My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

बालकमंदीर ते प्ले-स्कुल
नुकतेच नागपूरला माझ्या भावाच्या मुलाचा एका प्ले-स्कुल मधे प्रवेश झाला. (म्हणजे ॲडमिशन झाली) ही सारी प्रक्रीया मोठी मजेदार होती. त्या प्ले-स्कुलमधे प्रवेशासाठी सर्वप्रथम वेगवेगळे फॉर्मस भरुन घेण्यात आले. यामधे मुलाची व आई वडीलांची संपुर्ण माहिती म्हणजे अगदी आधार कार्ड नंबर पासून तो पॅन नंबर पर्यंत सर्व माहिती भरुन सादर करण्यात आली. या सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतर, आई वडीलांच्या माहितीच्या आधारे, त्यांच्या मुलास त्या प्ले-स्कुलमधे प्रवेशासाठी पात्र समजण्यात आले. त्यानंतर त्याला मुलाखतीसाठी वेळ देण्यात आला. त्याच्या मुलाखतीसोबत पालकांची देखील मुलाखत घेण्यात येईल असे सांगितले. या मुलाखतीच्या तयारीसाठी साधारण पंधरा दिवसांचा वेळ देण्यात आला. या पंधरा दिवसात त्या बाळाची तयारी सुरु झाली. ती देखील सारी गंमत होती. त्याला नाव विचारल्यावर तो स्वतःचे नाव डोरेमॉन सांगायचा. त्यानंतर तर त्याने त्यात बदल करुन बाहुबली सांगणे सुरु केले. त्याच्या आई वडीलांनी ठेवलेले छान अबीर हे नाव काही केल्या तो सांगेना. कसेबसे दहा दिवसांनंतर त्याचा मुड असला तेव्हा तो नाव सांगे. अश्या सर्व बाबींचे अडथळे पार करीत त्याचे मायबाप त्याची तयारी करुन घेत होते. मुलाखतीच्या दिवशी छान तयार होऊन, आजी-आजोबांना नमस्कार करुन हे वीर प्ले-स्कुलच्या मुलाखतीसाठी शाळेत पोहोचले. मुलाखत सुरु झाली. त्याची मुलाखत घेणाऱ्या मॅडमने त्याला विचारले, बेटा तुझे नाव काय? हा म्हणाला, मी नाही सांगत. तिने विचारलेल्या जवळपास दहा प्रश्नांना त्याने हेच उत्तर दिले. त्या दिवशी त्याचा मुड नव्हता. पिटुकलं बाळ ते.. त्याला त्या मुलाखतीशी काय देणे घेणे होते. मग त्याच्या मॅडमनेच त्याला वेगवेगळ्या गप्पांमधे गुंतवून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर आई-वडीलांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि साधारण तासाभराने ही मुलाखत प्रक्रीया संपली. त्यानंतर या सर्व मुलाखतीचे असेसमेंट केल्यानंतर प्रवेश निश्चित करण्यात येईल असे सांगण्यात आले. जवळपास आठवड्याभराच्या उत्कंठेनंतर किंवा काळजीनंतर त्या छोट्या डोरेमॉन किंवा बाहुबलीचा प्रवेश निश्चित झाला आणि आनंदी आनंद झाला. प्ले-स्कुल नावाच्या या पहिल्या शैक्षणिक पद्धतीमधे त्याचा प्रवेश झाला. हे सारे ऐकत असताना या लहान मुलाचा बाप, माझा लहान भाऊ साधारण पस्तीस वर्षांपूर्वी तिवसा नावाच्या छोट्याश्या गावात शैक्षणिक प्रणालीतील बालकमंदीर नावाच्या पद्धतीमधे प्रवेशित झाला तो दिवस मला ठळकपणे आठवला.
एका मोठ्या वाड्याच्या ओसरीमधे भरणारे ते बालकमंदीर. त्या नावातच मंदीर असल्याने एक प्रकारची सात्विक भावना त्यामागे होती. प्रवेशासाठी मुलाखत वगैरे प्रकार नव्हता. बालकमंदीराच्या बाई घरी आल्या आणि पोरगा तीन वर्षाचा झाला असेल तर त्याला उद्यापासून पाठवून द्या असे सांगून गेल्या. आई-वडीलांच्या शैक्षणिक, आर्थिक किंवा सामाजिक दर्जाचा संबंध मुलांच्या शिक्षणाशी नसतो अशी मान्यता असलेला समाज त्याकाळी अस्तित्वात होता. त्यामुळे ज्याप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी जाऊन मुलाला पाठवून द्या असा निरोप देणाऱ्या बाई एखाद्या शेतकऱ्याच्या, शिंप्याच्या किंवा मेंढपाळाच्या घरी जाऊन देखील हाच निरोप देत होत्या. त्यामुळे ज्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदीरात (पैसे देऊन रांग वेगळी व बिनापैसेवाल्यांची वेगळी अश्या प्रकारचा भेद करणाऱ्या काही श्रीमंत मंदीरांचा अपवाद वगळता) सर्वांना प्रवेश असतो त्याच प्रमाणे या मुलांच्या मंदीरात मुख्याध्यापक, शिंपी किंवा मेंढपाळ या सर्वांच्या मुलांना प्रवेश होता. ही सारी मुले एकत्रीतपणे त्या विद्यामंदीरात आपल्या आयुष्याचे प्राथमिक धडे गिरवित होते. तेथे कोठलाही ठराविक अभ्यासक्रम वगैरे नव्हता. मुलांना छान छान गाणी शिकवीली जायची, सुंदर व अर्थपूर्ण कविता शिकविल्या जायच्या, धावाधावीचे आणि पकडापकडीचे खेळ शिकविले जायचे. मग डब्बा खाण्याची सुट्टी व्हायची. डब्बा खाण्याआधी -वदनी कवळ घेता- हा श्लोक म्हणल्या जायचा. मुख्य म्हणजे हे सारे करीत असताना समाजाच्या सर्व स्तरांमधील मुले एकत्रीत असत व त्यामुळे त्यांच्या मनात एकोप्याची भावना आपसुकच जोपासली जात असे. बालकमंदीर या शिक्षण पद्धतीमधे ही सर्वसमावेशाची बाब फार प्रामुख्याने व आपुलकीने परंतू सहजच जोपासली जात असे. आपण सारे एक आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी विशेष दिन साजरे करण्याची किंवा रॅलीज काढण्याची आवश्यकता नव्हती. त्या बालकमंदीराच्या एकंदर कार्यपद्धतीतूनच हे सारे संस्कार लहान मुलांच्या मनामधे स्थापित केले जात असत. याचा सर्वोत्तम परीणाम असा आहे की त्या काळात मनावर झालेले संस्कार व त्यामधून झालेली मैत्री आजही सर्वश्रेष्ठ आनंद देते व तो आनंद उपभोगताना आज प्राप्त झालेला पैसा, पद किंवा प्रतिष्ठा अजिबात आड येत नाही. तिवसा गावात स्वाभिमानाने हॉटेल चालविणारा मित्र अजूनही त्याच आत्मियतेने भेटतो कारण ती मैत्री त्या बालकमंदीरातील आहे ज्याचा आधार निरामय निरागसता होता व कायमस्वरुपी राहणार आहे.
साधारण पस्तीस वर्षांमधे जीवनाचा हा प्रवास त्या बालक मंदीरापासून तो प्ले-स्कूल पर्यंत पोहोचला आहे. या नव्या प्रणालीतही अनेक गोष्टी चांगल्या आहेत. वेगवेगळे आधुनिक प्रयोग या नव्या व्यवस्थांमधे केले जातात. मुलांना चांगल्या प्रकारे मॅनर्स आणि एटीकेट्स शिकविले जातात. आधुनिक जगात वावरण्यासाठी व त्यांच्यामधे न्युनगंड निर्माण होऊ नये म्हणून मुलांना स्मार्ट बनविण्याचे सर्व हातखंडे या शाळांमधून वापरले जातात ही फार चांगली बाब आहे. अडचण एकच आहे की या सर्व शाळांचे प्रवेश तेथील व्यवस्थांनुसार आर्थिक निकषांवर आधारित आहेत. त्यामुळे बरेच वेळा समाजातील उच्चभ्रू वर्ग या शाळांचे शुल्क भरण्याची क्षमता बाळगून असतो. समाजात सध्या सर्वच बाबी आर्थिक निकषांवर मोजल्या जात असल्याने शैक्षणिक क्षेत्रात देखील असे होणे स्वाभाविक आहे. परंतू त्या बालकमंदीरांमधून दिला जाणारा खराखुरा समानतेचा पाठ मात्र या व्यवस्थांमधे उपलब्ध नाही. येथे आर्थिक निकषांची जी समानता आहे ती बालमनावर सामाजिक समानतेचा संस्कार करु शकत नाही. हाच या प्रक्रीयेमधील सर्वात मोठा दोष आहे. परंतू बदलत्या सामाजिक स्थितीमधे नाईलाजाने याचा स्विकार करावा लागतो हे सत्य नाकारता येत नाही. कारमधून शाळेत येणारा व पायी चालत शाळेत येणारा असे दोन्ही विद्यार्थी जोपर्यंत एकत्र सोबत बसून शिक्षण घेणार नाहीत तोवर समानता मुलांच्या मनात स्थापित होऊ शकत नाही. या विचारांना काही मानसशास्त्रज्ञ विरोधही करतात किंबहुना मुलांच्या मनात यामुळे न्यूनगंड तयार होतो असली कारणे पुढे केली जातात जी माझ्यामते फार संयुक्तिक नाहीत. पस्तीस वर्षांपूर्वी ज्या बालकमंदीरांमधून माझ्या पिढीने शिक्षण घेतले त्या पिढीला बालपणीच्या मित्रांशी वागत असताना प्रेमाच्या निकषाखेरीज इतर कोणतेही निकष मनातही येत नाहीत. हे घट्ट संस्कार त्या बालकमंदीराचे आहेत. प्ले-स्कुलच्या या नव्या व्यवस्था स्विकारताना व त्यांचे अवास्तव समर्थन करताना एक महत्वाची बाब आपण विसरलो आहे.
बालकमंदीरात किंवा प्ले-स्कुलमधे जाणाऱ्या मुलाला त्याकाळात किंवा आजच्याही काळात त्याचे नाव विचारल्यावर तो तेव्हा शिवाजी किंवा हनुमान सांगायचा, आज तो डोरेमॉन किंवा बाहुबली सांगतोय. या सरळ व साधा अर्थ असा आहे की काळ बदलला असला तरी बालकांमधील निरागसता कायम आहे. ही निरागसता सामाजिक एकोप्याच्या स्वभावामधे परावर्तित करण्याचे ध्येय आपल्या सर्वांपुढे असायला हवे. आपण निर्माण केलेल्या वेगवेगळ्या निकषांमुळे ही निरागसता विभाजित होऊ नये यासाठी मनोमन प्रयास करायला हवेत... मग ते बालकमंदिरातून होवोत किंवा प्ले-स्कुलमधून... दोन्ही समानच ठरतील.

   

Comments

  1. खूप छान! विचार करायला लावणारे , अंतर्मुख करणारे लेख . अभिनंदन!

    ReplyDelete
  2. अगदी......आपण स्वतः सुध्दा नकळत या प्रक्रियेत भाग घेतोय ...सुंदर लिखाण ...नेहमी प्रमाणे

    ReplyDelete
  3. अगदी......आपण स्वतः सुध्दा नकळत या प्रक्रियेत भाग घेतोय ...सुंदर लिखाण ...नेहमी प्रमाणे

    ReplyDelete
  4. अप्रतीम लेखन वाचन करतांना आपन स्वतः त्याचा एक भाग होतो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23