My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
गेट टुगेदर रीझोल्युशन
यशस्वी आयुष्य जगण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो कारण यशस्वी आयुष्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या देखील वेगवेगळ्या असतात. असे असले तरीदेखील जो आनंदी आयुष्य जगतो व ज्याला आयुष्याच्या विविध क्षणांमधे आनंद शोधता येतो तो यशस्वी आयुष्य जगतो असे सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येईल. अर्थात आपले आयुष्य बरेचवेळा आपल्या सभोवताली असलेल्या समुहाच्या अस्तित्वावरही अवलंबून असते. काही लोक समुहामधेही त्रयस्थ राहतात तर काही या समुहाचा उपयोग सर्वांच्या आयुष्याला अर्थ निर्माण करुन देण्यासाठी करतात. मुळात दृष्टीकोन सकारात्मक असेल तर आपल्याला प्रत्येक क्षणाला यशस्वी आयुष्याच्या दिशेने पडणाऱ्या पावलामधे परावर्तीत करता येऊ शकते. एक असाच सुंदर प्रयत्न मला बघायला मिळाला आणि तो प्रयत्न किती परीणामकारक ठरतो आहे हे देखील मला कळल्यानंतर माझा त्याबद्दलचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सध्या सगळीकडे शाळेतील जुन्या बॅचेसच्या रीयुनीयनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आहेत. ही एक अतिशय चांगली बाब आहे. पंचेवीस किंवा पन्नास वर्षांनतर शाळेतील सर्व सवंगडी परत एकदा एकत्र भेटणार आणि काही वर्षांपूर्वी एकत्र घालविलेला काळ पुन्हा अनुभवणार. असल्या कार्यक्रमांमधे फार धमाल असते. फार जुने मित्र मैत्रीणी एकत्र भेटून पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देतात. मुळात हे कार्यक्रम मनःस्वीच असतात कारण त्या जुन्या काळात केलेली मैत्री ही निखळ मैत्री असते. कसलाही स्वार्थ किंवा फायदा मनात न ठेवता सहजतेने परंतू घट्ट झालेली मैत्री पुन्हा अनेक वर्षांनंतर पुनःरुज्जीवीत करणे हा एक अपुर्व सोहळाच असतो. असल्या कार्यक्रमाचे पॅटर्न ठरलेले असतात. एकत्र यायचे, मजा करायची, फोटो काढायचे, एकमेकांची माहिती घ्यायची, काही पैसे गोळा करुन शाळेला एखादी भेट वस्तू द्यायची, जुन्या शिक्षकांचा सत्कार करायचा, व्हाॅट्स ॲपचा ग्रुप बनवायचा, एकमेकांना जोक्स शेअर करायचे आणि दरवर्षी आपण नक्की भेटायचे असे ठरवायचे. अश्या पद्धतीने हे सोहळे लाजरे केले जातात. सर्वांच्या भेटी होतात असे नाही परंतू काही जण भेटतात. हे जे काही केले जाते ते खरोखरीच छान आहे. अनेक वर्षांच्या जुन्या मित्र मैत्रीणी भेटणे हीच मुळात पर्वणी असते. परंतू या साचेबंद कार्यक्रमासोबत आपल्याला काही अजून वेगळे व मैत्रीची भावना खऱ्या अर्थाने सिद्ध करणारी काही बाब करता येऊ शकते असा प्रयत्न एका ग्रुपने केलेला मला कळला. त्यांनी या अश्या प्रकारच्या रीयुनीयनमधे आयोजित केलेला एक अभिनव उपक्रम मला फार आवडला. काही लोक हे जीवनातील क्षणांना यशस्वी जीवन जगण्याच्या संधीमधे परावर्तीत करतात असे जे मी लिहीले त्याचा खरा खुरा प्रत्यय आणणारा तो उपक्रम होता. मैत्री केवळ व्हाॅट्स ॲप वर मेसेजेस शेअर करण्यासाठी नसते किंवा एखाद्या रीयुनीयनच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापुरती नसते तर अनेक वर्षांच्या भेटीनंतरही एकमेकाच्या जीवनाला भरभक्कम आधार देण्यासाठी मैत्रीचा उपयोग होऊ शकतो हे त्या उपक्रमाने सिद्ध केले.
त्या रीयुनीयनमधे बाकी सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे झाले पण एक कार्यक्रम मात्र सर्वांना आश्चर्यात टाकणारा होता. सर्वांनी आपापला परीचय द्यायचा, आपल्या परीवारासंबंधी सांगायचे, गेल्या पंचेवीस वर्षांचा कालावधी कसा गेला हे सांगायचे पण यासोबतच शेवटी अगदी बिनधास्तपणे कोणती व्यसने लागली हे देखील सांगायचे. सगळेच मित्र मंडळी असल्याने प्रत्येकाने मोकळेपणाने बोलावे असे अपेक्षित होते. घडले देखील तसेच. प्रत्येक जण मनमोकळेपणाने सांगू लागला. त्या जवळपास सत्तर मित्रमंडळींपैकी पंचेवीस लोकांना वेगवेगळी व्यसने होती. कुणाला तंबाखूचे व्यसन लागले होते, कुणी कसल्याश्या पुड्या खायचा, कुणाला दारुचे व्यसन होते तर कुणाला लाॅटरीचे देखील व्यसन होते. प्रत्येकाने मोकळेपणाने आपापली व्यसने कबुल केली. ती कबुली देत असताना, खरे तर हे चांगले नाही पण त्याशिवाय आता भागत नाही हे देखील सांगितले. त्या सगळ्यांमधील ऋणानुबंध इतके छान होते की खरे तर लोकांपासून लपविली जाणारी गोष्ट त्या सर्वांनी मनमोकळेपणाने कबुल केली. ही कबुली झाल्यानंतर त्यावरचा उपाय देखील त्या उपक्रमाच्या कल्पक आयोजकांनी विचार करुन ठेवला होता. त्यांनी एक अफलातून रिझोल्युशन केले. त्यांनी ज्यांना ही व्यसने होती त्यांच्यासोबत इतर दोन दोन लोकांच्या जोड्या लावल्या. त्यांना एकमेकांचे मोबाईल नंबर घ्यायला लावले आणि त्या दोघांनी ज्याला व्यसन आहे त्या मित्राचे व्यसन वारंवार फोन करुन, त्याला त्यापासून परावृत्त करुन थांबविण्याचा प्रयत्न करायचा असे ठरले. ज्याला व्यसन आहे त्याने आपल्या मित्र मैत्रीणींच्या पाठपुराव्याचा आदर करायचा व व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करायचा असेही त्या रीयुनीयन रिझोल्युशन मधे ठरले. यासाठी कालमर्यादा देखील ठरविण्यात आली. एक वर्षामधे हे प्रयत्न करायचे आणि एक वर्षानंतर परत एकदा सर्वांनी भेटून आपल्या व्यसनांबाबत स्थिती विषद करायची. अत्यंत कल्पकतेने व मैत्रीतील दृढ प्रेमभाव साक्षीला ठेऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाचे केवळ चार महिन्यातील फलीत जेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितले तेव्हा माझा विश्वास बसला की मैत्रीचे नाते हे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे नाते असते आणि मैत्रीच्या आधारे जीवनात आमुलाग्र बदल घडू शकतात.
सतत तंबाखू खाण्याची सवय असलेल्या व त्यासाठी तंबाखू आणि चुन्याची डबीच बाळगणाऱ्या माझ्या मित्राने केवळ तीन महिन्यात तंबाखू खाणे पूर्णपणे बंद केले. त्याच्या मागे असलेल्या एक मित्र व एका मैत्रीणीच्या जोडीने अत्यंत प्रभावीपणे व हळू हळू त्याचा मागोवा घेऊन, त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहन देऊन तीन महिन्यात त्याचे तंबाखू खाणे बंद केले. तो माझा मित्र अत्यंत अभिमानाने सांगत होता की त्याच्या त्या रीयुनीयनच्या कार्यक्रमामधे करण्यात आलेल्या रीझोल्युशनमुळे जवळपास सर्वच जणांची व्यसने संपली आहेत व काहींची आटोक्यात आहेत. कुणी दिवसाकाठी दहा दहा पुड्या खायचा तो आता केवळ एकच पुडी खातोय. कुणाची रोजची दारुची पार्टी केवळ रविवार पर्यंत मर्यादित झालीय. कुणाची लॉटरीची सवय कायमची बंद झालीय. अर्थात हे सारे घडण्यासाठी स्वतः त्या व्यक्तीचे व त्याचा पाठपुरवा करणाऱ्या त्याच्या मित्रांचे बरोबरीचे योगदान आहे. पण मित्रांच्या परस्पर सहकार्याने हे घडू शकले ही बाब महत्वाची आहे. कल्पना छोटीशी होती पण अतिशय उपयुक्त ठरली. मैत्रीच्या त्या मेळाव्याचे फलीत इतके सुंदर व उपयोगी राहू शकते याचा अंदाज कदाचित त्या कल्पक मंडळींनाही सुरुवातीला आली नव्हती. परंतू योग्य पद्धतीने कल्पकता वापरुन मैत्रीच्या मेळाव्याचा उपयोग चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रेरक ठरु शकतो हे त्यांनी सिद्ध केले.
माणूस जेव्हा अश्या प्रकारे आपल्या स्वतःच्या सीमित वर्तुळाच्या पलीकडे जाऊन आपल्या मेंदुतील कल्पकतेला संधी देतो आणि आपल्या प्रामाणिक मनोभुमिकांची त्याला जोड देतो तेव्हा खरी निर्मिती होऊ शकते. चांगल्या जगाची निर्मिती ही याच प्रकारे व आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी मनुष्यजन्मामुळे असलेली कल्पकता सकारात्मकतेने वापल्यासच होऊ शकते हे सिद्ध करणारे हे रीयुनीयन रिझोल्युशन आपल्याला आपल्या पद्धतीने व आपल्यासोबतच इतरांचेही आयुष्य आनंदमयी करण्यासाठी वापरता येईल?

Comments
Post a Comment