My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

"बुध"वासी महिला, "मंगळ"वासी पुरुष
"आम्हा बायकांचे असेच असते, आम्ही असाच विचार करतो. पुरुषांनी त्याला नावे ठेवावी, त्याची टिंगल करावी किंवा त्यावर जोक्स बनवून व्हाॅट्स ॲपवर पाठवावेत.. आम्ही आहोत अशाच आहोत. परंतू आमच्या या स्वभावाबद्दल आता आम्हाला न्यूनगंड वाटत नाही. वाहिन्यांवरील जशी 'मेन वील बी मेन' ही जाहीरात पुरुषांना आवडते व पुरुष मंडळी त्यावर हळूच माना डोलावतात त्याचप्रमाणे आमच्या स्वभावातील हे वेगळेपण आम्ही आता सकारात्मकतेने स्विकारायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत आमचे हे वेगळेपण आमच्या मनात एक 'कमतरता' म्हणून जाणवून दिल्या जायचे. परंतू या पुरुषांच्या बरोबरी करण्याच्या शर्यतीमधे स्वतःची कायम पुरुषांसोबत तुलना करण्याची वाईट खोड आम्हाला लागली. काही बाबतीत ती बरोबरी होऊ शकतच नाही कारण नैसर्गिकरित्या आम्हाला परमेश्वराने वेगळे बनविलेले आहे. परंतू या शर्यतीची एकच बाजू कायम आम्ही विचारात घेतली. पुरुषांची बरोबरी करायची व ती करु न शकल्यावर न्यूनगंडाला सामोरी जायचे. परंतू याच प्रकारची एक वेगळी शर्यत देखील आहे हा विचार आमच्या मनातच आला नाही. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यामधे पुरुष स्रीयांची बरोबरी करु शकत नाहीत परंतू त्याबाबतचा आत्मविश्वास आमच्यात आम्ही निर्माणच होऊ दिला नाही. याचे कारण शर्यतीची ही दुसरी बाजू आमच्या लक्षातच आली नाही. परंतू आता आम्ही या 'पुरुषांची बरोबरी करा' नावाच्या स्पर्धेत धावणे बंद केले आहे. स्री म्हणून आमचे वेगळेपण आम्हाला जपता येतेय. त्यासाठी स्री म्हणून आमच्या सर्व सक्षमतांबद्दल आम्ही अभिमान बाळगणे सुरु केले आहे. पुरुषांची बरोबरी करुन त्यांची कामे आम्ही करायची तर मग त्यांनी काय करायचे? पण या विचाराला पुरुषांपेक्षाही महिलांनीच समजून घेण्याची गरज आहे. स्रीमुक्ती चळवळीच्या प्रक्रीयेमधे 'पुरुषांशी बरोबरी साधायची' हा विचार स्विकारतानाच स्रीयांची स्वतः ची कमतरता स्विकारणारी मानसिकता दिसून पडली. पुरुषांप्रमाणे वावरायचे, त्यांची कामे आपण करायची वगैरे बाबी करताना नकळतपणे पुरुषांना आदर्श प्रमाण म्हणून स्विकारल्या गेले व त्यामुळेच अजूनही खरे सक्षमीकरण झालेलेच नाही. पुरुषांप्रमाणे नोकरी करुन पैसे कमावणारी स्री ही संसार सांभाळून परीवाराला जगण्याचे बळ देणाऱ्या गृहीणीपेक्षा उजवी ठरते हे मुळात महिला सक्षमीकरणाच्या चळवळीचे अपयश आहे असे मला मनापासून वाटते. यासंबंधीचे उद्गार नोकरी करणाऱ्या महिलांकडूनच गृहिणींबद्दल काढले जातात. नोकरीच्या निमित्ताने  काही वाचन वगैरे करणारी किंवा साहित्यात रमणारी एखादी महिला एखाद्या गृहीणीच्या बुध्यांकाबद्दल शंका उपस्थित करते तेव्हा आश्चर्य वाटायला लागते. तिला या गोष्टीचा गर्व असतो की पुरुष ज्या प्रमाणे राजकारण, साहित्य असल्या विविध विषयांवर चर्चा करतात त्याप्रमाणे ती चर्चा करु शकते व म्हणून ती एखाद्या गृहिणीपेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही स्रीया अनेकवेळा वेगवेगळ्या फॅशन्स बाबत, पदार्थांबाबत किंवा दागिन्यांबाबत चर्चा करतो ती वायफळ असते हे महिलांनीच ठरविले आहे त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. स्रीयांना नैसर्गिकरित्या आवडीचे असलेले विषय हे महत्वाचे नाहीत असा विचार ज्या पुरुषी मानसिकतेने आजवर या समाजात रुजविला त्याला आम्ही 'पुरुषांची बरोबरी' या स्पर्धेतील महिलाच मोठा व घट्ट करीत आहोत." महिला सक्षमीकरणासंबंधीच्या एका खाजगी चर्चेमधे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली नव्या पिढीची प्रतिनीधी असलेली एक मुलगी हे विचार मांडत होती. त्यानंतर एका गृहिणीने बोलणे सुरु केले.
"या मुलीचे काही बाबतीत खरे आहे पण काही गोष्टी मात्र मला पटत नाहीत. माझा अनुभव वेगळा आहे. मी देखील आता नोकरी करण्याचे ठरविले आहे. नोकरी केली की किंमत राहते असे माझ्या लक्षात आले आहे. घरची कितीही कामे केली, कितीही कष्ट केले किंवा कितीही काळजी केली तरी देखील महत्व नोकरी करणाऱ्यांनाच दिले जाते कारण त्या पैसा कमावतात. पैसा हा सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही पैसा कमावून आणा, तुम्हाला सर्व बाबी माफ आहेत. तुम्ही परंपरा पाळा, सणवार करा, येणाऱ्या जाणाऱ्यांचे करा सोबत जबाबदारी देखील सांभाळा. हे सारे करुनही महत्व मात्र पैसे कमावणाऱ्यांनाच. त्यांना सारे काही माफ. नोकरीच्या निमित्ताने किंवा त्याचे कारण सांगून अनेक बाबींमधून सूट. यापेक्षा नोकरी केलेलीच बरी. ही गृहिणींना कमी लेखण्याची मानसिकता काही बदलत नाही आणि येणाऱ्या काळात बदलणारही नाही. पुरुषांसारखे पैसे कमावले की मग खरी किंमत मिळायला लागते हे कटू असले तरी सत्य आहे." यानंतर बोलण्याची पाळी होती एका उतारवयीन काकूंची.
"या सगळ्या नव्या जगातील समस्या आहेत. महिला या पुरुषांची बरोबरी करु शकत नाही हे खरेच आहे. नवमतवादाच्या नावावर आणि स्त्री मुक्तीच्या चळवळींच्या नावाखाली इतके वर्षे जोपासलेली परंपरेची नाळ तोडण्याचा हा प्रयत्न आपल्याला परवडणारा नाही. या सर्व प्रकारांचा जरा बारकाईने विचार केला तर असे लक्षात येईल की यातही नुकसान स्रीयांचेच आहे. किंबहुना आता आपल्यातच वेगवेगळे गट तयार व्हायला लागले. आपण केवळ एकत्र असल्याचे दाखवितो. शिक्षण प्राप्त करुनही आपल्यातील असूया संपलेली आहे की उच्चशिक्षित महिलांमधे ती जास्त तीव्र असते याचा विचार करा. एखाद्या व्यवस्थेत पंधरा स्रीया कार्य करीत असतील तर त्यांच्यात पाच किंवा सहा गट असतात व हे गट एकमेकांशी पराकोटीच्या असूया व मत्सर जोपासित असतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला सभोवताली दिसतील. आपण महिला वेगळ्याच आहोत. या नवमतवादामुळे या असूया जास्त वाढीला लागल्यात कारण सर्व बंधनांना झुगारुन स्वतंत्र आयुष्य जगू पाहणाऱ्या महिलांना परंपरा पाळणाऱ्या महिला शत्रूच समजतात. सुधारक विचारांच्या जिन्स पॅंट व टाॅप घालणाऱ्या सुनेला सासऱ्यापेक्षा तिच्या सासुचे टोमणे जास्त ऐकावे लागतात हे सत्य नाकारता येत नाही. माझेही म्हणाल तर असे कपडे घालून आणि पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करुन काही सुधारणा होत नाही असे माझे ठाम मत आहे. महिला या पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत. ते वेगळेपण सर्वात  आधी स्विकारायला हवे. इतका समाज प्रगत असूनही अत्याचार होण्याचा धोका अजूनही स्रीयांनाच आहे.  किंबहुना तो वाढतोच आहे. रात्री ११ वाजता घरचा मुलगा सहजच कामाच्या ठिकाणाहून घरी येऊ शकतो परंतू मुलीला येता येईल का? त्यावेळी समानतेच्या आणि बरोबरीच्या गप्पा करता येतील का? नाही ना? या सर्व गोष्टी सुरक्षित घराच्या चार भिंतींमधे बसून करणे फारच सोपे आहे परंतू अश्या तोकडे कपडे घालण्यामुळे ओढवलेल्या प्रसंगांना सामोरे जाताना काय यातना होऊ शकतात याचा अंदाजही मनाचा थरकाप उडवितो. ज्या दुर्दैवी महिलांना हे भोगावे लागते त्या कधीच समानतेच्या वगैरे गोष्टी करीत नाहीत कारण त्यांना भोगावे लागलेले दुःख केवळ त्यांनाच समजू शकतं." यानंतर एक प्रखर स्रीवादी चळवळीतील कार्यकर्ती भगिनी बोलू लागली.
"मला तुमच्या विचारांचे अतिशय आश्चर्य वाटते आणि तीव्रतेने जाणीव होते की पुरुषी वर्चस्वाच्या विचारांनी आपल्याला पूर्णतः जखडून टाकलेले आहे. स्रीयांचे वेगळेपण जपण्यासाठी ते कोणत्या महत्वाच्या गोष्टींमधे टिकले आहे तपासायला नको का? बांगड्या, दागिने, हळदीकुंकु, स्वयंपाक, श्रुंगार यासारख्या बाबींमधे स्रीयांचे वेगळेपण आणि महत्वाचे निर्णय, शासनाची धोरणे, समाजाचा विचार या सर्व बाबतीत पुरुषांची मक्तेदारी हाच मुळात मानसिक गुलामगीरीचा प्रकार आहे. स्रीयांचे वेगळेपण टिकविण्यासाठी त्या वेगळेपणाला अर्थ व दर्जा असण्याची प्रथमतः गरज आहे."... वगैरे वगैरे.... चर्चा पुढे सुरु राहिली.
जागतिक महिला दिन साजरा होत असताना स्रीयांच्या भारतीय समाजातील अस्तित्वासंबंधीचे हे विविध विचारप्रवाह आहेत. हे सर्व विचार बरोबर किंवा चूक या निर्णयासाठी नसून स्त्री-सक्षमीकरणाच्या प्रक्रीयेतील विविध दिशा आहेत हे आपण सर्वांनी समजण्याची गरज आहे व या सर्व विचारांवरील सखोल चिंतनानंतर आपले मत मांडण्याची गरज आहे. या सकारात्मक चिंतनातूनच आपल्या समाजाला चांगली दिशा प्राप्त होऊ शकते व चांगल्या संकल्पना दृढ होऊन परीपक्व विचारसरणीचा समाज निर्मित होऊ शकतो. कारण स्रीया "बुध"वासी असल्या आणि पुरुष "मंगळ"वासी असले तरीही या दोघांच्या परस्परांमधील सकारात्मक सहयोगानेच पृथ्वीचे भले होणार आहे.





Comments

  1. एक स्त्री म्हणून मी असे बोलणे कदाचीत योग्य दिसणार नाही ,पण खरच पुरुष खूप सहज स्त्रियांचे वर्चस्व बरेचदा स्वीकारतात,,त्रास खरच स्त्रियामधे सिद्ध करायला होतो ,जास्त ताकत तिथेच लावावी लागते ...कदाचित माझ्याकडूनही असं होतं असाव..पण चिंतन करून बदल आणण्यास काहीच हरकत नाही ..सुंदर लेख सर !!!!अभिनंदन !!!!

    ReplyDelete
  2. मला वाटतं,स्री पुरूष समानतेची सुरूवात आपल्या घरापासून करावी स्री म्हणून निर्णय प्रक्रियेत ,आर्थिक बाबतीत स्वातंत्र्य , मिळणारा सन्मान तपासून पहावा.दुसरीचा नवरा बायकोला किंमत देत असेल ,तिच्या कष्टाची जाणीव असेल तर टिंगल न करता कौतुक करता आले पाहिजे.आपल्या मुलांनाही स्री सन्मान शिकविला पाहिजे.पण खंत याची वाटते की आई येथे आजही कुठेतरी कमी पडते आहे .आरतीताईंचे म्हणणे खरेआहे स्रियांमध्येच सिध्द करणे अवघड आहे मानसिक गुलामगिरी संपवायला हवीहेच खरे! विचार करायला लावणारा आजच्या स्री सक्षमीकरणावर नेमके बोट ठेवणारा सुंदर लेख . सर अभिनंदन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23