My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

"स्कील"फुल शिक्षक
नुकतेच अमरावती शहरातील एका महाविद्यालयामधे मला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यानासाठी बोलाविले होते. शिक्षक दिन लागूनच असल्याने मी माझ्या व्याख्यानात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामधे शिक्षकांच्या योगदानाबद्दल बोललो. शिक्षक वेगवेगळ्या पातळीवर कश्या प्रकारे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकसित करीत असतो याचे दाखले देऊन मी ती बाब स्पष्ट केली. परंतू मी बोललेल्या बाबीवर नंतर माझ्या मनात एक वेगळाच विचार सुरु झाला. कला, वाणिज्य व विज्ञान या महाविद्यालयांमधे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे आम्ही प्राध्यापक मंडळी किंवा विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रदान करणारे शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थ्यांना काय देतो आहे याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटायला लागले. माझ्या मनातील या प्रश्नांची फार उत्तम उत्तरे त्या महाविद्यालयाच्या अत्यंत अनुभवी व प्रयोगशील प्राचार्यांनी मला दिली. मुळात आपण जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना ज्ञान देतो आहे किंवा फार स्पष्ट बोलायचे झाल्यास माहिती देतो आहे. ही माहिती प्राप्त करण्याचे स्रोत आपल्याकडे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहेत किंवा पुस्तकांमधे असलेली ही माहिती समजून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची आमची हातोटी आहे. या एका बाबींमुळे आपण सर्व शिक्षकाच्या भुमिकेला न्याय देतो आहे. परंतू आता यापुढे आपण आतापर्यंत ज्या प्रकारे या ज्ञानदानाच्या म्हणजेच माहीती प्रसारणाच्या प्रक्रीयेला राबवित आलो होतो ती मात्र बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
एकविसाव्या शतकात जे महत्वाचे बदल झाले त्यातील एक महत्वाचा बदल म्हणजे तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनातील वेगवान प्रवेश हा होय. म्हणूनच माहीती प्रसारण किंवा ज्ञानदानाच्या प्रक्रीयेमधे विद्यार्थ्यांची तंत्रज्ञान हाताळण्याची हातोटी शिक्षकाचे अढळ स्थान धोक्यात आणणारी आहे. चर्चेमधे त्या मार्गदर्शक प्राचार्यांनी सहजच विचारले की आजपर्यंत कोणत्याही शाळेत किंवा महाविद्यालयामधे विशेषतः या नव्या सहस्त्रकाच्या सुरुवातीपासून महाविद्यालयात किंवा शाळेत तास होत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले आहे का? प्रश्न फार मार्मिक होता. याचा अर्थ सर्वच महाविद्यालयांमधे आणि शाळांमधे नियमित तास होतात असा घेता येत नाही. याचा अर्थ असा होतो की शाळा व महाविद्यालयांमधे दिल्या जात असलेल्या माहिती प्रसारणाची हळू हळू विद्यार्थ्यांना गरज वाटेनासी होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे माहितीचे जे स्रोत आतापर्यंत केवळ शिक्षकांकडे उपलब्ध होते ते आता विद्यार्थ्यांकडे जास्त प्रभावीपणे उपलब्ध झालेले आहेत व म्हणूनच परंपरागत ज्ञानदानाच्या पद्धतींमधे काहीतरी आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. हा बदल काय राहू शकतो व तो कशा प्रकारे राबविला जाऊ शकतो याचे एक उत्तम मॉडेल त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मला दाखविले. ते मॉडेल बघून मी खरोखरीच समाधानी झालो. एक नवा मार्ग मिळाल्याचे ते समाधान होते. निदान काहीतरी नविन, काहीतरी कामाचे व काहीतरी असे की जे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी खरोखरीच मदत करु शकेल असे एक मॉडेल मी समजावून घेतले. त्याचे यश कितपत राहील, त्याला प्रतिसाद कसा मिळेल हे राबविल्यानंतर आपल्याला कळेलच. त्या महाविद्यालयात ते मिळाले आहे. परंतू परंपरागत अभ्यासक्रमांसोबत अश्या प्रकारचा उपक्रम प्रत्येक शाळेत किंवा महाविद्यालयात सुरु होणे ही काळाची गरज आहे.
सध्या देशभरात विशेषतः उच्चशिक्षण प्रक्रीयेत एक नवा विचार प्रस्थापित केला जात आहे तो म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण. विद्यार्थ्यांमधे कोणतेतरी स्कील निर्माण होणे ही काळाची गरज आहे. शिक्षण घेत असलेल्यांची वाढती संख्या व त्या प्रमाणात तंत्रज्ञानामुळे कमी होत चाललेल्या नोकरीच्या संधी या व्यस्त समिकरणावर मात करण्यासाठी व येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढू पाहणाऱ्या बेरोजगारीला रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमधे स्कील्स निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. तंत्रशिक्षणाच्या संस्था सोडल्यास जवळपास ८० टक्के विद्यार्थी वर्ग सध्या परंपरागत शिक्षण प्रणालीमधेच प्रशिक्षित होतो आहे. त्यामुळे त्याला प्राप्त होत असलेल्या ज्ञानाच्या आधारे तो नोकरी करण्यासाठीच तयार होतो आहे. दुर्दैवाने ज्या प्रमाणात हे विद्यार्थी प्रशिक्षित होत आहेत त्याच्या ५ टक्के देखील नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत हे भीषण वास्तव आहे. यामुळे प्रतीवर्षी नोकरी मिळत नसलेल्या वैफल्यग्रस्त प्रशिक्षित तरुण-तरुणींच्या संख्येमधे वाढच होते आहे. अजुनही या परंपरागत अभ्यासक्रमांमधे हव्या त्या प्रमाणात स्कील डेव्हलपमेंट समाविष्ट झालेले नाही. ते फार मोठ्या प्रमाणात होऊ देखील शकणार नाही कारण शेवटी मूळ अभ्यासक्रमाचे महत्व देखील नाकारता येत नाही. अश्या वेळी आता या सर्व व्यवस्थांमधील शिक्षकांनी पुढाकार घ्यायला हवा. तो कशाप्रकारे घ्यावा याचे मॉडेल मला बघायला मिळाले.
त्या महविद्यालयात सर्व शिक्षकांना त्यांच्या विषयाशी अनुरुप किंवा आवडीनुरुप एक एक स्कील निवडण्यास सांगण्यात आले. शिक्षकांनी स्वतःच्या क्षमतांचा विचार करुन हे स्कील्स निवडले. या उपक्रमाचे नाव वन टीचर-वन स्कील असे ठेवण्यात आले. स्कील्स निवडल्यासोबत साधारण किती काळामधे या स्कीलबाबत शिक्षक स्वतः प्राविण्य प्राप्त करु शकतो हे देखील विचारण्यात आले. सर्व शिक्षकांनी अत्यंत उत्साहाने या प्रक्रीयेत भाग घेतला ही जमेची बाजु ठरली. मग कुणी मशरुम उगविण्यासंबंधीचे स्कील सांगितले तर कुणी इंग्रजी भाषेतून संवादाचे स्कील सांगितले. कुणी ऑनलाईन व्यवहारासंबंधीचे स्कील सांगितले तर कुणी इलेक्ट्रीकल वस्तुंच्या दुरुस्तीचे स्कील सांगितले. यासोबतच कुणी तीन महिने तर कुणी दोन महिन्याचा कालावधी मागितला. या कालावधीनंतर सर्व शिक्षक वेगवेगळ्या स्कील्स सोबत व त्याच्या एकूण दहा ते पंधरा दिवसाच्या ट्रेनींग प्रोग्रामच्या मॉड्युलसोबत तयार झाले. प्रत्येकाने दहा दिवसाचे सिलॅबस तयार करुन प्राचार्यांकडे सादर केले. यानंतर या सर्व शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार आपापल्या स्कील्स ट्रेनींग प्रोग्राममधे भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता सूचना लावण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना वाटेल त्या कोर्सला त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर त्यांनी त्या त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामधे वेगवेगळे स्कील्स शिकले. या प्रत्येक कोर्समधे शेवटी परीक्षा घेण्यात आली व त्यानंतर प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याचा फायदा असा झाला की त्या महाविद्यालयातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना कोणतेतरी स्कील प्राप्त करता आले व त्याद्वारे त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी प्राप्त झाली किंवा भविष्यात होईल. या कोर्स साठी कोणतीही अतिरीक्त फी न घेता, महाविद्यालयीन वेळातच शिक्षकांनी राबविलेला हा अत्यंत विद्यार्थी उपयोगी उपक्रम ठरला आहे. परंपरागत प्रशिक्षणासोबत पदवी अभ्यासक्रमाला असलेला विद्यार्थी तीन वर्षात जर पाच ते सहा महत्वाचे स्कील्स प्राप्त करुन तयार होत असेल तर ही किती मोठी व उपयोगी बाब राहू शकते याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा.
नव्या काळात शिक्षकाने आपल्या परंपरागत कार्यासोबत अश्याप्रकारचे विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने कार्य केल्यास या शिक्षण प्रणालीवरचा कमी झालेला विश्वास वृद्धींगत व्हायला काहीच वेळ लागणार नाही. शिक्षणाचे व गुरुचे गतवैभव लवकरच परत मिळविता येईल. अश्या प्रकारचे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आमुलाग्र बदलवून टाकणारे कार्य केवळ शिक्षकच करु शकतो कारण आर्य चाणाक्यने म्हणलेच आहे-
शिक्षक कभी साधारण नही होता, प्रलय और निर्माण उसकी गोद मे पलते है।
वर वर्णन केल्याप्रमाणे स्कील फुल शिक्षक बनवून सर्व शिक्षकांना एका चांगल्या पद्धतीचा भारत निश्चितच निर्माण करता येईल यात अजिबात शंका नाही.




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23