थोडा है थोडे की जरुरत है @ 02.03.21
ताटातूट
एका मातेच्या उदरातून दोघांनीही जन्म घेतला. रुपाने तसे दोघेही जरासे वेगळे होते परंतू सोबतच जन्मलेले असल्याने सोबतच मोठे होत होते. आईच्या देखरेखीखाली त्यांचे खेळणे, बागडणे सारे काही विनायास सुरु होते. नाही म्हणायला दोघांपैकी एक जरा बदमाश होता. उगाच दुसऱ्याला त्रास द्यायचा. मग तो आईकडे जाऊन तक्रार करायचा व मग आई तिच्या पद्धतीने याला दम द्यायची. सर्वांनाच या दोघांच्या खेळण्याचे, बागण्याचे कौतुक वाटायचे. केवळ त्यांच्या आईलाच नाही परंतू आजुबाजूच्या मंडळींना देखील त्यांचा फारच लळा लागला होता. ती वाईट घटना होईपर्यंत सारे काही छान सुरु होते. बाजुच्या घरचे निवृत्त झालेले काका, समोरच्या घरची मिनी, पलिकडच्या घरच्या काकू असे वेगवेगळ्या वेळी या दोघांच्या खेळण्याचे व धमाल मस्ती करण्याचे कौतुक करुन जायचे. पण हे सारे, काही नतद्रष्ट लोकांना बघविले नाही. म्हणूनच त्यांनी असे काही केले की त्यामुळे ती आई आणि त्या दोघांचे विश्वच बदलले. अन्यथा परीसरात यांच्या खेळकर आवाजाने चैतन्यच असायचे. सर्वात पहिल्यांदा ते निवृत्त काका त्यांना खेळवायचे. ती दोघे देखील काकांना एव्हाना ओळखू लागली होती. सकाळी सर्वात अगोदर काका येतात आणि काहीतरी खायला देतात, चुटू चुटू खायला, हे त्यांना कळले होते. काका निवृत्त झाले असल्याने सकाळचे छान दोन तास यांच्या सोबत जायचे. काका म्हणायचे देखील की या दोघांकडे नुसते बघितले तरी ताजेतवाने वाटते आणि दिवस कसा मस्त जातो. काकांना कुठे ठाऊक होते की त्यांचा हा आनंद हिरावला जाणार आहे. दुपारची वेळ मिनीची असायची. मिनी आपल्या बाहुल्या घेऊन त्यांच्यासोबत खेळायला यायची. खरे तर त्या दोघांना बाहुल्या वगैरे काही कळत नव्हते. पण मग थोडा थोडावेळ या दोघांना ती आपल्या मांडीवर देखील घ्यायची. ते दोघे सुद्धा मिनीच्या मांडीवर शांतपणे बसायचे. मिनीचा तो उत्साह फार दिवसाकरीता नव्हता हे मात्र त्या चिमुरडीला माहित नव्हते. सायंकाळच्या वेळी पलीकडच्या घरातल्या काकू यायच्या. दिवेलागणीच्या वेळी त्या घरासमोर फेऱ्या मारायच्या व प्रत्येक फेरीच्या वेळी हे दोघे त्यांना ओळखायचे. गोड आवाजात काकू त्यांना हाका मारायच्या. त्या दोघांना काहीच कळत नव्हते परंतू प्रेमाने उच्चारलेले शब्द कळायला बहुदा भाषेचा अडथळा नसतो. ते थेट ह्रदयातून ह्रदयापर्यंत पोहोचतात. म्हणूनच वेगळेच आवाज काढीत ती दोघे काकुंच्या प्रेमाच्या शब्दांना प्रतिसाद देत. परंतू हा प्रतिसाद लवकरच थांबणार हे मात्र काकुंना माहित नव्हते. या दोघांचे आनंदी अस्तित्व आणि त्यांच्याशी रममाण झालेले आम्ही सर्व लवकरच घडणाऱ्या त्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असल्याने सारे काही छान सुरु होते आणि अचानक ती काळरात्र आली.
या दोघांचा जन्म झाल्यापासून परीसरातील वातावरण एकदम बदलूनच गेले होते. त्या दिवशीही दिवसभर या दोघांची एकत्रित केलेली धमाल बघून आम्ही सारे झोपी गेलो. ही दोघेही आपल्या आईच्या कुशीत झोपी गेली असतानाच रात्रीच्या अंधारात काही मंडळी तेथे आली व कुणाच्याही नकळत, अगदी त्या आईलाही कळू न देता त्या दोघांपैकी एकाचे त्यांनी तो झोपेतच असताना तोंड दाबले. त्याने आवाजही करु नये ही काळजी घेत त्यांनी त्याला उचलले आणि निर्दयीपणे ते निघून गेले. रात्रीच्या त्या अंधारात कुणालाही काहीच कळले नाही परंतू पहाट झाली तेव्हा त्या आईचे, त्या उरलेल्या बाळाचे आणि परीसरातील आम्हा सर्वांचे जगच बदलले होते.
पहाट झाली नि अगदी वेगळ्याच रुदनाने सर्वांना कळून चुकले की काहीतरी मोठी गडबड झालीय. सर्वात मोठा धक्का बसला तो त्या आईला. आपले बाळ हरविले म्हणून ती बिचारी कासावीस होऊन सैरभैर झाली. तिला काहीच सुचेना. ते दुसरे बाळ देखील कावरे बावरे झाले. एव्हाना झालेला प्रकार सर्वांच्याच लक्षात आला. सारी शोधाशोध सुरु झाली. परंतू काही केल्या ते बाळ कुठे गेले हे कुणालाच कळले नाही. ही घटना झाल्यामुळे परीसरातील वातावरणच बदलून गेले. आपला भाऊ आपल्याला सोडून गेला, ताटातूट झाली हे कदाचित त्या राहीलेल्या बाळाच्या लक्षात आले असावे आणि म्हणून त्याचे बागडणेच बंद झाले. त्याचे शांतपणे पडून राहणे हाच त्याचा दिनक्रम सुरु झाला. आपला जिवलग भाऊ आपल्यापासून दूर झाला याचा परीणाम कदाचित त्याच्यावर एवढा झाला की त्याचे खाणे देखील कमी झाले. पहाटे काका त्याला नेहेमीप्रमाणे खायला द्याचे पण तो खायचाच नाही. निमूटपणे तो शांत रहायचा. मग त्याची आईच त्याला जबरदस्तीने दूध पाजायची परंतू तरीदेखील त्याला बळ येईना. सर्वांना लाड करावा वाटेल असा गुबगुबीत असलेला तो त्याच्या भावाच्या विरहात रोड होऊ लागला आणि आम्हा सर्वांनाच चिंता वाटू लागली. सतत दूर कुठेतरी बघतोय आणि कुणाची तरी मनापासून वाट बघतोय असे वाटायचे. काका, मिनी आणि त्या पलीकडच्या काकू यांना तर या गोष्टीचे फारच वाईट वाटत होते. या दोघांसोबतचा त्यांचा आनंदी दिनक्रमच बदलून गेला. मिनी देखील त्याच्या सोबत खेळायला जायची. त्याला मांडीवर घ्यायची परंतू तो मांडीवरुन उतरुन जाई. शांत शांत राही. मग मिनीला देखील रडू यायचे. खरे तर सायंकाळी काकूंना देखील रडू यायचे. त्या तेवढ्याच प्रेमाने त्याच्याशी बोलायच्या परंतू आता ते बाळ पार कोमेजून गेले होते व कोणताही प्रतिसाद काकूंना मिळत नव्हता. सारे काही बदलून गेले होते. एकाच मातेच्या उदरातून जन्म घेतला असल्याने त्याला आपल्या भावाचा विरह सहनच होईना. परीसरात सर्वांनाच खिन्न वाटत होते. पण अचानक एके दिवशी गम्मत झाली.
मी कार्यालयातून घरी परत आलो पण मला कार घराजवळ आणताच आली नाही. परीसरातील मंडळी घोळका करुन उभे होते. मला कळेना काय झाले. मी जरा चिंतेतच गाडीतून उतरलो व तिकडे जायला लागलो. परंतू मला हसण्याचे व टाळ्या वाजविण्याचे आवाज येऊ लागले. तेथे जाऊन बघतो तर काय? तो हरविलेला भाऊ परत आला होता व आपल्या भावासोबत त्याची धमाल सुरु होती. ज्यांनी त्याला उचलून नेले होते त्यांनाही त्याची अवस्था बघवत नव्हती म्हणे. ते बाळ सारखे रडत होते, काही खात नव्हते. कदाचित त्यालाही आपल्या भावापासून झालेली ताटातूट सहन झाली नव्हती. म्हणून त्यांनी त्याला परत आणून सोडले. पण आता परत आल्यावर त्या दोन्ही भावांची परत धमाल सुरु झाली व त्यांची आई ती बिचारी कुत्री आपल्या आपल्या दोन्ही बागडत्या पिल्लांकडे समाधानाने बघत होती.
प्राण्यांच्या जगात एकाच मातेच्या उदरातून जन्मलेली दोन भावंडे ताटातूट सहन करु शकत नाही हे आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवले. परंतू माणसांच्या जगात मात्र संपत्तीच्या, इगोच्या, जबाबदारी झटकणाऱ्या प्रवृत्तीच्या किंवा स्वार्थाच्यापोटी भावंडांचीच काय परंतू जन्मदात्या आईची पण ताटातूट सहज सहन करणारे व त्यातही आनंदी राहणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. त्यांना काय म्हणावे?
सुरुवातीला मला कथा वाचताना माणसांची कथा वाटली. पण शेवटी कळले की ही कथा कुत्री आणि तिच्या पिल्लांची आहे.
ReplyDeleteआई कोणत्याही प्राण्यांची असो पण भावना त्याच कायम आहेत.
खूप सुंदर लिहिले आहे सर.
Very nice article Sir as usual
ReplyDeleteVery nice article Sir as usual
ReplyDeleteSo nice..i like each and every blog.My mind is always overwhelmed.
ReplyDeleteSo superb subject..
Very nice,sir, mother is always kind, loving and caring, true
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteछान
ReplyDeleteVery nice sirji.... suprabhat sirji
ReplyDeleteवाह छान, माणसांचीच बाळं वाटली, पण पोलीस तक्रार वगैरे आले नाही मग लक्षात आलं काही तरी गडबड आहे. पण शेवट छान आहे
ReplyDeleteछोट्या छोट्या गोष्टीतून मोठा संदेश देण्याची कला आपल्यात आहे. फार छान.
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण.।।
ReplyDeleteअमिताभ बच्चन यांचा 'बदला'.. साधारण 2 वर्षांपूर्वी पहिला होता. टॉकीज मधुन बाहेर येतांना असे वाटत होते की आत्ता लगेचच पुन्हा बघावा..
ReplyDeleteकारण असे की एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून आपण सिनेमा बघत असतो आणि शेवटी दिग्दर्शक त्या कथेला मात्र वेगळीच कलाटणी देतो. त्यामुळे ती कलाकृती अनन्यसाधारण ठरते.
हिच अनुभुती हा लेख वाचतांना जाणवली.
लेखकानी अत्यंत तल्लखतेने वाचकांना खिळवून ठेवले आहे. पुढे काय होणार ह्याची उत्सुकता आपल्याला सारखी जाणवत रहाते.. आणि वाचताना वेगवेगळ्या भावभावनांचा अनुभव येतो.
लेखातील प्रत्येक पात्राशी आपण भावनिक स्तरावर जुळत जातो आणि त्यांच्या सोबतीने आनंदी / हळवे होत असतो.
ह्यातच लेखकाच्या शब्दांची ताकद कळून येते.
लेखाच्या शेवटी लेखक एक गुगली टाकतो आणि आपण यष्टीचित होऊनही .. वाचक म्हणुन लेखकाला मनापासून दाद देतो.
एक समाधानी स्मितरेषा चेहर्यावर घेऊन आपण हा लेख परत एकदा नव्या दृष्टीने वाचायला घेतो आणि लेखाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
Sir wacht astana watnari hurhur shewat wachun sampli positive shevet khup chaan watla
ReplyDeleteआता तरी माणसाने माणसाला प्राण्यावरून हिणवणे सोडून दिले पाहिजे.
ReplyDeleteप्रा. डा. संजय नीलकंठ पाटील, वाशीम
मी ही कथा मुलीला वाचून दाखवली आणि तिच्या निरागस नजरेतून जे भाव उमटले ते बघून माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या...... किती सुदंर विचार मांडलाय सर तुम्ही..... अप्रतिम......
ReplyDeleteKhup sunder vichar, as usual,
ReplyDeleteसुंदर लेख, good morning sir
Dr.Rohini Deshmukh
नेहमीप्रमाणे मस्तच...छानच लिहीतो तू ...'ताटातूट' खूप आवडली..
ReplyDeleteखूपच सुंदर ! शेवट नेहमीप्रमाणेच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा...
ReplyDeleteVery nice write up.
ReplyDeleteशेवट छान केला.
ReplyDelete