My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

एस ओ एस कॉल
साधारण वर्षभरापूर्वी मुंबईला रहात असलेल्या माझ्या एका मित्राचा मला फोन आला. तो मला म्हणाला, यार! मी तुला एक एस ओ एस कॉल करतोय. मला कळेना की त्याला नेमके काय म्हणायचे आहे. मला त्याने वापरलेली संज्ञा माहित नसल्याने मी त्याच्या पुढील बोलण्याची वाट बघितली. त्याच्या बोलण्याहून माझ्या नंतर लक्षात आले की तो अमरावतीला आलेला होता आणि त्याला माझ्याकडे एक काम होते. काम अतिशय साध्या स्वरुपाचे होते परंतू तो त्यासाठी फारच आर्जव करीत होता. मला त्याचे आर्जव करणे जरा विचित्रच वाटत होते. काम असे होते की त्याच्या घरी महालक्ष्मींचा सण असल्याने त्याला पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटर बॉटल्सवाल्याकडून तीन बॉटल्सची ऑर्डर बुक करुन हवी होती. इतक्या साध्या कामासाठी त्याने मला एस ओ एस कॉल करावा ही माझ्यासाठी फारच आश्चर्याची बाब होती. पण ज्यावेळी फोन आला त्यावेळी मला एस ओ एस कॉलची संकल्पना माहिती नव्हती. तरीदेखील मित्र म्हणून हक्काने जी गोष्ट किंवा काम त्याने सांगायला हवे होते त्यासाठी तो फारच काकुळतीला येऊन आर्जव करीत होता. त्याचे काम लगेच होऊन जाईल असे त्यास आश्वस्त करुन मी त्याची चिंता मिटविली. त्यानंतर त्याने धन्यवादाचा पाढा सुरु केला. मग मात्र मी न राहवून खास वैदर्भीय भाषेत त्याचा चांगलाच समाचार घेतला. तो अमरावतीला रहात असताना किती मोकळेपणाने वावरायचा आणि आता त्याने ही फारच वेगळी व मैत्रीमधे न रुचणारी औपचारिकता अंगीकारण्याचे कारण नाही इत्यादी गोष्टी मी त्याला समजावून सांगितल्या. तो पर्यंत देखील मला त्याच्या एस ओ एस कॉल या संकल्पनेचा अर्थ कळला नव्हता. हा प्रसंग घडून गेल्यावर काही महिने उलटून गेले व नंतर परत एकदा आणखी एका मित्राचा एका कामासाठी एस ओ एस कॉल आला तेव्हा मात्र मी त्वरीत त्या संज्ञेचा अर्थ जाणून घेतला. त्या संज्ञेचा मूळ अर्थ समजल्यावर संज्ञेच्या मूळ अर्थाचाही अपभ्रंश होऊ शकतो आणि या नव्या जमान्यात अत्यंत सामान्य बाबी देखील एस ओ एस कॉलच्या पातळीच्याच होऊन बसतात किंवा आपण त्याला बनवितो असेच मला वाटले. नव्या सामाजिक पद्धतींमधे माणसा माणसांच्या व्यवहारामधील मोकळेपणा हळू हळू लोप पावून अत्यंत सामान्य स्वरुपाच्या मदतीला देखील एस ओ एस कॉल लागायला लागला. 
एस ओ एस कॉल ही संकल्पना तशी शंभर वर्षांहून अधिक वर्षे जुनी आहे. जून्या काळी संदेश वहनासाठी वापरल्या गेलेल्या व्यवस्थेमधील ही संज्ञा आहे. याचा स्विकार सर्वप्रथम जर्मन सरकारने १ एप्रील १९०५ रोजी रेडीओ सिग्नल वापरताना केला. त्यानंतर लवकरच १ जुलै १९०८ पासून या एस ओ एस संदेशाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. एस ओ एस म्हणजे सेव्ह अवर शीप किंवा सेव्ह अवर सोल. जहाजे किंवा विमाने जेव्हा धोकादायक स्थितीमधे पोहोचतात तेव्हा मदत मागण्यासाठी पाठविण्यात येणारा रेडीओ सिग्नल म्हणजे एस ओ एस. हा संदेश म्हणजे तात्काळ व आपातकालीन मदत प्राप्त करण्यासाठी पाठविण्यात येणारी विनंती अश्या स्वरुपाचा होता. त्या काळी संवादाची विविध आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने मोर्स कोड मधे हा संदेश पाठविला जायचा. हा संदेश म्हणजे पाठविणाऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न. अश्या स्वरुपाचा अर्थ असलेली संज्ञा या आधुनिक काळात आपण अत्यंत सामान्य कामांच्या विनंतीसाठी वापरायला लागलो. मला या सर्व प्रकाराची गंमत वाटली. परंतू त्याचा थोडा खोलवर जाऊन विचार केल्यावर मला असे जाणविले की नव्या काळात एकमेकांशी अत्यंत औपचारिक वागत असताना एखादी अत्यंत सामान्य अडचण देखील एस ओ एस सारखीच बनू शकते आणि त्यासाठी मित्रांकडून किंवा स्नेही मंडळींकडून मदत मागणे हे तर त्याहून कठीण होऊन बसते. अगदी जवळच्या मित्रमंडळींशी देखील वागताना अतिशय औपचारिक वागण्याची पद्धती "सभ्यता" बनल्यामुळे साध्या साध्या मागण्या व मदत देखील एकदम एस ओ एस झाल्या आहेत. माणूस शहरी झाला की कदाचित या असल्या तथाकथीत सभ्यता व त्या सभ्यतांचे उपचार त्याला चिकटत असावेत. याचे कारण माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील लोकांचा व्यवहार मला आठविला की तेथील लोक आपुलकीने कसे वावरायचे याची आठवण होते.
त्या गावात जर कुणाच्या घरी लग्न असेल तर काय होत असावे? लग्न म्हणजे या नव्या शहरी संकल्पनांनुसार तर खरोखरीच एस ओ एस सारखेच कार्य असते. परंतू त्या गावात ते कार्य सगळ्या गावाची जबाबदारी असायची. लग्नासाठी संपूर्ण गावाला निमंत्रण दिले जायचे. लग्नामधे सर्वांना जेवण्यासाठी सामुहिकपणे केवळ भात व वांग्याची भाजी बनविली जायची. जेवणाच्या वेळी लागणाऱ्या पोळ्यांसाठी सर्व घरी केवळ सूचना दिली जायची. प्रत्येक घरुन आपल्या व आणखी एका कुटुंबापुरत्या पोळ्या महिलांनी बनवून आणायच्या. भात व भाजी पुरुष मंडळी बनविणार. लग्नाची सर्व कामे देखील अश्याच प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने केली जायची. अश्या प्रकारे फारच मोठे एस ओ एस पद्धतीचे कार्य देखील सर्वांच्या सहकार्याने चुटकीसरशी होऊन जायचे. ग्रामीण भागात एकमेकांना हक्काने मदत करण्याचा व एकमेकांकडून हक्काने मदत घेण्याचा हा प्रकार अद्यापही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे. शहरात मात्र हे सारे बदलले. एक तर आम्हाला वेळ नाही हीच सध्या सर्वात परवलीची संज्ञा बनली आहे. ती खरी देखील आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाला असला तरी देखील कामाच्या ठिकाणचा ताण कमी होत नाही. असे झाल्यामुळे वेगवेगळ्या सेवा प्रदान करणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्या व त्यामुळे लोकांची गरजच भासेनासी झाली. लोकांना भेटण्याची गरज नाही, हक्काने कामे सांगण्याची गरज नाही की त्यांच्याकडून करुन घेण्याची देखील आवश्यकता नाही. यामुळेच मग अगदी जवळच्या मित्राचा देखील फोन येतो की तुम्ही व्यस्त नसाल तर भेटायला येतो. त्याच्याशी वागताना माझ्याही मनात विचार यायला लागलाय की मी याच्याकडे गेल्यानंतर याला त्रास तर होणार नाही ना? अशी स्थिती फार काळ राहीली की आपोआपच नात्यांमधे औपचारिकता निर्माण होते आणि मग जिवलग मित्र देखील अत्यंत सामान्य कामासाठी एकमेकांना एस ओ एस कॉल करायला लागतात.
खरे तर आपण अत्यंत खुल्या दिलाने नाती सांभाळायला हवी. ज्या नात्यांमधे प्रेम आहे त्या नात्यांना एकमेकांच्या कोणत्याच बाबींचे ओझे व्हायला नको. माझ्या मते नाती जपणारे यशस्वी जीवन म्हणजे गरज पडेल त्याक्षणी कसलाही किंतू न बाळगता बोलाविता येतील असे किमान दहा लोक आपल्या फोन मधे फास्ट डायलींगवर असणे आणि गरज पडल्यास ताबडतोब कसलाही परंतू न बाळगता पोहोचण्यासाठी आपणही त्या दहा लोकांच्या फोन मधील फास्ट डायलींगवर असणे. नात्यांमधील औपचारिकता आपल्याला घालविता आली तरच आपण खऱ्या एस ओ एस कॉलसाठी पात्र ठरु.


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23