थोडा है थोडे की जरुरत है @ 09.02.21
अंगाई
कधी कधी काही योगायोग घडतात. असाच एक योगायोग त्या दिवशी माझ्या बाबतीत घडला. जेवण आटोपल्यावर मी निवांत गाणी ऐकत बसलो असता माझ्या प्लेलीस्ट मधे मला फार आवडणारे एक गाणे सुरु झाले. लताबाईंनी गायलेली प्रसिद्ध अंगाई. जिजाबाई आपल्या शिवबाला झोपविताना म्हणणारी, गुणी बाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया. लताबाईंच्या कातर आवाजात रात्रीच्या वेळी ते गाणे आणखीनच मनाला भावत होते. आईचे आपल्या बाळाला झोपविणे. जिच्यामुळे त्या बाळाला सजीव अस्तित्व लाभलेले असते व बाळाच्या त्या अस्तित्वाचा सर्वात सक्षम धागा असलेली माऊली जेव्हा दिवसभर राब राब राबून देखील पाठ आडवी न करता त्या तान्हुल्याला निजवित असते हे दृष्यच मुळी जगातील सर्वोत्तम समर्पणाचे दृष्य आहे. लताबाईंच्या दैवी सुरांसोबत हे दृष्य डोळ्यासमोर तरळत असतानाच अचानक गाणे बंद झाले व एका मित्राचा फोन आला. रात्रीचे साधारण दहा वाजले होते. यावेळी त्याचा फोन म्हणजे बहुदा त्याला काही महत्वाचे काम असणार असे मला वाटून गेले. एरवी फार कटाक्षाने तो वागत असतो. रात्री नऊ नंतर फोन करुन उगाच डीस्टर्ब करायचे नाही वगैरे. मी त्याला अनेक वेळा सांगितले की मित्रांमधे कसली आलीय औपचारिकता. पण तो ऐकत नाही. परंतू आज रात्री दहाला फोन आला म्हणजे काहीतरी समस्या असली पाहीजे. फोनची रींग वाजून फोन उचले पर्यंत माझ्या मनात हे विचार येऊन गेले. त्यानंतर पुढे साधारण तासभर तो जे मला सांगत राहीला तो मला लताबाईंचे गाणे ऐकतानाचाच योगायोग वाटला. माझ्या मनात ती अंगाई आणि आईचे ते आपल्या पोटच्या गोळ्याला हलकेच थोपटून झोपविणे असल्याने माझ्या मित्राच्या संपुर्ण बोलण्यात तो संदर्भ फार ठळकपणे जाणविला. वयाने एवढा मोठा झाला असला तरी त्याला हवी असलेली ती अंगाई किती श्रेष्ठ असते याची मला जाणीव झाली.
सुरुवातीची चौकशी झाल्यावर त्याने मूळ विषयाला हात घातला. आवाजात विलक्षण असहायता जाणवत होती. पण सारे काही बोलून टाकावे अश्या परीस्थितीत तो बोलू लागला. अवि, मी फार थकलोय रे. काम करुन करुन पार भूगा झालाय. किती वर्षे झाले धावतोय केवळ. तुला ठावूक आहे, किती गरीबीत दिवस काढले मी लहानपणी. त्या गरीबीचा पुढे लवलेशही नको म्हणून धावणे सुरु केले. पण धावता धावता त्या सोबत जगायचेही असते हे विसरुनच गेलो. गरीबी तर केव्हाच मागे सोडून गेली होती. भरपूर पैसा मिळाला. साऱ्या सुखसोयी देखील प्राप्त झाल्या म्हणजे निरनिराळ्या वस्तू, गाडी, बंगला सारे काही झाले. पण आता पार थकून गेलोय रे. आता मला आराम करायचाय. आणि तो कुठे मिळेल सांगू? बोलता बोलता त्याचा गळा भरुन आलाय असे जाणवले. मी त्याला म्हणालो, काय झालेय तुला? असा का भावूक झालाय आणि नेमके काय झालेय ते मला सांग. गळ्यातला तो दुःखाचा आवंढा गिळून तो पुढे बोलू लागला. आवाज अजूनही थरथरत होता. पुढचे वाक्य एका दमात बोलण्याच्या घाईत तो बोलून गेला. अव्या, मला ना, माझ्या आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचेय रे... शांतपणे आणि तिच्याकडून थोपटून घ्यायचेय निवांत झोप लागण्यासाठी. मी लहान असताना आई किती गोड आवाजात गायची रे, गुणी बाळ असा जागसी का रे वाया... ते ऐकायचेय रे. तुला सांगतो मला आता काही काही नको वाटतेय. माझा मोठा बंगला, माझी आलीशान गाडी, माझा महागडा फोन, माझ्याकडे असणारी श्रीमंतीची सारी बिरुदे, काही काही नको वाटतात. माझ्या घरच्या आलीशान बेडवरदेखील मला झोप लागत नाही रे. तुला हा माझा वेडेपणा वाटेल कदाचित परंतू मला आईकडून थोपटून घेऊन, तिच्या आवाजातली ती अंगाई ऐकत तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपायचेय रे. तरच मला निवांत झोप लागेल. अव्या, असे वाटते, आईच्या मांडीवर डोके ठेवून शांत शांत वाटावे आणि तिच शेवटची झोप ठरावी. मी ताडकन म्हणालो, काय हे वेड्यासारखे बोलणे तुझे. शेवटची झोप वगैरे काय? तो पुढे म्हणाला, होय रे. एवढी गरज आहे आईच्या थोपटण्याची नि तिच्या गळ्यातून उमटणाऱ्या त्या अंगांईची. पण माझ्या नशीबात तशी शांत झोप नाही कारण मीच काही वर्षांपूर्वी माझ्या आईला जोरात ओरडून म्हणालो होतो, आता मला आयुष्यातही तुझे तोंड बघायचे नाही. तू तुझी सोय करुन घे. त्यानंतर तो काहीच बोलला नाही. मी देखील आमच्या संवादात ती शांतता राहू दिली. मला आठवले, साधारण वीस वर्षांपूर्वी याने असाच फोन करुन आईसोबत झालेले भांडण आणि आई घर सोडून गेली हे मला सांगितले होते. त्यावेळी तो म्हणाला होता. घरच्या भांडणांमधे माझी झोप देखील दुरापास्त झाली होती. रोजच्या कटकटीपेक्षा आता मला निवांत झोपता तरी येईल.
त्यावेळी जे काही झाले होते ते घरातील वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांनी एकमेकांना समजून न घेतल्यामुळे झाले होते. कुणाचे चूक होते नि कुणाचे बरोबर माहित नाही. प्रत्येकाचा इगो मोठा झाला होता. आपले घर या संकल्पनेपेक्षा माझे घर हा भाव प्रत्येकाच्या मनात उफाळून येत होता. एकमेकांसोबत वावरताना प्रत्येकालाच एक स्पेस हवी असते ही संकल्पना माहितच नव्हती त्यामुळे सारेच काही ओरबाडण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच केला. संसाराचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थित्यंतर होताना ती एक कष्टप्रद बाब असते. काहींना आपला अधिकार हस्तांतरीत करायचा असतो तर काहींना तो मिळवायचा असतो. परंतू यामधे ओढताण न होऊ देता हे स्थित्यंतर आनंदाने झाले तर सारे काही आलबेल असते. यासाठी आवश्यक असते सहनशक्तीची आणि स्थीर वृत्तीची. दोन्ही पिढ्यांमधे त्याची कमतरता असली की एका पिढीच्या हातून गोष्टी सूटत नाहीत आणि दुसरी पिढी त्यांच्या सोडण्याची वाट न बघता हिसकावण्याचा प्रयत्न करते व त्यामधूनच संघर्ष उभा राहतो. असेच काहीसे माझ्या मित्राच्या घरी झाले होते. परंतू त्या परिस्थितीला सांभाळताना त्याचाही इगो आडवा आला व त्यामुळेच त्याने आईला ओरडून सांगितले होते, मला आयुष्यात तुझे तोंडही बघायचे नाही. परंतू ते नाते असे तोडून तुटतच नाही हे त्याला ठावूक नव्हते. जगातील सर्व नात्यांपेक्षा आईचा आपल्या जिवंत अस्तित्वावर सर्वात जास्त अधिकार असतो कारण आपण तिच्या शरीराच्या अणूरेणूंपासून बनलेलो असतो व त्यामुळे काहीही झाले तरी तो बंध विलग होऊ शकत नाही. म्हणूनच माझ्या मित्राला त्याच्या आयुष्यातील संपूर्णपणे थकून गेलेल्या स्थितीत आईच्या मांडीवर डोके ठेवून तिची अंगाई ऐकत झोपायचे होते.. खरी खूरी शांतता मिळविण्यासाठी.
मी त्याला म्हणालो, तुला असे वाटतेय तर सरळ आईकडे जा नि सांग तिला. ती तुझी आई आहे. तिच्यासमोर कसला इगो नि कसले काय. तुला या क्षणी त्या अंगाईचीच गरज आहे. कारण ती अंगाई स्वत्व संपुर्णपणे त्यागून स्वतःच्या अंशालाच अर्पण करण्याचे जगातले सर्वात मोठे प्रतिक आहे. माझ्या मित्राने फोन केला की नाही ठावूक नाही. परंतू त्या दिवशी फोन बंद करताना पुन्हा एवढेच म्हणाला... अवि, मला झोप येत नाही...मला शांत झोपायचंय...मी फार थकलोय.
फोन बंद झाला नि मधेच थांबलेले लताबाईंचे सूर कानी आले, गुणी बाळ असा जागसी का रे वाया!! कदाचित अंगाईचे हेच सूर माझ्या मित्राच्या आईच्याही गळ्यात दाटले असतील. गरज होती ती तिच्या बाळाने तिच्या मांडीवर डोके टेकविण्याची..
चिंतनीय
ReplyDeleteWaah bhai!!!!, well said. Agree this generational transition has made things difficult in maintaining relations. But it is equally true that however grown a person may be mothers love and affection does provide solace to every being, some may accept openly some may not but deep down it is a universal truth. Well articulated bhai👏🏻👏🏻👏🏻
ReplyDelete'अंगाई' या शब्दातील 'ममताळूपण' ही एक आयुष्यभर न संपणारी शिदोरी असते. याचा प्रत्यय देणारे ललित......
ReplyDelete-प्राचार्य डॉ.गजानन जाधव, देऊळगावराजा
वर्तमानकालीन बहुतांश मानसिकता आपण छान टीपली.
ReplyDeleteसभोवताल अनेक ठिकाणी दिसणार वास्तव .......छान शब्दात मांडलय सर........
ReplyDeleteNo comment is enough to express my feelings 😌
ReplyDeleteSHABDATEET❤️
एखादा विचार लेखाद्वारे मांडताना तो विचार वाचकांच्या मनाचा ठाव कसा घेईल.. ह्याचा अंदाज लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने केला आहे.
ReplyDeleteम्हणजे हेच बघा, ह्या लेखाचा विषय तसा गांभीर्याच्या वळणावर चालणारा किंवा स्वतःच्याच 'मी' पणाला चाचपडून बघावे असा.. पण लेखकाने लेखाच्या सुरुवातीला ज्या व्यक्तींचा / नात्यातील मुलायमतेचा उल्लेख केल्याने जी वातावरण निर्मिती झाली आहे त्याला तोड नाही.
'एकमेकांसोबत वावरताना प्रत्येकालाच
एक स्पेस हवी असते ही संकल्पना
........ त्यामधूनच संघर्ष उभा राहतो.'
लेखाच्या दुसर्या भागातील ह्या ओळी
लेखाचा गाभा आहे आणि हे उमजून आचरण केल..
तर जगण खऱ्या अर्थाने परीपूर्ण होईल.
खूपचं मनभावक
ReplyDeleteखूपच छान
DeleteDr.Kalpana Deshmukh
ReplyDeleteदोन पिढीतील वैचारिक आणि भावनिक अंतर फार सुरेख टिपलेत.
Kay बोलायचं sir ह्या लेखाबद्दल शब्द सुचत नाही, क्या बात हैं.
ReplyDeleteRohini Deshmukh
अत्यंत हळुवार भावनांचा ओघवता प्रवाह..अंतर्मुख करणारा..आईची महती विषद करणारा आणि स्वामी तिन्ही जगाचा.. अशी अवस्था...👏👏
ReplyDeleteSo nice sir,,मनाला शांत करून जून्या आठवणी जाग्या झाल्या आहेत...अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteखूप छान!💐
ReplyDeleteExcellent Sir
ReplyDelete