थोडा है थोडे की जरुरत है @ 23.02.21

जमीनीवरचा मालक

अनेक वर्षांपासून आम्ही एका ठराविक दुकानातून किराणा आणतो. माझे वडील तेथूनच आणायचे आता मी देखील तेथूनच किराणा आणतो. फॅमीली डॉक्टर असतात त्या प्रमाणे ते आमचे फॅमीली किराणा दुकान आहे. अर्थात आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे असे फॅमीली किराणा दुकान असते. नाही म्हणायला गावात मोठे मॉल सुरु झाल्यावर तेथून एक दोन महिने आम्ही किराणा आणून बघितला. परंतू दर महिन्याला साधारण तीन हजार रुपयाचा आणला जाणारा किराणा एकदम साडे सहा हजार रुपयाचा झाला असे बघितल्यावर त्या चकचकीत मॉलचे वैशिष्ट्य कळले. ट्रॉली घेऊन निघालो की वस्तू दिसायला लागतात आणि त्या सहजच त्या ट्रॉलीमधे टाकल्या जातात. शिवाय किराणा खरेदी करताना परीवार सोबत असेल तर मग प्रत्येक जण आपल्या मर्जीने वस्तू ट्रॉलीत आणून टाकतो त्यामुळे अचानक किराण्याची किंमत दुप्पट होते. दोन महिन्याच्या या किराणा खरेदीच्या कौतुकानंतर मी परत माझ्या नेहेमीच्या दुकानात जाणे सुरु केले आणि आपली परंपरागत पद्धती म्हणजे कार्यालयात जाताना यादी आणि पिशव्या देऊन देणे कार्यालयातून परतताना किराणा घरी घेऊन येणे सुरु केली. एरवी कार्यालयाच्या वेळी दुकान उघडून बराच वेळ झालेला असतो. परंतू मागच्या महिन्यात मी रविवारी किराण्याची यादी अगदी सकाळी द्यायला गेलो मला एक अत्यंत वेगळी आणि आश्चर्यात टाकणारी गोष्ट बघायला मिळाली. योगायोगच होता तो. त्या गोष्टीमुळे माझा त्या दुकान मालकांकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच बदलला. ते किराणा दुकान चालविणाऱ्या त्या दोन भावांचे मला फार कौतुक वाटले एखादा व्यवसाय चालविताना किती वेगळ्या वेगळ्या भूमिका लोक जपतात याचा देखील प्रत्यय आला. शेवटी चांगला किंवा वाईट माणूसच असतो. कुणी आपला व्यवसाय करीत असताना स्वतःला मालक समजून वागतो किंवा कुणी या आमच्या किराणा मालकाप्रमाणे जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. माझ्या या किराणा दुकानाच्या मालकांची जी कृती मला त्यांच्या दुकानात फार लवकर गेल्यामुळे बघायला मिळाली, ती त्यांच्या जमिनीवर असण्याचे द्योतक होती. खरे तर गेल्या काही वर्षात त्यांनी त्यांच्या दुकानाचा एवढा चांगला विकास केलाय की त्यांची परीस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. दुकानात अनेक ग्राहक त्यांनी जोडले, मालाची प्रत, गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न त्यांनी केला, दुकानात एव्हाना वीस नोकर मंडळी देखील आहेत. एवढे मोठे दुकान झाल्यावरही त्यांनी जाणीवपूर्वक ठरविलेली ती गोष्ट खरे तर आश्चर्यात टाकणारी होती परंतू त्याबद्दलचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण मला फारच भावले

त्या दिवशी दुकानात मी पोहोचल्यावर इतर ग्राहक कुणीच नव्हते पण दुकानाचे दोन्हीही मालक, ते दोघे भाऊ हातात झाडू घेऊन चक्क दुकान झाडत होते. मला सुरुवातीला असे वाचले की नोकर मंडळींना यायला उशीर झाला म्हणून कदाचित हे असे करत असावे. पण परिस्थीती वेगळी होती. सर्व नोकर मंडळी आलेली होती ती सर्व वेगळ्या कामात गुंतलेली होती. परंतू हे दोघे भाऊ, एक दुकानाच्या आतला भाग एक दुकानाच्या बाहेरचा भाग झाडत होते. त्यांचे ते झाडणे सुरु असे पर्यंत मी बाहेरच उभा राहीलो. त्यापैकी एका भावाने दुकानाबाहेरचा भाग झाडून काढला मग आतले झाडणे होईपर्यंत तो माझ्या बाजूने उभा राहीला. मला त्यांच्या त्या कृतीबद्दल कुतुहल वाटले होते कारण नोकर मंडळी आली असताना त्यांनी हे काम केले होते. मी त्याला सहज विचारले, सगळे नोकर आले असताना तुम्ही दुकान का झाडतायं? त्यावर त्याने जे उत्तर दिले ते म्हणजे त्या दोघांची त्यांच्या दुकानाबद्दलची श्रद्धा त्यांची जमिनीवरचा मालक राहण्याची इच्छा दर्शविणारे होते

तो मला म्हणाला, सर ही आमची गेल्या अनेक वर्षांची पद्धत आहे. त्या वेळे पासून जेव्हा आमच्या दुकानात एकही नोकर नव्हता. त्यावेळी देखील आम्ही दोघे भाऊ याच प्रकारे दुकान झाडायचो. पुढे तुमच्या सारखे अनेक ग्राहक येऊ लागले आणि दुकान मोठे झाले पण आम्ही दोघांनी आमच्या वडीलांनी सांगितलेला हा मंत्र कायम लक्षात ठेवला. दुकान कितीही मोठे झाले तरीदेखील सकाळी पहिल्यांदा ते आपणच झाडायचे. त्याप्रमाणे आम्ही दोघे आजही अश्याच प्रकारे दुकान झाडतो. त्यानंतर मग दिवसभरात दोन तीन वेळा नोकर मंडळी झाडतात. परंतू दिवसाची सुरुवात दुकान झाडूनच आम्ही करतो. कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते आणि आम्ही जी गोष्ट मानतो ती म्हणजे काहीही झाले तरी चालेल परंतू दुकानाचे मालकपण डोक्यात जायला नको. ते डोक्यात गेले की आपला दुकानाशी संबंध संपतो आपण हवेत जातो. असे होऊ नये म्हणून आम्ही मुद्दाम हे काम करतो. तो आमचा नियमच आहे. आम्ही जास्त काही शिकलो नाही सर, पण हे मात्र शिकलो आणि ते पाळतोय

एवढ्या मोठ्या दुकानाचे मालक असणारे, जवळपास वीस नोकर मंडळींना पगार देऊन त्यांना रोजगार पुरविणारे, लाखो रुपयांचा माल दुकानात ठेवणारे, हजारो ग्राहकांच्या घरात किराणा पुरविणारे, अत्यंत चांगल्या सांपत्तिक स्थितीत असलेले ते दोघे भाऊ एका छोट्याश्या परंतू महत्वपूर्ण कृतीने जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रचंड यशाचे कदाचित हेच कारण असावे. पैसा, संपत्ती, पद, या गोष्टी माणसाला बरेच वेळा त्याचे मुलभूत वर्तन बदलायला भाग पाडतात. यापैकी काहीच कायम स्वरुपी नाही हे देखील विसरायला भाग पाडतात. त्यामुळे या अस्थायी गोष्टींच्या भरीस पडून अनेक वेळा माणसाचा स्थायी लोकांना जोडणारा, सांभाळणारा, सहसंवेदना जपणारा स्वभाव बाजूला पडतो माणूस बदलतो. तो दुकानदार म्हणाला त्याप्रमाणे हवेत जातो. जमेल त्या पद्धतीने सोबतच्या प्रत्येकाचा अपमान करु लागतो. माझेच काय ते खरे या भ्रमात राहून तीव्र शब्दांचा वापर करुन अपमानास्पद वागणूक देऊ लागतो त्याचा परीणाम एकच होतो, तो म्हणजे असा व्यक्ती मालक बनून त्याच्या सोबत्यांपासून तूटून एकटा पडतो. अर्थात त्याला हे पैसा, संपत्ती किंवा पदाच्या गुर्मीत कळतच नाही. परंतू या अस्थायी गोष्टी त्याची कधी ना कधी साथ सोडतात त्यानंतर त्या गोष्टींव्यतिरीक्त केवळ तोच एकटा उरतो कारण तोवर त्याच्या मालकी अवतारामुळे सारे त्याला सोडून गेलेले असतात किंवा दुखावून तटस्थ झालेले असतात. यापेक्षा एवढ्या मोठ्या दुकानाचे मालक असूनही रोज सकाळी, पदरी अनेक नोकर असूनही, आपले दुकान स्वतः झाडून जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करणारे हे दुकान मालक फार योग्य कार्य करीत आहेत असे वाटते.

या दुकानदारांचे अश्या प्रकारे जमिनीवर राहणे बघितल्यावर एकच वाटले, रोजच्या जीवनाकडे जर डोळसपणे बघितले ना तर आपल्याला किती गोष्टी सहज शिकायला मिळतात. माणसाचे नाते परमेश्वराने जमिनीशीच बांधलेले आहे. हवेत जाणे ही त्यासाठी क्वचित घडणारी रोमांचकारी गोष्ट असू शकते. परंतू त्याला सर्वात सुरक्षित, स्थिर आणि सक्षम तो जमिनीवर असतानाच जाणवते. म्हणूनच आपल्या मालकपणाचा अहं जोपासण्यापेक्षा जमिनीवरचा मालक बनून लोकांना जोडणारा, सांभाळणारा सहसंवेदना जोपासणारा सोबती बनणे केव्हाही फायद्याचेच राहील, होय ना?






Comments

  1. सरजी,व्यावसायिक यशाचे गमक,, सुंदर मांडणी

    ReplyDelete
  2. सहज, सोप्या शब्दात खूप काही.
    आपल्या डोळस निरीक्षण क्षमतेला वंदन.

    ReplyDelete
  3. खुप छान निरीक्षण व शब्दांकन..

    ReplyDelete
  4. शेवटी, गड्या आपला गाव बरा!
    हेच खरे.
    तेथेच मानवी मूल्य अजुनही अबाधित आहेत.
    सर,आपल्या वैचारिकतेला नमन.

    ReplyDelete
  5. सर, नेहमीप्रमाणेच खूप सुरेख लिहिले आहे. आपले निरीक्षण आपल्याला अनेक गोष्टी शिकवित असतात.

    ReplyDelete
  6. छान लिहिलंय. आणि चित्रं अगदी चपखल आहे.

    ReplyDelete
  7. हो हे अगदी खरं आहे. आपलं नाळ हे जमीनीशच जोडलं गेलं असल्यामुळे, आपण जमीनीवर च राहणं योग्य आहे. हवेत गेलेल्याला पुन्हां जमीनीवरच यावं लागतं.
    खुप छान लीहीलं आहे. सुंदर.
    शुभेच्छा🙏🙏

    ReplyDelete
  8. Salute tumhala sir.
    Dr. Rohini Deshmukh

    ReplyDelete
  9. Wa wa very nice, and grassroots reality.

    ReplyDelete
  10. Salute sir Ji.... apratim....

    ReplyDelete
  11. आपल्या वैचारिकतेला नमन.
    खुपच छान.
    शेवटी, गड्या आपला गाव बरा हेच खरे.
    कारण नैतिक मूल्ये ही तेथेच जपली जात आहेत अजूनही.

    ReplyDelete
  12. Thanks to all for acknowledging the greatness of those two brothers

    ReplyDelete
  13. सर, फार सुरेख विचार आणि मांडणी सुद्धा.

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18