थोडा है थोडे की जरुरत है @ 06.02.24
अजुनही ती आहे…
भा.रा. तांबे आपल्याला सांगून गेले, जन पळभर म्हणतील हाय हाय.. मी जाता राहील कार्य काय? खरेच आहे. कुणाच्या जाण्याने कुणाचेच काहीच अडत नाही असा त्या चिरस्मरणीय काव्याचा साध्या भाषेतला अन्वयार्थ आहे. जन्म देताच एखाद्या बाळाची जन्मदात्री त्याला सोडून जाते पण त्या बाळाच्या वाट्याचे दिवस ते बाळ जगतंच, मोठंही होतं. त्यामुळे तांब्यांच्या काव्यातील त्रिकालाबाधीत सत्याला नाकारण्याचे धाष्ट्य कुणीही करु शकत नाही. परंतू असे असले तरी देखील काही व्यक्तींचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे कालप्रवाहामधे ते आपल्याला सोडून पुढे निघून जरी गेले तरी देखील त्यांची कमतरता ही पदोपदी जाणवत राहते. आपले जीवन थांबते असे नाही पण त्या व्यक्तीने आपल्याकरीता असे काही कमालीचे मानसिक आधार तयार केलेले असतात की त्या आधारांच्या रुपाने त्या व्यक्तीचे अस्तित्व सारखे जाणवत राहते. अशीच एक व्यक्ती आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात वेगवेगळ्या परीस्थितीतील मानसिक आधारांच्या रुपाने हजर आहे. दोन वर्षे झाली तिचे ऐहिक अस्तित्व संपून.. आजच्याच दिवशी..परंतू तिच्या मानसिक आधारांचे अस्तित्व चिरंतन आहे हे मला व अनेकांना जाणवत असलेला हा प्रवास…
फार एकटे वाटत होते त्या दिवशी. कारण कळत नव्हते. काहीतरी आपल्या जवळ असावे परंतू आपल्या जवळ राहूच शकत नाही अशी मनाची अगतिकता जाणवत होती. कुणाच्यातरी सहवासाची आत्यंतिक ओढ वाटत असताना तोच सहवास मिळू नये ही वेदना व्यक्त करणेही कठीण होत होते. मन रमविण्यासाठी रेडीओ सुरु केला… अन् ती गात होती..
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,
अजुनही वाटते मला की, अजुनही चांदरात आहे…
स्वरांमधील ती आर्तता ह्रदयाला भेदून गेली व आपसुकच डोळ्यातून अश्रुंवाटे बाहेर पडली.. ती आहे.. अजुनही आहे.
विचार सुरु होते मनात… नवीन काहीतरी करायला हवे, नव्या वाटा चोखंदळायला हव्या. आपल्या कामाचा कॅनव्हास वाढला पाहिजे. पण त्याचवेळी या नव्या गोष्टी करण्याने व नवे स्विकारण्याने विस्कटणारी घडी देखील दिसत होती. मन संभ्रमात होते. काय करावे? सारे काही सोडून घ्यावी झेप आणि निघून जावे वर्तुळाच्या पल्याड, नव्याने सुरु करावे सारे.. पण नवतेचा ध्यास व त्याची स्वप्ने रेखाटली जातानाच दिसत होते काही चेहेरे ज्यांनी आयुष्य जोडलेय सोबत, ज्यांना गरज आहे प्रत्यक्ष सहवासाची, ज्यांना गरज आहे माझी… संभ्रमित मनाने एकटाच निघालो.. गाडी चालवत…न ठरविलेल्या दिशेने, मनाला शांत करण्यासाठी, नेहेमीच्या सवयीप्रमाणे आपसुकच म्युझीक ऑन केले आणि त्रासलेल्या मनावर मायेची फुंकर घातली जावी अश्या दैवी सुरांमधे ती गात होती…
कभी पास बैठे, किसी फूल के पास..
सुनो ये महकता है, बहोत कुछ कहता है..
कभी गुनगुनाके, कभी मुस्कुराके..
कभी चुपके चुपके, कभी खिलखिलाते,
जहाँ पे सवेरा हो, बसेरा वहीं है..
शिक्षणाकरीता मुले परगावाला गेल्यावर फार कठीण अवस्था होते. विशेषतः सुरुवातीच्या काळात तर ज्या अनेक गोष्टींकरीता ती मुले आपल्यावर अवलंबून असतात त्या साऱ्या गोष्टी ते कसे करतील ही चिंता फार त्रास देणारी ठरते. कधी कधी तर मुलांची एवढी आठवण येते की त्याक्षणी त्यांना भेटायला जावे वाटते. त्यांची प्रकृती ठीक नसेल तर जास्तच ओढीने त्यांना मदत करायला जावे वाटते. आपल्या मायेच्या पंखाखाली त्यांना घ्यावे वाटते. पण हे शक्य नसते. आपलेही आपल्या बसेरामधे सुरु असलेले जीवन आपल्याला असे तडक बाहेर पडू देत नाही. मग मुलांनी आता काही दिवसांकरीता का होईना पण घरी यावे असे वाटत राहते. तिन्ही सांजेला… झुंजुमुंजु असताना…अंगणातील पाळण्यावर बसून त्यांची खूप आठवण येत असताना हेडफोनवर आपल्या आवडीच्या गाण्याच्या यादीमधील एक गाणे आपोआपच लागते.. ती पुन्हा आर्त स्वरात गात असते…
या चिमण्यांनो परत फिरा.. घराकडे अपुल्या…
तिन्ही सांजा जाहल्या…
आपल्या घरच्या चिमण्यांच्या आठवणीने गलबलून गेलेले मन…सर्वांच्या नकळत अश्रू ढाळून मोकळे होते. आयुष्याच्या अनेक वळणांवर वेगवेगळ्या भावविश्वांमधे आपल्या भावना जेव्हा तिच्या अमृतमयी स्वरांमधून व्यक्त होतात तेव्हा जाणवते… ती अजुनही आहे… ऐहिक रुपात नसली तरी मनातील भावविश्वाची प्रेरक बनून थेट मर्मस्थानी विराजमान आहे.. कायम राहणार आहे!!
सुंदर,
ReplyDeleteपण मी निशब्द🙏
अप्रतिम
ReplyDelete