दै. हिंदुस्थानमधे प्रकाशित माझ्या थोडा है, थोडे की जरुरत है या सदरातील आजचा लेख

समुपदेशन...काळाची गरज!
माझ्या एका मित्राचे त्याच्या पत्नीशी अजिबात पटत नव्हते. अत्यंत छोट्या छोट्या बाबतीत ते दोघेही नेहमीच टोकाची भूमिका घ्यायचे. वाद सुरु होताना त्याचे कारण फारच क्षुल्लक असायचे परंतू त्यानंतर वादावादी वाढून त्याचे रुपांतर टोकाच्या भांडणामधे व्हायचे. या सारख्या सारख्या भांडणांमुळे त्याच्या घराची सुख शांती पार हरवून गेली होती. केवळ तीन वर्षात त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण आनंद संपून गेला होता. भांडणे तर इतकी विकोपाला गेली होती की एक एकदा दोघांनीही जवळपास आपले आयुष्य संपविण्याचा प्रयत्न देखील केला होता. सुरुवातीला त्यांची भांडणे चार भिंतींच्या आड होत असल्याने कळायचे नाही. परंतू पुढेपुढे त्यांना भेटताना त्यांच्यातील वाद आम्हाला देखील जाणवायला लागले. सारेच अवघड होऊन बसले होते. दोघांच्या परीवाराच्या मंडळींनी देखील त्यांना समजावून सांगितले होते. परंतू काही दिवस संसाराचा गाडा ताळ्यावर राहून परत ये रे माझ्या मागल्या असे त्यांचे व्हायचे. त्याच्या संसाराचा झालेला खेळ खंडोबा मला बघवतच नव्हता. शेवटी मी एकदा मनाशी पक्के ठरवून त्यांच्याकडे गेलो. दोघेही तणावातच होते. कदाचित त्यांचे काहीतरी परत बिनसले होते. परंतू तरीदेखील निग्रहाने मी त्या दोघांनाही माझ्यासमोर बसविले आणि त्यांना एक सल्ला दिला. त्यांना मी वैवाहिक समस्यांवर मार्गदर्शन करीत असलेल्या एका समुपदेशकाकडे जाण्यास सांगितले. मी समुपदेशक म्हणल्यावर मला अपेक्षित तीच प्रतिक्रीया मिळाली. आता एव्हडेच शिल्लक राहीले आहे. आधीच एकमेकांच्या सहवासात डोके फिरायची वेळ आली आहे. आता कौन्सीलरकडे जाऊन वेडेपणाचे प्रमाणपत्र देखील घेऊन येतो.. किंवा यांच्या सहवासात मी अर्धी वेडी झाली आहेच, आता कौन्सीलरकडे जाऊन तिकडून परस्पर वेड्यांचे इस्पीतळ गाठते म्हणजे हे सुटतूल आणि मी पण सुटेन वगैरे वगैरे. समुपदेशक म्हणल्यावर आपण वेडे आहोत का? हा अत्यंत चुकीचा प्रश्न अजूनही आपल्या मनात येतो. या परंपरागत सवयीमुळेच त्यांच्या प्रतिक्रीया आल्या. त्यानंतर माझ्या मानसशास्त्राच्या अभ्यासाचा वापर करुन मी पुढील दोन तास त्यांना समुपदेशक म्हणजे काय व त्याच्याकडे जाऊन त्यांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल समुपदेशनच केले. दोन तासाच्या प्रयत्नांनंतर माझ्या त्या भूमिकेला यश मिळाले. ती दोघे एका समुपदेशकाकडे जाण्यास तयार झाली. शेवटी मी समुपदेशनाचे महत्व सांगताना मी त्यांचे दोन तास समुपदेशनच करीत होतो असे सांगितल्यावर समुपदेशन म्हणजे सहज घडणारी प्रक्रीया आहे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी ते करुन घेण्याचे त्यांचे पक्के झाले. साधारण सहा महिन्याच्या समुपदेशनानंतर त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल झाले. ते समुपदेशकाच्या सल्ल्याने त्यांनीच केले. त्यांचे वागणे बदलले, त्यांचा एकमेकांबद्दलचा ग्रह बदलला, दोघे एकमेकांसोबत सकारात्मक वेळ घालवू लागले. साधारण वर्षभरानंतर एकमेकांना खाऊ की गिळू पाहणारे ते नवरा बायको एक समाधानी व आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतीत करु लागले. आज त्या घटनेनंतर पुढे दहा वर्षे लोटून गेली आहेत व आता आपल्या मुलाबाळांसह त्यांचा एक आनंदी परीवार सर्व लोकांना व आम्हा सर्वांना जाणवितो आहे. हे साध्य होऊ शकले ते केवळ एका अत्यंत प्रोफेशनल व अभ्यासू समुपदेशकाच्या समुपदेशनामुळेच, किंबहुना त्या दोघांनी समुपदेशनाचे महत्व समजून घेतल्यानेच.
एकविसाव्या शतकातील बदलत्या काळात एका बाजूने माणसाचा भौतिक विकास फार झपाट्याने होत असला तरीही या नव्या काळात अनेक मानसिक समस्या निर्माण झाल्या आहेत. जीवनाचा वेग वाढला, स्पर्धा वाढली, पैश्याची गरज वाढली, तो मिळविण्यासाठी धावपळ वाढली, त्यामुळे वेळ मिळेनासा झाला व त्यामधून संवाद हरविला. चौकोनी कुटुंबांमधे संवादच नसेल तर निर्माण झालेली पोकळी वाद व वितंडवादानेच भरली जाणार हे नक्की. त्यामुळेच सर्वच वयोगटाच्या मंडळींना वेगवेगळ्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मुळात काय होतेय की वाद निर्माण झाला की त्याचे मुळ मानसिक समस्येत आहे हेच अनेक वेळा कळत नाही. अजुनही मानसिक समस्या म्हणजे वेडेपणा असे समिकरण आपल्या परंपरागत विचारसरणीतून गेलेले नाही. त्यामुळे मला मानसिक समस्या असू शकते हे स्विकारणेच सर्वात कठीण होऊन बसते. मनासिक समस्या म्हणजे वेडेपणा, म्हणजे मी वेडा, म्हणजे मला आता वेड्यांच्या इस्पीतळात नेणार अशी विचार श्रुंखला तयार होते व त्यामुळे मानसिक समस्या तशीच राहून एकमेकातील दुराव्याचे निराकरण भलतीकडेच शोधले जाते. या विचित्र व चुकीच्या श्रुंखलेमधे एक व्यक्ती आधुनिक काळात समाविष्ट झालेली आहे व जी मानसिक समस्या वेडेपणाकडे न जाऊ देता त्यांस ठीक करु शकते, ती म्हणजे समुपदेशक.
या नव्या काळात आपली जीवनशैली बदलली व त्या अनुषंगाने काही नवनविन समस्या आपल्यापुढे येऊन ठाकल्या आहेत. जुन्य काळात कदाचित सामाजिक परीस्थितीमुळे व एकोप्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण परस्परच केले होऊन जायचे. जसे मुलांच्या बाबतीत त्यांच्या विकासाचा विचार शाळेच्या पातळीवरच केला जायचा आणि त्याला पाढे आले नाही तर हातावर रुळ मारण्याचा अधिकार शिक्षकाला होता. आता तसे राहीलेले नाही. मुलांना मारहाण करुन शिकविणे नव्या पठडीत बसत नाही. ही बाब योग्य की अयोग्य हा स्वतंत्र चर्चेचा विषय राहू शकतो. परंतू मुलाचे मन सांभाळणे व त्याला ताणविरहित प्रशिक्षण देणे या प्रक्रीयेत त्यांच्या मनाचा विचार करणारा समुपदेशक आजकाल शाळांमधून नेमला जातो आहे. बालकांवर निर्माण होत असलेल्या ताणाचे योग्य नियोजन कसे करायचे व त्यास सकारात्मक उर्जेमधे कसे परावर्तीत करायचे हे समुपदेशक सांगण्याचे कार्य करीत असतो. अनेक महिला समुपदेशकही आजकाल फार चांगल्या प्रकारचे कार्य करीत आहेत. पतीपत्नी मधील वाद असोत किंवा मुलांच्या विकासाबद्दलच्या समस्या असोत, एक चांगली दृष्टी प्रदान करणारा समुपदेशक ही आपली गरज बनली आहे व म्हणूनच समुपदेशन प्रक्रीयेकडे सकारात्मकतेने बघण्याची आवश्यकता आहे.
आपल्या परंपरागत जीवन पद्धती आपल्या नसानसांमधे भिनलेल्या असल्याने जग बदललेले असले तरीही त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र तोच आहे व त्यामधूनच वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्षांच्या परीस्थिती निर्माण होताना दिसतात. अश्यावेळी योग्य समुपदेशक आपल्याला प्राप्त परीस्थितीकडे कसे बघायचे आणि आपल्या वागण्याच्या शैलीमधे फार छोटे बदल करुन आपल्या आजुबाजुचे वातावरण आनंदी कसे ठेवायचे याबद्दल मार्गदर्शन करु शकतो. त्यासाठी समुपदेशकाकडे जाणे माझ्या योग्यतेला शोभत नाही अश्या पद्धतीचा अहं बाजूला सारणे आवश्यक आहे. तसेच समुपदेशन कोणत्याही वयात प्राप्त केल्या जाऊ शकते किंबहुना त्यास वयाचे बंधन नाही. आम्ही खूप पावसाळे बघितले किंवा आम्हाला सर्व कळते यासारख्या आत्मभ्रमात जगत असलेल्या मंडळींनी देखील प्रसंगी समुपदेशकाची मदत घेऊन बिघडणारी परिस्थिती सावरायला हवी. कारण समुपदेशक हा आपला आपल्याच जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन प्रदान करणारा मित्र-मैत्रीण आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. या मित्राच्या किंवा मैत्रीणीच्या मदतीने आपण आपले आयुष्य आपल्या सख्या-सोबत्यांसह आनंदात व्यतीत करु शकतो. शेवटी आपल्या जीवनाचे ध्येय -आनंदी व समाधानी आयुष्य- हेच असते ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23