Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

फिनीक्स...परत उडण्याच्या तयारीत
ग्रीक पुराणांमधे फिनीक्स नावाच्या पक्षाचे एक वेगळे महत्व आहे. हा पक्षी सूर्याशी संबंधित मानलेला असून आयुष्याच्या शेवटी मानवाप्रमाणे त्याच्या देहाची राख होते असा संदर्भ दिल्या जातो. परंतू मानवाच्या शरीराप्रमाणे त्याची राख होत असली तरी देखील त्या राखेतून नवा फिनीक्स पक्षी जन्माला येतो व तो परत गगन भरारी घेतो. अश्या प्रकारे राखेतून जन्म घेणारा व दुर्दम्य आशावादाचे प्रतिक मानल्या गेलेला हा एक अद्भूत पक्षी आहे. हा संदर्भ काल्पनिक असला तरी ग्रीक साहित्याचा प्रभाव असलेल्या इंग्रजी साहित्यामधे बरेच वेळा काही विशिष्ट माणसांच्या बाबतीत तो वापरला जातो. ज्या व्यक्तीचे आयुष्य काही कारणांमुळे किंवा विपरीत परीस्थितीमुळे विपन्नावस्थेला पोहोचते व ज्या व्यक्तीच्या जीवनाची पार धुळधाण होते अश्या व्यक्तीने त्याच्यावर ओढावलेल्या संकटापुढे डगमगून न जाता परत नवी उभारी घेऊन आयुष्यात उत्तुंग यश प्राप्त केल्यास त्याने फिनीक्स पक्षागत जन्म घेऊन उड्डाण केले असे म्हणतात. जिवनातील संकटांवर मात करुन पुढे सरसावणारी अशी जिगरबाज माणसे जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला सक्षमपणे जीवन जगण्याची प्रेरणाच प्राप्त होत असते. अश्याच एका फिनीक्सरुपी माणसाची गोष्ट आज सांगणार आहे ज्याच्या प्रकल्पाच्या कार्यालयाची अकस्मात राखरांगोळी झाली, जो प्रकल्प दुर्गम भागातील आदीवासी मुला मुलींना स्वयंपुर्ण बनविण्यासाठी राबविला जात होता, ज्या प्रकल्पामागील त्याग व समर्पण वादातीत होते. परंतू असे सगळे असतानाही परमेश्वर कुणाचीही परीक्षा घेऊ शकतो या उक्तीला खरी ठरविणारी घटना या प्रकल्पामधे घडली आणि बघता बघता राख रांगोळी झाली...ती देखील अतिशय जलद गतीने झाली कारण बांबु जळायला वेळ कितीसा लागतो? आदीवासी तरुण तरुणींना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणारा बांबू...आग लागल्यावर मात्र भस्मसात झाला. मेळघाटातील धारणीजवळ लवादा नावाच्या गावाला घडलेली घटना..
संपुर्णपणे भस्मसात झालेले संपुर्ण बांबु प्रकल्पाचे कार्यालय डोळ्यात आसवे आणून त्याचे निर्माते सुनील देशपांडे, निरुपमा देशपांडे व त्यांची अतिशय समर्पित चमू बघत होती... काय वाटले असेल या मंडळींना त्या वेळी...जवळपास पंचेवीस वर्षांचा तो संघर्षमय प्रवास झरझर डोळ्यासमोरुन गेला असणार! जवळपास पंचेवीस वर्षांपूर्वी लवादा नावाच्या छोट्याश्या गावात पोहोचलेले देशपांडे दांपत्य. कोणाचीही ओळख नाही, जवळ फार पैसे नाहीत केवळ एक अभूतपूर्व स्वप्न उराशी बाळगून सुरु झालेला प्रवास. ध्यास एकच.. या परीसरातील आदीवासी तरुण तरुणींसाठी काहीतरी करणे. त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी जाणिव निर्माण करणे व त्यासोबतच त्यांना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी मदत करणे. परंतू साधनांची उपलब्धता नसताना हे कसे होणार हा यक्ष प्रश्न होता. मग उपलब्ध साधनांमधूनच काय करता येईल याचा विचार सुरु झाला आणि या विचाराचे फलीत म्हणजे सुनील व निरुपमा देशपांडे यांचे बांबुशी जुळलेले नाते. या परीसरात मिळणाऱ्या व पिकणाऱ्या बांबुच्याच मदतीने हा सन्मानमार्ग निवडण्यात आला. अनेक संघर्षाचे क्षण आले, दबाव निर्माण झाले, ज्यांना आदीवासींचा विकास नको होता अशी देखील काही मंडळी होती त्यांच्याकडून त्रासही झाला, अतिशय कठीण परीस्थीती ओढावली परंतू कामामागील हेतू उदात्त व पारदर्शी असल्यामुळे या सर्व संकटावर मात करण्यासाठी त्याच परीसरातील काही सच्चे सहकारी देखील मिळाले. संपुर्ण बांबू केंद्राची स्थापना झाली. त्यामधे वेगवेगळ्या वस्तू बनायला लागल्या. आदिवासी मुला मुलींना प्रशिक्षण दिले जाऊ लागले, ती मुले तयार होऊ लागली. बांबुच्या शोभेच्या वस्तू, मानचिन्हे, राख्या या सारख्या वस्तुंची विक्री देखील सुरु झाली. गावागावात केंद्रे सुरु झाली. सहकारी तत्वावर कामे व्हायला लागली. बघता बघता अनेक आदिवासी परीवार स्वयंपूर्ण व्हायला लागले. पैसा प्राप्त व्हायला लागल्याने सन्मानाने जगता यायला लागले. त्यामधूनच व्यसनधिनता कमी झाली. एका बांबु प्रकल्पामुळे अनेक आदिवासी परीवार माणसांचे स्वरुप प्राप्त करायला लागले. परंतू या पंचेवीस वर्षांच्या खडतर प्रवासात स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून हा प्रकल्प सुनिल देशपांडे व निरुपमा देशपांडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिनीक्स पक्षाप्रमाणे पुनरुज्जीवित केला व यशाच्या दिशेने अग्रेसर केला. या सर्वांची स्वप्ने मोठी असल्याने व ती साकार करण्याचा दुर्दम्य आशावाद यांच्या ठायी असल्याने संपुर्ण बांबु केंद्राच्या पुढे जाऊन ग्रामीण भागातील जीवनकलांना नव्याने जीवनदान देऊन त्यातून रोजगार निर्मिती करण्यासाठी ग्राम विद्यापीठाची निर्मिती हे या चमुचे पुढचे पाऊल नुकतेच पडले. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटनही झाले. आदिवासी व ग्रामीण तरुण तरुणींना विविध ग्रामकलांच्या प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नव्या प्रकल्पाचा कारभार देखील बांबु प्रकल्पाच्या कार्यालयातून च चालायचा. एका नव्या उभारीने कामे सुरु होती. आणि अचानक...
इलेक्ट्रीकच्या वायर्स मधे शॉर्ट सर्कीट झाले आणि ठिणगी पडली. देशपांडे दांपत्याची परीक्षा घेणारीच ती ठिणगी होती. क्षणात त्या ठिणगीचा वणवा झाला. संपुर्ण बांबु केंद्राच्या कामाचे प्रतीक असलेले ते सुबक कार्यालय देखील पूर्णतः बांबुचे बनले होते. आग पसरली आणि आग विझविण्याचे प्रयत्न होईस्तोवर काही क्षणात ते संपुर्ण कार्यालय, तेथील फर्नीचर, कागदपत्रे, नव्या प्रकल्पाचे दस्तऐवज, काही बांबुच्या वस्तू सारे काही भस्मसात झाले. काही क्षणातच साधारण पंधरा लक्ष रुपयांचे नुकसान डोळ्यासमोर झाले व त्याबाबत काहीही करता आले नाही. पाणावलेल्या नजरांनी त्या राखरांगोळीकडे बघताना सुनील देशपांडे काय विचार करीत असतील? परमेश्वराचे त्यांची परीक्षा घेणे काही अद्याप संपलेले नाही. ठीक आहे, एक परीक्षा और सही. डोळ्यात आलेले पाणी सहकारी मंडळींच्या नजरेस न पडू देता त्यांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले. परत काम सुरु झाले. त्यांच्या या प्रकल्पाबद्दल असलेल्या प्रामाणिक व समर्पित भावना ओळखून समाजातून मदत देखील उभी झाली. अश्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी बरेच लोक पुढे येणे ही एक या निमित्ताने बघायला मिळालेली अत्यंत सकारात्मक बाब आहे. माणूस नव्या जगात आत्मकेंद्री व्हायला लागला आहे, इतरांसाठीच्या संवेदना शिल्लक उरलेल्या नाहीत अश्या पद्धतीच्या वातावरणामधे सुनिल देशपांडे यांच्या संपुर्ण बांबु केंद्राला समाजाच्या विविध स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारची मदत उपलब्ध होणे ही प्रचंड आशादायी गोष्ट आहे. निस्पृहतेने व पारदर्शीपणे समाजपयोगी कार्य केल्यास समाज पाठीशी उभा राहतो हे या निमित्ताने ठळकपणे दिसलेले समाजाच्या चांगुलपणाचे द्योतक आहे व मनाला उभारी देणारे चित्र आहे. 
घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती घेण्यासाठी सुनीलजींना फोन केला तेव्हा त्यांनी शांतपणे घटनेची माहिती दिली व काही वाक्यांनंतर लगेच नव्या प्रकल्पाबद्दल, ग्रामविद्यापीठाबद्दल बोलणे सुरु केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात आपले विद्यापीठ पूर्णपणे कार्यान्वित होईल हे मोठ्या आनंदाने त्यांनी सांगितले. आवाजात तीच आश्वासकता, तोच उल्हास, तोच आत्मविश्वास आणि तीच जीद्द जाणवित होती. क्षणार्धात मला जाणविले..फिनीक्स परत उडण्याच्या तयारीत आहे. या असल्या उड्डाणांना बघून आपल्याला देखील सकारात्मकतेने जगण्याची उर्मी प्राप्त होते. त्यांच्या सारखे समाजपयोगी कार्य जरी आपल्याला करता आले नाही तरीही या असल्या समर्पित माणसांना, त्यांच्या प्रकल्पांना परीवारासह भेटी देऊन इतरांसाठी कसे जगता येते व त्यामधून काय आनंद मिळतो हे कळू शकते. त्यामधूनच आपल्यालाही जमेल तसे योगदान देता येऊ शकते. अश्या चांगुलपणाच्या श्रुंखलाच या समाजाला एकत्र ठेवण्यास मदत करु शकतात व आपल्या जगण्याला खरा खुरा अर्थ प्राप्त करुन देऊ शकतात.




Comments

  1. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
    वाळवंटातून चालता स्वस्तीपद्मे रेखती
    अशी माणसे विरळाच! छान लेख सर!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23