Article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है
मला एकटे रहायचेय
काकुळतीला येऊन ती म्हणाली, मला कृपया एकटे रहायचेय. यावेळी मला कुणीही माझ्या जवळ नकोय. मला कुणीही समजावू नका, कुणी आधारही देऊ नका. माझ्याबद्दल सहानुभूती तर दाखवूच नका. मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय. तेच तेच बोलून बोलून, तेच तेच करुन करुन मला आता खरोखरीच वीट आलाय. तुमची अती काळजी करणे देखील मला आता नकोसे झालेय. गंभीर चेहेरे करुन तुम्ही मला समजविण्याचा प्रयत्न करताय, माझ्या काळजीपोटीच हे सारे तुम्ही सर्वजण करताय हे मला कळतंय. पण तरीही आत्ता या क्षणी मला कुणीही जवळ नकोय. अगदी प्रेमाचं देखील कुणी नकोय. मला माझ्या स्वतःसोबत राहायचे आहे. मला विचारशून्य व्हायचे आहे. प्लीज, लीव्ह मी अलोन. सर्वांना हात जोडून ती विनवणी करीत होती. तिच्या जवळच्या लोकांना कळेचना की ही असे काय म्हणते आहे. तिच्या अश्या विनवण्यांमुळे स्वाभाविकच तीव्र प्रतिक्रीया उमटायला लागल्या. हिचे हे वागणे तर फारच विचित्र आहे. एव्हडा मोठा आघात हिच्या आयुष्यात झाला. आयुष्य अक्षरशः उध्वस्त झाल्यागत स्थिती झालीय. आम्ही सर्व जवळचे हिला आधार देण्यासाठी आलोय. हिच्या भविष्याचा विचार आम्ही सर्व करतोय आणि हिचा हा काय वेडेपणा सुरू आहे. आम्हाला हिच्याबद्दल काही वाटते म्हणूनच आम्ही आलोय ना येथे इतक्या लांबून. हिला तर आमच्या प्रेमाची आणि काळजीची काही पर्वा नाही असेच दिसतेय. ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणतो आपलंच खरं. वगैरे वगैरे. प्रत्येकजण त्या क्षणी तिला आधार देऊन सांभाळण्याचा प्रयत्न करीत होता. परंतू सांभाळापेक्षा आपले तिच्यावर किती प्रेम आहे आणि तिचा सांभाळ करण्याची संपुर्ण जबाबदारी आता माझीच आहे असे दाखविण्याचा प्रयत्न तो जास्त वाटत होता. तिच्या त्या - एकटे राहू द्या - या विनंतीला कुणी समजून घेण्याच्या मानसिकतेतच नव्हते. आपल्या भारतीय समाजरचनेमधे - मला एकटे राहू द्या - ही संकल्पनाच मुळात मान्य नाही त्यामुळे तशी कुणी विनंती केल्यास किंवा तसे राहण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर लगेचच सामाजिक चौकटीच्या विरोधात वागल्याचा आरोप होतो. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून खरे तर ती प्रत्येक मानवाची मूलभूत गरज आहे. परंतू आपली भारतीय सामाजिक रचना आपल्याला तश्या प्रकारची सवलत देत नाही.
आपण मुळात सर्व बाबी समुहाने करण्यात प्रसिद्ध आहोत. आपले सर्व जीवनमान, सर्व सणवार, सर्व परंपरा या लोकसंग्रह करुन पार पडतात. मुळात या सर्व परंपरांची रचनाच तश्या प्रकारची करण्यात आलेली आहे. एका बाजूने विचार केल्यास हे आपल्या भारतीय समाजाचे बलस्थान आहे. जगभरात या बाबींचे कौतूक केले जाते व त्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त केले जाते. मी माझ्या स्वीडन दौऱ्यामधे माझ्या परीवाराची ओळख करुन देताना माझ्या पत्नी व मुलांसोबत आई-वडील, भाऊ, त्याची पत्नी, त्याची मुले अशी एकत्रीत संख्या सांगायचो तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटायचे. वडीलांचा, माझा आणि माझ्या भावाचा असे तीन परीवार मी एकत्र करुन सांगतोय याचे त्यांना नवल वाटायचे. आमच्या काही सहलींचे फोटो त्यांना मी दाखविले ज्यात आम्ही दहा बारा परीवार मिळून एकत्रीतपणे सहलीला कसे काय जाऊ शकतो हा त्या मंडळींसाठी कुतुहलाचा विषय असायचा. आपल्या समाजरचनेमधे मोठ्या संख्येने एकत्रीत येऊनच आपण प्रथा व समारंभ साजरे करतो. परंतू या सर्व सवयींमुळे नव्या काळात आपली जरा अडचण व्हायला लागली आहे. नव्या काळात आवश्यक बनलेला परंतू अजूनही आपल्या अंगवळणी न पडलेला प्रकार म्हणजे - स्पेस देणे. नव्या जगातील जीवनाच्या वाढलेल्या वेगामुळे किंवा आधुनिकीकरणामुळे प्रत्येकाला स्पेस लागायला लागली आहे. परंतू आपल्या समाजरचनेच्या सवयींप्रमाणे अश्या प्रकारची स्पेस हवी असते हेच मुळात अजून आपण स्विकारलेले नाही. ही स्पेस दोन लोकांनाच नाही तर एकट्या व्यक्तीलाही हवी असते. त्यातूनच ही -मला एकटे राहू द्या - यासारखी बाब समोर येते आणि जास्तीत जास्त लोक त्या भावनेला समजूच शकत नाही.
खरे तर माणसाला स्वतःचा शोध घेण्यासाठी एकटेच रहावे लागते ही बाब आपल्या धर्मिक व पारमार्थिक तत्वज्ञानामधे समाविष्ट करण्यात आलेली आहे. ऋषी मुनींनी केलेली ध्याने किंवा समाध्या हा त्यातीलच प्रकार होता. परंतू ही सारी धार्मिक संदर्भात वापरली जाणारी उदाहरणे असल्याने व्यवहारिक जीवनात लागू पडत नाहीत. परंतू रोजचे जीवन जगत असताना देखी ल प्रत्येकाला एकटे रहावे वाटते किंवा वाटू शकते हा विचारच आपल्याला पचनी पडत नाही. खरे तर असे वाटणे अत्यंत स्वाभाविक असते. मानसशास्त्रीय अभ्यास देखील या गोष्टीची महती सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीकधी सर्वच बाबींचा शीण येतो. आपण करीत असलेले काम, त्यामधील कंटाळा आणणारी पुनरावृत्ती, यंत्रवत राबविल्या जात असलेल्या पद्धती, तेच तेच लोक, तेच तेच वातावरण, सर्वच बाबतीतला तोच तोपणा कधी कधी आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवितो. आपले शरीर नेहमीची कामे करीत राहते. नेहमीची सवय अल्याने शारीरिक थकवा देखील जाणवत नाही परंतू मन थकलेले असते. त्या थकलेल्या मनाला विश्रांती हवी असते. अशी विश्रांती केवळ एकटे रहाण्यानेच प्राप्त होऊ शकते. ती अवस्था अशी असते की त्यावेळी कुणीही म्हणजे कुणीही नको असते. अगदी ज्याच्यावर निरातीशय प्रेम आहे, ज्याचा आधार आहे ती पण व्यक्ती नको असते. अश्यावेळी आपल्या सामाजिक व्यवस्थेमधे फार गैरसमज होतात. मी इतका जवळचा आणि प्रेमाचा व्यक्ती असूनही मी देखील सोबत नकोय. मी तर आधारच देणार आहे. खरे सांगायचे तर त्यावेळी प्रेमाच्या आधाराचेही ओझे झालेले असते. कठीण प्रसंगांमधे दाखविली जाणारी सहानुभूती देखील बोचत असते. कारण ती मानसिकताच निराळी असते. त्या स्थितीमधे आत्मचिंतन होणार असते, स्वतः चा शोध लागणार असतो, किंवा आपणच आपले होणार असतो.
तसे बघितल्यास आईच्या उदरापासून विलग झाल्यानंतर आपण एकटेच असतो. वेगवेगळ्या भावनिक बंधनांनी आपण बांधल्या जरी गेलो तरीही मुळात आपण एकटेच असतो. हे एकटेपण आपल्याला मनःपटलावर कायम जाणवित असते आणि म्हणूनच त्या एकटेपणाची आपल्याला कधीकधी आवश्यकता असते. नेमकी हीच मनोवस्था आपल्या भारतीय सामाजिक चौकटीत स्विकारल्या जात नाही. ते आत्ममग्न होणे, त्या आत्ममग्नतेतून, आत्मबोध होणे व त्या आत्मबोधातून आत्माविष्कार होणे अशी ती प्रक्रीया असते. ही प्रक्रीया पार पाडण्यासाठीच कधीतरी कुणीतरी विनवणी करीत असते - मला एकट्याला राहू द्या. प्रेम करणाऱ्या व आधार देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने ही मनोभूमिका समजावून घेतली व त्या व्यक्तीला तिच्याबद्दल गैरसमज न करुन घेता एकटे राहू दिले तर अनेक मानसिक समस्या सोडविण्याची ताकद या स्थितीमधे असते. त्या स्थितीमधे त्या स्व चा शोध लागला की त्यापासून नेहेमीचे जीवन प्रभावीपणे जगण्याची शक्ती प्राप्त होते. त्यासाठीच आपणही कधीकाळी एकटे राहून आत्मचिंतन करावे व इतरांनाही करु द्यावे. ही जीवन सुखकर करण्याची एक प्रकारची साधनाच आहे. त्याचा सन्मान करावा.

Comments
Post a Comment