Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

माणूस नावाचा हिंस्त्र पशू
ते सगळे माझ्यावर तुटून पडले. सुरुवातीला मी विरोध करण्याचा प्रयत्न केला. एका दोघांना इजा देखील केली पण त्यांच्या संख्येपुढे आणि शस्रांपुढे माझा टिकाव लागला नाही. मी समोर बघत असताना माझ्या पाठीवर एका माणसाने घाव केला. त्याच्या हातातला अणकुचीदार भाला त्याने माझ्या पाठीत घुसविला होता. मरणप्राय वेदना मला झाल्या. मी वळून त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच एका माणसाच्या हातातला मोठा दगड माझ्या कपाळावर येऊन आदळला. माझे कपाळ फुटले, रक्ताची धारच लागली. त्या दगडाच्या हल्ल्याने माझा प्रतिकार जरा कमी झाला. हे बघताच लोकांचे ते कोंडाळे हातातील सर्व शस्त्रे घेऊन माझ्या आणखी जवळ यायला लागले. मी आता स्वतःला वाचविण्याच्या पवित्र्यात आली होती. या लोकांना चुकवून आणि जमेल तेथून उडी मारुन पळून जाण्याची संधी मी शोधत होती. परंतू या सर्व लोकांनी माझ्याभोवती वर्तुळच केले होते. त्यातच आणखी वाईट म्हणजे तीन चार लोकांच्या हाती लांब काडीला बांधलेले आगीचे पलीते होते. त्यांनी ते मला आता चटके द्यायला लागले. माझा धीर खचायला लागला होता. माझी बाळे माझी वाट बघत होती. खरे तर त्यांच्याच भूकेची चिंता मला सतावित असल्याने मी या गावात आली होती. या गावातल्या लोकांच्याच प्रतापामुळे आमच्या आसपासच्या अन्न मिळविण्याच्या संधी संपल्या होत्या म्हणून मी या गावात आली होती. पण येथे येणे माझ्या जीवावर बेतेल असे मला लक्षातच आले नाही. ही माणसे मला पकडतील व माझ्यावर सगळे मिळून अश्या प्रकारे हल्ला करतील असे मला वाटलेच नव्हते. मी जमेल तसे माझ्या बाळांसाठी खायला काहीतरी मिळविन व हलकेच निघून जाईन या बेताने येथे आली होती. पण चुकून यांच्या तावडीत मी सापडली. आगीचे चटके सहन न होऊन मी समोर असलेल्या एका शरीरयष्टीने कमजोर वाटणाऱ्या माणसाच्या दिशेने झेप घेतली. परंतू त्याची शरीरयष्टी जरी कमजोर असली तरी त्याच्या जवळ एक तिक्ष्ण भाला होता. खस्सकन त्याने तो भाला माझ्या पोटात खुपसला. प्राणांतिक वेदना होऊन मी एक मोठी किंकाळी मारली व धाडकन जमिनीवर पडले. मी जमिनीवर पडल्याक्षणी माझ्या आजुबाजूचा तो शस्त्रधारी जमाव माझ्यावर तुटून पडला. भाले, तलवारी, दगड जे हातात असेल त्याचा मारा माझ्यावर झाला. दोनच मिनीटे हे सारे सुरु राहिलेले मला जाणविले ... आणि मग अचानक मी माझ्या शरीरापासून वेगळी झाली. अलगद हवेत तरंगावे त्याप्रमाणे मी हळूहळू काही उंचीवर पोहोचली. मी माझ्या शरीरातून बाहेर पडलेली आत्मारुप संवेदना होती हे माझ्या नंतर लक्षात आले. दोन मिनीटाच्या तीक्ष्ण घावांमुळे झालेल्या अतीव वेदना अचानक थांबून गेल्या होत्या. तेथे जमलेल्या लोकांचा कोलाहल मात्र थांबलेला नव्हता. माझ्या देहातून प्राण कधीच निघून गेलेले आहेत हे त्यांना कळतच नव्हते. माझ्या शरीराची शस्त्रांनी खांडोळी करणे त्यांनी सुरुच ठेवले होते. प्रत्येकजण अत्यंत क्रुरपणे माझ्या शरीरावर घाव घालत होता व त्याचा माझ्याबद्दलचा राग व्यक्त करीत होता. प्रत्येक घाव माझ्या शरीरावर केल्यानंतर रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या. त्या रक्ताच्या उडण्यासोबतच हे सर्वजण आरोळ्या मारीत होते. एक मोठा पराक्रम गाजविला होता त्यांनी मला अश्याप्रकारे ठार मारुन. मी गतप्राण झाली आहे हे काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले. आत्मारुपाने मी हे सारे बघत होते. आपले काय चुकले याचाच विचार माझ्या मनात सुरु होता. त्याक्षणी माझ्या आत्मारुपालाही हादरवून टाकणारी घोषणा या टोळक्याच्या म्होरक्याने केली. त्याने माझा वध म्हणजे त्या सर्व माणसांनी गाजविलेला एक मोठा पराक्रम आहे असे सांगितले. त्यामुळे हा पराक्रम साजरा करायला हवा असे तो म्हणाला. पण कशाप्रकारे? माझे आत्मारुपही हादरुन गेले. त्याने सांगितले की आता माझ्या त्या शरीराचे अजून बारीक बारीक तुकडे केले जातील आणि मग ते सारे शिजवून सर्वांनी मिळून त्याचे भक्षण करायचे.. केव्हडा हा क्रुरपणा! माणसाला इतके क्रुर होताना मी प्रथमच बघत होते. त्या शरीराशी माझा संबंध संपलेला असतानाही त्याची ज्या प्रकारची विटंबना करण्याचे या सर्व माणसांनी योजीले होते ते सर्व अतर्क्य व समजण्यापलीकडचे होते. खरोखरीच माझा गुन्हा इतका मोठा होता? खरोखरीच माझ्या बाळांचे पोट भरण्यासाठी मी या गावात येऊन अन्न मिळविण्याचा प्रयत्न करणे इतके वाईट होते? ती पाळी देखील माझ्यावर या माणसांनीच आणली नव्हती का? आमच्या परीसरात घूसून यांनी अनधिकृतपणे आमचे अन्न पळविले नव्हते का? म्हणजे यांचे अन्न हेच खाणार व आमचेही हेच पळविणार. असे झाल्यास माझ्यासारख्या आईला माझ्या बाळांचे पोट भरण्यासाठी नाईलाजाने या गावात येऊन अन्न मिळविण्याचा प्रयत्न करावा लागतो. परंतू त्याची इतकी भयानक शिक्षा? इतका राग आणि त्यामधून फलद्रुप होणारा इतक्या टोकाची क्रुरता. या साऱ्या बाबी माझ्या समजण्यापलीकडच्या होत्या. मला माझी बाळे उपाशी राहिल्याचे दुःख तर होतेच पण काळजी नव्हती कारण आईखेरीजही ती लवकरच जगायला शिकतील याची मनोमन खात्री होती. परंतू आपल्या शरीराची आणखी विटंबना होऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना मी करीत होते....आणि परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली.
माझ्या शरीराचे तुकडे करण्याच्या हेतूने ही मंडळी माझ्या त्या शरीराकडे सरसावित असतानाच त्याठिकाणी पोलीस व डॉक्टर्सची चमू येऊन पोहोचली. पोलीसांनी त्यानंतर स्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्याच संरक्षणात डॉक्टरांच्या चमुने माझे शवविच्छेदन केले व त्यानंतर माझ्या शरीराला दफन करण्यासाठी माझे शव गाडीत टाकण्यात आले. अचानक तेथील लोकांनी पुन्हा गलका सुरु केला. हे सर्व लोक माझ्या शरीराची मागणी करीत होते. याचे कारण मला ठार मारणे हा त्यांच्यासाठी एक शौर्याचा क्षण होता. त्यांनी ठरविल्याप्रमाणे माझ्या शरीराचे तुकडे करुन व त्याचे भक्षण करुन त्यांना त्यांचे शौर्य गाजविणे साजरे करायचे होते. पोलीस त्यांनी तसे करणे अनधिकृत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत राहीले. बराच काळे हे भांडण सुरु राहिले. काही तासांनंतर लोक ऐकेनासे झाल्यावर पोलीसांना बलाचा वापर करावा लागला. त्यांनी चिडून लाठीचार्ज सुरु केला. त्यानंतर मात्र तो जमाव पांगला व माझे कलेवर घेऊन पोलीसांची चमू निघाली. गावाला लागून असलेल्या जंगलातच माझ्या शरीराचे पोलीसांच्या कडक बंदोबस्तात दफन करण्यात आले. त्यानंतर पुढील आठ दिवसांसाठी गावातील लोक पुन्हा काही उपद्रव करु नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. अश्या रितीने माझे शरीर धरणीमातेच्या कुशीत विसावले. मला मात्र अजूनही मुक्ती मिळालेली नाही कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत. माणूस इतका हिंस्त्र कसा काय होऊ शकतो? खरे तर तो माझा गुणधर्म आहे.
होय माझा. माणसाला माणूसपण सोडून पशू होताना मी प्रथमच बघितले होते. माझे काय चुकले होते? माझ्या बाळांना खाण्यासाठी माझ्या परीसरात असलेली जनावरे याच माणसांनी मारुन खाल्ली होती. म्हणून माझ्या बाळांची भूक शमविण्याकरीता या गावात येऊन मी एका बकरीवर हल्ला केला होता. पण या नागालँडमधील मेडझीफेमा नावाच्या गावातील माणसांनी माझ्यासारख्या एका वाघिणीला निर्घृणपणे भाल्यांनी टोचून टोचून व आगीचे चटके देऊन ठार मारणे हे माणूसपणाचे लक्षण नाही. हे तर पशुत्वच आहे. एकंदरीत या पृथ्वीतलावर आमच्यासोबत माणूस नावाचा एक हिंस्त्र पशुच राहतो हे मला कळून चुकले.


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23