थोडा है थोडे की जरूरत है @ 16.01.18
कॉर्पोरेट
आपल्या देशात विविध क्षेत्रांचा विचार करता उद्योग जगतातील खाजगी क्षेत्र ज्याला आपण सामान्यपणे कॉर्पोरेट सेक्टर म्हणून ओळखतो ते एक महत्वाचे क्षेत्र आहे. परंतू सार्वजनिक व सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेकांना या कॉर्पोरेट जगताविषयी एका वेगळ्या प्रकारचे कुतुहल आहे. मुळात त्याबद्दल माहिती नसल्याने किंवा या क्षेत्रात सहजगत्या प्रवेश मिळत नसल्याने या क्षेत्राबद्दल एक प्रकारची गूढता देखील वाटत राहते. प्रचंड पैसा व प्रचंड काम अश्या स्वरुपात वावरणारे हे सारे लोक आपल्या कार्यामधे फार जास्त व्यग्र असल्याने सामाजिक व्यवस्थांमधे त्यांचा वावर कमी असतो. ही सारी मंडळी आपल्या वर्तुळात वावरत असतात ज्या वर्तुळात सामान्य माणसाला प्रवेश करणे जरा दुरापास्त असते. प्रचंड काम असल्याने एक तर या मंडळींकडे वेळ नसतो व त्यासोबतच प्रचंड पैसा मिळत असल्याने त्यांची जीवन जगण्याची शैली फारच वेगळी असते. ब्रॅन्डेड वस्तू वापरणे, ब्रॅन्डेड दुकानांमधे जाणे, पैसा भरपूर असल्याने त्याच्या अनुरूप सर्व बाबींची आवड जोपासणे, वरचेवर परदेशात जाणे या सर्व गोष्टींमुळे त्यांचे जीवन समाजातील वरच्या स्तरामधे असते व त्याची सवय झाल्याने त्यांना इतर स्तरांमधे वावरणे देखील अवघड जाते. यासोबतच या क्षेत्रात अतिशय जास्त स्पर्धा असल्याने व स्वतःला सिद्द केले तरच टिकाव लागणार असल्याने यांचे लक्ष काम, व्यवसाय, नफा, त्याचे फायदे या सर्व बाबींकडे जास्त असते. काहीही झाले तरी नफा मिळायलाच हवा अश्या पद्धतीची मानसिकता या कॉर्पोरेट जगतातील प्रत्येकाच्या मनात जाणिवपूर्वक रुजविल्यामुळे हे सर्व लोक त्या व्यवस्थेनुरुप वागायला लागतात जी अत्यंत स्वाभाविक बाब आहे. सार्वजनिक क्षेत्रात कर्मचाऱ्याने कसेही काम केले तरी देखील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढणे. परंतू कॉर्पोरेट सेक्टरमधे कितीही काम केले तरी सर्वात सोपी गोष्ट असते ती म्हणजे कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढणे. या गोष्टीमुळे परफॉर्म अॉर पेरीश (सिद्ध करा किंवा नष्ट व्हा) हा कायदा या क्षेत्रात लागू असतो व पाळल्याही जातो व म्हणूनच येथे कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी नफा सर्वोच्च स्थानी असतो. असे हे क्षेत्र, काम व नफ्याशी जोडलेले असल्याने कार्यपद्धतीतील गुप्तता व स्वतंत्र अस्तित्व हे महत्वाचे घटक या क्षेत्राला अधिकच गूढ बनवत राहतात. या क्षेत्राचे वर्णन करणारा कॉर्पोरेट नावाचा एक चित्रपट देखील प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी बनविला होता. या चित्रपटातील वास्तववादी चित्रीकरणामुळे व कथावस्तूमुळे हा चित्रपट चर्चेत राहीला होता. असले चित्रपट किंवा या कॉर्पोरेट जगतातील गूढता यामुळे या जगताबद्दल सामान्य माणसाच्या मनामधे काही भावना तयार होतात.
सर्वात महत्वाची भावना म्हणजे कॉर्पोरेट जगत हे भावनांचा किंवा मनाच्या संवेदनशीलतेचा विचार अजिबात करीत नाही. किंबहुना भावनिक असणे ही कॉर्पोरेट जगताला न परवडणारी गोष्ट आहे. येथे केवळ आणि केवळ व्यवहार बघितला जातो व संपुर्णतया व्यावहारिक प्रवृत्ती येथे जोपासली जाते. मनाचा तरलपणा, संवेदनशीलता, इतरांना भावनिक पातळीवर समजून घेणे वगैरे सारख्या बाबी येथे टिकू शकत नाही किंवा अश्या मनोवृत्तीचा व्यक्ती या जगतात टिकत नाही असा समज सामान्यतः सार्वजनिक किंवा इतर क्षेत्रांमधे कार्य करणाऱ्या लोकांचा असतो. दुसरी भावना म्हणजे या मंडळींजवळ अमाप पैसा असतो व त्यामुळे पैश्याच्या बळावर काहीही करता येते ही या सर्व मंडळींची भावना असते. पैसा आहे त्यामुळे तो वाटेल तसा खर्च करणे व मजा करणे हे जीवनाचे सूत्र यांनी स्विकारले असल्याने या मंडळींच्या सामाजिक जाणिवा बोथट झालेल्या असतात असाही एक समज कॉर्पोरेट क्षेत्राच्या बाहेरील लोकांचा असतो. परंतू प्रामुख्याने रुढ झालेल्या या दोन्ही समजांमधे फार तथ्य आहे असे नाही. खरे तर एका वेगळ्या कार्यप्रणालीला समर्पित असलेले व कामाच्या व्यस्ततेमुळे पावलोपावली सामाजिक दृष्टीने उपलब्ध नसल्याने या सर्व मंडळींबद्दल झालेले हे पूर्वग्रहदूषित मत आहे. कॉर्पोरेट जगतामधे कार्य करीत असताना देखील समाजिक जाणिवा जीवित ठेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजाभिमुख कार्य केलेल्या अनेक लोकांची माहिती आपल्याला मिळू शकते. सामाजिक कामांसाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मर्यादित काळामधे देखील हे लोक कधी कधी खूप मोठे काम करतात. असेच एक मोठे काम मला नुकतेच ऐकायला मिळते.
सामाजिक जाणिवा अत्यंत सजीव असलेल्या भुपेंद्र मुजुमदार नावाच्या एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरने त्याच्या कंपनीत कार्य करणाऱ्या ३०० इंजीनियर मंडळींकडून करुन घेतलेल्या एका अभुतपूर्व कामासंबधी मला माहिती मिळाली. समाजातील दिव्यांग मुलामुलींबाबत व त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचारांनी प्रेरीत असलेल्या मुजुमदार साहेबांनी त्यांच्या संपर्कातील काही दिव्यांगांच्या शाळांना भेटी दिल्या. तेथील मुला मुलींना शिक्षण घेताना काय अडचणी निर्माण होतात याबाबत त्यांनी माहिती घेतली व त्यानंतर त्यांनी तेथील व महाराष्ट्राच्या विविध भागातील अश्या शाळांमधील अंध मुलामुलींसाठी एक अतिशय कल्पक उपक्रम त्यांच्या कंपनीतील इंजीनियर्सच्या मदतीने करुन घ्यायचा ठरविले. मुजुमदार साहेबांनी अतिशय प्रामाणिक भावनेतून मांडलेली भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी मनापासून उचलून धरली आणि त्यानंतर सुरु झाला कॉर्पोरेट जगतातल्या कल्पक लोकांचा एक अफाट उपक्रम. ३०० इंजीनियर्सचे वेगवेगळे गट निर्माण करण्यात आले. त्यापैकी साधारण वीस ते तीस लोकांनी वेगवेगळ्या रविवारी सुटीच्या दिवशी कंपनीमधे चार ते पाच तास येण्याचे कबूल केले. कंपनीमधे साउंडप्रुफ असलेल्या केबीन्सचा वापर एका वेगळ्या सामाजिक कामासाठी केल्या गेला. तीन तीन लोकांची चमु तयार करण्यात आली. एक व्यक्ती बोलणारा, एक ऐकणारा व एक तंत्रज्ञ म्हणून काम बघणारा. काम सुरु झाले..
काय होते ते काम? या सर्व कॉर्पोरेट जगातील इंजीनियर्स लोकांनी सहा महिन्यात अंध मुलांसाठी आठवी, नववी व दहाव्या वर्गाचा सर्व अभ्यासक्रम रेकॉर्ड करुन उपलब्ध करुन दिला. संपुर्ण अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व अंध विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाला. इतकेच नाही तर त्यांना समजतील अश्या प्रकारे त्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी सोबत रेकॉर्ड केले. एक अभुतपूर्व काम… अर्थात हे केवळ रेकॉर्डींग नव्हते तर त्याचं अंध मुलांना कळेल असे स्पष्टीकरण द्यायचे होते. उदा. घनता समजावून सांगताना एक लोखंडी व एक प्लास्टीकचा चेंडू तीन मजली इमारतीहून टाकला तर लोखंडी चेंडू प्लास्टीकच्या चेंडूपेक्षा लवकर पडेल व त्यावरुन त्याची घनता जास्त आहे हा प्रयोग समजावून सांगायचा. सामान्य मुलांना हे कळणे सहज शक्य आहे परंतू अंध मुलांना तिसरा मजला किंवा उंची हे काहीच ठाऊक नाही कारण उंची किंवा खोली त्यांनी बघितलेलीच नाही. मग हे उदाहरण कसे समजावून सांगायचे. बुद्धीमान इंजिनियर्स ते…परफॉर्म करणे त्यांना चांगले येत होते. त्यांनी मग चेंडू ऐवजी लोखंडी व प्लास्टीकच्या खुळखुळ्याचा वापर केला व तिसऱ्या मजल्यावरुन पडताना त्यांच्या लवकर व उशीरा येणाऱ्या आवाजाच्या आधारे लोखंडाच्या व प्लास्टीकच्या घनतेतील फरक समजावून सांगितला. अश्या प्रकारे संपुर्ण अभ्यासक्रमाचे रेकॉर्डींग करुन व अंध मुलांना समजेल या पद्धतीने त्याचे स्पष्टीकरण देऊन तीन वर्षाचा संपुर्ण अभ्यासक्रम सुटीच्या दिवसांचा सदुपयोग करुन या सर्व कॉर्पोरेट जगतातील लोकांनी बनवून दिला. सामजिक संवेदना यापेक्षा वेगळी काय असू शकते व आणखी कोणत्या चांगल्या प्रकारे ती प्रकटीत होऊ शकते?
कॉर्पोरेट जगतामधे अश्या प्रकारे कार्य करणारे खूप लोक आहेत. मुळात क्षेत्र कोणतेही असो, सामाजिक संवेदना जागृत ठेवून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काहीना काही करणारा माणूस महत्वाचा. त्याला क्षेत्राची चौकट नसते. जसे पाच तास कार्यालयात थांबण्याचे बंधन आहे तर महिन्यातून बावीस दिवस बायोमेट्रीक्स मशीनमधे ५ तास २ सेकंद अशी उपस्थिती नोंदविणारे व्यावहारिक कर्मचारी देखील सार्वजनिक क्षेत्रात सापडतात, केवळ पैश्याचा विचार करीत पॅकेज ते पॅकेज यामधेच वावरणारे कर्मचारी कॉर्पोरेट जगतातही सापडतात…तसेच महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतरही विद्यार्थिनी सुरक्षित घरी जाईपर्यंत आपल्या घरी न जाणारे कर्मचारी देखील सार्वजनिक क्षेत्रात आढळतात व अंध मुलांसाठी अभ्यासक्रम बनविणारे कर्मचारी कॉर्पोरेट जगतातही आढळतात. सामाजिक दृष्टीने संवेदनशीलता माणसामाणसावरच अवलंबून आहे हेच खरे, क्षेत्र कोणतेही असो!!
Comments
Post a Comment