थोडा है थोडे की जरूरत है @ 02.01.18
नात्यांचा मेन्टेनन्स
एका मराठी मालिकेचा एक भाग सहज माझ्या बघण्यात आला. त्या मालिकेतील आधुनिक विचारांना सहजच अंगीकारलेली एक सासू तिच्या सुनेला जीवन आनंदाने जगण्याच्या काही युक्त्या सांगत असते. त्या सर्व संवादात तिचे एक वाक्य माझ्या ठळकपणे लक्षात राहीले. आधीच्या पिढीची असूनही नव्या व बदलत्या जगाचा पुरेपूर अभ्यास असलेली ती सासू, तिच्या नव्या जगाचे बदलते ठोकताळे अद्यापही लक्षात न आलेल्या सुनेला सांगत असते… आता जुना काळ गेला जेव्हा माणसांमाणसातील नात्यांना संस्कारांच्या व रुढींच्या बंधनांचा धाक होता, त्या धाकामुळे नाती टिकविण्यासाठी फार काही करावे लागत नव्हते..ती आपोआप टिकायची कारण प्रत्येकाची जुळवून घेण्याची मानसिकता पक्की असायची. आता मात्र प्रत्येकाला स्वतंत्र मते आहेत, विचार आहेत व सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वांसोबत स्वाभाविकपणे निर्माण होणारे इगो देखील आहेत. म्हणूनच या नव्या व आधुनिक व्यवस्थेमधे नाती आपोआप टिकत नाहीत…त्यांचा वारंवार व योग्य पद्धतीने मेन्टेनन्स करावा लागतो.. नाती मेंटेन करावी लागतात…प्रयत्नपूर्वक, विचारपूर्वक व अतिशय धिराने… अन्यथा विखरुन जायला वेळ लागत नाही.. आणि मग सावरताही येत नाहीत..
नात्यांचा मेन्टेनन्स? हा एक वेगळा विचार मला ऐकायला मिळाला. साधारणपणे नातेसंबंधांच्या ज्या संकल्पना आपल्या मनात घट्ट बसल्या आहेत त्यानुसार नाती ही भावनिक आधारावर टिकत असतात किंबहुना माझ्या आधीच्या पिढीच्या लोकांनी तरी निदान सारी नाती भावनिक गुंतणूकीचीच बघितली आहेत. नाते म्हणजे शेवटी मनाचे मनाशी जुळणेच नाही का? नात्यामधे यांत्रीकता राहू शकत नाही. नाती निर्माण करताना व्यवहार बघून उपयोगाचा नाही. व्यवहाराचा विचार करुन निर्माण झालेली नाती कालसापेक्ष असतात व त्यांचे आयुष्य फार कमी असते. खरी नाती ही व्यावहारिकतेच्या पलीकडची, निखळ प्रेम निर्माण करणारी, मनापासून एकमेकांना सांभाळणारी, एकमेकांना मदत करणारी, हक्काने मदत घेणारी, कोणत्याही परिस्थितीचा परीणाम न होणारी, वर्षानुवर्षे स्नेहाची तिव्रता कमी न होऊ देणारी, मानसिक बळ देणारी, कठीण प्रसंगांमधे सर्वप्रथम हाक मारता यावी अशी, समज गैरमजाच्या संकुचित जाळ्यांपलीकडली, निरामय मैत्रीपूर्ण भावना जपणारी असतात…असाच साधारणपणे खऱ्या नात्यांबद्दलचा विचार आपल्या सर्वांच्या वाचनात आणि अनुभवात होता. नात्यांसंदर्भातील हाच विचार दृढ असल्याने नात्यांचा मेन्टेनन्स हा शब्द जरासा वेगळा वाटला. परंतू त्या आधुनिक विचारांच्या सासुने त्या संदर्भात दिलेल स्पष्टीकरण ऐकल्यावर मात्र ती बाब पटायला लागली. नात्यांसंदर्भातील उदात्त भावना मनात असल्याने हा विचार जरासा अवघड ठरतो परंतू तो समजून घेणे ही काळाची गरज आहे.
मुळात नाती ही उदात्त भावनांनी वेढलेली असतात. त्यातल्या त्यात रक्ताच्या नात्यांना तर अनेक साहित्यीकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विस्तारपूर्वक वेळी उंची देऊन ठेवली. या सर्व विचारांमुळे व त्या माध्यमातून आपल्या मनावर झालेल्या संस्कारांमुळे नात्यांकडे बघण्याची आपली दृष्टी अजूनही काही गृहीतकांवर आधारीत आहे ज्यामुळे नात्यांना अद्यापही गृहित धरण्याची चूक आपण करतो. त्यामुळे आपल्याही नकळत दुरावा निर्माण होतो व त्यामधून कधीही सावरता न येणारी स्थिती निर्माण होते. मनावर ओरखडे पडतात ज्यामुळे झालेली जखम भरुन निघणे कठीण असते. या अश्या घडामोडीनंतरही नात्यांचा प्रवास सुरु राहतो परंतू त्यातील सहसंवेदना संपलेली असते व एक प्रकारची कोरडी औपचारिकता त्यात उरलेली असते. हळू हळू असल्या कोरड्या व औपचारिक नात्यांचे ओझे होऊन अंतीमतः ती तुटून जातात. आयुष्यभर अगदी जवळच्या नात्यातील लोकांना अजीबात न भेटता किंवा संवाद न करता किंवा त्यांच्याबद्दल मनात निर्माण झालेली अढी तशीच्या तशी जोपासून जगताना आपण अनेकांना बघतो. असे लोक एकटे पडलेले असतात. नात्यांच्या बाबत सर्वसाधारणपणे असे होत असल्यास आधुनिक काळातील नात्यांचा मेन्टेनन्स हा विचार स्विकारायला काय हरकत आहे?
नात्यांचा मेन्टेनन्स करण्यासाठी आपल्याला काळ बदलला आहे हे पटवून घ्यावे लागेल. जीवनाचे ठोकताळे ठोकून व ताळे लावून बंद करु नये तर त्यांना पुन्हा पुन्हा नव्या समाजव्यवस्थेच्या कसोटीवर तावून सुलाखून नव्याने चमकवावे अशी स्थिती आहे. हे ज्याच्या ज्याच्या लक्षात आले तो या मेन्टेनन्सच्या प्रक्रीयेत यशस्वी होतो. जग बदलतेय म्हणजे ज्ञानाच्या व माहितीची कक्षा रुंदावल्या आहेत, त्यामुळे स्वाभाविकच माहितीची मक्तेदारी संपुष्टात येऊन त्याची सहज उपलब्धता झाली आहे. त्यामुळे चांगला वाईट कसाही का होईना परंतू प्रत्येकाचा एक विचार तयार होतोय जो विचार आत्मकेंद्रीत व्यक्तीमत्वामधे परावर्तित होऊन समाजात वावरताना दिसतो. असा विचार जवळपास प्रत्येकाचाच तयार झालाय व त्यामुळे कधी नव्हे इतकी मत व्यक्त करण्याची धडपड निर्माण झालीय. हे झालेय याचा स्विकार केला की प्रत्येकाचे स्वतंत्र मत राहू शकते व देवाने आपल्यासोबत इतरांनाही विचार करण्याची शक्ती दिलेली आहे हा विचार पटायला लागतो. या विचारांचे परीणाम काय होतील हा भाग अलाहीदा परंतू विचार करणारा जर विचारांच्या परीणामाची जबाबदारी स्विकारीत असेल तर तो त्याला करु दिला पाहीजे हा नात्यांच्या मेन्टेनन्स मधला पहिला व सर्वात महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाला स्वतःची स्वतंत्र अशी स्पेस मिळणे ही देखील फार गरजेची बाब आहे नात्यांच्या मेन्टेनन्स मधे आपण स्पेस कश्या प्रकारे देतो यावर बरेच काही अवलंबून असते. स्पेसची गरज असते हेच मुळात अनेकांना पटत नाही. एखाद्यावेळी कुणीच नको असतं, कुणीही नाही… ही भावना समजायला हवी. मी इतका जवळचा असूनही नकोय हा माझ्या नात्याचा अपमान आहे अश्या पद्धतीच्या भावनिक आक्रमणांना रोखले पाहिजे. मला एकट्याला रहायचे आहे या वाक्याचा अर्थ तंतोतंत समजणे हा नात्यांच्या मेन्टेनन्समधला खरा शहाणपणा आहे. नात्यांमधे संवाद असणे व भावनांना व्यक्त करणे ही देखील आवश्यक गोष्ट बनली आहे. अनेकदा काहीही न बोलता तू समजून घे ना..अश्या पद्धतीच्या जुन्या काळातील रोमँटीक संकल्पना आजही राबविण्याचा प्रयत्न होतो. काही प्रमाणात ते छान असले तरी देखील भावनांचे प्रकटीकरण ही नात्यांच्या जपणूकीतील गरज बनली आहे. व्यक्त व्हायलाच हवे.. मनातील विचार बोलून दाखवायला हवे कारण ते समजून घेण्याचा वेळ कदाचित नव्या काळात नाही. बोलण्याने नुकसान काहीच होत नाही उलट नात्यांमधे दृढता निर्माण होते. अगदी जवळच्या व रक्ताच्या नात्यांमधेही औपचारिक वाटले तरीही भावनांचे शाब्दिक प्रकटीकरण गरजेचे बनत चालले आहे. नाते मेंटेन करताना व त्याची मजबूती वाढविण्यासाठी हा बदल करणे गरजेचे आहे. मनापासून मनातील विचार स्पष्टपणे किंवा कल्पकतेने व्यक्त करुन नाती घट्ट बनतात हे समजले पाहिजे. नात्यांच्या मेन्टेनन्स मधला शेवटचा व महत्वाचा भाग म्हणजे नात्यांची विचारपूर्वक बांधणी करणे व सोबतच त्यातील सहजता न गमावणे. ही एक तारेवरची कसरत आहे पण ती करावी लागेल. भावनांच्या आधारे निर्माण होणाऱ्या नात्यांना केवळ भावनिक चौकटीतून व उदात्त भूमिका प्रदान करुन न बघता त्यामधील व्यवहारीकता पाळण्याची व नाती माणसांमधली आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. अपेक्षाविरहित नाती ही कवी कल्पना ठरते या नव्या काळात.. त्यापेक्षा नात्यामधील अपेक्षांना समजून घ्यावे, त्या अपेक्षांची प्रयत्नपूर्वक पूर्तता करावी व हक्काने करवून देखील घ्यावी. कोणे एके काळी अपेक्षा ठेऊन निर्माण झालेले नाते कमी दर्जाचे मानले जात असे… बदलत्या काळात अपेक्षा ठेवाव्या व ठेऊ द्याव्या… या अपेक्षापूर्तींच्या आनंदाने नाती दृढ होतात. म्हणूनच नात्यांमधील उदात्तपणा बाजूला ठेऊन एक छोटासा बदल करुयात ज्यामुळे नात्यांचा मेन्टेनन्स व्यवस्थित होऊ शकेल…
तो बदल म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येकच नात्याला मैत्रीच्या भूमिकेतून बघूयात. सर्वांशी मैत्री करुयात… मैत्री केली की नात्यांमधील ओझे कमी होते व सारीच नाती योग्य पद्धतीने मेंटेन होऊ लागतात. आनंदी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला सर्व नात्यांना मैत्रीच्या सुंदर धाग्यात निश्चितच बांधता येईल.. एका नव्या व सुंदर वर्षाच्या सुरुवातीलाच यापेक्षा देखणा संकल्प काय राहू शकतो?
Comments
Post a Comment