My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
ब्रेक हवाच!
ब्रेक - हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत सहजपणे वापरला जातो. गाडीमधे असलेल्या ब्रेकला तर मराठीत पर्यायी शब्द शोधणे कठीण जाईल. पण हा शब्द आणखी एका छानश्या संदर्भात वापरला जातो. आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीक्षेत्रात कामे करीत असताना त्यात पार गुरफटून गेलेला असतो. कधी कधी ही कामे इतकी अंगवळणी पडतात की त्यामधील आकर्षण देखील संपून गेलेले असते. अनेक लोक तर यांत्रीकपणे काम करीत असताना दिसतात. तेच तेच काम करुन कदाचित अशी यांत्रीकता येत असावी. काही लोक काचेच्या पेटीत बसून पैश्यांची देवाण घेवाण करतात तर काही महिनाअखेरपर्यंत आपले टारगेट पूर्ण करण्यासाठी धडपडत राहतात. काही लोक वस्तू विकण्यासाठी गावोगाव प्रवास करतात तर काही मंडळी आपापल्या वर्गांमधे विद्यार्थ्यांना शिकवित राहतात. काही लोक कोर्टामधे लोकांच्या वतीने भांडत राहतात तर काही दिवसभर आजारी लोकांना तपासून त्यांचे आजार बरे करीत असतात. काही लोक लोकलच्या डब्यांमधे लटकत प्रवास करतात तर काही मोटरसायकलवरुन हजारो किलोमिटर फिरतात. काही कारमधून आपल्या कार्यलयात जातात तर काही लोक पायदळ आपल्या शेतांमधे जातात. काम करणारी प्रत्येक व्यक्ती जर तेच तेच काम सतत करीत असेल तर तिला त्या गोष्टीचा प्रथम कंटाळा आणि मग कामामधे यांत्रीकपणा येणे अत्यंत सहाजिक आहे. या सर्व प्रकारच्या रुटीन कामांधून थोडासा विरंगुळा, काहीसे वेगळेपण, काहीसा प्रवास, कधी स्थानबदल या प्रकारच्या आयुष्यातील वेगळेपणाला दिल्या गेलेला इंग्रजी पण मराठीत सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे ब्रेक. प्रत्येकालाच नेहमीच्या कामांपासून ब्रेक हवा असतो.
नव्या वेगवान जगात प्रत्येकाचेच काम अतिशय किचकट होत चालले आहे. या सोबत वेगवेगळे ताण देखील निर्माण होत आहेत. या सर्व बदलांमुळे तर हा कामांच्या रामरगाड्यातील ब्रेक फारच आवश्यक झाला आहे. अर्थात याबाबतीत या नव्या जगात लोक मोठ्या प्रमाणात जागरुक झालेले दिसतात. विशेषतः संपुर्ण परीवारासोबत हा ब्रेक अनुभवण्याचे प्रस्थदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामधे वयाचेही बंधन राहीलेले नाही. लहान मुलाबाळांपासून तर ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वजण अश्या प्रकारच्या ब्रेकचा आनंद घेतात. या ब्रेक घेण्याच्या नव्या आणि अतिशय सकारात्मक बदलामुळे भारतात अनेक पर्यटन केंद्रे निर्माण व्हायला लागली आहेत आणि जी आहेत ती विकसित व्हायला लागली आहेत. येत्या काही वर्षांमधे आपल्या देशात पर्यटन हा एक अत्यंत मोठा व्यवसाय झालेला आपल्याला दिसेल. अर्थात ही एक अतिशय सकारात्मक बाब आहे. ज्या परीवारांमधे अश्या प्रकारच्या ब्रेकची आवश्यकता समजली जाते व त्यानुसार नित्यनेमाने वर्षातून किमान दोन वेळा असा ब्रेक घेतला जातो त्यांना या आधुनिक काळात जीवन सुसह्य होणार आहे असे म्हणावे लागेल. बँकेमधे मोठी रक्कम जमा करुन किंवा भरमसाठ दागिने बँकेच्या लॉकरमधे ठेवून आयुष्यभर त्या संपत्तीच्या असण्याचा केवळ खोटा आनंद घेत कायम तेच ते रटाळ आणि चौकटीतले आयुष्य जगत आणि इतरांनाही जगायला भाग पाडणारी मंडळी दुर्दैवीच असतात. कारण जीवनाचा खरा अर्थ त्यांना कळलेलाच नसतो. वयाच्या साठीनंतरही तरुणांना लाजवेल इतकी एनर्जी असलेला आणि खराखुरा ब्रेक एन्जॉय करणारा एक ग्रुप मी नुकताच माझ्या ब्रेकमधे बघितला.
नेहमीच्या कामाच्या व्यस्तेतून मोकळीक मिळावी म्हणून मी देखील बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने एक ब्रेक घेतला. या ब्रेकमधे मी पचमढी या गावी एका भन्नाट ग्रुपला भेटलो. वय वर्षे ६० ते ७५ या वयोगटातील तरुण मंडळींचा ग्रुप. दोन दिवस पचमढीच्या वेगवेगळ्या पॉईंट्सवर हा ग्रुप मला भेटत राहीला आणि प्रत्येकवेळी त्यांचा तो जीवन जगण्याचा पवित्रा बघून मला दुप्पट एनर्जी मिळत गेली. हे सगळे आजोबा आजी एकदम आधुनिक पोशाखात मिरवत होते. जीन्स पँन्टस्, केप्री, डोक्यावर हॅट वगैरे अशी जवळपास सर्वांची वेशभूषा होती. प्रत्येकजण अक्षरशः उत्साहाने खळखळत होता. त्यांचा संपुर्ण दौरा एका कंपनीने आयोजित केला होता. छान मीनी बसमधे हे पंचेवीस जण मुंबईहुन आले होते. बसमधे त्यांचे गाणी गाणे सुरु असायचे. प्रत्येक पॉईंटवर त्यांच्यापैकी अनेक जण बढीया फोटोग्राफी करायचे. इतकेच काय तर बरेच जण सेल्फी वगैरे काढायचे. त्यांचा उत्साह अगदी बघण्यासारखा होता. ते सर्वजण आमच्या हॉटेलजवळच निवासाला होते. रात्री त्यांचा मस्त कॅम्प फायर चालायचा. थंडी खूप होती त्यामुळे शेकोटी पेटवून सर्वजण त्याच्याभोवती मस्त गप्पा मारीत, गाणी म्हणीत, नकला करीत आणि काही वेळेला नाचतही होते. ते सर्वजण पाच दिवसांच्या ट्रीपसाठी आले होते. परंतू त्या पाच दिवसात ते आपले जग जणू संपूर्णपणे विसरुन पूर्णतः फ्रेश होण्याचाच विचार मनात घेऊन आले असावेत. पचमढीची कडाक्याची थंडी असतानाही त्यांचा फार गोड वाटणारा पण अक्षरशः धांगडधिंगाच सुरु होता. किती आनंद मिळत होता त्यांना असे मनमुराद जीवन जगताना बघून. त्यांनी त्यांच्या त्या धमाल ॲटीट्युडमुळे ते सुंदर क्षण अविस्मरणीय बनविले होते. आपण नेहमी जगत असलेले आयुष्य संपुर्णपणे विसरुन केवळ आणि केवळ आनंद उपभोगण्याची ही कला त्या आजोबा आजींना फार छान साधली होती. कदाचित त्यांना जीवन जगण्याचे आणि त्यामधील अश्या मुल्यवान क्षणांचे मोल कळलेले असणार ज्याची किंमत कोणत्याही बँक लॉकरच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. अर्थात सर्वांनाच हा विचार पटतो असे नाही. काही मंडळींसाठी असले ब्रेक म्हणजे विनाकारण वाया घालविलेला वेळ व पैसा असेच समिकरण असते. हे लोक जमाखर्चात फार पक्के असतात. त्यांच्या लेखी बँकेतील जमा हीच मोठी व एकमेव मिळकत असते. परंतू त्यांच्या आयुष्याच्या जमाखर्चाच्या कागदावर निखळ आनंदाचा कॉलम मात्र रिकामाच असतो. बरेचदा काही ठिकाणी असल्या ब्रेकची गरजच मुख्य व्यक्तीला जाणवित नसते व त्यामुळे घरातील इतरांना अश्या प्रकारच्या ब्रेकची गरज असू शकते हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. अर्थात ही परीस्थिती आता बदलत चालली आहे.
सुटीच्या दिवसांमधे अनेक पर्यटन स्थळांवर वाढती गर्दी या ब्रेकची आवश्यकता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागल्याचे च द्योतक आहे. अनेक लोक आधीपासून आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करायला लागले आहेत. सुट्यांचा उपयोग वेगळ्या प्रांतांमधे भटकण्यासाठी लोक करायला लागले आहेत. आपल्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच अनेक सुरेख गोष्टींचा अनुभव मिळू शकतो व त्या अनुभवांनीच जीवन खरेखुरे समृद्ध होते. बाहेर पडले की मग पचमढीची ५ डीग्री तापमानावर पोहोचलेली थंडी शेकोटीच्या संगतीने अनुभवता येते, अनेक मंडळींसोबत बमबम भोले म्हणत चौरागडच्या चौदाशे पायऱ्या सहजच चढून जाता येतात, धूपगड सारख्या उंच शिखरावरुन मावळतीला जाणारा सूर्य बघून गहीवर येतो, टचटच अंगाला लागणारे पाण्याचे तुषार झेलत बीफॉलचा अद्भुत आनंद अनुभवता येतो, रेशीम प्रक्रीया करणारा अत्यंत विलक्षण प्रकल्प बघता येतो... आपल्या नेहमीच्या जगाला विसरविणारे व आपल्या त्याच त्या कामाने शिणलेल्या मनाला ताजेतवाने करणारे हे सारे क्षण आपली नेहमीची चौकट सोडल्याखेरीज अनुभवता येऊ शकत नाही. मनाला फ्रेश करणारे अश्या प्रकारचे ब्रेक आपल्याला आपले आयुष्य जोमाने व सुखाने जगण्याचे बळ देतात आणि या क्षणांमधे प्राप्त झालेला मनाचा तजेला आपल्याला नेहमीचे काम उत्साहाने करण्याची उर्मी देतात. जे लोक असे ब्रेक घेतात त्यांना सलाम... जे घेत नाहीत त्यांनी विचार करायला काय हरकत आहे?

Waa wonderful....
ReplyDeleteWaa wonderful....
ReplyDelete