My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

अब बस सन्नाटे है
ती: सकाळी ६.०० वाजता मला अलार्म वाजायच्या आतच जाग येते. पहाटेची घरातील सर्व कामे मला घाई घाईने आटपावी लागतात. नवरा झोपला असतो. आधीच्या रात्रीच्या पार्टीचा हँगओव्हर उतरायचा असतो त्याचा. मला मात्र कामे आटोपून लगोलग ऑफीसला पळायचे असते. नेमके ऑफीसमधे लवकर बोलाविले जाते. त्यांचेही बरोबर आहे, पुढच्या आठवड्यात हेड ऑफीसची टीम येणार आहे त्यामुळे कामे तर करावीच लागणार. आठ वाजेपर्यंतही नवरा उठला नसतो त्यामुळे त्याला काही सूचना देऊन निघते. नास्ता ठेवलाय टेबलवर, दुध फ्रीजमधेच आहे, चहा करुन घे, कामवाल्या बाईसाठी समोरच्या घरी किल्ली ठेवीत जा म्हणून रोजच सांगावे लागते, विसरणे किती प्रमाणात राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझा नवरा. ऑफीसच्या गोष्टी मात्र बरोबर लक्षात राहतात. स्वयंपाकाला बाईच असल्याने मला लवकर निघता येते अन्यथा ज्या दिवशी बाई नसेल त्या दिवशी काहीतरी भराभर करुन द्यावे लागते. पण मग त्या दिवशी ऑफीसमधे फोन करुन उशीरा येण्याची परवानगी घ्यावी लागते. मला ते अजिबात आवडत नाही. माझा नवरा झोपेतच मला गुड मॉर्नींग करतो आणि मी त्याचे ते शब्द ऐकण्याआधीच घराबाहेर पडलेली असते. मी काम चांगले केले तर मला प्रमोशन मिळणार आहे. माझे पॅकेजदेखील वाढणार आहे. मी ठरवलंय, सध्या आहे त्याच्या दुप्पट पॅकेज झाल्याशिवाय मुल होऊ द्यायचे नाही. विनाकारण अडकून पडायला होतं त्यामुळे. माझे करीयर माझी प्रायॉरीटी आहे. नवरा म्हणत राहतो मधून मधून पण मी त्याला स्पष्ट बजावले आहे, नो वे! मला सध्या शक्य नाही. त्याची मला काही मदतच होत नाही. सध्या तर खरं सांगायचे तर माझा ऑफीसमधे वेळ छान जातो. माझी टीम मस्त आहे. आम्ही दोघी मैत्रीणी आणि आमचे तीन मित्र. आम्ही बढीया काम करतो. आमच्यात फारच छान ट्युनींग आहे. सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंत वेळ कसा जातो हे कळतच नाही. ऑफीस संपल्यावर देखील आम्ही काहीतरी प्लॅन करतो. घरी येण्याची मला घाई नसतेच कारण माझा नवरा कधीही रात्री नऊच्या आत येत नाही ते देखील पार्टी नसेल तर. अन्यथा रात्री बाराच. मग एकटीला जेवणे फार बोअर होते. घरी पोहोचायचे आणि मस्त टीव्ही बघून मग ताणून द्यायची.  नवरा लवकर घरी आला तरी देखील त्याला इंटरनॅशनल कॉल असतो त्यामुळे तो कामातच असतो. घर मात्र आमचं पॉश आहे एकदम. सर्व सुविधा आहेत. आम्ही दोघेही छान कमावतो ना म्हणून सगळं करता आलं. पण इतक्यात मला या घरी यावे वाटत नाही. कारण मला हे घर माझं आणि माझ्या नवऱ्याचं वेगवेगळं वाटायला लागलं आहे. खरं म्हणजे मला आता वाटायला लागले आहे की त्याचे एक वेगळे विश्व आहे आणि माझे एक वेगळे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे विश्व कुठेही एकमेकांना स्पर्श करीत नाहीत. सुरुवातीला आमची खूप भांडणे व्हायची पण त्यानिमित्ताने का होईना आम्ही बोलायचो. लेकीन अब हमारे बीच बस सन्नाटे है और सिर्फ वो सन्नाटे झगडते रहते है। आम्ही केवळ लोकांसाठी नवरा-बायको आहोत. एकमेकांसाठी आम्ही पुन्हा एकदा अनोळखी झालो आहोत.
तो: मला सूचना देऊन माझी बायको निघून गेली. मला तिच्या हातचा चहा आवडतो हे तिला माहित होते पण बहुदा आता ती विसरली असणार. रात्री पार्टी असली की सकाळी माझ्याकडून उठणेच होत नाही. पार्टीला जाण्याचा खरे तर कंटाळा येतो परंतू काय करणार कंपनीचा व्हीपी म्हणल्यावर हे करावेच लागते. कंपनी इतके मोठे पॅकेज उगाच थोडेच देते. आमच्या स्वयंपाकवाल्या मावशी फारच मस्त जेवण बनवितात. त्यांनाच माझ्या जेवणाच्या आवडी जास्त माहीत आहेत. अर्थात माझ्या बायकोनेच त्या सांगितल्या आहेत पण त्यांना सांगून ती स्वतः मात्र त्या सगळ्या गोष्टी विसरुन गेली आहे. मी ऑफीसमधे मात्र आरामात दहा साडे दहा पर्यंत जातो कारण माझ्या परतण्याचा वेळ निश्चित नाही. त्यातून महिन्याचे दहा ते पंधरा दिवस परदेशातच असतो मी. पण येथे असलो की घरी रहावे वाटायचे दोन वर्षा आधी. पण आता नाही वाटत. माझ्या ऑफीसातील माझ्या सेक्रेटरीला माझ्या आवडी निवडी जास्त माहीत आहेत माझ्या बायको पेक्षा. मला माझ्या परीवारासाठी पैसा कमवायचा आहे. भविष्य सुरक्षित करायचे आहे. त्यामुळे मला काम करावे लागते. एव्हड्या मोठ्या कंपनीचा उपाध्यक्ष म्हणजे गंमत नाही. पण काम करुन मी पैसा देखील चांगलाच मिळवलाय. एकदम पॉश घर बनविले आहे. नाही म्हणायला बायकोने देखील पैसा दिला पण तो कमीच होता. मलाही वाटते की आपला परीवार आता वाढायला हवा. घरी मुले बाळे असावी. परंतू माझी बायको सपशेल नकार देते. करीयरला प्राधान्य. मी कमावतोय. अजून जास्त कमाविन, अजून जास्ती वेळ काम करीन. पण ती समजूनच घेत नाही त्याला काय करावे? माझ्या नोकरीमधे माझा वेळ माझा नाही. मी माझा वेळ कंपनीला विकलाय. पण त्या बदल्यात मला बरेच काही पर्क्स मिळतात. त्यामधूनच आमचे भविष्य सुरक्षित होते. मी घरी परत येतो तर बायको थकून झोपलेली असते. आजकाल तर मी पार्टी नसेल तर तिने काहीतरी बनविलेले असते ते गरम करणेही सोडून दिले आहे. ऑफीसमधून निघतानाच मी काहीतरी खाऊन निघतो. घरी दोन घास पोटाखाली ढकलायचे आणि झोपायचे. बायको काही विचारत नाही. मी देखील काही सांगत नाही. सुरुवातीला त्रास झाला पण आता तिच्या न विचारण्याचेही काही वाटत नाही. बरेचवेळा माझे इंटरनॅशनल कॉल्स असतात ते अटेंड करावे लागतात. अमेरीकन लोक ते. त्यांच्याशी ऑफीशीयल वेळातच बोलावे लागते. ऑफीसच्या वेळेनंतरचा त्यांचा वेळ खाजगी कामांसाठी असतो. पण माझा वेळ चांगला जातो. कारण आता आम्हा नवरा बायकोत एक प्रकारच्या शांतता निर्माण झाल्यात. आम्ही आजकाल भांडणांसाठीही बोलत नाही. हमारे बीच मे जो सन्नाटे है ना वोही शायद झगडते रहते है । एक विचित्र प्रकारचे अनोळखीपण आले आहे आमच्यात. 
या दोघांचे घर: अरे वेड्यांनो, मला सजविता सजविता तुम्ही माझ्या अस्तित्वाचे खरे मर्म विसरलात. पॅकेजच्या नादात भविष्याची चिंता करता करता वर्तमानकाळात जगायला विसरलात. एकमेकांचे अस्तित्व टिकविण्याच्या हौसेपोटी मला हवी असलेले लहानग्यांच्या बोबड्या बोलांचे महत्व तुम्हाला पटेनासे झाले. दोघांच्या भविष्यासाठी काम करताना एकमेकांना वेळ द्यायचा असतो हे तुमच्या लक्षातच राहीले नाही. आपापल्या कार्यालयातील सहकारी मंडळींशा जेव्हडे बोलता त्यापेक्षा दहा टक्के देखील एकमेकांशी तुम्ही बोलत नाही याची खंतही तुम्हाला वाटेनाशी झालीय. अरे येथील शांतता मला खायला उठते कारण ती एकाकीपणाची शांतता नाही तर दोन व्यक्तींच्या संवादहीन आयुष्यातील भयाण शांतता आहे. अरे घर हे सिमेंट विटांचे बनलेले असले तरीही त्याला माणसांच्या आनंद संवादांनी घरपण मिळवून द्यावे लागते. मला तुम्ही निर्माण तर मोठ्या आवडीने केले पण पण घरपण न मिळालेली मी एक देखणी परंतू भकास इमारत बनून राहीलोय...बघा तुमचे एकमेकांचे अनोळखी पण जर घालविता आले तर मला माझी खरी खुरी ओळख मिळेल.
आपण: हे सारे ऐकून केवळ सुन्न आणि आपल्यासोबत असे होऊ नये याची काळजी !! 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23