Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
मुखवट्यांची प्रामाणिकता
कला शाखेच्या अंत्य वर्गातील विद्यार्थिनींना मी मागच्या आठवड्यात एक कविता शिकवित होतो. त्या इंग्रजी कवितेमधे माणसाला जगताना धारण करावी लागणारी वेगवेगळी रुपे वर्णन केलेली आहेत. कवी त्यात असे म्हणतो की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगानुरुप आपण वस्त्र परीधान करतो त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे मुखवटे देखील धारण केलेले असतात. या सर्व मुखवट्यांच्या गर्दीमधे आपला मूळ मुखवटा कसा आहे हे कळतच नाही. त्या मूळ मुखवट्याचा शोध हाच खरेतर आत्मज्ञानाच्या दिशेचा प्रवास आहे. अश्या पद्धतीचे ते सारे वर्णन होते. कवितेचा अर्थ कवीला साधारणपणे जसा अपेक्षित होता तसा मी सांगितला परंतू माझ्या गुरुंनी मला दिलेल्या अध्यापनाच्या मूलतत्वानुसार मी माझ्या विचारी विद्यार्थीनींना या कवितेच्या मर्माबद्दल बोलण्यास सांगितले. त्या बोलायला लागल्या. सर्वांचे छान छान विचार मी ऐकीत होतो तेव्हड्यात माझ्या एका विद्यार्थी मैत्रीणीने मलाही विचार करायला लावणारे मत मांडले. ती मला म्हणाली की सर, या कवितेतील मांडणी तथ्यांवरच आधारीत आहे. आपल्याला वेगवेगळे मुखवटे लावूनच वावरावे लागते कारण आपण सामाजिक व्यवस्थांमधे वावरतो. परंतू कवीने मांडलेल्या शेवटच्या मुद्द्याशी मी सहमत नाही. मुखवटे लावणे देखील चांगलेच आहे जर त्यामागील हेतू चांगला असेल तर. तिचे वाक्य ऐकुन मी जरा विचारात पडलो. मी तिला त्याबद्दल एखादे उदाहरण देता येईल का असे विचारले. त्या चुणचुणीत मुलीने मला एक अफलातून उदाहरण दिले. ती म्हणाली की सर, समजा आता या वर्गात येताना तुमचा एखाद्या शिक्षकांसोबत कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला. तुम्हाला त्यांचा फार राग आला. त्याच संतापाच्या मुडमधे तुम्ही आम्हाला शिकवायला आलात. परंतू वर्गात शिरता शिरता तुम्ही नेहमीप्रमाणे साहित्याच्या शिक्षकाचा मुखवटा लावलात आणि आम्हाला सर्वांना खूप मनापासून कविता शिकविलीत. खरे तर तुमच्या मनात झालेल्या घटनेबद्दल राग होता, त्याचा परीणामही असणारच. परंतू तो दूर सारुन तुम्ही वेगळा मुखवटा लावला आणि तुमच्यातील शिक्षकाच्या भुमिकेला न्याय दिलात. हा तुम्ही धारण केलेला मुखवटा असला तरी त्यामागील हेतु प्रामाणिक असल्याने तो प्रामाणिक मुखवटा ठरतो आणि असा मुखवटा जर धारण करुन काहीतरी चांगले होत असेल तर तो धारण करायला काहीच हरकत नसावी असे मला वाटते. माझ्या त्या विद्यार्थिनीने मांडलेला विचार मला अक्षरशः थक्क करुन गेला. मुखवट्यांबद्दल कायम नकारात्मक भूमिका मांडल्या जात असल्याने मुखवट्यांनाही सकारात्मकतेने स्विकारायला लावणारा तो एक अत्यंत आशादायी विचार तिने मांडला होता.
आपण सर्वच जण बरेचवेळा या मुखवट्यांच्या वापरांबद्दल बोलत असतो किंवा त्याबद्दल टिका देखील करीत असतो. परंतू आपणही अनेकवेळा मुखवटे लावलेलेच असतात. या बाबीचा व्यापक विचार केल्यास समाजात वावरत असताना आपल्याला मुखवटे लावणे ही आपली अपरीहार्यता आहे. मुद्दा आहे तो मुखवटे लावण्यामागच्या हेतूंचा. तो हेतू जर जनकल्याणाचा आणि इतरांना आनंद देण्याचा असेल तर मग असले प्रामाणिक मुखवटे लावायला हरकत नसावी. उदाहरण द्यायचे झाल्यास, एखादा गायक किंवा साहित्यीक आपल्या अत्यंत प्रगल्भ विचारप्रक्रीयेतून एखादा कलाविष्कार सादर करीत असतो. त्या सादरीकरणाच्या वेळी त्याने एक मुखवटाच लावलेला असतो. त्याक्षणी त्याला त्याच्या प्रतिभेच्या सहाय्याने श्रोत्यांना सुरांनी किंवा शब्दांनी तृप्त करावयाचे असते. आपल्या मनातील इतर सर्व भावनांना बाजूला सारुन तो कलावंत किंवा साहित्यीक केवळ आनंदानुभूती देण्यासाठी प्रयत्नरत होतो आणि यासाठी त्यानेही एक मुखवटा लावलेलाच असतो. केवळ तो मुखवटा लावण्यामागील हेतु चांगला असल्याने आपण त्याला प्रामाणिक मुखवटा म्हणू शकतो आणि त्याचा चांगल्या मनाने स्विकार देखील करु शकतो. तो कलावंत त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा जगतो किंवा त्याचे व्यक्तिगत आयुष्य किती विस्कटलेले आहे याचा जर त्याच्या कलासादरीकरणावर परीणाम होत नसेल तर मग आपण देखील त्याच्या त्या आपल्याला न पटणाऱ्या चौकटीत शिरण्याचा प्रयत्न करु नये. त्या कलावंताला किंवा साहित्यीकाला आपण या प्रामाणिक मुखवट्यासकटच स्विकारावे. मध्यंतरी कुठल्याश्या मराठी मालिकेतील अभिनेता व अभिनेत्रीच्या लग्नाची नंतर काही महिन्यातच घटस्फोटाची फार चर्चा सुरु होती. मालिकेमधे फार प्रेमळपणे व समंजसपणे एकमेकांशी वागणारी ती दोघे व्यक्तिगत आयुष्यात एकमेकांपासून घटस्फोट घेताहेत हे अनेकांना पटले नाही. काही हौशी मंडळींनी तर त्यांच्या घटस्फोटाच्या केसची माहिती वगैरे काढून त्याचा नंबर वर्तमानपत्रातील लेखामधे छापला. लोकांच्या असल्या करामतींचे खरोखरीच नवल वाटते. मान्य आहे की त्या दोघांनी त्या मालिकेतील आपल्या भुमिका वठविण्यासाठी मुखवटे लावलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात कदाचित तसे प्रेम नसेलही. परंतू त्यांनी जो मुखवटा लावलेला आहे तो अतिशय प्रमाणिक आहे कारण त्यांच्या त्या सादरीकरणातून एकमेकांवर खूप प्रेम करणारे, एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करणारे एक आदर्श जोडपे ते वाटतात. मग आपण त्यांनी धारण केलेल्या मुखवट्यांसकट त्यांना स्विकारावे. कारण नसताना त्यांच्या मुखवट्याआड दडलेल्या व कदाचित आपल्याला न पटणाऱ्या वास्तवाचा चेहेरा बघण्याचा आपण तरी का प्रयत्न करावा. प्रामाणिक मुखवट्यांमुळे आपल्याला मिळणारा आनंद मिळविणे योग्य की त्या मुखवट्यामागे असलेल्या चेहेऱ्यांचा शोध घेऊन दुःखी होणे योग्य हा महत्वाचा विचाराधीन प्रश्न आहे.
माझ्या विद्यार्थीनीने मांडलेला मुद्दा मला पटतो कारण आपणही अनेकवेळा असे मुखवटे लावलेले असतात नव्हे ते लावल्या शिवाय आपल्याला समाजात क्रीयाशीलतेने व प्रभावाने वावरताच येत नाही. मुखवटे लावण्याने आपल्याला योग्य पद्धतीनेच वागावे लागते. डार्वीनच्या म्हणण्यानुसार प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर दडलेले असते. परंतू हे जनावर मुखवट्यांमुळे दडवून ठेवता येते. सामाजिक दृष्टीने या जनावराला दडवून चांगल्या हेतूने लावलेले मुखवटे आपण स्विकारायला हवेत कारण शेवटी त्याला दुसरा पर्याय नाही. वेगवेगळे मुखवटे लावून लावून आपल्याला आपल्या खऱ्या चेहेऱ्याचा शोध लागायला फार वेळ लागतो. कदाचित बरेचवेळा तो चेहेरा असाही असतो की तो लोकांपुढे न आलेला बरा हे आपलेच आपल्याला पटलेले असते. त्यामुळे धारण केलेल्या मुखवट्यांमुळे इतरांना आनंद देता येत असेल व कुणाची हानी होणार नसेल तर आपल्या आसपास वावरत असलेल्या अश्या मुखवट्यांबद्दल विषाद किंवा दुःस्वास न बाळगता त्यांतील दर्शनी सकारात्मकता स्विकारावी व आनंद घ्यावा. त्यांच्या मुखवट्यामागील चेहेऱ्यांसोबत त्यांना मोकळे सोडावे व मोकळीक द्यावी.
ही सकारात्मक तडजोड आपल्याला चांगल्या जगण्यासाठी करावी लागणार आहे कारण नव्या व आधुनिक काळात मुखवट्यांची दुकाने फार उघडल्या गेली आहेत. आपल्याला ती बंद करता येणार नाहीत. त्यांमधील सकारात्मक बाबी स्विकारुन पुढे मार्गक्रमण करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

Ek nava drustikon milala thanku
ReplyDelete