Article published under थोडा है थोडे की जरूरत है
परीक्षा..आपल्यालाच जाणून घेण्याची
देशातील उच्च शिक्षण प्रक्रीयेमधे येणाऱ्या काळात काही महत्वपूर्ण बदल संभवतात. या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकच महाविद्यालयासाठी सर्वात महत्वाची बाब ठरणार आहे - महाविद्यालयाचा दर्जा. प्रत्येक महाविद्यालय आपल्या दृष्टीने आपले वेगळेपण राखून असते. प्रत्येक महाविद्यालयाची कार्यशाली आणि वातावरण देखील वेगवेगळे असते. महाराष्ट्रामधे फार मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्थांद्वारा चालविली जाणारी महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालये फारज मोजकी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठमोठ्या व जुन्या काळापासून कार्यरत असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांद्वारे चालविली जाणारी वेगवेगळी महाविद्यालये राष्ट्रीय पातळीच्या मानकानुसार तपासून त्याचे मुल्यांकन केल्या जाण्याची प्रक्रीया जवळपास वीस वर्षांपासून सुरु झाली. सुरुवातीला या अश्याप्रकारच्या मानकांची गरज कुणालाही न भासल्याने फार कमी महाविद्यालयांनी या प्रक्रीयेमधे सहभाग दिला. परंतू शिक्षणातील स्पर्धा जागतिक पातळीवर पोहोचल्याने आता भारतीय उच्च शिक्षण पद्धतीमधे बदल करण्याची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली. या प्रक्रीयेनुसार महाविद्यालयाचे मुल्यांकन करुन देण्याचे कार्य बंगलुरु येथील "नॅक" (National Assessment and Accreditation Council) नावाच्या स्वायत्त संस्थेद्वारे करण्यात येऊ लागले. या नॅक द्वारे महाविद्यालयांचे मुल्यांकन व अधिस्विकृतीची प्रक्रीया केली जाते व त्यानुसार मानांकन प्राप्त होऊ शकते. सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या निर्देशानुसार प्रत्येकच महाविद्यालयाला नॅक द्वारे मुल्यांकन करुन स्वतःचे मानांकन प्राप्त करुन घेण्याचे आदेश आहेत. परंतू नॅकच्या एकंदर मार्गदर्शक तत्वांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे जाणविते की नॅक द्वारा केले जाणारे मुल्यांकन ही शासकीय आदेशांद्वारे लादलेली प्रक्रीया नसून या माध्यमातून महविद्यालयाशी जोडल्या गेलेल्या सर्व घटकांना स्वतःच्या कार्याबद्दल चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची सुसंधी आहे. या सबंध प्रक्रीयेकडे अत्यंत सकारात्मकतेने बघितल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य, पालक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महत्वाचे म्हणजे विद्यार्थी या सर्वांनाच ही संधी प्राप्त होते. आपल्या कार्यासंबंधी तटस्थपणे मुल्यमापन करण्याच्या संधी विविध महाविद्यालयीन घटकांना फारच क्वचित प्राप्त होते. परंतू नॅक ती संधी प्रत्येकाला देते.
एखादे महाविद्यालय चालणे म्हणजे एक संपुर्ण व्यवस्था चालणे असा प्रकार असतो. ते एक स्वतंत्र युनीट असते. या व्यवस्थेला चालविणारे अनेक घटक असतात. नॅक द्वारा केले जाणारे मुल्यांकन म्हणजे या प्रत्येक घटकाची स्वतःला नव्याने होणारी ओळख ठरत असते. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये ज्या वेगवेगळ्या व्यवस्थापनांच्या माध्यमातून चालतात त्या व्यवस्थापनांची ही विद्येची मंदीरे चालविण्यामागील भूमिका या निमित्ताने तपासली जाते. नॅक मुल्यांकनाच्या एका मानकानुसार या व्यवस्थांना नेतृत्व प्रदान करणाऱ्या पालक संस्था त्यांच्या महाविद्यालयातील शैक्षणिक प्रक्रीयेकडे तसेच भौतिक सुविधांकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतात ही बाब फार महत्वाची ठरते. शिक्षणाचे महत्व तसेच शैक्षणिक प्रक्रीया राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा नॅक मुल्यांकनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे निर्माण झाल्या आहेत. सकारात्मक विचार करणाऱ्या संस्था या बाबींकडे लक्ष ठेवून या सर्व बाबींची पूर्तता करीत आहेत. या मुल्यांकनाच्या प्रक्रीयेत आणखी महत्वाचा घटक म्हणजे प्राचार्य व प्राध्यापक. ज्यांच्या कौशल्यामुळे महाविद्यालयात अत्यंत प्रभावी शैक्षणिक प्रक्रीया चालते व ज्यांच्या ज्ञानदानामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याला आकार देण्याची क्षमता प्राप्त होते त्या शिक्षकांसाठीही हे मुल्यांकन म्हणजे मुल्यमापनाची एक अपूर्व संधी असते. या निमित्ताने आपापल्या विषयात आपणअभ्यासाच्या किती कक्षा रुंदावल्या आहेत, आपण किती संशोधन केले आहे तसेच आपण केलेले संशोधन कश्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडत आहे याचा विचार करण्याची ही संधी आहे. यासोबतच आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपण शिकवित असलेल्या विषयाचा कसा उपयोग होईल यासाठी केले जाणारे प्रयत्न व तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल कसे बनविता येईल या सर्व बाबींचा विचार करण्याची ही संधी असते. त्यानिमित्ताने सर्व बाबींचे प्रभावी सादरीकरण करण्याची देखील संधी प्राप्त होते. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सर्व घटकांचा समन्वय साधण्याचे महत्वाचे कार्य करावे लागते. ताण येऊ न देता, सर्वांना एकसुत्रात बांधून हे कार्य पार पाडण्याची तारेवरच्या कसरतीसारखी ही कवायत प्रचार्यांना करावी लागते. परंतू समर्पित कार्य करणारी चमु असली की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. या सबंध प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी ज्यांच्या भोवती ही सारी प्रक्रीया फिरत असते. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यवस्थापनाने, प्राचार्यांनी, प्राध्यापकांनी किंवा शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने केलेल्या सादरीकरणाला खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच विद्यार्थीवर्गावर देखील या मुल्यांकनादरम्यान मोठी जबाबदारी असते. त्यांच्या तर्फे सादर केल्या जात असलेल्या क्षमता, त्यांच्या योग्यता, त्यांची पारीतोषीके, त्यांचे विचार, त्यांचे वागणे या सर्व छोट्या छोट्या बाबींमधून त्या त्या महाविद्यालयाच्या चारित्र्याचे दर्शन घडत असते. कारण ती सर्वात महत्वाची बाब आहे.
नॅक द्वारा केल्या जात असलेल्या मुल्यांकनामधे सर्व बाबींसोबत तज्ञ चमू प्रत्येक महाविद्यालयाच्या चारित्र्याचा देखील बारकाईने अभ्यास करते. महाविद्यालयाने सादर केलेल्या विविध बाबींवरुन तेथे कार्य करण्याची प्रक्रीया त्यांच्या लक्षात येतेच परंतू एखाद्या महाविद्यालयाबद्दल समाजाच्या विविध घटकांमधे असणारे मत मात्र चारीत्र्यावरुनच ठरत असते. हे चारित्र्य नॅकच्या चमुला जाणवून देण्याचे कार्य मात्र विद्यार्थी वर्गच करु शकतो. विद्यार्थ्यांचा जीवनविषयक दृष्टीकोन, त्यांची स्वतःच्या जीवनाबद्दल व त्याच्या विकासात्मक वाटचालीबद्दल असलेली आस्था व त्यासाठी महाविद्यालयाच्या मदतीने त्यांनी निरंतर सुरु ठेवलेले प्रयत्न या सर्व बाबी फार महत्वाच्या ठरतात. महाविद्यालयाने जरी विविध सोयी किंवा उपक्रम राबविण्याचे ठरविले तरीदेखील जोवर विद्यार्थी त्याचा फायदा घेणार नाहीत तोवर त्या कोणत्याही उपक्रमाला अर्थ उरत नाही. यासाठी या सबंध प्रक्रीयेकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा असलेला सकारात्मक दृष्टीकोन हा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. महाविद्यालयाला परीवार मानण्याच्या भुमिका असल्यास आणि माझ्या परीवारासाठी मी काहीतरी करतोय ही भावना या संपुर्ण प्रक्रीयेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते व यशस्वी बनविते.
काही वर्षांपूर्वी अतिशय निरस व अपेक्षाहीन स्थितीमधे पोहोचलेल्या उच्चशिक्षण प्रक्रीयेला या मुल्यांकनाच्या प्रक्रीयेमुळे एक नवी चकाकी निश्चित आली आहे. सर्व बाबींचे कागदोपत्री रेखीव व आकर्षक सादरीकरण सुरु झालेले आहे. बऱ्याच अंशी या प्रक्रीयेतील प्रत्येकच घटक स्वतःला किमान एकदा तरी तपासायला लागला आहे व त्याला जमेल तसा विकासाचा विचार करायला लागला आहे. यामुळे बदल होतो आहे हे निश्चितच आहे. अर्थात कधीकधी मानवनिर्मित प्रक्रीया असल्याने काही उणीवा यात आढळतात. कधीकधी मुल्यांकन करीत असतानाही काही उणे राहून जाते. परंतू काही बाबी या मोठ्या प्रक्रीयेमधे स्विकाराव्या लागतात. नॅक मुल्यांकनाची प्रक्रीयादेखील आता आणखी पारदर्शी होते आहे. यावर्षी नुकतेच नॅक मुल्यांकनाच्या संपुर्ण प्रक्रीयेचे चित्रीकरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जेणेकरुन या प्रक्रीयेतील पारदर्शीपणा वाढेल. एकंदरीत देशातील प्रत्येक उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेची यानिमित्ताने परीक्षाच आहे आणि ती देखील स्वतःला जाणून घेण्याची परीक्षा..

Comments
Post a Comment