My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

एकटी
दिवसभराची सगळी धावपळ करताना मला काही नाही वाटत परंतू सायंकाळ झाली की मन खिन्न व्हायला लागतं. उगाचच हुरहुर वाढते. दिवसभराच्या कामांमधे लोकांसोबत वावरत असताना आठवणही येत नाही. परंतू दिवेलागणीच्यावेळी मात्र हमखास आठवण येते. सायंकाळी घरात कुणीच नसतं. मोठा मुलगा तर त्याच्या नोकरीच्या निमित्ताने परगावीच आहे. लहान मुलगा त्याच्या कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. देवापुढे दिवा लावून झाल्यावर दिवाणखान्यातील त्या फोटोसमोर उदबत्ती लावताना मात्र डोळे पाणावतात. मग त्या फोटोशीच बोलते आणि एक प्रश्न रोज नित्य नियमाने विचारते, मला एकटीला सोडून पुढे का निघून गेलात? अश्या प्रकारे जाण्याचे काय वय होते का तुमचे? चाळीसाव्या वर्षी माझ्या पदरी दोन लहान लहान मुले, आमच्या चरीतार्थाला लागणारी गुंतवणूक आणि हे घर सोपवून तुम्ही निघून गेलात.. या मोठ्या घरात सायंकाळच्या वेळी एकटे बसून रोज हे विचार माझ्या मनात येतात. हे असताना कशी असायची संध्याकाळ माझी... झर्रकन् मन भूतकाळात गेले.
सायंकाळ म्हणजे धावपळीचा काळ. साहेब आता थोड्याच वेळात कार्यालयातून घरी येणार. त्यांच्या आधी मुले येणार. घराच्या फाटकापासूनच आईच्या नावाचा पुकारा करीत दोघेही घरात येणार. येतानाच आईला काय काय खायला मागायचे हे ठरलेले असायचे. आल्या बरोबर वेगवेगळ्या पदार्थांच्या फर्माईश. ते सारे पुरे करायचे. ते होत नाही तर लगेच त्यांची खेळायला जायची तयारी. त्यासाठी त्यांना तयार करुन देणे हे देखील एक मोठे काम होते. मुले घराबाहेर पडून त्यांना टाटा करीत नाही तोच साहेबांची गाडी दाराशी हजर. दिवसभराच्या कामाने थकून घरी आलेला नवरा निदान काही वेळ तरी शांत बसावा अशी माझी अपेक्षा. पण तसे काहीच घडायचे नाही. सकाळी साडेनऊ पासून ते सायंकाळी साडेसहा पर्यंत काम करुन आलेला माझा नवरा थकत कसा नाही याचेच नवल वाटायचे. बॅग माझ्या हातात देतानाच पुढचे प्लॅन ठरलेले असायचे. हा मित्र येणार आहे, त्यांना बोलावले आहे, त्यांच्यासाठी मस्तपैकी हे कर, त्यांना तुझ्या हातचे ते आवडते वगैरे. इतकेच काय तर बरेच वेळा मित्रमंडळी गाडीत सोबतच असायची. घरात आल्यावर माझी गंमत करायची, गप्पा रंगायच्या आणि मी देखील त्यांच्या सगळ्या रंगांमधे रंगून जायची. माणूसप्रीयच होता माझा नवरा. कायम त्यांना आसपास लोक लागायचे. लोकांना जोडणे व त्यांच्यासाठी कोणत्याही वेळी व कोणतीही मदत उभी करणे हा त्यांचा छंद होता. रात्री बेरात्री कुणाची प्रकृती बिघडली, कुणाकडे काही घटना घडली, कुणाला गावाला जायचे आहे, कुणाला पैश्याची मदत हवी आहे, यासारख्या सर्व कामांमधे सर्वात पुढे राहणार आमचे हे..कायम पुढे जाण्याची त्यांची सवय...एके दिवशी असेच मला एकटीला सोडून कायमचे पुढे निघून गेले. 
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळवून माझे पती मला या जीवनाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सोडून गेले. त्यांच्या पुण्याईने मला लगेच नोकरी लागली व त्यांनी अल्पवयात आमच्यासाठी करुन ठेवलेल्या गुंतवणुकीमुळे आर्थिक बाबतीत मी निश्चिंत होती. पण माझा आधार गेला होता. माझ्या श्वासांचा आधार गेला होता. पण त्यांच्या जाण्याबद्दल फार वियोग करण्याची वेळ परमेश्वराने मला दिलीच नाही. दोन चिमुकली मुले व त्यांचे पुढील आयुष्य हेच जीवनाचे ध्येय बनले व माझ्यावर झालेला आघात विसरुन परत उभी झाले. माझ्या मुलांचेच आयुष्य माझे जीवनध्येय बनले. त्यांच्या शाळा, त्यांचा अभ्यास, त्यांचे विस्तारणारे जग यामधे मी गुंग होऊन गेले. माझ्याबद्दल सहानुभूती असणारे माझे नातेवाईक व स्नेही मंडळींनी मला चांगला आधार दिला परंतू त्यांना त्यांचे जीवन होते व शेवटी सहानुभूतीची तीव्रताही कालानुरुप कमी व्हायला लागते. या जगरहाटीनुसार हळूहळू ही सर्व मंडळी आपापल्या जगात परत गेली. त्यांना आमच्या घरी खेचून आणणारा किंवा कोणत्याही प्रसंगांमधे मदत करणारा स्रोत संपल्यामुळे त्यांचे अश्या प्रकारे दूर जाणे स्वाभाविकच होते. परंतू माझ्या पतीने केलेल्या आर्थिक मदतीच्या भरवश्यावर बांधल्या गेलेल्या एका घराच्या वास्तुपुजनाच्या समारंभाच्यावेळी जेव्हा माझा तो जवळचा नातेवाईक मला व माझ्या मुलांना निमंत्रण देण्याचे विसरला तेव्हा मनोमन फार वाईट वाटले. मन भूतकाळात डोकावले..
सर्व नातेवाईकांमधे माझे पती अतिशय प्रीय होते. त्यांच्या ठायी असलेले काही गुण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे उत्साहाने भरलेल्या झऱ्यासारखे होते. त्यांचे गडगडाटी हसणे, मन न दुखावता प्रत्येकाची गंमत करुन हास्य कारंजी उडविण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. लोकांना गोळा करायचे व हसते ठेवायचे. या सोबतच माझ्या नकळत अनेकांना आर्थिक मदत करायची. मी जरा व्यवहारी असल्याने टोकण्याचा असफल प्रयत्न करायची. आपल्याजवळ आहे तर करायची मदत. मदत केल्याने आपला खिसा रिकामा होत नसतो तर परमेश्वर तो दुपटीने भरुन देतो असली भन्नाट वाक्ये मला ऐकवत त्यांचे मदत करणे सुरु रहायचे. मी हरकत घेते म्हणून परस्पर कार्यालयात बोलावून देखील अनेकांना साहेब पैसे देतात अशी खबर माझ्या कानावर होती. मी विचारणा केली असता सुरुवातीला उत्तर द्यायचे टाळायचे परंतू मी इरेला पेटली की मग हमखास ठरलेले उत्तर द्यायचे. मी तुला काही कमी पडू देतोय का मग तू या बाबतीत बोलू नको. लोकांना गरज असते, अनंत अडचणी असतात. आपण केलेल्या मदतीमुळे जर त्यांच्या समस्या सुटत असतील तर मग काय हरकत आहे. मित्र मंडळींसोबतच जवळपास सर्वच नातेवाईक मंडळींनी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. परंतू त्याच्या जाण्यानंतर मात्र संवेदना व्यक्त करावयास आलेल्या कुणीही त्या मदतीचा उल्लेख केला नाही कारण त्यामुळे ती रक्कम परत करण्याची जबाबदारी घ्यावी लागली असती. अपवाद सोडला तर त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कडून घेतलेली रक्कम आता परत करण्याची गरज नाही असाच ग्रह सर्वांनी करुन घेतला होता व तो ग्रह पक्का करण्यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येकाने आमच्या घराशी संबंध सोईस्कररित्या कमी केला. अर्थात या सगळ्यांच्या वागण्याबाबत माझ्या मनात तक्रार अजिबात उरली नाही कारण आपल्या परीवाराची काळजी माझ्या पतीने व्यवस्थित घेतली असल्याने मला फार त्रास झाला नाही. परंतू त्या कारणामुळे ह्यांच्या हयातीत घरी जो लोकांचा राबता होता तो बंद झाला. हळूहळू मी माझ्या कोषात गुंतत गेली व ह्यांच्याविना आयुष्य जगत राहिली. लोकांना व माझ्या मुलांनाही वरकरणी मी असेच भासविते की मी त्या प्रचंड मोठ्या दुःखातून सावरलेय. प्रत्येक प्रसंगात चेहेऱ्यावर हास्य ठेवण्याचे कसबही मला आता जमलंय. दिवसभर अजूनही माझ्या मनाला मी सांभाळलेलेच असते. परंतू सायंकाळच्या वेळी मात्र मनाचा बांध फुटतो. अकारणच असहाय व एकटे वाटायला लागते. एखाद्या उंच कड्यावरुन आपण कुणालातरी जिवाच्या आकांताने हाक मारतोय पण तोंडातून आवाजच फुटत नाही असे वाटते. जीवनातील ते एकटेपण फार तीव्रतेने अंगावर येते. सायंकाळच्या त्या वेळेला कातरवेळ का म्हणतात याचा अनुभव मी रोज घेत असते...काही वेळ आसवे ओघळून गेल्यावर परत आपल्या कामाला लागते...जणू काही झालेच नाही याप्रमाणे..
कधी नव्हे तो आमची वहिनी मोकळेपणाने बोलत होती..वयाच्या केवळ सदतीसाव्या वर्षी परमेश्वराने तिच्यावर केलेला आघात तिने कसा पचविला व त्या आघाताची जखम कधीच भरुन निघणारी नाही हे वहिनीच्या डोळ्यात प्रथमच दिसलेल्या आसवांवरुन लक्षात आले. आपल्या आसपास वावरत असताना बरेचवेळा आपण दृष्य बाबींवरुन किंवा ऐकीव घटनांवरुन इतरांबद्दल मते बनवितो व त्यानुसार वागत जातो. प्रत्येकाच्या आयुष्याची अशी वेदनादायी बाजू जर आपल्याला समजून घेता आली तर आपले वागणे निश्चितच वेगळे राहू शकते. त्यामधून निर्माण होणाऱ्या संवेदनांनीच आपले माणूसपण सिद्ध होते.



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23