परंतू सासरेबुवांनी आपल्या सरांसमोर दिलेल्या उत्तरामुळे तिच्या डोळ्यात तरळलेले पाणी मला दिसले. ती सोप सुपारी घेऊन आल्यावर मी तिला तेथेच बसविले आणि तिला तिचा दिनक्रम विचारला.. माझ्या प्रश्नाने तिच्या सासरची मंडळी जरा बिचकली. परंतू मी निग्रहाने तिला परत एकदा तिचा दिवसभराचा वेळ ती कसा घालवते याबद्दल विचारले. सुदैवाने माझीच विद्यार्थिनी असल्याने व बरेचवेळा भविष्यातील जीवनाबद्दल मी विद्यार्थिनींशी चर्चा करीत असल्याने मी तिला हा प्रश्न का विचारला याचा माझ्या त्या हुशार विद्यार्थिनीला अंदाज आला. सारे बळ एकवटून कदाचित तिच्या गेल्या दहा वर्षांच्या संसारी जीवनात पहिल्यांदाच ती हे सारे बोलत होती. ठामपणे तिने सांगायला सुरुवात केली.
सर, सकाळी साडेपाच वाजता मला उठावे लागते. आमच्या घरी कृषी केंद्राचा व्यवसाय असल्याने रात्री घरातील सर्वच मंडळींना झोपायला फार उशीर होतो. त्यामुळे घरात कुणीच लवकर उठत नाही. पण सकाळी झाडलोट लवकर झाली पाहिजे व स्नान आटोपून तुळशीची पुजा झाली पाहिजे असा या घराचा दंडक असल्याने मी त्याचे पालन करते. मला झोपायला कितीही उशीर झाला तरीही पहाटे साडे पाचला मी उठलेली असते. सासुबाईंचे आता वय झाले व त्यामुळे आता ही जबाबदारी माझी आहे. त्यानंतर मला सात वाजल्यापासून मुलांच्या मागे लागावे लागते. त्यांना शाळेकरीता तयार करा, त्यांचे गणवेश इस्त्री करा, सोबतच त्यांचे डबे बनवा ही सारी कामे मी केवळ पाऊण तासात आटोपून लगेच एका मुलाला मीच माझ्या गाडीवर बसवून शाळेत सोडून देते. माझे मिस्टर दिवसभर दुकानात असतात, खूप कष्ट करतात त्यामुळे मी त्यांना सकाळी आवाज देत नाही. आराम करु देते. त्यानंतर मग मला सर्वांचा नास्ता करावा लागतो. सासुबाई मला मदत करतात परंतू त्यांच्याकडून आता घाई घाईने कामे होत नाहीत. माझे सासरे व माझे पती सकाळी दहा वाजता दुकानात जातात व त्यामुळे त्याच्या आधी मला त्यांचा डबा करुन द्यावा लागतो. मी डबा दिला नाही तर मग हे बाहेरचे काहीतरी खाऊन घेतात. त्यामुळे त्यांची अॅसीडीटी वाढते म्हणून मला जरा धावपळ होते. परंतू मी पटापट स्वयंपाक करुन देते. गरम गरम पोळ्या सर्वांनाच मिळाव्या म्हणून डब्यापुरत्या पहिले करते, मग मोठा मुलगा शाळेत जातो तेव्हा परत त्याच्यासाठी पुन्हा करते. माझ्या नणंदबाई सध्या आमच्याकडेच आहेत. त्यांच्या पतीची बदली मुंबईला झाल्याने त्या येथेच आहेत. त्या बँकेत नोकरी करतात त्यामुळे त्या देखील साडेनऊ वाजता डबा घेऊन जातात. मोठ्या मुलाला तयार करुन मग मी शाळेत सोडून देते व लहान्याला घेऊन येते. धावपळीत वेळ कसा जातो ते काही कळत नाही. सकाळी साडेपाच ते दुपारी साडेबारा पर्यंत फुरसतच नसते. त्यानंतर मी व सासुबाई जेवण करतो. जेमतेम पंधरा मिनीटे मी पाठ टेकते तो एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत माझ्याकडे शिवणकाम शिकायला काही मुली येतात. सर, कॉलेजमधे होम सायन्स विषयात शिवणकाम शिकले होते तेच उपयोगात आणते. सोबत माझ्या त्या क्लास चा परीवाराला आर्थिकदृष्ट्या फायदाच होतो. गेल्या काही वर्षात माझ्या या क्लासमुळे आम्ही एक चांगली गुंतवणूक करु शकलो. त्या क्लासनंतर मी लहान मुलाचा अभ्यास घेते. मग बरेचवेळा दुपारी काही कामे असतात. भांडेवाली, कपडेवाली आली नाही तर ती कामे मला करावी लागतात. सोबत बाहेरची काही कामे असतात. माझ्या मिस्टराना दुकानामुळे अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे किराणा आणणे, दळण आणणे, भाजीपाला आणणे, कुणाची तब्येत बरी नसेल तर दवाखान्यात नेणे, औषधे आणणे, बीले भरणे यारखे कोणते तरी काम दुपारी मला करावेच लागते. तसेच आमच्याकडे छान सणवार साजरे केले जातात. त्या विशेष दिवशी चांगला पूर्ण स्वयंपाक करायला मला आवडतो. सोबत मला बागकामाची आवड असल्याने मी माझ्या घरी सुंदर बाग लावली आहे. तो माझ्या आनंदाचा विषय असल्याने मी त्यावरही बरीच मेहनत घेते. माझ्या घरच्यांना या माझ्या बागेतल्या भाज्यांच्या रेसीपीज खूप आवडतात. मला देखील त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. बाहेरचे काही खाऊ देण्यापेक्षा सर्वांनी घरीच खावे असे मला वाटते. मला कधी कधी त्याचा त्रास होतो परंतू माझ्या घरच्यांची प्रकृती चांगली रहात असेल तर तेवढा त्रास काही फार वाटत नाही. सायंकाळी मोठ्या मुलाला शाळेतून आणल्यावर त्याचा अभ्यास मी घेते. त्यानंतर सात वाजल्यापासून स्वयंपाकाला लागते. माझ्या सासुबाई व नणंदबाई मला मदत करतात. परंतू नणंदबाई देखील बँकेच्या नोकरीमुळे थकलेल्या असतात. त्यामुळे त्यांना फार कामे सांगवत नाही. सायंकाळी सासरे दुकानातून लवकर येतात. मग सासुबाई त्यांना वाढून देतात. त्यानंतर माझे मिस्टर सोडून आम्ही सगळे जेवायला बसतो. मी कधीकधी माझ्या मिस्टरांसाठी जेवायची थांबते पण कधी कधी जेवून घेते. त्यांना दुकानातील सारे हिशोब आटोपून यायला रोज अकरा वाजतात. पण मी त्यांना वाढून देते कितीही वाजता आले तरीही. थकलेले असतात ते दिवसभर काम करुन. मग ते जेवण झाल्यावर टीव्ही वगैरे बघतात. मी त्यानंतर सगळेच उष्टे काढते, भांडी घासायला टाकते व मग रात्री बाराच्या सुमारास झोपायला जाते. असा एकंदरीत माझा दिवस जातो…
हे सारे ऐकून काही क्षण स्तब्धतेचे गेल्यावर मी तिच्या सासरेबुवांना म्हणालो, आपण तर म्हणालात ही काहीच करीत नाही… त्यापुढे मला फार बोलावे लागले नाही. मला काय म्हणायचे आहे ते त्यांच्या लक्षात आले. निघताना मी केवळ एवढेच म्हणालो… काका, माझी विद्यार्थिनी यापेक्षाही जास्त तुमच्या घरासाठी करेल जर आपण तिच्या कामाचा सन्मान केलात तर… तिची फार अपेक्षा नाही, केवळ तिच्या कामाबद्दल प्रेमाची पावती मधून मधून आपण द्यावी. तुम्ही म्हणता तसे तिचे काहीच नाही हे तर खरे तुमच्या घराचे सर्व काही आहे….
विवाहपश्चात आपल्या पतीच्या परीवाराला आपला मानून त्यासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या गृहीणीचा होम मेकर म्हणून सन्मान करायला हवा व तिच्या समर्पित कामाप्रती सर्वांची सहानुभूती असणे ही तिची केवळ मानसिक गरज नाही तर तो तिचा हक्क आहे. बरेचवेळा पुरुषच काय पण नोकरी करणाऱ्या काही महिला देखील घरी राहून परीवार सांभाळणाऱ्या होम मेकरना कमी दर्जाचे संबोधताना दिसतात. त्या काहीच करीत नाहीत म्हणून त्यांना हिणविले जाते. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. परीवार सांभाळणे ही आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक फार मोठी बाब आहे व अश्या माता भगिनींच्या कामाचा सर्वांनीच यथोचित सन्मान करणे आवश्यक आहे. त्यांचे काम काहीच नाही असे नसून सर्व काही आहे.
Comments
Post a Comment