थोडा है थोडे की जरुरत है @ 16.02.21

बालपणीचे गाव

माझ्या माझ्या आधीच्या पिढीच्या बालपणीच्या आठवणींमधे एक छोटेसे गाव असतेच. जिवनाच्या विकासात्मक वाटचालींमधे आपण शहराकडे धाव घेतली येथील रहाणीमानाशी नकळतच एकरुप होऊन गेलो असलो तरीही ते बालपणीचे गाव मनाच्या कुपीत अजुनही सुरक्षित आहे. परंतू आपण ते गाव आपल्या इच्छेने आधुनिकतेच्या नव्या परीमाणांना अनुसरुन सोडले नव्या व्यवस्थांशी जुळवून घेतले. मग या सर्व व्यवस्था आपल्याश्या झाल्या आणि त्या बालपणीच्या गावाच्या स्मृती विरळ होत गेल्या. त्या स्मृती विरळ झाल्या तरी पुसल्या जाऊच शकत नाहीत आणि मग त्या गावाशी संबंधित कुणी भेटले तर त्या सुंदर स्मृती परत उजळून निघतात. त्या सर्व काळामधे जगलेले क्षण पुन्हा ताजेतवाने होतात. हे असे होण्याचे कारण फार महत्वाचे आहे. ते क्षण आपण अश्या काळात जगलेले होते ज्यावेळी आपण संपुर्णपणे स्वच्छंदी आणि निरागस होतो. आपले मन हळूहळू आकार घेऊ लागले होते त्यामुळेच अनेक छोट्या छोट्या आणि आज अगदीच क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी फारच महत्वाच्या होत्या. परंतू आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने आपल्या मर्जीने किंवा कालानुरुप होणाऱ्या स्थित्यंतरामुळे आपले गाव सोडले. परंतू ज्यांना आपले गाव जबरदस्तीने, क्रुरतेने हिंसात्मक भयाच्या वातावरणात सोडावे लागते त्यांना काय वाटत असेल याची कल्पना आपण करु शकत नाही. त्यांच्या अनुभवांवरुनच आपल्याला ते जाणवू शकते. असाच एक अनुभव नुकत्याच एका पुस्तकात मला वाचायला मिळाला. दोन मित्रांच्या संवादाचा उल्लेख त्यात आला ते दोघेही साहित्यक्षेत्रातले संवेदनशील व्यक्तिमत्वे असल्याने आपल्या भावना अचूक शब्दात मांडणे त्यांना फार छान जमले होते

या दोन मित्रांपैकी एक होते पत्रकारीतेतील फार मोठे नाव असलेले सुप्रसिद्ध लेखक कुलदीप नायर आणि ज्यांच्याजवळ त्यांनी आपले मन मोकळे केले ज्यांनी ते एका पुस्तकात शब्दबद्ध केले ते होते प्रसिद्ध कवी गुलजार. अठन्नी नावाच्या एका गुलजार लिखीत पुस्तकात मला हा प्रसंग सापडला. कुलदीप नायर आणि गुलजार या दोघांनाही त्यांच्या बालपणीचे गाव अत्यंत भयावह परीस्थितीत सोडावे लागले. गाव सोडायचे ठरल्यावर आजुबाजुने सुरु असलेल्या हिंसक दंगलींमधून हाताला लागते ते गोळा करुन रातोरात गाव कायमचे सोडून जाणे ही एक भयानक गोष्ट आहे. कष्टाने उभे केलेले घर, राब राब राबून जोपासलेले शेत आणि स्नेहाच्या धाग्यांनी बांधलेली अनेक नाती हे सारे काही सोडून फक्त स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अंगावरील कपड्यानीशी माणसांनी कोंबुन कोंबुन भरलेल्या रेल्वेमधे बसताना या दोन्हीही लहान मुलांना काय वाटले असेल याचे अत्यंत अचूक वर्णन कुलदीप नायर यांनी केले ते तेवढ्याच प्रभावीपणे गुलजार यांनी शब्दबद्ध केले. कुलदीप नायर लिहीतात, मेरी सारी जड़े मैं अपने छोटेसे क़स्बे में छोड़कर और कुछ टहनियाँ बड़ी बेरहमीसे काटकर मेरे साथ ले आया हूँ... अब हालात यह है की जड़ों के बगैर ना उनपे फूल खिलते है और ना ही मैं उन्हें मरने देता हूँ.... एका लहान मुलाच्या मनातील या वेदना आपल्यालाही व्यथित करतात. खरे तर या लहान मुलांसाठी घर किंवा शेती किंवा संपत्ती यापेक्षाही काही खूप महत्वाचे मागे राहून गेले होते. ते काय काय असेल याचा विचार केला तर आपलेच बालपण आपल्या मनःपटलावर उमटू लागते.

बालपणीची ती शाळा ज्यामधे बेंच नव्हते तर फाऱ्यांवर बसावे लागे. शाळेच्या त्या भिंती ज्यांच्याकडे तोंड करुन उभे राहून शिक्षा भोगताना सरांचे चॉपने खरवडलेले चित्र, शाळांच्या बाहेर पाच पैश्यात मिळणाऱ्या चिंचा, बोरे किंवा राजगीऱ्याचे लाडू, शाळेच्या मैदानावर गणवेष खराब होण्याची चिंता करता केलेली एखादी मारामारी, एकाने चूक केली तरी संपुर्ण वर्गाला मिळालेल्या शिक्षेमुळे हुळहुळ झालेला हाताचा तळवा, शाळेतून सायंकाळी घरी परतताना चिंचेच्या झाडावरील भुताला घाबरुन सश्यागत झालेले मन, दफ्तरामधे आतल्या खणात ठेवलेली आगपेटी त्यात लपवून ठेवलेले सोनपाखरु, गुंजा, सुटीच्या दिवशी कुठल्याश्या शेतात बोरे तोडायला जाण्याची धमाल, विकत घेतलेल्या बोरांपेक्षा अश्या लपून छपून तोडलेल्या बोरांची चव नेहेमीच छान असते अशी ठाम समजूत, शेताच्या एका कडेला मोठ्या झाडाला बांधलेला झुला त्यावर मोठ्ठा झोका घेताना पोटात आलेला मोठ्ठा गोळा, जवळच्या मित्रासोबत झालेले भांडण आणि झालेली पहिली कट्टी, त्यानंतर त्याच्याशी बोलण्यास्तव केलेले प्रयत्न आणि मग परत एकदा झालेली दोस्ती, शाळेतल्या एखाद्या मुलीने सहजच दिलेली लिमलेटची गोळी आणि त्यानंतर तिच्या नावाने मित्रांनी चिडवून चिडवून बेजार केल्यावर मनात फुटलेले लाडू, वेगवेगळ्या सरांना, मॅडमना दिलेली नावे, त्या नावांचे संशोधन, गावात असलेल्या सुताराकडून बनवून घेतलेले गिल्ली दांडू, मोठा रींग एखाद्या बीएमडब्ल्यू च्या थाटात चालवत चार पाच किलोमीटर पर्यंत सहजच मारलेली रपेट, मोठ्या तंबुमधे पडद्याच्या उलट बाजूने आई इतर काकू मंडळींसोबत बघितलेला अमिताभ बच्चनचा सिनेमा, पडद्याच्या दुसऱ्या बाजूने बसलेल्या माणसांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कोलाहलात त्याने घेतलेली धडाकेबाज एंट्री मध्यांतरात आईने घरुन बनवून नेलेला मुरमुऱ्याचा कच्चा चिवडा, बाबांची ओळख असल्याने प्रोजेक्शन टपरीमधे तेथील काकांनी दिलेल्या तुटलेल्या रीळाच्या फिल्म्स आणि मग घरी त्याचाच सिनेमा बनवून बघण्याचा केलेला खेळ, शाळेतला मित्रांचा ग्रुप, त्यामधून निर्माण झालेली जीवाभावाची नाती, घरासमोरची हातावर राखी बांधणारी अफ्रोज, किंवा घरघुती औषधी देणारी दादी माँ, तिच्या किराण्याच्या छोट्या दुकानातून काही सामान घेतल्यावर सहजच तिने हातावर ठेवलेल्या दोन घशाला थंड वाटून देणाऱ्या त्या गोळ्या, कसले कौतुक त्याचे!! कारण त्या गोळ्या सहजच तिने दिलेल्या असायच्या हे सारे सारे मनात विचार येताक्षणी लख्खपणे जाणवायला लागते. हे असेच सारे क्षण थोड्या फार बदलासह आपण सर्वांनीच आणि कुलदीप नायर किंवा गुलजार यांनी अनुभवलेले असतीलच. म्हणूनच कुलदीप नायर यांनी केलेले वर्णन आपल्या मनाला स्पर्शते आपण त्यातील वेदना समजू शकतो. हे असे सारे सुवर्णक्षण रक्तरंजीत वातावरणात अचानक सोडून यावे लागल्यावर त्यांना काय वाटत असेल हे आपल्यालाही जाणवू शकते कारण या क्षणांचे मोल करता येत नाही. ते सारे अनमोल क्षण आहेत. आधुनिक काळातील व्यावहारिक चौकटींमधे तर हे क्षण म्हणजे निव्वळ वेडेपणा वाटू शकतो परंतू माझ्या माझ्या आधीच्या पिढीच्या प्रत्येकाला या क्षणांचे महत्व ठाऊक आहे. कुलदीप नायर, गुलजार किंवा आपल्यापैकी कुणालाही ते क्षण परत आणणे शक्य नाही. परंतू ते सारे क्षण जर आपण मनापासून जगले असतील आणि त्याची आठवण आपल्या मनाला निखळ आनंद देत असेल तर एक गोष्ट मात्र आपण निश्चित करु शकतो

आपल्या बालपणीचा गाव सोडून आपण आधुनिक शहरात आल्यावर येथील रहाणीमानासोबत आपण येथील जगण्यासाठी लागणारी चतुराई, व्यावहारीकपणा, आपल्यापुरता विचार करण्याची पद्धत, आपल्याला इतरांचे काय करायचेय ही विचार प्रणाली, स्वतःचा विकास करण्यासाठी इतरांना जबरीने बाजूला करुन किंवा त्यांच्यावर पाय ठेऊन वर चढण्याची जिद्द आणि मीच सर्वोत्तम आहे ही आत्माभिमानाची मुद्दाम जोपासलेली भावना हे देखील शिकलो. हे सारे कदाचित आधुनिक जगण्यासाठी आपल्याला जपावे लागेलही, परंतू आपल्या बालपणीच्या गावात मागेच राहून गेलेला तो स्वच्छंदी, अहंकारविरहीत, निखळ आनंद देणारा निरागसपणा जर आपल्याला पुन्हा आठवून काही प्रमाणात जपता आला तरी, आधुनिकतेच्या जगण्यातील सायंकाळी मनाला बोचणारी अस्वस्थता आणि अस्तित्वाचे भय निश्चित कमी करता येईल आणि मग गावाकडच्या खाटेवर टिपूर चांदण्यांनी भरलेले आकाश बघताना जशी अलगद गाढ झोप लागायची तशी आता देखील आपल्याला लागेल. अशी समाधानी गावाकडे लागत होती तशी झोप अजुनही समाधानी आयुष्याचे तेच सर्वोत्तम प्रतिक आहे ना?





Comments

  1. खूप छान आहे...
    Thanks for bringing us back to that golden days of childhood.

    ReplyDelete
  2. सर्व बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आपण

    ReplyDelete
  3. बालपणात घेऊन गेलास मित्रा...नकळत डोळ्यात जमा झालेल्या अश्रुबिंदूतून रम्य, सुखद आठवणींंना उजाळा मिळाला ..एका एका क्षणाचे स्मरण झाले.. खूप सुंदर अवि मनस्पर्शी लिखाण..

    ReplyDelete
  4. बालपणात घेऊन गेलास मित्रा...नकळत डोळ्यात जमा झालेल्या अश्रुबिंदूतून रम्य, सुखद आठवणींना उजाळा मिळाला.. एक.. एक क्षणांचे स्मरण झाले.. खुप सुंदर अवि मनस्पर्शी लिखाण...

    ReplyDelete
  5. छान, बालपणीच्या काळात नेले

    ReplyDelete
  6. Waah!!! Avi, Great writeup, very intricately narrated childhood activities, takes one back through the memories of yesteryears. Yes one does truly find solace in the memories. Thx for rekindling those childhood memories👌🏻👏🏻😊

    ReplyDelete
  7. सर्व बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या सर

    ReplyDelete
  8. खूपच मस्त सर

    ReplyDelete
  9. खूपच मस्त सर

    ReplyDelete
  10. Nostalgic ...relived the moment like a rerun

    ReplyDelete
  11. वा --- काय सुंदर रंगवलय बालपण जे आपल्या पिढीतील सर्वांनी अनुभवलंय यात आम्हा मुलींचे वेगवेळे खेळ ,मातीची घरकुलं, लंगडी, लगोरी,लपाछपी,खडे खेळणे,सनभात,नदीवर पोहायला जाण, नी काय-काय.क्षणभर गावी बालपणात मन रमुन गेल.

    ReplyDelete
  12. Balpanichya Ramya Athwanit Ramale....

    ReplyDelete
  13. GREAT BOOKS SHOULD LEAVE YOU WITH MANY
    EXPERIENCES AND SLIGHTLY EXHAUSTED AT THE END AS YOU LIVE SEVERAL LIVES WHILE READING THEM:
    WILLIAM STYRON

    हिच अनुभुती लेख वाचतांना जाणवली.
    दोन दिग्गज कलाकारांना, त्यांच्या हळव्या मनाला अनुभवता आले.

    हाच धागा पकडून लेखक आपल्याला
    एक अनोखी सफर घडवून आणतो.
    लहानपणी झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावाला जातांना जो निखळ आनंद मिळायचा तोच आनंद परतून जगायचा असेल तर लेखकाने केलेले वर्णन आवर्जून वाचावे असे आहे.

    आपल्या मुठीतुन... कणाकणाने जी निरागसता हरवते आहे ती कशी जपता येईल हे लेखकाने अत्यंत मार्मिकपणे आपल्या मनावर बिंबवलं आहे.

    ReplyDelete
  14. गावाकडील वर्णन अप्रतिमच!
    पण खंत ही की आता गाव असं राहिलंय का?तिथली बापेमंडळी आणि मुलं सुद्धा या माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यापुढे आपलं निरागसपण गमावून बसली आहेत असं वाटतं. आधुनिकतेच्या काळात सारे जण यंत्रमानव झालेत जणू.भाव भावना सुद्धा व्यावहारिक पातळीवर तोलल्या, मापल्या जाताहेत.शहरांनी सांस्कृतिक दृष्ट्या गावांना पार बकाल केलं आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18