My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

माझी डीग्री...वीस रुपये किलो!
त्याची माझी पहिल्यांदा भेट केव्हा झाली ते आठवत नाही पण एक चांगला भाजीवाला म्हणून मी त्याच्या दुकानात कधीपासून जायला लागलो हे मात्र नक्की आठवतंय. साधारण दहा वर्षांपूर्वी माझ्या घराजवळ असलेल्या भाजीवाल्याचे दुकान बंद असल्याने सहजच मी त्याच्या दुकानावर पोहोचलो. भाजी देताना त्याचे माझ्याकडे लक्ष देणे मला फार भावले. मी योग्य भाजी निवडली आहे की नाही याची तो काळजी घेत होता. भाजीपाल्यातील मला फार काही कळत नाही हे एक मिनीटात समजल्यावर खरे तर माझ्यासारखे ग्राहक काही दुकानदारांसाठी फायद्याचे असतात. जमेल तसा इतर लोकांनी काढून टाकलेला माल माझ्यासारख्यांच्या माथी मारणे अतिशय सोपे असते. परंतू हा मात्र वेगळा होता. मी निवडलेल्या भेंड्यांमधून अर्ध्या त्याने बाजूला काढल्या व चांगल्या निवडून मला दिल्या. मला त्याचा हा वेगळेपणा चटकन लक्षात आला. इतकेच नव्हे तर तो अतिशय चांगल्या भाषेत संवाद करीत होता. बोलता बोलता मधेच इंग्रजी शब्दांची पेरणी देखील तो करीत होता. त्याचा भाजी देण्याबद्दलचा प्रामाणिकपणा व त्याची भाषा या दोन्ही बाबींचा विचार करुन मला त्याच्याबद्दल सहाजिकच कुतुहल निर्माण झाले. कदाचित याचमुळे मी त्यानंतर त्याच्याच कडून भाजी विकत घेणे सुरु केले. 
साधारण पंधरा दिवसातून एकदा आमची भेट व्हायची. तो माझ्याशी अनेक विषयांवर बोलायचा. एकदा बोलता बोलता त्याने मला माझ्या व्यवसायाबद्दल विचारले. मी इंग्रजी वाड़मयाचा शिक्षक आहे हे कळल्यावर त्याला फारच आनंद झाला. त्या दिवशी तो चक्क त्याच्या जागेवरुन उठून माझ्याजवळ आला. माझे हात हातात धरुन तो मला म्हणाला की, सर मला तुमच्यासारख्याचीच गरज होती. पुढे त्याने जे सांगितले ते ऐकून मी स्तब्ध झालो. त्याने साधारण दोन वर्षांपूर्वी त्याची पदवी पूर्ण केली होती. विशेष म्हणजे त्याचा इंग्रजी वाड़मय हा विषय अतिशय आवडीचा होता. परंतू त्याला दुर्दैवाने प्रथम वर्षानंतर महाविद्यालय सोडावे लागले. घरच्या चार मंडळींचे पालनपोषण करण्यासाठी त्याला आपल्या अभ्यासाची पुस्तके बाजूला ठेवून भाजी विकण्यासाठी तराजू हातात घ्यावा लागला. परंतू ते काम करतानाही त्याने मोठ्या नेटाने खाजगी परीक्षा देऊन पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो मला सांगत होता, सर मला या भाजीपाल्यात रस वाटत नाही. पण पोटापाण्यासाठी मला हे करावे लागत आहे. हे काम कमी दर्जाचे आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतू मी या कामासाठी बनलेला नाही. म्हणूनच माझे मन यात रमत नाही. सर मला याऐवजी शेक्सपीयरचा ऑथेल्लो आठवितो आणि त्याची ती ट्रॅजेडी मला सारखी खुणावत असते. रॉबर्ट फ्रॉस्टची - स्टॉपींग बाय द वूडस् ही कविता तर मला पाठ आहे. त्याचवेळी कीटस् च्या सुंदर ओळी मनात रुंजी घालतात - हर्ड मेलडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर किंवा कोलरीज ची विलींग सस्पेन्शन ऑफ बीलीफ ची अफाट संकल्पना मला मोहीत करते. वाड़मयाच्या त्या विशाल सागरातील मोती मी शोधण्याचा प्रयत्न करीत राहतो परंतू या व्यवसायाच्या धावपळीमुळे मला ते शक्यच होत नाही. पण सर, तुम्ही भेटले म्हणून मला एक आशा जागृत झाल्यागत झाले आहे. सर माझे खूप दिवसाचे स्वप्न आहे.. ते म्हणजे इंग्रजी भाषेत एम. ए. करायचे आणि प्राध्यापक व्हायचे. सर असे झाले तर मी हा व्यवसाय त्वरीत आणि कायमचा बंद करीन. सर मला मदत कराल? मला त्याच्या सबंध विचारांबद्दल अतिशय आनंद झाला. मी त्याला सर्वतोपरी मदत करण्यचे आश्वासन दिले. त्यानंतर पुढील तीन वर्षे तो मला वारंवार भेटत राहीला. माझ्याकडून त्याने एम.ए. इंग्रजीच्या नोट्स नेल्या. त्याला बरीच पुस्तके देखील मी दिली. मुळातच साहित्यावर त्याचे प्रेम असल्याने त्याला फार काही सांगावे लागत नव्हते. एकंदरीत त्याचा अभ्यास चांगला सुरु होता. भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळून त्याला हे शिक्षण करावे लागत असल्याने त्याने दोन दोन पेपर देण्याचे ठरविले होते. मधेच एकदा त्याने मला सांगितले की त्याचा मावस भाऊ गावावरुन आलाय आणि तो याचा भाजीचा व्यवसाय सांभाळायला तयार आहे. त्यामुळे याला अभ्यासाला भरपूर वेळ मिळणार आहे. मला देखील या बाबीचा आनंद झाला. एम. ए. च्या द्वितीय वर्षाला जास्त अभ्यासाची गरज असल्याने त्याला उपलब्ध झालेली सोय फारच चांगली होती. मोठ्या जिद्दीने एम.ए. करुन प्राध्यापकी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने तयारी सुरु केली. शेवटी सर्व प्रयत्न करुन त्याला एम. ए. इंग्रजी या परीक्षेमधे छान गुण मिळाले व त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर त्याने भाजीचे दुकान चालवायचे नाही असा निर्णय घेतला व नोकरी शोधणे सुरु केले. बरेच दिवस त्यानंतर त्याची माझी भेट झाली नाही. मागच्या महिन्यात मी अमरावतीतील राजापेठ या परीसरात मी भाजी घेण्यासाठी गेलो तेव्हा अचानक मला तो तेथे दिसला. त्याला परत भाजी विकताना बघून मला आश्चर्यच वाटले. मला पाहिल्यावर आधी त्याला व्हायचा तसा आनंद त्याला झाला नाही. मी त्याला काही विचारणार हे त्याला कळल्यामुळे त्याने दुकान सोबतच्या पोराला सांभाळायला सांगितले आणि मला त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो सारा प्रकार माझ्या शिक्षण क्षेत्रात घडला याबद्दल माझ्या मनात विषाद निर्माण झाला. जे क्षेत्र सर्वाधिक पवित्र क्षेत्र मानले जाते त्या ठिकाणी एखाद्या शिक्षक बनू पाहणाऱ्या होतकरु माणसाचा अश्या प्रकारे बळी जावा ही खेदाची बाब होती.
एम.ए. झाल्यावर त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. त्या वाटत होते तेव्हडे ते काम सोपे नव्हते. प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक योग्यतेसोबत अनेक बाबी लागतात याची त्याला जाणिवच नव्हती. प्रत्येक ठिकाणी त्याला पैसे मागण्यात आले जे त्याच्याजवळ नव्हते. पुढे नोकरी मिळेल या आशेने एका ठिकाणी तीन वर्षे अत्यल्प पगारावर काम केले पण नंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकच तेथे नोकरीला लागले. असा जवळपास आठ वर्षांचा संघर्ष केल्यानंतर शेवटी पुन्हा त्याला आपल्या मूळ व्यवसायाकडे वळावे लागले कारण.... तो म्हणाला,"सर, जिवंत राहण्यासाठी पैसे लागतातच ना? ...म्हणून हे परत सुरु केले.. भाजी सोबत माझी डीग्री देखील विकायला ठेवली आहे...वीस रुपये किलो या भावात...पण त्या भावातही ती कुणीच घेत नाही..." शेवटचे वाक्य उच्चारले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते...
ही सारी एखाद्यानाटकाची काल्पनिक कथा वाटतेय ना?...खरंय! ही रंगमंचावरचीच कथा आहे....केवळ या नाट्याचा दिग्दर्शक तो महापरमात्मा आहे. तसेही माझ्या आणि माझ्या त्या भाजी विकणाऱ्या मित्राच्या शेक्सपीयरने म्हणलेच आहे, "जीवन एक रंगमंच आहे, ज्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला एक भूमिका वठवायची आहे आणि आपले काम झाले की हा रंगमंच सोडून जायचे आहे... त्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाच्या आज्ञेवरुन..."




Comments

  1. असं कसे होतं यार ? . . खूप होपलेस सिस्टिम आहे !! किती वेळ लागेल कोण जाणे (?)

    ReplyDelete
  2. असं कसे होतं यार ? . . खूप होपलेस सिस्टिम आहे !! किती वेळ लागेल कोण जाणे (?)

    ReplyDelete
  3. Sir ,I have read your cover story but this is the only case you come in contact with,but there are thousands of it .

    ReplyDelete
  4. Sir, you are also the actor/director of this hopeless system of our society,following the same norms created by this selfish technology.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18