थोडा है थोडे की जरुरत है @ 13.02.14

सिवा तेरे कुछ भी….

उद्याचा दिवस १४ फेब्रुवारी सबंध जगात प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो. खरे तर आपल्या सांस्कृतिक चौकटीत असा प्रेमाचा दिवस बसत नव्हता. असे विशेष दिवस नाहीत असे नाही परंतू ते सारे दिवस सामाजिक दृष्टीने एकत्रीकरण साजरे करणारेच आहेत. केवळ एका व्यक्तीकरीता साजरा केला जाणारा दिवस ही संकल्पना आपल्याकडे नव्हती. परंतू पाश्चिमात्य देशांमधे समाजिक चौकटींपेक्षा व्यक्तिगत विचारांना जास्त प्राधान्य दिले जात असल्याने हे असले दिवस साजरे केले जातात. जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेमधे विचारांचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता हे सारे दिवस पर्यायाने प्रेमदिवस आपल्याकडेही साजरा केला जातो. या साजरीकरणाचे स्वरुप बरेचवेळा फार विचित्र असते त्यामुळे त्यावर टीका देखील केली जाते. परंतू नव्या तंत्रज्ञानाने जवळपास एकच झालेल्या जगात हे असे प्रभाव दिसणे स्वाभाविक आहे. त्याला फार विरोध करणे कठीण आहे किंबहुना केलेला विरोध संधर्षाच्या पद्धतीने वेगळ्या स्वरुपात उफाळून येतो. त्यापेक्षा ज्या प्रेमाकरीता हा दिवस साजरा केला जातो त्या प्रेमाचे स्वरुप किती समर्पित असू शकते ते तसे असेल तरच ते खरे प्रेम म्हणावे लागेल हे पटवून देता आले तर काही फरक पडू शकतो. निदान व्हॅलेंटाईन आठवड्यापुरते एकमेकांवर प्रेम करून आयुष्याचा खेळ करून घेणारे काही तरुण तरुणी प्रेमाच्या खऱ्या स्वरुपाबद्दल विचार तरी करतील. प्रेमाचे असे उदात्त समर्पित रुप दाखविणारे एक गीत मला नुकतेच ऐकायला मिळाले. सुप्रसिद्ध चित्रपट निर्देशक संजय लीला भन्साली याच्या संगीताने नटलेल्या सुकून नावाच्या एका अल्बममधे हे गाणे मी ऐकले. प्रेमाचे किती पवित्र स्वरुप यात मांडले आहेप्रेम म्हणजे समर्पण जोडीदारप्रती श्रद्धा हाच भाव यामधे जाणवतो. .एम. तुराज या कवीचे हे शब्द किती उत्कट प्रेम व्यक्त करतात

सिवा तेरे कुछ भी दिखाई दे 

ख़ुदा इस सज़ा से रिहाई दे 

तुझ्या शिवाय मला काहीच दिसत नाही. प्रेमामुळे माझे जणू भान हरपलेले आहे. माझे जीवनच तुझ्या भोवती गुंफल्या गेले आहे. मी इतर कोणत्याही गोष्टींना न्याय देऊ शकत नाही. माझ्यासाठी तर ही एक शिक्षाच आहेपरंतू ही शिक्षा एवढी गोड किंवा हवीहवीशी आहे की परमेश्वराला माझी विनवणी आहे की या शिक्षेमधून माझी कधीही सुटका होऊ नये. कारण तुझ्याशिवाय इतर काही दिसणे हाच माझ्या जीवनाचा आयाम आहे तेच माझे ध्येय देखील आहे. प्रेमामधे समर्पणाची भावना असल्यामुळे ही शिक्षा असूनही हवीहवीशीच वाटतेय.

प्रेम म्हणजे नाते नाते नेहेमी दोन व्यक्तींमधे असते ज्या दोन व्यक्ती भिन्न मनोभुमिका घेऊन जगत असतात. अश्या दोन व्यक्तींमधे बरेच वेळ गैरसमज होतात, वादही होतात, हक्कांची देवाण घेवाण होते, अपेक्षांचा हिशोबही होतो. कधी कधी तर नाते तुटण्यापर्यंत देखील पोहोचते, अनेकवेळा ते तुटते देखील. परंतू या कवीने वर्णन केलेल्या प्रेमात संपुर्ण समर्पणाची भावना असल्याने त्यामधे शंकांना वावच नाही. म्हणूनच या निस्सीम नात्यात सवाल जवाब नाहीत, संशयाला वाव नाही, कोणतेही स्पष्टीकरण मागणे देखील नाही. म्हणूनच त्या संपुर्ण विश्वासाला कवीने व्यक्त केले आहे..

मुझे तेरी हर बात पर है यक़ीं अब 

ख़ुदा के लिए तू सफ़ाई दे

या प्रेमामधे एकमेकांबद्दल निरातीशय प्रेम एकमेकांची मनोभावे काळजी वाहणे देखील आहे. प्रेम असल्याने त्यासोबत विरह, त्याचा वियोग, त्यामधून निर्माण होणारे दुःख, त्याच्या सोबत सहन करावी लागणारी वेदना हे सारे काही आहेच. परंतू ते एकमेकांचे दुःख एकमेकांना कळू नये ही धडपड देखील आहे. कारण ती वेदना कळली तर आपल्या जोडीदारालाही वेदना होतील त्या होऊ नये म्हणून त्या लपविण्याचा गोड प्रकार देखील आहे.

मेरी आह सुनकर तू बेचैन होगा 

दुआ है तुझे कुछ सुनाई दे 

अश्या पद्धतीचे समर्पित प्रेम जर असेल तर मग ते व्यक्त करण्यासाठी केवळ एक दिवस साजरा करून भागणार नाही कारण असे प्रेम ही आयुष्यभराची जबाबदारी असते ज्याचे निर्वहन करताना जोडीदाराची नितांत काळजी घेणे, संपुर्ण विश्वास ठेवणे भावनांची मनापासून जपणुक करणे ही फार कठीण बाब करावी लागते. प्रेमाचे हे असे निरामय स्वरुप जर लक्षात आले तर ते एखाद्या दिवसापुरते मर्यादित राहता ती जबाबदारी पेलण्याची कुवत निर्माण झाल्यावरच अनुभवण्याची मानसिकता तयार होईल आणि त्यानंतरच हे आठवड्याभरापुरते प्रेमाचे उथळ साजरीकरण कमी होईल. होय ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18